ShriRamcharitmans Part 34
Doha 189 to 191
श्रीरामचरितमानस भाग ३४
दोहा १८९ ते १९१
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--तब अदृस्य भए पावक सकल सभहि समुझाइ ।
परमानंद मगन नृप हरष न हृदयँ समाइ ॥ १८९ ॥
नंतर अग्निदेव संपूर्ण सभेला समजावून सांगून अंतर्धान पावले. राजा परमानंदात मग्न झाला. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. ॥ १८९ ॥
तबहिं रायँ प्रिय नारि बोलाईं । कौसल्यादि तहॉं चलि आई ॥
अर्ध भाग कौसल्यहि दीन्हा । उभय भाग आधे कर कीन्हा ॥
मग राजाने आपल्या प्रिय पत्नींना बोलावून घेतले. कौसल्या इत्यादी सर्व राण्या तेथे आल्या. राजाने पायसाचा अर्धा भाग कौसल्येला दिला आणि उरलेल्या अर्ध्या भागाचे दोन भाग केले. ॥ १ ॥
कैकेई कहँ नृप सो दयऊ । रह्यो सो उभय भाग पुनि भयऊ ॥
कौसल्या कैकेई हाथ धरि । दीन्ह सुमित्रहि मन प्रसन्न करि ॥
त्यापैकी एक भाग राजाने कैकेयीला दिला. उरलेल्या भागाचे दोन भाग केले आणि राजाने ते कौसल्या आणि कैकेयी यांच्या हातावर ठेवून ( त्यांच्या संमतीने ), त्यांचे मन प्रसन्न ठेवून सुमित्रेला दिले. ॥ २ ॥
एहि बिधि गर्भसहित सब नारी । भईं हृदयँ हरषित सुख भारी ॥
जा दिन तें हरि गर्भहिं आए । सकल लोक सुख संपति छाए ॥
अशाप्रकारे सर्व राण्या गर्भवती झाल्या. त्यांना मनातून खूप आनंद झाला. त्यांना फार सुख वाटले. ज्या दिवशी श्रीहरी ( आपल्या लीलेने ) गर्भामध्ये आले, त्या दिवसापासून सर्व लोकांमध्ये सुख व संपत्ती पसरली. ॥ ३ ॥
मंदिर महँ सब राजहिं रानीं । सोभा सील तेज की खानीं ॥
सुख जुत कछुक काल चलि गयऊ । जेहिं प्रभु प्रगट सो अवसर भयऊ ॥
शोभा, शील व तेज यांची खाण ( बनलेल्या ) सर्व राण्या राजमहालामध्ये शोभून दिसू लागल्या. अशाप्रकारे काही काळ सुखात गेला. प्रभूंची प्रकट होण्याची वेळ आली. ॥ ४ ॥
दोहा--जोग लगन ग्रह बार तिथि सकल भए अनुकूला ।
चर अरु अचर हर्षजुत राम जनम सुखमूल ॥ १९० ॥
योग, लग्न, ग्रह, वार आणि तिथी सर्वच अनुकूल बनले. सर्व चराचर आनंदाने भरुन गेले. कारण श्रीरामांचा जन्म सुखाचे मूळ आहे. ॥ १९० ॥
नौमी तिथि मधु मास पुनीता । सुकल पच्छ अभिजित हरिप्रीता ॥
मध्य दिवस अति सीत न घामा । पावन काल लोक बिश्रामा ॥
चैत्राचा पवित्र महिना होता, नवमी तिथी होती. शुक्लपक्ष आणि भगवंताचा प्रिय अभिजित मुहूर्त होता. दुपारची वेळ होती. फार थंडी नव्हती आणि फार ऊनही नव्हते. ती पवित्र वेळ सर्व लोकांना शांतता देणारी होती. ॥ १ ॥
सीतल मंद सुरभि बह बाऊ । हरषित सुर संतन मन चाऊ ॥
बन कुसुमित गिरिगन मनिआरा । स्रवहिं सकल सरिताऽमृतधारा ॥
शीतल, मंद आणि सुगंधित वारा वाहात होता. देव आनंदित होते आणि संतांच्या मनामध्ये मोठा उत्साह भरला होता. वने फुललेली होती. पर्वतांचे समुदाय रत्नांनी चमचमत होते. सर्व नद्यांतून अमृताच्या धारा वाहात होत्या. ॥ २ ॥
सो अवसर बिरंचि जब जाना । चले सकल सुर साजि बिमाना ॥
गगन बिमल संकुल सुर जूथा । गावहिं गुन गंधर्ब बरुथा ॥
जेव्हा ब्रह्मदेवांनी ती ( भगवंतांच्या प्रकट होण्याची ) वेळ जाणली, तेव्हा ( त्यांच्यासह ) सर्व देव विमाने सजवून निघाले. आकाश देवांच्या समुदायाने भरुन गेले. गंधर्वांचे समूह गुणगान करु लागले. ॥ ३ ॥
बरषहिं सुमन सुअंजुलि साजी । गहगहि गगन दुंदुभी बाजी ॥
अस्तुति करहिं नाग मुनि देवा । बहुबिधि लावहिं निज निज सेवा ॥
आणि ओंजळीमध्ये सुंदर फुले भरुन पुष्पांचा वर्षाव करु लागले. आकाशात नगारे दुमदुमू लागले. नाग, मुनी आणि देव स्तुती करु लागले आणि अनेक प्रकारे आपापल्या सेवा अर्पण करु लागले. ॥ ४ ॥
दोहा--सुर समूह बिनती करि पहुँचे निज निज धाम ।
जगनिवास प्रभु प्रगटे अखिल लोक बिश्राम ॥ १९१ ॥
सर्व लोकांना शांतता देणारे, जगदाधार प्रभू प्रगट झाले. देवांचे समुदाय प्रार्थना करुन आपापल्या लोकांमध्ये गेले. ॥ १९१ ॥
छं०--भए प्रगट कृपाला दीनदयाला कौसल्या हितकारी ।
हरषित महतारी मुनि मन हारी अद्भुत रुप बिचारी ॥
लोचन अभिरामा तनु घनस्यामा निज आयुध भुज चारी ।
भूषन बनमाला नयन बिसाला सोभसिंधु खरारी ॥ १ ॥
दीनांच्यावर दया करणारे, कौसल्येचे हितकारी कृपाळू प्रभू प्रकट झाले. मुनींचे मन हरण करणारे, त्यांचे अद्भुत रुप पाहून माता आनंदून गेली. नेत्रांना सुख देणारे मेघांसारखे त्यांचे सावळे शरीर होते. चारी हातांमध्ये आपली वैशिष्ट्यपूर्ण आयुधे होती. विशाल नेत्र होते. अशा प्रकारे सौंदर्याचे सागर भगवान श्रीराम प्रकट झाले. ॥ १ ॥
कह दुइ कर जोरी अस्तुति तोरी केहि बिधि करौं अनंता ।
माया गुन ग्यानातीत अमाना बेद पुरान भनंता ॥
करुना सुख सागर सब गुन आगर जेहि गावहिं श्रुति संता ।
सो मम हित लागी जन अनुरागी भयउ प्रगट श्रीकंता ॥ २ ॥
दोन्ही हात जोडून माता कौसल्या म्हणू लागली, ' हे अनंता, मी तुमची स्तुती कशी करु ? वेद आणि पुराणे म्हणतात की माया, गुण आणि ज्ञान यांच्या पलीकडील आणि परिमाणरहित तुम्ही आहात. श्रुती आणि संतजन ज्यांचे दया आणि सुखाचे सागर, सर्व गुणांचे धाम म्हणून गायन करतात, तेच भक्तांवर प्रेम करणारे लक्ष्मीपती भगवान माझ्या कल्याणासाठी प्रकट झाले आहेत. ॥ २ ॥
ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रति बेद कहै ।
मम उर सो बासी यह उपहासी सुनत धीर मति थिर न रहै ॥
उपजा जब ग्याना प्रभु मुसुकाना चरित बहुत बिधि कीन्ह चहै ।
कहि कथा सुहाई मातु बुझाई जेहि प्रकार सुत प्रेम लहै ॥ ३ ॥
वेद म्हणतात की, तुमच्या प्रत्येक रोमामध्ये मायेने रचलेले ब्रह्मांडाचे समूह भरलेले आहेत. तुम्ही माझ्या उदरात राहिलात, ही हसण्यावारी नेण्याजोगी गोष्ट ऐकून विवेकी पुरुषांची बुद्धीसुद्धा अचंबित होते. जेव्हा मातेला ज्ञान झाले, तेव्हा भगवंतांनी स्मित हास्य केले. त्यांना बर्याच लीला करावयाच्या होत्या. म्हणून त्यांनी ( पूर्वजन्मीच्या ) सुंदर कथा सांगून मातेला समजावले. ज्यामुळे तिला आपल्याविषयी पुत्रप्रेम वाटावे. ॥ ३ ॥
माता पुनि बोली सो मति डोली तजहु तात यह रुपा ।
कीजै सिसुलीला अति प्रियसीला यह सुख परम अनूपा ॥
सुनि बचन सुजाना रोदन ठाना होइ बालक सुरभूपा ।
यह चरित जे गावहिं हरिपद पावहिं ते न परहिं भवकूपा ॥ ४ ॥
त्याबरोबर मातेची ती ( ज्ञान ) बुद्धी बदलली. ती म्हणाली, ' हे रुप सोडून आईला आवडणारी बाललीला कर. ( माझ्यासाठी ) ते सुख परम अनुपेय ठरेल. ' मातेचे हे वचन ऐकताच देवाधिदेव ज्ञानस्वरुप भगवंतांनी बालरुप धारण करुन रुदन सुरु केले. ( तुलसीदास म्हणतात, ) जे या चरित्राचे गायन करतात, त्यांना श्रीहरींचे परमपद लाभते आणि मगते संसाररुपी अंधकूपात पडत नाहीत. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment