Thursday, August 17, 2017

Samas Dusara Brahma Nirupan समास दुसरा ब्रह्मनिरुपण


Dashak Satava Samas Dusara Brahma Nirupan 
Samas Dusara Brahma Nirupan It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Brahma. What is Brahma? Brahma is beyond name and form and face. It is God. Though it is beyond name some names are given to have an idea about Brahma. There are some qualities of Brahma, are described in here. Brahma is one and same for king or poor person. There are no discrepancies. It is same to a famous person and for ordinary person. We will come to know about Brahma in this samas.
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 
श्रीराम ॥
ब्रह्म निर्गुण निराकार । ब्रह्म निःसंग निर्विकार ।
ब्रह्मासि नाहीं पारावार । बोलती साधु ॥ १ ॥
१) साधु असें सांगतात कीं, ब्रह्म गुणरहित, आकाररहित, संगरहित, विकाररहित आणि मर्यादासुद्धा नसलेले आहे. 
ब्रह्म सर्वांस व्यापक । ब्रह्म अनेकीं येक ।
ब्रह्म शाश्वत हा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ २ ॥
२) ब्रह्म सर्वांना व सर्वाला व्यापून आहे. अनेकांमध्यें एकपणानें आहे. तें शाश्वत आहे, असे शास्त्रांत सांगितलें आहे.   
ब्रह्म अच्युत अनंत । ब्रह्म सदोदित संत ।
ब्रह्म कल्पनेरहित । निर्विकल्प ॥ ३ ॥
३) ब्रह्म कधीं न ढळणारें, अंत नसणारे, तें नेहमी स्थिर आहे. त्याची कल्पना करतां येत नाही. तें कल्पनारहित आहे.
ब्रह्म या दृश्यावेगळें । ब्रह्म सुन्यत्वास निराळें ।
ब्रह्म इंद्रियांच्या मेळें । चोजवेना ॥ ४ ॥
४) ब्रह्म दृश्याहून अगदीं वेगळें आहे. दृश्य लय पावल्यावर शून्य उरतें. त्याहूनसुद्धा ब्रह्म वेगळें आहे. सर्व इंद्रियांनी जाणण्याचा प्रयत्न केला तरी तें त्यांना कळत नाही.  
ब्रह्म दृष्टीस दिसेना । ब्रह्म मूर्खासी असेना ।
ब्रह्म साधुविण येना । अनुभवासी ॥ ५ ॥
५) ब्रह्म डोळ्यांना दिसत नाही. म्हणून मूढ लोकांना तें नसल्यासारखेंच, साधूच्या मार्गदर्शनाशिवाय ब्रह्माचा अनुभव येत नाही.  
ब्रह्म सकळांहूनि थोर । ब्रह्म ऐसें नाहीं सार ।
ब्रह्म सूक्ष्म अगोचर । ब्रह्मादिकांसी ॥ ६ ॥
६) ब्रह्म सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रह्मासारखें दुसरें काहींच चांगलें नाही. ब्रह्म अती सूक्ष्म आहे. ते ब्रह्माआदि देवांनासुद्धा जाणता येत नाही.  
ब्रह्म शब्दीं ऐसें तैसें । बोलिजे त्याहुनि अनारिसें । 
परी तें श्रवणअभ्यासें । पाविजे ब्रह्म ॥ ७ ॥
७) ब्रह्म हें असें आहे, तसें आहे असें वर्णन केले तरी तें त्याहूनही वेगळेंच आहे. श्रवण व साधना अभ्यास करुन ते ब्रह्म जाणणें शक्य आहे.  
ब्रह्मास नामें अनंत । परी तें ब्रह्म नामातीत ।
ब्रह्मास हेतदृष्टांत । देता न शोभती ॥ ८ ॥ 
८) ब्रह्माला पुष्कळ नांवे आहेत. पण ब्रह्म या सर्व नामांच्या पलीकडेच आहे. कोणतेही नाम स्वरुप कसें आहे तें सांगू शकत नाही. दृश्यांतील वस्तुंच्या द्वारे ब्रह्म समजत नाही.  
ब्रह्मासारिखें दुसरें । पाहातां काय आहे खरें ।
ब्रह्म दृष्टांतउत्तरें । कदा न साहे ॥ ९ ॥
९) या ब्रह्मांडामध्यें ब्रह्मासारखें दुसरें कांहीं नाही. त्यामुळें दृष्टांत देऊन ब्रह्माचे वर्णन करता येत नाही. 
श्रुति ॥
यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह ॥
जेथें वाचा निवर्तती । मनासी नाहीं ब्रह्मप्राप्ती ।
ऐसी बोलिली श्रुती । सिद्धांतवचन ॥ १० ॥
१०) ब्रह्मापाशी वाणी माघार घेते. मनाला ब्रह्माची प्राप्ती होत नाही. असें अंतिम सत्य श्रुति बोलली आहे.  
कल्पनारुप मन पाहीं । ब्रह्मीं कल्पनाचि नाहीं ।
म्हणौनि वाक्य कांहीं । अन्यथा नव्हे ॥ ११ ॥
११) सारख्या कल्पनाकरीत राहणें हे मनाचे स्वरुप आहे. पण ब्रह्मामध्यें कल्पनेला स्थान नाही. म्हणून श्रुतिनें सांगितलेला सिद्धांत खोटा नाही. 
आतां मनासि जें अप्राप्य । तें कैसें होईल प्राप्त ।
ऐसें म्हणाल तरी कृत्य । सद्गुरुविण नाहीं ॥ १२ ॥
१२) मनाला जें प्राप्त करुन घेता येत नाही. तें कसें प्राप्त करुन घ्यावें असें विचाराल तर सद्गुरुशिवाय तें होणार नाहीं हें समजून घ्यावें.
भांडारगृहें भरलीं । परी असती आडकिलीं ।
हातास न येतां किली । सर्व हि अप्राप्त ॥ १३ ॥ 
१३) कोठारें धान्यादिंनी भरलेली आहेत. पण ती कुलुपें लावून बंद करुन ठेवलीं आहेत तर किल्ली आपल्याजवळ नसेल तर कोठारांतील वस्तु आपल्याला अप्राप्यच आहेत.  
तरी ते किली ते कवण । मज करावी निरुपण ।
ऐसा श्रोता पुसे खूण । वक्तयासी ॥ १४ ॥
१४) तेव्हां श्रोत्यानें वक्त्यास विचारलें कीं, मग (ब्रह्मज्ञान प्राप्त करुन घेण्याची) ती किल्ली कोणती तें मला सांगा.
सद्गुरुकृपा तेचि किली । जेणें बुद्धि प्रकाशली ।
द्वैतकपाटें उघडलीं । येकसरीं ॥ १५ ॥
१५) सद्गुरुची कृपा संपादन करणें हीच ती किल्ली होय. त्यानेच द्वैताची घट्ट कपाटें एकदम उघडली जातात. असे वक्यानें श्रोत्यास सांगितले.
तेथें सुख असे वाड । नाहीं मनास पवाड ।
मनेंविण कैवाड । साधनाचा ॥ १६ ॥
१६) आत्मबुद्धीमध्यें सुखाला कमतरता नाही. तेथें पुष्कळ सुख मिळते. तेथें मनाचा शिरकाव होत नाही. पण साधना चालूंच राहाते. 
त्याची मनेंविण प्राप्ती । किं वासनेविण तृप्ती । 
तेथें न चले वित्पत्ती । कल्पनेची ॥ १७ ॥
१७) स्वस्वरुपाच्या प्राप्तीसाठीं मनाची आवश्यकता नाही. वासना तृप्त न करतां तृप्ती मिळते. अशा त्या अवस्थेची कल्पनानें आकलन होणें शक्य नाही. 
तें परेहूनि पर । मनबुद्धीअगोचर  ।
संग सोडितां सत्वर । पाविजेतें ॥ १८ ॥
१८) ब्रह्मस्वरुप अनुभवाप्रमाणें आपण समजतो त्याच्याही पलीकडे आहे. तें मन व बुद्धीच्या आटोक्याबाहेंरचे आहे. पण जर साधकानें देहाचा संबंध सोडला तर तें लगेच प्राप्त होते.  
संग सोडावा आपुला । मग पाहावें तयाला ।
अनुभवी तो या बोला । सुखावेल गा ॥ १९ ॥
१९) आपण आपल्या देहबुद्धीचा संबंध सोडला तर मग ब्रह्मस्वरुप पाहाता येईल. जे स्वानुभवी आहेत त्यांना माझ्या बोलण्याने बरे वाटेल.
आपण म्हणिजे मीपण । मीपण म्हणिजे जीवपण ।
जीवपण म्हणिजे अज्ञान । संग जडला ॥ २० ॥
२०) ज्याचा संबंध सोडायचा ते आपण म्हणजे आपला मीपणा होय. मीपणा म्हणजेच जीवपणा आणि जीवपणा म्हणजे आपले अज्ञान होय. म्हणजेच देहबुद्धीचा संग सोडणें.  
सोडितां तया संगासी । ऐक्य होये निःसंगासी ।
कल्पनेविण प्राप्तीसी । अधिकार ऐसा ॥ २१ ॥
२१) जीवपणाचा संबंध सोडला कीं, संबंधरहित ब्रह्मस्वरुपाशीं ऐक्य घडून येते. कल्पनेशिवाय स्वस्वरुपाशी तादात्म्य होण्याचा अधिकार प्राप्त होतो.
मी कोण ऐसें नेणिजे । तया नाव अज्ञान बोलिजे ।
अज्ञान गेलियां पाविजे । परब्रह्म तें ॥ २२ ॥
२२) " मी खरा कोण आहे " हे न कळणें म्हणजेच अज्ञान होय. अज्ञान गेल्यावर परब्रह्म प्राप्त होते. 
देहबुद्धीचें थोरपण । परब्रह्मीं न चले जाण ।
तेथें होतसे निर्वाण । अहंभावासी ॥ २३ ॥
२३) देहबुद्धीचा अहंकार परब्रह्मांत चालत नाही. त्याठिकाणी अहंभावाचे पूर्ण निरसन करावयाचे असते.  
उंच नीच नाहीं परी । राया रंका येकिच सरी ।
जाला पुरुष अथवा नारी । येकचि पद ॥ २४ ॥
२४) ब्रह्मस्वरुपामध्यें उच्च नीच असा भेदभाव नाही. तेथें राजा व रंक सारखेच असतात. स्त्री किंवा पुरुष सर्वांना ब्रह्मपद सारखेंच प्राप्त होते.
ब्राह्मणाचें ब्रह्म तें सोंवळें । शूद्राचें ब्रह्म तें वोवळें ।
ऐसें वेगळें आगळें । तेथें असेचिना ॥ २५ ॥
२५) ब्राह्मणाचे ब्रह्म सोवळें, शूद्राचे ब्रह्म औवळें असे वेगळेपणाचे लहान-मोठे भेद तेथें नसतात. 
उंच ब्रह्म तें रायासी । नीच ब्रह्म तें परिवारासी । 
ऐसा भेद तयापासीं । मुळिंच नाहीं ॥ २६ ॥
२६) राजाला उत्तम ब्रह्म व परिवारांतील लोकांना कनिष्ठ ब्रह्म असा भेदाभेद त्यापाशी मुळींच नसतो.  
सकळांसि मिळोन ब्रह्म येक । तेथें नाहीं हे अनेक ।
रंक अथवा ब्रह्मादिक । तेथेंचि जाती ॥ २७ ॥
२७) अगदीं सगळ्या जीवांना ब्रह्म एकच आहे. रंक किंवा ब्रह्मादिक देव असोत सर्वजण एकाच ब्रह्माला जातात.
स्वर्ग मृत्य आणि पाताळ । तिहीं लोकींचे ज्ञाते सकळ ।
सकळांसि मिळोन येकचि स्थळ । विश्रांतीचें ॥ २८ ॥
२८) स्वर्ग, मृत्यु व पाताळ या तिन्ही लोकांतील आत्मज्ञानी सर्वांना विश्रांतीचे एकच ठिकाण म्हणजे परब्रह्मच. 
गुरुशिष्या येकचि पद । तेथें नाहीम भेदाभेद ।
परी या देहाचा संबंध । तोडिला पाहिजे ॥ २९ ॥
२९) सद्गुरुला व शिष्याला दोघांनाही एकच ब्रह्मपद तेथें भेदाभेद नाही. देहाशी संबंध मात्र सोडला पाहिजे.  
देहबुद्धीचा अंतीं । सकळांसि येक चि प्राप्ती ।
येक ब्रह्म द्वितीयं नास्ति । हें श्रुतिवचन ॥ ३० ॥
३०) देहबुद्धीचा अभिमान, संबंध सोडल्यावर तीचा अंत घडून आल्यावर एकच ब्रह्म प्राप्त होते. ब्रह्म दुसरे नसते. असे श्रुति वचन आहे.   
साधु दिसती वेगळाले । परी ते स्वरुपीं मिळाले ।
अवघें मिळोन येकचि जाले । देहातीत वस्तु ॥ ३१ ॥
३१) साधु देहानें वेगळें दिसतात. तरी अंरंगाच्या दृष्टीनें तें एकाच आत्मस्वरुपांत मिसळून जातात. आत्मस्वरुपांत मिसळले कीं, सर्व मिळून एकच देहाच्या पलीकडील एकच ब्रह्मवस्तु होऊन जातात. 
ब्रह्म नाहीं नवें जुनें । ब्रह्म नाहीं अदिक उणें ।
उणें भाविल तें सुणें । देहबुद्धीचें ॥ ३२ ॥
३२) ब्रह्म हें नवें अगर जुनें नाही. तें अधिक नाही तसेच उणे नाही. ब्रह्म उणे आहे असे ज्याला वाटते तो माणुस देहबुद्धीचा गुलाम असतो. 
देहबुद्धीचा संशयो । करी समाधानाचा क्षयो ।
चुके समाधानसमयो । देहबुद्धीयोगें ॥ ३३ ॥
३३) देहबुद्धीमध्यें अविद्या, अज्ञान असते. त्यामुळें अनेक संशय निर्माण होतात. संशयांमुळें समाधान नष्ट होते. 
देहाचें जें थोरपण । तेंचि देहबुद्धीचें लक्षण ।
मिथ्या जाणोनि विचक्षण । निंदिती देहो ॥ ३४ ॥   
३४) देहच (मी आहे) मोठा आहे असे वाटणे. हे देहबुद्धीचे मुख्य लक्षण आहे. परंतु शहाणें लोक देहाचा अशाश्वतपणा, खोटेपणा ओळखतात व देहाचे दोष पाहतात.          
देह पावे जंवरी मरण । तंवरी धरी देहाभिमान । 
पुन्हा दाखवी पुनरागमन । देहबुद्धि मागुती ॥ ३५ ॥
३५) देह जीवंत आहे तो पर्यंत जीव देहाचा मीपणाने अभिमान धरतो. मात्र मरणाधीन झाल्यावर हीच देहबुद्धी परत जन्म घ्यावयास लावते.
देहाचेनि थोरपणें । समाधानासी आलें उणें ।
देहो पडेल कोण्या गुणें । हें हि कळेना ॥ ३६ ॥
३६) देहबुद्धीमुळें देहाला महत्व येते. परंतु त्यामुळें समाधानाला कमीपणा येतो. हाच देह कधीं, केव्हां पडेल हें देखिल कळत नाही.
हित आहे देहातीत । म्हणौनि निरोपिती संत ।
देहबुद्धीनें अन्हित । होंचि लागे ॥ ३७ ॥
३७) साधु संत देहाच्या पलीकडे जाण्यांत जीवाचे कल्याण आहे, असेच सांगतात. देहबुद्धी वाढल्यानें आपलेंच नुकसान होते. 
सामर्थ्यबळें देहबुद्धी । योगियांसि तेहि बाधी ।
देहबुद्धीची उपाधी । पैसावों लागे ॥ ३८ ॥
३८) देहबुद्धी फार शक्तीशाली असते. ती योग्यांनासुद्धा त्रास देते. सिद्धीचा उपयोग करुन मोठेपण मिळवणें, व्याप वाढविणें हा देहबुद्धीच प्रभाव आहे.  
म्हणौनि देहबुद्धि हे झडे । तरीच परमार्थ घडे  ।
देहबुद्धीनें विघडे । ऐक्यता ब्रह्मीची ॥ ३९ ॥
३९) म्हणुन देहबुद्धी क्षीण झाली, तरच परमार्थांत पाऊल पडते. अन्यथा देहबुद्धीमुळें ब्रह्माशी ऐक्यता होत नाही. 
विवेक वस्तूकडे वोढी । देहबुद्धि तेथूनि पाडी ।
अहंता लाऊन निवडी । वेगळेपणें ॥ ४० ॥
४०) आत्मानात्मविवेक जीवाला परमार्थाकडे ओढतो. तर देहबुद्धी त्याला मागें ओढते. नंतर देहबुद्धींतून निर्माण झालेल्या अहंकारानें तो सद्वस्तुपासून वेगळा होतो.
विचक्षणें याकारणें । देहबुद्धि त्यजावी श्रवणें ।
सत्यब्रह्मीं साचारपणें । मिळोन जावें ॥ ४१ ॥
४१) म्हणुन शहाण्यानें देहबुद्धी सोडावी. ब्रह्म जे सत्य आहे, त्याच्याशी समरुप व्हावे.  
सत्यब्रह्म तें कवण । ऐसा श्रोता करी प्रश्र्ण ।
प्रत्योत्तर हे आपण । वक्ता श्रोतयासी ॥ ४२ ॥
४२) ती सद्वस्तु कशी आहे? असा श्रोत्यानें प्रश्र्ण केला. त्याला आता वक्ता उत्तर देत आहे.  
म्हणे ब्रह्म येकचि असे । परी तें बहुविध भासे ।
अनुभव देहीं अनारिसें । नाना मतीं ॥ ४३ ॥
४३) ब्रह्म एकच आहे. पण तें अनेक प्रकारांनीं भासते. वेगवेगळ्या माणसांना तें त्यांच्या त्यांच्या मनोरचनेप्रमाणें अनुभवास येते.   
जें जें जया अनुभवलें । तेंचि तयासि मानलें ।
तेथेंचि त्याचें विस्वासलें । अंतःकर्ण ॥ ४४ ॥
४४) माणसाला ज्या प्रकारें अनुभवास येते, तेच तो खरे मानतो. त्या स्वरुपाबाबत त्याच्या मनांत विश्र्वास निर्माण होतो.   
ब्रह्म नामरुपातीत । असोनि नामें बहुत ।
निर्मळा निश्र्चळ निवांत । निजानंद ॥ ४५ ॥
४५) ब्रह्म हें नामारुपाच्या पलीकडे आहे. म्हणजे त्याला नाम व रुप यांची जरुरी नसूनही त्याला (साधकांनी) नावे दिली आहेत. त्याला निर्मळ, निश्र्चळ, निवांत व निजामंदांत असलेले, अशी कांहीं नामें दिली आहेत.
अरुप अलक्ष अगोचर । अच्युत अनंत अपरांपर ।
अदृश्य अतर्के अपार । ऐसीं नामें ॥ ४६ ॥
४६) ब्रह्म अरुप आहे कारण त्यास रुप नाही. अलक्ष आहे कारण त्यास पाहाता येत नाही. अगोचर आहे कारण इंद्रियांना आकलन होत नाही. अच्युत कारण स्थान सोडत नाही. अनंत आहे कारण त्याचा आदि अंत लागत नाही. तें अपरंपार आहे कारण त्यास मर्यादा नाहीत. तें अदृश्य आहे, अतर्क्य आहे. ते अपार आहे. अशी ब्रह्माची नावें आहेत. 
नादरुप ज्योतिरुप । चैतन्यरुप सत्तारुप ।
साक्षरुप सस्वरुप । ऐसीं नामें ॥ ४७ ॥
४७) ब्रह्म नादरुप, ज्योतिरुप, चैतन्यरुप, सत्तारुप,साक्षरुप व स्वसरुप आहे.   
सुन्य आणी सनातन । सर्वेश्र्वर आणी सर्वज्ञ ।
सर्वात्मा जगजीवन । ऐसीं नामें ॥ ४८ ॥
४८) तें शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर, सर्वात्मा व सर्व जगाचे जीवन आहे. अशी त्याची नावें आहेत. 
सहज आणी सदोदित । शुद्ध बुद्ध सर्वातीत ।
शाश्वत आणी शब्दातीत । ऐसीं नामें ॥ ४९ ॥ 
४९) ब्रह्म सहज आहे. ते नेहमी आहेच आहे. शुद्धबुद्ध आहे. सर्वातीत आहे. शाश्वत आहे. तें शब्दाच्या पलीकडे आहे.            
विशाल विस्तीर्ण विश्र्वंभर । विमळ वस्तु व्योमाकार ।
आत्मा परमात्मा परमेश्र्वर । ऐसीं नामें ॥  ५० ॥
५०) तें विशाळ आहे, विस्तीर्ण आहे, तें विश्र्वाला भरुन आहे, तें मलरहित आहे, तें आत्मा, परमात्मा, व परमेश्र्वर आहे.   
परमात्मा ज्ञानघन । येकरुप पुरातन ।
चिद्रूप चिन्मात्र जाण । नामें अनाम्याचीं ॥ ५१ ॥
५१) तें परमात्मा आहे. तें ज्ञानाने भरलेले आहे. तें एकरुप आहे. पुरातन आहे. तें चिद्रूप, चिन्मात्र आहे. अशी अनाम ब्रह्माची नावें आहेत.  
ऐसी नामें असंख्यात । परी तो परेश नामातीत ।
त्याचा करावा निश्र्चितार्थ । ठेविलीं नामें ॥ ५२ ॥
५२) ब्रह्माला अशी बरीच नावें आहेत. पण तो परमेश्र्वर नामांच्या पलीकडे आहे. त्याच्या स्वरुपाची कांहींशी कल्पना यावी म्हणुन हीं इतकीं नामें ठेवली आहेत.
तो विश्रांतीचा विश्राम । आदिपुरुष आत्माराम ।
तें येकचि परब्रह्म । दुसरें नाहीं ॥ ५३ ॥
५३) जेथें विश्रांतीला विश्रांती मिळते, असा तो आदिपुरुष आत्माराम आहे. नामें जरी भिन्न दिसली तरी तें एकच एक परब्रह्म आहे. तें दुसरें कांही नाहीं.
तेंचि कळायाकारणें । चौदा ब्रह्मांचीं लक्षणें ।
सांगिजेती तेणें श्रवणें । निश्र्चयो बाणे ॥ ५४ ॥
५४) हें समजावें म्हणून आतां चौदा ब्रह्मांची लक्षणें सांगतो. त्यांच्या श्रवणाने ब्रह्म एकच एक आहे हें तत्व मनांत ठसते. 
खोटे निवडितां येकसरें । उरलें तें जाणिजे खरें ।
चौदा ब्रह्में शास्त्राधारें बोलिजेती ॥ ५५ ॥
५५) जेवढें खोटे तेवढें बाजुस सारलें कीं, जें उरतें तें खरें असते. चौदा ब्रह्मांचे वर्णन शास्त्राच्या आधारें करतो.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मनिरुपणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Brahma Nirupan
समास दुसरा ब्रह्मनिरुपण 


Custom Search
Post a Comment