Dashak Sahava Samas Satava SagunBhajan
Samas Satava SagunBhajan. It is in Marathi. Why Upasana is necessary when disciple has known that what he sees (Drusha or Sagun) is not real and what he don’t see (Nirgun) is real. He has acquired Atmdnya then bhajan or upasana is not necessary. Samartha Ramdas is telling us about that in this Samas Satva.
समास सातवा सगुणभजन
श्रीराम ॥
ज्ञानें दृश्य मिथ्या जालें । तरी कां पाहिजे भजन केलें ।
तेणें काय प्राप्त जालें । हें मज निरोपावें ॥ १ ॥
१) श्रोता म्हणतो कीं, " आत्मज्ञान झाल्यावर हें सगळें दृश्य विश्व खोटें आहे असा अनुभव येतो. मग भजन कां करावें, त्यानें काय मिळतें, तें मला समजावून सांगा.
ज्ञानाहूनि श्रेष्ठ असेना । तरी कां पाहिजे उपासना ।
उपासनेनें जना । काये प्राप्त ॥ २ ॥
२) आत्मज्ञानाहून दुसरें कांहीं श्रेष्ठ नाहीं, मग उपासना कशाला? उपासना करुन लोकांना काय मिळतें?
मुख्य सार तें निर्गुण । तेथें दिसेचिना सगुण ।
भजन केलियाचा गुण । मज निरोपावा ॥ ३ ॥
३) जर अंतिम सत्य निर्गुण आहे आणि तेथें सगुणाला स्थान नाहीं, तर सगुणाचें भजन केल्यानें काय विशेष गुण प्राप्त होतो तें मला सांगावें.
जें समस्त नासिवंत । त्यासि भजावें किंनिमित्य ।
सत्य सांडून असत्य । कोणें भजावें ॥ ४ ॥
४) दृश्य सगळें जर नाशिवंत आहे तर नाशिवंत सगुणाच्या भजनाचें कारण काय? निर्गुण सत्य सोडून सगुण असत्याचें भजन कोण करणार?
असत्याचा प्रत्यये आला । तरी मग नेम कां लागला ।
सत्य सांडून गल्बला । कासया करावा ॥ ५ ॥
५) दृश्य खोटे आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला मग सगुण देवाचें भजनपूजनाचा नियम कशाला करावयाचा? सत्य बाजूस करुन असत्याचा पसारा कशाला वाढवायचा?
निर्गुणानें मोक्ष होतो । प्रत्यक्ष प्रत्यया येतो ।
सगुण काये देऊं पाहातो । सांगा स्वामी ॥ ६ ॥
६) निर्गुणानें मोक्ष मिळतो. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. मग सगुणोपासनेपासून काय प्राप्त होते तें स्वामी आपण मला सांगा.
सगुण नासिवंत ऐसें सांगतां । पुन्हा भजन करावें म्हणतां ।
तरी कशासाठीं आतां । भजन करुं ॥ ७ ॥
७) आपण सगुण नाशिवंत आहे असे सांगता. पुन्हा भजन करावें असें म्हणता. तर मी सगुणाचे भजन कशासाठीं करुं?
स्वामीचे भिडेनें बोलवेना । येर्हवीं हें कांहींच मानेना ।
साध्यचि जालियां साधना । कां प्रवर्तावें ॥ ८ ॥
८) स्वामी तुमची भीड म्हणून स्पष्ट बोलतां येत नाही. तरी पण तुम्हीम सांगितलेले पटत नाही. साध्य मिळाल्यावर साधन करावयाचे कारण काय?
ऐसें श्रोतयाचें बोलणें । शब्द बोले निर्बुजलेपणें ।
याचें उत्तर ऐकणें । म्हणे वक्ता ॥ ९ ॥
९) श्रोता असें गोंधळून गेल्याने असें बोलला. आतां वक्ता याचे उत्तर देतो तें ऐका.
गुरुचें वचन प्रतिपाळणें । हें मुख्य परमार्थाचें लक्षण ।
वचनभंग करितां विलक्षण । सहजेंचि जालें ॥ १० ॥
१०) गुरुचें वचन पाळावें हें परमार्थाचें मुख्य लक्षण आहे. गुरुचें वचन मोडलें तर भलतेंच कांहीं आपोआप घडते.
म्हणोनि आज्ञेसी वंदावें । सगुणभजन मानावें ।
श्रोता म्हणे हे देवें । कां प्रयोजिलें ॥ ११ ॥
११) म्हणुन गुरुची आज्ञा मानावी. आणि सगुणोपासना करावी. श्रोता म्हणतो, गुरुदेव, सगुणभजन करण्याचा हेतु कोणता?
काय मानिला उपकार । कोण जाला साक्षात्कार ।
किंवा प्रारब्धाचें अक्षर । पुसिलें देवें ॥ १२ ॥
१२) सगुणोपासनेंत कांही उपकार घडतो कां? साक्षात्कार होतो कां? कां प्रारब्धांत असलेले देव पुसतो?
होणार हें तों पालटेना । भजनें काय करावें जना ।
हें तों पाहतां अनुमाना । कांहींच न ये ॥ १३ ॥
१३) जें होणार आहे ते चुकत नाही. मग सगुणभजनाचा लोकांना काय उपयोग? असा विचार केल्यावर बुद्धीला कांहींच पटत नाही.
स्वामीची आज्ञा प्रमाण । कोण करील अप्रमाण ।
परंतु याचा काय गुण । मज निरोपावा ॥ १४ ॥
१४) स्वामीची आज्ञा मान्य आहे. आज्ञेला कोण अप्रमाण मानिल? परंतु सगुणभजनाचें फळ काय मिळतें तें मला सांगा.
वक्ता म्हणे सावधपणें । सांग ज्ञानाची लक्षणें ।
तुज कांहीं लागे कारणें । किंवा नाहीं ॥ १५ ॥
१५) वक्ता सावधपणें म्हणतो कीं, हे बघा मला आत्मज्ञानाची लक्षणें सांगा. त्यांत गुणानें म्हणजे देहानें तुला कांहीं करावें लागते कां नाहीं ते मला सांग.
करणें लागे भोजन । करणें लागे उादकप्राशन ।
मळमूत्र त्याग लक्षण । तेंहि सुटेना ॥ १६ ॥
१६) तुला जेवावे लागते, पाणी प्यावें लागते. मलमूत्राचा त्याग करावा लागतो. हें कांहीं चुकत नाही.
जनाचें समाधान राहावें । आपुलें पारिखें वोळखावें ।
आणि भजनचि मोडावें । हें कोण ज्ञान ॥ १७ ॥
१७) आपल्या लोकांचे बरें चालावें. त्यांचे समाधान टिकावें. असें तुला वाटते. मी माझें, तूम तुझे असा आपपरभाव तूं ओळखतोस. मग सगुणाचे भजनपूजन सोडून द्यावे हें कोठले ज्ञान?
ज्ञानविवेकें मिथ्या जालें । परंतु अवघें नाहीं टाकिलें ।
तरी मग भजनेंचि काय केलें । सांग बापा ॥ १८ ॥
१८) आत्मज्ञानामुळें दृश्य सगळें खोटे आहे हे निश्र्चयपूर्वक कळले. तरी देह असेपर्यंत दृश्याचा त्याग करताम येत नाही. मग भजनानेंच काय बिघडले तें सांग.
साहेबास लोटांगणीं जावें । नीचासारिखें व्हावें ।
आणि देवास न मनावें । हें कोण ज्ञान ॥ १९ ॥
१९) साहेबापुढें तूं लोटांगण घालतोस. लाचार होतोस. मात्र सगुण देवाला तेवढे मानत नाहीस. हें कोठचे ज्ञान?
हरीहर ब्रह्मादिक । हे जयाचे आज्ञाधारक ।
तूं येक मानवी रंक । भजेसिना तरी काय गेलें ॥ २० ॥
२०) ब्रह्मा, विष्णु व महेश हे देवसुद्धा ईश्र्वराच्या आज्ञेप्रमाणें वागतात. तुझ्यासारख्या कःपदार्थ माणसानें त्याचे भजनपूजन केलें नाहीं तर त्याचे काय जाणार आहे?
आमुचें कुळीं रघुनाथ । रघुनाथें आमुचा परमार्थ ।
जो समर्थाचाहि समर्थ । देवां सोडविता ॥ २१ ॥
२१) माझ्या कुळाचे कुळदैवत श्रीराम आहे. श्रीरामाच्या कृपेने माझा परमार्थ चालतो. तो समर्थांचाही समर्थ आहे. त्यानें देवांना रावणाच्या कैदेतूंन सोडविले.
त्याचे आम्ही सेवकजन । सेवेकरितां जालें ज्ञान ।
तेथें अभाव धरितां पतन । पाविजेल कीं ॥ २२ ॥
२२) त्या रामाचा मी सेवक आहे. त्याची सेवा केल्यामुळें देहबुद्धि जाऊन मला आत्मज्ञान झालें. हें माझे म्हणणे तूं खरें मानावेस न पेक्षा तुझे अधःपतन झाल्याखेरीज राहाणार नाही.
गुरु सांगती सारासार । त्यास कैसें म्हणावें असार ।
तुज काय सांगणें विचार । शाहाणे जाणती ॥ २३ ॥
२३) सद्गुरु सारासार विचारानें सार कोणतें तें निश्र्चितपणें सांगतात. त्याला असार म्हणणे चुकीचे आहे. तुला हें सांगणें पटत नसल्यानें तुला काय सांगणार? शहाण्यांना हे बरोबर समजते.
समर्थाचे मनीचें तुटे । तेंचि जाणावें अदृष्ट खोटें ।
राज्यपदापासून करंटे । चेवलें जैसें ॥ २४॥
२४) ज्ञानी साधुच्या मनांतून उतरणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्यपदाचा हक्क असणारा राजपुत्र दुराचारानें हक्क गमावून बसतो.
मी थोर वाटे मनीं । तो नव्हे ब्रह्मज्ञानी ।
विचार पाहातां देहाभिमानी । प्रत्यक्ष दिसे ॥ २५ ॥
२५) मी मोठा ज्ञानी आहे असे ज्याला वाटते तो खरा आत्मज्ञानी नव्हे. सूक्ष्म विचारानें पाहीले तर तो देहाभिमानी आहे. असे आढळून येते.
वस्तुभजन करीना । न करीं ऐसेंहि म्हणेना ।
तरी हे जाणावी कल्पना । दडोन राहिली ॥ २६ ॥
२६) एखदा माणूस आत्मस्वरुपाचे अनुसंधान ठेवित नाही. आणि तसें तो म्हणतही नाही. त्याठिकाणी देहाभिमानाची कल्पना अंतर्यामी वास करते आहे असे समजावे.
ना तें ज्ञान ना भजन । उगाचि आला देहाभिमान ।
येथें नाहीं किं अनुमान । प्रत्यक्ष तुझा ॥ २७ ॥
२७) तेथे आत्मान नाही व भजनही नाही. देहाभिमान मात्र असतो. त्याबद्दल कल्पना करीत बसण्यास अर्थ नाही.
तरी आतां ऐसें न करावें । रघुनाथभजनीं लागावें ।
तेणेंचि ज्ञान बोलावें । चळेना ऐसें ॥ २८ ॥
२८) तरी आतां असे करु नये. रघुनाथाचे भजन करावें त्यानें जें ज्ञान प्राप्त होईल कीं जें कधीही चळणार नाही. शाश्वत असे आत्मज्ञान प्राप्त होईल.
करी दुर्जनाचा संव्हार । भक्तजनासी आधार ।
ऐसा हा तों चमत्कार । रोकडा चाले ॥ २९ ॥
२९) सगुण ईश्वर दुर्जनांचा संव्हार करतो. भक्तांना सांभाळतो. असा त्याचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवास येतो.
मनीं धरावें तें होतें । विघ्न अवघेंचि नासोन जातें ।
कृपा केलियां रघुनाथें । प्रचित येते ॥ ३० ॥
३०) मनांत जें असेल तें रघुनाथाच्या कृपेने घडून येते. सर्व संकटांचा नाश होतो. याची प्रचिती येते.
रघुनाथभजनें ज्ञान जालें । रघुनाथभजनें महत्व वाढलें ।
म्हणौनियां तुवां केलें । पाहिजे आधीं ॥ ३१ ॥
३१) श्रीरामाची उपासना केल्यानें मला आत्मज्ञान झाले. त्याच्या उपासनेनें माझे महत्व वाढले. हा माझा अनुभव आहे. म्हणून तूं आधीं सगुणाची उपासना कर.
हें तों आहे सप्रचित । आणी तुज वाटेना प्रचित ।
साक्षात्कारें नेमस्त । प्रत्ययो करावा ॥ ३२ ॥
३२) सगुणोपासना केल्यानें आत्मज्ञान होतें. हा माझा साक्षात अनुभव आहे. तुला हा अनुभव खरा वाटत नसेल तरीसुद्धा तूं स्वतः सगुणोपासना करुन अनुभव घे.
रघुनाथ स्मरोनि कार्य करावें । तें तत्काळचि सिद्धी पावे ।
कर्ता राम हें असावें । आभ्यांतरीं ॥ ३३ ॥
३३) श्रीरामाचे स्मरण करुन कोठचेही कार्य केले तर ते पुरें होते. असा माझा अनुभव आहे. मात्र ते कार्य करणारा राम आहे हे मनांत पक्के ठेवावे.
कर्ता राम मी नव्हे आपण । ऐसें सगुणनिवेदन ।
निर्गुणीं तें अनन्य । निर्गुणचि होइजे ॥ ३४ ॥
३४) कर्ता राम आहे मी नव्हे अशी दृढ भावना ठेवणें हे सगुणनिवेदन आहे. निर्गुणामध्यें साधक त्याच्याशी एकरुप होऊन निर्गुण होऊन जातो.
मी कर्ता ऐसें म्हणतां । कांहींच घडेना सर्वथा ।
प्रचित पाहासी तरी आतां । सीघ्रचि पाहें ॥ ३५ ॥
३५) मी कर्ता आहे. या भावनेने कार्य केले तर आपल्याला हवेतसे तें कार्य घडून येत नाही. याचा अनुभव पाहावयाचा असेल तर आपल्या जीवनांत तो लगेच पाहाता येईल.
मी कर्ता ऐसें म्हणसी । तेणें तूं कष्टी होसी ।
राम कर्ता म्हणतां पावसी । येश कीर्ती प्रताप ॥ ३६ ॥
३६) मी कर्ता या भावनेने काम होईल कां नाही याची काळजी लागून मन कष्टी होते. तर राम कर्ता या भावनेने कार्य पुरे होऊन यश, कीर्ति व प्रताप पदरांत पडतो.
येके भावनेसाठीं । देवासीं पडे तुटी ।
कां ते होये कृपादृष्टी । देव कर्ता भावितां ॥ ३७ ॥
३७) मी कर्ता या भावनेने आपण भगवंताला गमावतो. उलट देव कर्ता या भावनेने भगवंत आपल्यावर कृपा करतो.
आपण आहे दों दिसांचा । आणी देव बहुतां काळांचा ।
आपण थोडे वोळखिचा । देवासि त्रैलोक्य जाणे ॥ ३८ ॥
३८) आपले जीवन फार कमी काळाचे आहे. तर भगवंत फार काळ राहाणार आहे. आपल्याला फार थोडे लोक ओळखतात. तर भगवंताला सारें त्रैलोक्य ओळखतें.
याकारणें रघुनाथभजन । त्यासि मानिती बहुत जन ।
ब्रह्मादिक आदिकरुन । रामभजनीं तत्पर ॥ ३९ ॥
३९) यासाठी भगवंताची उपासना करावी. असे जो करतो त्याला लोक मान देतात. ब्रह्मादिकदेवसुद्धा ईश्र्वराच्या उपासनेंत रत आहेत.
ज्ञानबळें उपासना । आम्ही भक्त जरी मानूं ना ।
तरी या दोषाच्या पतना । पावों अभक्तपणें ॥ ४० ॥
४०) आम्ही भक्त आहोत. आम्हांला आत्मज्ञान झालेले आहे. असें म्हणून उपासना केली नाही तर उपासनेचा अनादर केल्याचा दोष लागतो.
देव उपेक्षी थोरपणें । तरी मग त्याचें तो जाणे।
अप्रमाण तें श्र्लाघ्यवाणें । नव्हे किं श्रेष्ठा ॥ ४१ ॥
४१) मोठेपणाच्या तोर्यानें उपासनेची उपेक्षा केली तर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागेल. तें त्याचे त्याने पाहून घ्यावें. जें अयोग्य आहे ते श्रेष्ठ पुरुषांना कधीही श्र्लाघ्यवाणें वाटत नाही.
देहास लागली उपासना । आपण विवेकें उरेना ।
ऐसी स्थिति सज्जना । अंतरींची ॥ ४२ ॥
४२) देह सगुणाच्या उपासनेंत गुंतलेला ठेवावा. विवेकानें मीपणा घालवावा. सत्पुरुषांच्या जीवनांत अशी आंत बाहेर अवस्था असते.
सकळ मिथ्या होऊन जातें । हे रामभजनें कळों येतें ।
दृश्य ज्ञानियांचेनि मतें । स्वप्न जैसें ॥ ४३ ॥
४३) भगवंताच्या उपासनेने सगळें दृश्य मिथ्या आहे अशी प्रचिती येते. ज्ञानी पुरुषांच्या मतानें हे सगळें दृश्य स्वप्नासारखें आहे.
मिथ्या स्वप्नविवंचना । तैसी सृष्टीची रचना ।
दृश्य मिथ्या साधुजना । कळों आलें ॥ ४४ ॥
४४) स्वप्नामधिल व्यवहार जसा खोटा तशी या सृष्टीची रचना खोटी आहे. साधु पुरुषांना दृश्याचे खोटेपण कळून येते.
आक्षेप जाला श्रोतयांसी । मिथ्या तरी कां दिसतें आम्हांसी ।
याचें उत्तर पुढिले समासीं । बोलिलें असे ॥ ४५ ॥
४५) श्रोत्यांची शंका होती कीं, दृश्य जर खोटे तर तें आम्हाला कां दिसते? याचे उत्तर पुढील समासांत सांगितलें आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सगुणभजननाम समास सातवा ॥
Samas Satava SagunBhajan
समास सातवा सगुणभजन

Custom Search
No comments:
Post a Comment