Tuesday, August 4, 2020

Dnyaneshwari Adhyay 3 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा


Dnyaneshwari Adhyay 3 Part 1
 ज्ञानेश्र्वरी अध्याय तिसरा भाग १
ज्ञानेश्र्वरी  तिसरा अध्याय  ओव्या १ ते २५ 
मग आइका अर्जुनें म्हणितलें । देवा तुम्हीं जें वाक्य बोलिलें ।
तें निकें म्यां परिसलें । कमळापती ॥ १ ॥
१) मग अर्जुन म्हणाला, श्रीकृष्णा, ऐका. देवा, तुम्हीं जें कांहीं बोललात, तें, हे कमलापति, मी चांगलें ऐकलें.  
तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां ।
ऐसें मत तुझें अनंता । निश्र्चित जरी ॥ २ ॥
२) श्रीअनंता, तुमच्या मागील व्याख्यानाचा विचार करुन पाहिला असतां त्या ठिकाणी कर्म आणि त्याचा कर्ता हे उरतच नाहींत व हेंच जर तुझें मत निश्र्चित असेल,
तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं ।
इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं स्त्रुतां ॥ ३ ॥  
३) तर मग श्रीकृष्णा,' अर्जुना, तूं युद्ध कर ' असें मला कसें सांगतोस ? ह्या मोठ्या घोर कर्मामध्यें मला घालतांना तुला कांहींच लाज वाटत नाहीं काय ? 
हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारिसी निःशेष ।
तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं ॥ ४ ॥
४) अरे, तूंच जर सर्व कर्मांचा पूर्ण निषेध करतोस, तर मग हें हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तूं कां करवितोस ?  
तरी हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा ।
आणि येसणी हे हिंसा । करवीत अहासी ॥ ५ ॥
५) तर हृषीकेशा, याचा तूं विचार करुन पाहा कीं, तू कर्माला मान देतोस ( आणि ) माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस, ( याचा मेळ कसा घालावा ? )
देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें ।
आतां संपलें म्हणे पां आघवें । विवेकाचें ॥ ६ ॥
६) श्रीकृष्णा, तूंच असें ( असंबद्ध ) बोलूं लागलास, तर मग आमच्यासारख्या अजाण माणसांनीं काय करावें ? आता सारासार विचार जगांतून पार नाहींसा झाला असें म्हणेनास !  
हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा ।
आतां पुरला आम्हां घिंवसा । आत्मबोधाचा॥ ७ ॥
७) अरे, याला जर उपदेश म्हणावयाचें, तर मग भ्रम उत्पन्न करणारें भाषण याहून वेगळें तें काय राहिलें ? आतां आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली म्हणावयाची ! 
वैद्यु पथ्य वारुनि जाये । मग जरी आपणचि विष सुये ।
तरी रोगिया कैसेनि जिये । सांगें मज ॥ ८ ॥
८) वैद्यानें प्रथम रोग्यानें काय खावें, काय खाऊं नये, हें सांगून गेल्यावर मग त्यानेंच जर रोग्यास विष दिलें तर तो रोगी कसा वांचावा, हें मला सांग बरें !
जैसें आंधळें सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा ।
तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां ॥ ९ ॥
९) आंधळ्याला जसें आडमार्गांत घालावें किंवा आधींच माकड आणि त्यांत त्याला मादक पदार्थ पाजावा, त्याप्रमाणें तुझा हा उपदेश आम्हांला फार चांगला लाभला आहे !
मी आधींचि कांहीं नेणें । वरी कवळिलों मोहें येणें ।
कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज ॥ १० ॥
१०) मला अगोदरच कांहीं समजत नाहीं, त्यांत या भ्रमानें मला घेरलें आहे, म्हणून कृष्णा, तुला सारासार विचार पुसला. 
तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई ।
तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे ॥ ११ ॥
११) पण तुझें एकेक पाहावें, तें सर्वच आश्र्चर्य ! इकडे उपदेश करतोस आणि त्यांत घोटाळ्यांत घालतोस ! तर तुझ्या उपदेशाप्रमाणें चालणार्‍यांशीं तूं असें वागावेंस कां ?  
आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें ।
आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे ॥ १२ ॥
१२) आम्हीं शरीरानें, मनानें व जीवानें तुझ्या शब्दांवर अवलंबून राहावें आणि तूंच असें ( भलतेंच ) करावेंस, तर मग सर्व कारभार आटोपला म्हणावयाचा !     
आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी ।
ऐथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे ॥ १३ ॥
१३) आतां याप्रमाणेंच जर तूं उपदेश करणार असशील, तर मग आमचें चांगलेंच कल्याण करतोस म्हणावयाचे ! अर्जुन म्हणाला, आतां येथें ज्ञान मिळण्याची आशा कशाची ? 
तरी ये जाणिवेचें कीर सरलें । परी आणीक एक असें जाहलें ।
जें थितें हें डहुळलें । मानस माझें ॥ १४ ॥
१४) ज्ञान मिळविण्याची गोष्ट तर खरोखरच संपली, पण यांत आणखी एक असें झालें कीं, माझें स्थिर असलेलें मन यामुळें गडबडलें.
तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे ।
जरी चित्त पाहसी माझें । येणें मिषें ॥ १५ ॥
१५) त्याचप्रमाणें श्रीकृष्णा, तुझें हें चरित्र कांहीं समजत नाहीं; कदाचित् या निमित्तानें तूं माझें मन पाहतोस कीं काय ? ( तें न कळें ! )
ना तरी झकवीतु आहासी मातें । कीं तत्त्वचि कथिलें ध्वनितें ।
हें अवगमितां निरुतें । जाणवेना ॥ १६ ॥
१६) अथवा तूं आम्हाला फसवीत आहेस, किंवा गूढार्थानें तत्त्वज्ञानच सांगितलें आहेस, हें विचार करुन पाहिलें, तरी निश्चित असें कांहींच समजत नाहीं. 
म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा ।
मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी ॥ १७ ॥
१७) एवढ्याकरितां देवा, ऐक. हा उपदेश असा गूढार्थानें सांगू नकोस. महाराज, मला तो विचार माझ्या भाषेंत, मला समजेल तसा सोपा करुन सांगावा.  
मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें । 
कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ ॥ १८ ॥
१८) मी अतीशय मंद आहे; परंतु कृष्णा, अशाहि मला चांगलें समजेल, असें एक निश्र्चयात्मक सांग.
देखें रोगातें जिणावें । औषध तरी देयावें । 
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें ॥ १९ ॥
१९) हें पाहा. रोग हटविण्याकरितां औषध तर द्यावें, पण तें औषध ज्याप्रमाणें, अतिशय रुचकर आणि गोड असावें; 
तैसें सकळार्थभरित । तत्त्व तरी सांगावें उचित ।
परी बोधे माझें चित्त । जयापरी ॥ २० ॥  
२०) त्याप्रमाणें सर्वार्थानें भरलेलें योग्य तत्त्व तर सांगावें, की जेणेंकरुन तें माझ्या मनाला निःसंशय कळेल.  
 देवा तुजऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करुं ।
एथ भीड कवणाची धरुं । तूं माय आमुची ॥ २१ ॥
२१) देवा, तुझ्यसारखा आज गुरु मिलाला आहे, तेव्हां आज मीं आपल्या इच्छेची तृप्ति कां करुन घेऊं नये ? तूं आमची आई आहेस ( तर मग ) येथें भीड कोणाची धरावयाची ?
हां गा कामधेनूचें दूभतें । दैवें जाहलें आपैते ।
तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे ॥ २२ ॥ 
२२) अहो, दैववशात् कामधेनूचें दुभतें जर प्राप्त झालें तर तशा प्रसंगीं हवें तें मागण्यास कमी कां करावें ? 
जरी चिंतामणी हातां चढे । तरी वांछेचें कवण सांकडें ।
कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना ॥ २३ ॥
२३) चिंतामणी जर हाताला आला, तर मग हवी ती वस्तु मागण्याची अडचण कां वाटावी ? आपल्याला हवी तशी इच्छा कां करुं नये ?  
देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग ताहाना जरी फुटावें ।
तरी सायासु कां करावे । मागील ते ॥ २४ ॥  
२४) पाहा, अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन, तेथें तहानेनें जर तडफडत राहावयाचें, तर मग तेथपर्यंत येण्याकरितां केलेले मागले श्रम कशाकरितां करावयाचें ? 
तैसा जन्मांतरीं बहुतीं । उपासितां लक्ष्मीपती ।
तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी ॥ २५ ॥ 
२५) त्याप्रमाणें श्रीकृष्णा अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळें, तूं आज दैववशात् जर हातात आला आहेस, 


Custom Search

No comments: