Sunday, August 30, 2020

ShriRamcharitmans Part 38 श्रीरामचरितमानस भाग ३८

 


ShriRamcharitmans Part 38
Doha 201 to 203 
श्रीरामचरितमानस भाग ३८ 
दोहा २०१ ते २०३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
देखरावा मातहि निज अद्भुत रुप अखंड ।
रोम रोम प्रति लागे कोटि कोटि ब्रह्मंड ॥ २०१ ॥
मग भगवंतांनी मातेला आपले अखंड अद्भुत रुप दाखविले. त्याच्या एकेका रोमामध्ये कोट्यावधी ब्रह्मांडे सामावली होती. ॥ २०१ ॥
अगनित रबि ससि सिव चतुरानन । बहु गिरि सरित सिंधु महि कानन ॥
काल कर्म गुन ग्यान सुभाऊ । सोउ देखा जो सुना न काऊ ॥
अगणित सूर्य, चंद्र, शिव, ब्रह्मदेव, पुष्कळसे पर्वत, नद्या, समुद्र, पृथ्वी, वने, काल, कर्म, गुण, ज्ञान आणि स्वभाव दिसले. शिवाय कधीही पाहिले किंवा ऐकलेसुद्धा नव्हते, असे पदार्थही तिने तेथे पाहिले. ॥ १ ॥
देखी माया सब बिधि गाढ़ी । अति सभीत जोरें कर ठाढ़ी ॥
देखा जीव नचावइ जाही । देखी भगति जो छोरइ ताही ॥
सर्व तर्‍हेने बलवान असलेली माया पाहिली. ती ( भगवंतांच्यासमोर ) अत्यंत घाबरुन हात जोडून उभी होती. माया नाचवीत असलेल्या जिवाला पाहिले आणि मग त्या जिवाला ( मायेपासून ) सोडविणार्‍या अशा भक्तीलाही पाहिले. ॥ २ ॥
तन पुलकित मुख बचन न आवा । नयन मूदि चरननि सिरु नावा ॥
बिसमयवंत देखि महतारी । भए बहुरि सिसुरुप खरारी ॥
मातेचे शरीर पुलकित झाले. तोंडातून शब्द फुटत नव्हता. तेव्हा डोळे मिटून श्रीरामचंद्रांच्या चरणी तिने मस्तक ठेवले. मातेला आश्र्चर्य वाटल्याचे पाहून श्रीरामांनी पुन्हा बालरुप घेतले. ॥ ३ ॥
अस्तुति करि न जाइ भय माना । जगत पिता मैं सुत करि जाना ॥
हरि जननी बहु बिधि समुझाई । यह जनि कतहुँ कहसि सुनु माई ॥
मातेला स्तुतीसुद्धा करता येईना. ती घाबरली की, जगत्पिता परमात्म्याला मी पुत्र समजले. श्रीहरींनी मातेला पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले की, ' हे माते, ऐक. ही गोष्ट कुणलाही सांगू नकोस. ' ॥ ४ ॥
 दोहा--बार बार कौसल्या बिनय करइ कर जोरि ।
अब जनि कबहूँ ब्यापै प्रभु मोहि माया तोरि ॥ २०२ ॥
कौसल्या वारंवार हात जोडून प्रार्थना करीत होती की, ' हे प्रभो, मला कधीही तुमच्या मायेने व्यापू नये.' ॥ २०२ ॥
बालचरित हरि बहुबिधि कीन्हा । अति अनंद दासन्ह कहँ दीन्हा ॥
कछुक काल बीतें सब भाई । बड़े भए परिजन सुखदाई ॥
भगवंतांनी पुष्कळ प्रकारच्या बाललीला केल्या आणि आपल्या सेवकांना अत्यंत आनंद दिला. काही काळ लोटल्यावर चारीही भाऊ मोठे होऊन कुटुंबियांना सुख देऊ लागले. ॥ १ ॥
चूड़ाकरन कीन्ह गुरु जाई । बिप्रन्ह पुनि दछिना बहु पाई ॥
परम मनोहर चरित अपारा । करत फिरत चारिउ सुकुमारा ॥
मग गुरुजींनी चूडाकर्म संस्कार केला. ब्राह्मणांना खूप दक्षिणा मिळाली. चारी सुंदर राजकुमार फार मनोहर अपार लीला करीत फिरत असत. ॥ २ ॥
मन क्रम बचन अगोचर जोई । दसरथ अजिर बिचर प्रभु सोई ॥
भोजन करत बोल जब राजा । नहिं आवत तजि बाल समाजा ॥
जे मन, वचन व कर्म यांना अगोचर आहेत, तेच प्रभू दशरथ राजांच्या अंगणात फिरत होते. राजे जेव्हा त्यांना भोजनास बोलवत, तेव्हा ते आपल्या बाल सोबत्यांना सोडून येत नसत. ॥ ३ ॥
कौसल्या जब बोलन जाई । ठुमुकु ठुमुकु प्रभु चलहिं पराई ॥
निगम नेति सिव अंत न पावा । ताहि धरै जननी हठि धावा ॥
कौसल्या माता जेव्हा बोलवायला जाई, तेव्हा प्रभू ठूमकत ठूमकत पळून जात. वेद ज्यांचे ' नेति ' ( हे नाही ) म्हणून वर्णन करतात आणि श्रीशिवांनाही ज्यांचा थांग लागत नाही, त्यांना बळेच पकडण्यासाठी ती धावत असे. ॥ ४ ॥
धूसर धूरि भरें तनु आए । भूपति बिहसि गोद बैठाए ।
अंगाला धूळ लागलेल्या स्थितीत आलेल्या त्यांना राजा हसत हसत आपल्या मांडीवर बसवी. ॥ ५ ॥
दोहा--भोजन करत चपल चित इत उत अवसरु पाइ ।
भाजि चले किलकत मुख दधि ओदन लपटाइ ॥ २०३ ॥
( पकडून आणल्यावर ) श्रीराम भोजन करु लागत, परंतु चित्त चंचल असे. संधी मिळताच तोंडाला दही-भात लागलेला असतानाच किलकारी मारत ते इकडे-तिकडे पळून जात. ॥ २०३ ॥
बालचरित अति सरल सुहाए । सारद सेष संभु श्रुति गाए ॥
जिन्ह कर मन इन्ह सन नहिं राता । ते जन बंचित किए बिधाता ॥
श्रीरामचंद्रांच्या फार भोळ्या आणि मनमोहक बाललीलांचे सरस्वती, शेष, शिव व वेद यांनी गायन केले आहे. या लीलांमध्ये ज्यांचे मन लागले नाही, त्यांना विधात्याने अभागी बनविले. ॥ १ ॥
भए कुमार जबहिं सब भ्राता । दीन्ह जनेऊ गुरु पितु माता ॥
गुरगृहँ गए पढ़न रघुराई । अलप काल बिद्या सब आई ॥
सर्व भाऊ कुमारावस्थेस येताच, गुरु, पिता व माता, यांनी त्यांचा यज्ञोपवीत संस्कार केला. श्रीरघुनाथ ( भावांसह ) गुरुगृही विद्या शिकण्यास गेले आणि थोड्याच काळात त्यांना सर्व विद्या प्राप्त झाल्या. ॥ २ ॥
जाकी सहज स्वास श्रुति चारी । सो हरि पढ़ यह कौतुक भारी ॥
बिद्या बिनय निपुन गुन सीला । खेलहिं खेल सकल नृप लीला ॥
चारही वेद ज्यांचा स्वाभाविक श्र्वास आहेत, ते भगवान विद्या शिकतात ही मोठी आश्र्चर्याची गोष्ट. चारी भाऊ विद्या, विनय, गुण व शील यांमध्ये मोठे निपुण होते आणि ते सर्वजण राजांचे खेळ खेळत. ॥ ३ ॥
करतल बान धनुष अति सोहा । देखत रुप चराचर मोहा ॥
जिन्ह बीथिन्ह बिहरहिं सब भाई । थकित होहिं सब लोग लुगाई ॥
त्यांच्या हाती बाण व धनुष्य शोभत असत. त्यांचे रुप पाहताच चराचर मोहून जात असे, ते सर्व भाऊ ज्या ज्या ठिकाणी खेळायला जात, तेथील सर्व स्त्री-पुरुष त्यांना पाहून प्रेमाने देहभान विसरत किंवा स्तब्ध होऊन त्यांना पाहात राहात. ॥ ४ ॥




Custom Search

No comments: