Wednesday, August 12, 2020

ShriRamcharitmans Part 35 श्रीरामचरितमानस भाग ३५

 


ShriRamcharitmans Part 35 Doha 192 to 194
श्रीरामचरितमानस भाग ३५ दोहा १९२ ते १९४
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--बिप्र धेनु सुर संत हित लीन्ह मनुज अवतार ।
निज इच्छा निर्मित तनु माया गुन गो पार ॥ १९२ ॥
भगवंतांनी ब्राह्मण, गाई, देव आणि संत यांच्यासाठी मनुष्याचा अवतार घेतला. ते ( अज्ञानमय, मलिन ) माया आणि तिचे गुण ( सत्त्व, रज, तम ) आणि ( बाह्य व आंतरिक ) इंद्रियांच्या पलीकडील आहेत. त्यांचे ( दिव्य ) शरीर हे स्वेच्छेने बनले आहे. ( कोणत्याही कर्मबंधनामुळे परवश होऊन त्रिगुणात्मक भौतिक पदार्थांनी बनलेले नाही. ) ॥ १९२ ॥
सुनि सिसु रुदन परम प्रिय बानी । संभ्रम चलि आईं सब रानी ॥
हरषित जहँ तहँ धाईं दासी । आनँद मगन सकल पुरबासी ॥
मुलाच्या रडण्याचा आनंददायी आवाज ऐकून सर्व राण्यांनी उतावीळ होऊन धाव घेतली. दासी आनंदाने इकडे तिकडे धांवू लागल्याा. सर्व पुरवासी आनंदात बुडून गेले. ॥ १ ॥
दसरथ पुत्रजन्म सुनि काना । मानहुँ ब्रह्मानंद समाना ॥
परम प्रेम मन पुलक सरीरा । चाहत उठन करत मति धीरा ॥
राजा दशरथ पुत्र-जन्माची वार्ता ऐकून जणू ब्रह्मानंदात बुडाले. मनात अत्यंत प्रेम उचंबळून आले, शरीर पुलकित झाले. ( आनंदाने अधीर झालेल्या ) बुद्धीला मोठ्या धैर्यानें स्थिर करुन ( प्रेमाने विव्हळ झालेले शरीर सावरत ) ते उठण्याचा प्रयत्न करु लागले. ॥ २ ॥
जाकर नाम सुनत सुभ होई । मोरें गृह आवा प्रभु सोई ॥
परमानंद पूरि मन राजा । कहा बोलाइ बजावहु बाजा ॥
ज्यांचे नाव फक्त श्रवण केल्याने कल्याण होते, तेच प्रभू माझ्या घरी आले आहेत, ( असा विचार करुन ) राजाचे मन परमानंदाने भरुन आले. त्यांनी वादकांना बोलावून म्हटले, ' नगारे वाजवा. नगारे वाजवा. ' ॥ ३ ॥
गुर बसिष्ठ कहँ गयउ हँकारा । आए द्विजन सहित नृपद्वारा ॥
अनुपम बालक देखेन्हि जाई । रुप रासि गुन कहि न सिराई ॥
गुरु वसिष्ठांच्याकडे बोलावणे गेले. ते ब्राह्मणांना बरोबर घेऊन राजवाड्यात आले. त्यांनी जाऊन त्या अलौकिक बालकाला पाहिले. ते रुपाची खाण होते आणि त्याचे गुण सांगुन संपणारे नव्हते. ॥ ४ ॥
दोहा--नंदीमुख सराध करि जातकरम सब कीन्ह ।
हाटक धेनु बसन मनि नृप बिप्रन्ह कहँ दीन्ह ॥ १९३ ॥
नंतर राजांनी नांदीमुख श्राद्ध करुन जातकर्म-संस्कार इत्यादी सर्व केले आणि ब्राह्मणांना सुवर्ण, गाई, वस्त्रे आणि रत्नांचे दान केले. ॥ १९३ ॥
ध्वज पताक तोरन पुर छावा । कहि न जाइ जेहि भॉंति बनावा ॥
सुमनबृष्टि अकास तें होई । ब्रह्मानंद मगन सब लोई ॥ 
ध्वज, पताका आणि तोरणांनी नगर सजून गेले. ज्याप्रकारे ते सजविले होते, त्याचे वर्णन करणे अशक्य. आकाशातून फुलांचा वर्षाव होत होता, सर्व लोक ब्रह्मानंदात मग्न झाले होते. ॥ १ ॥
 बृंद बृदं मिलि चलीं लोगाईं । सहज सिंगार किएँ उठि धाईं ॥
कनक कलस मंगल भरि थारा । गावत पैठहिं भूप दुआरा ॥
स्त्रियांचे समूहच्या समूह निघाले. त्या स्वाभाविक शृंगार करुन धावल्या. सोन्याचा कलश घेऊन आणि तबकांमध्ये मांगलिक द्रव्ये घेऊन त्यांनी गात-गात राजमहालात प्रवेश केला. ॥ २ ॥            
करि आरति नेवछावरि करहीं । बार बार सिसु चरनन्हि परहीं ॥
मागध सूत बंदिगन गायक । पावन गुन गावहिं रघुनायक ॥
त्यांनी आरती ओवाळून ओवाळण्या दिल्या आणि त्या वारंवार मुलाच्या पाया पडू लागल्या. मागध, सूत, बंदीजन आणि गवई रघुकुलाच्या स्वामींच्या पवित्र गुणांचे गायन करु लागले. ॥ ३ ॥
सर्बस दान दीन्ह सब काहू । जेहिं पावा राखा नहिं ताहू ॥
मृगमद चंदन कुंकुम कीचा । मची सकल बीथिन्ह बिच बीचा ॥
अयोध्येत सर्वजणांनी सर्वस्वाचे दान केले. ज्यांना ते मिळाले, त्यांनीही ते ( आपल्याजवळ ) ठेवले नाही. ( लूटून टाकले. ) ( नगरातील ) सर्व गल्ल्यांमध्ये कस्तुरी, चंदन आणि केशर यांचा जणू सडा पडला होता. ॥ ४ ॥
 दोहा--गृह गृह बाज बधाव सुभ प्रगटे सुषमा कंद ।
हरषवंत सब जहँ तहँ नगर नारि नर बृदं ॥ १९४ ॥
घरोघरी मंगल वाद्ये गुंजू लागली. शोभेचा कंद असलेले भगवान प्रकट झाले होते. नगरातील स्त्री-पुरुषांच्या झुंडी सर्वत्र आनंदमग्न होत होत्या. ॥ १९४ ॥
कैकयसुता सुमित्रा दोऊ । सुंदर सुत जनमत भैं ओऊ ॥
वह सुख संपति समय समाजा । कहि न सकइ सारद अहिराजा ॥
कैकेयी आणि सुमित्रा या दोघींनीही सुंदर मुलांना जन्म दिला. त्या प्रसंगी सुख, संपत्ती, शुभवेळ आणि समाज यांचे वर्णन सरस्वती आणि सर्पराज शेषही करु शकणार नाहीत. ॥ १ ॥
अवधपुरी सोहइ एहि भॉंती । प्रभुहि मिलन आई जनु राती ॥
देखि भानु जनु मन सकुचानी । तदपि बनी संध्या अनुमानी ॥
अयोध्यापुरी अशी सुशोभित झाली होती की, रात्र ही जणू प्रभूंना भेटण्यासाठी आली होती आणि सूर्याला पाहून मनातून संकोच पावत होती, तरी पण मनात विचार करीत ती जणू संध्याकाळ बनून गेली होती. ॥ २ ॥
अगर धूप बहु जनु अँधिआरी । उड़इ अबीर मनहुँ अरुनारी ॥
मंदिर मनि समूह जनु तारा । नृप गृह कलस सो इंदु उदारा ॥
आगुरु-धूपाचा इतका धूर पसरला की, जणू तो संध्याकाळचा अंधार वाटला आणि जो गुलाल उधळला जात होता तो तिचा लालिमा आहे. महालांवर जडविलेले रत्नांचे समूह जणू तारागण आहेत. राजमहालाचा जो ( चमकणारा ) कळस होता , तो जणू तेजस्वी चंद्रमा आहे. ॥ ३ ॥
भवन बेदधुनि अति मृदु बानी । जनु खग मुखर समयँ जनु सानी ॥
कौतुक देखि पतंग भुलाना । एक मास तेइँ जात न जाना ॥
राजभवनात अत्यंत कोमल वाणीने जो वेदध्वनी होत होता, तो जणू पक्ष्यांचा समयोचित किलबिलाट होता. हे कौतुक पाहून सूर्यसुद्धा आपली गती विसरुन गेला. एक महिना केव्हा गेला, हे सूर्याला कळलेच नाही. ( अर्थात त्याचा एक महिना तेथेच गेला. ) ॥ ४ ॥



Custom Search

No comments: