Gurucharitra Adhyay 37 is in Marathi. This Adhyay describes many things such as the importance of devpooja, Manaspooja, Vaishvadev and so on. Name of this Adhyay is Karma-MargNirupanam.
Gurucharitra Adhyay 37 Parts 1 and 2 and 3 are only for Text. Adhhyay 37 is full in video.
गुरुचरित्र अध्याय ३७ भाग २/३
बळिहरण न काढितां जेवी जरी । सहा प्राणायाम त्वरित करीं ।
तेणें होय पाप दूरी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ ९१ ॥
गृहपूजा करुनि देखा । गोग्रास द्यावा विशेषका ।
नित्य श्राद्ध करणें ऐका । त्यक्त करुनि समर्पावें ॥ ९२ ॥
स्वधाकार पिंडदान । करुं नये अग्नौकरण ।
ब्रह्मचारियासी तांबूलदान । दक्षिणा वर्ज परियेसा ॥ ९३ ॥
वैश्र्देदेव झालियावरी । उभा राहोनि आपुल्या द्वारी ।
अतिथिमार्ग पहावा निर्धारीं । आलिया पूजन करावें ॥ ९४ ॥
श्रमोनि आलिया अतिथिसीं । पूजा करावी भक्तीसीं ।
अथवा अस्तमान समयासी । आलिया पूजन करावें ॥ ९५ ॥
' वर्णानां ब्राह्मणो गुरुः ' । ऐसें बोलती वेदशास्त्रु ।
अतिथि जाण सर्व गुरु । वैश्र्वदेवसमयासी ॥ ९६ ॥
वैश्र्वदेवसमयीं अतिथिसी । पूजा करिता परियेसीं ।
ती पावे सर्व देवांसी । तुष्टे ब्रह्मा-इंद्र-वह्नि ॥ ९७ ॥
वायुगण अर्यमादि देव । तृप्त होय सदाशिव ।
पूजा करावी एकोभावें । सर्व देवता संतुष्टती ॥ ९८ ॥
अतिथिपाद प्रक्षाळिती । पितर सकळ तृप्त होती ।
अन्नदानें ब्रह्मा तृप्ति । विष्णु-महेश्र्वरां अवधारा ॥ ९९ ॥
यतीश्र्वरादि ब्रह्मचारी । जे समयीं येती आपुल्या घरीं ।
अन्न द्यावें निर्धारीं । महापुण्य असे देखा ॥ १०० ॥
ग्रासमात्र दिधला एक । मेरुसमान पुण्य अधिक ।
बरवें द्यावें त्यासी उदक । समुद्रासमान दान असे ॥ १०१ ॥
अतिथि आलिया घरासी । जेवी आपण त्यजूनि त्यासी ।
श्र्वानयोनीं होय भरंवसी । गर्दभ होऊनि पुढें उपजे ॥ १०२ ॥
ऐसें अतिथि पूजोन । मग करावें भोजन आपण ।
न करावें अन्न भिन्न । प्रपंच करितां दोष असे ॥ १०३ ॥
सायंप्रातर्गृहस्थासी । भोजन करणें संतोषी ।
प्रक्षालन करोनि पादांसी । ओले पायीं असावें ॥ १०४ ॥
ओलीं असावी पांच स्थानें । हस्त पाद उभय जाणें ।
मुख ओलें पंचमस्थान । शतायुषी पुरुष होय ॥ १०५ ॥
पूर्वाभिमुख बैसोन । भोजनसमयीं धरा मौन ।
पाद उभय जोडोन । बैसावें ऐका एकचित्तें ॥ १०६ ॥
मंडळ करावें चतुष्कोनि । वरी भस्म प्रोक्षोनि ।
क्षत्रियासी मंडळ त्रिकोनि । वर्तुळ वैश्यासी परियेसा ॥ १०७ ॥
शूद्रें अर्धचंद्राकार । मंडळ करावें परिकर ।
आवाहनावे सुरवर । आदित्य-वसु-रुद्र-ब्रह्मा ॥ १०८ ॥
पितामहादि देवता । तया मंडलीं उपजीवता ।
याचि कारणें करा त्वरिता । मंडलाविणें जेवूं नये ॥ १०९ ॥
न करितां मंडल जेवी जरी । अन्नरस नेती निशाचरी ।
पिशाच असुर राक्षस येरी । अन्नरस नेती अवधारा ॥ ११० ॥
उत्तम पूर्वाभिमुखी देख । पश्र्चिम मध्यम असे ऐक ।
पितृकार्या उत्तरमुख । सदा दक्षिणेसी बैसावें ॥ १११ ॥
जेवितें पात्र अवधारा । सुवर्ण-रजत-ताम्रपात्रा ।
पद्मपत्र पालाशपात्र । पुण्यपात्र परियेसा ॥ ११२ ॥
वर्जावें गृहस्थें ताम्रपात्र । यतीं सुवर्ण-रजतपात्र ।
ताम्र-शौक्तिक-शंखज पात्र । स्फटिक पाषाण यतीसी ॥ ११३ ॥
कर्दलीगर्भपात्रेसी । पद्मपत्रजळस्पर्शी ।
वल्ली-पालाशपत्रेसी । जेवितां चांद्रायण आचरावें ॥ ११४ ॥
वट-अश्र्वत्थ-अर्क पटोल । कदंब कोविदारपर्णें कोमळ ।
भोजन करितां तात्काळ । चांद्रायण आचरावें ॥ ११५ ॥
लोहपात्र आपुले करीं । ताम्र-मृण्मय-पृष्ठपर्णावरी ।
कार्पासपत्री वस्त्रेयेरी । जेवितां नरकाप्रती जाय ॥ ११६ ॥
कांस्यपात्रीं जेविल्यासी । यश-बळ-प्रज्ञा-आयुषीं ।
वाढे नित्य अधिकेसी । गृहस्थांसी मुख्य कांस्यपात्र ॥ ११७ ॥
असावें पात्र पांच शेर । नसावें उणें अधिक थोर ।
उत्तमोत्तम षोडश शेर । सुवर्णपात्रा समान देखा ॥ ११८ ॥
कांस्यपात्रेसीं भोजन । तांबूळासहित अभ्यंगन ।
गृहस्थासी मुख्य जाण । यति-ब्रह्मचारी-विधवास्त्रियेसी वर्ज ॥ ११९ ॥
श्र्वानाच्या चर्माहुनी । निषेध असे एरंडपानीं ।
निषिद्ध जाणा त्याहुनी । आणिक जेविल्या ताटीं जेवितां ॥ १२० ॥
फुटके कांस्यपात्रेसीं । जेवितां होय महादोषी ।
संध्याकाळीं जेवितां हर्षी । महापातकी होय जाणा ॥ १२१ ॥
जवळी असतां पतित जरी । जेवूं नये अवधारीं ।
शूद्र जेविल्या शेषावरी । जेवूं नये ब्राह्मणानें ॥ १२२ ॥
सवें घेऊनि बाळकासी । जेवूं नये श्राद्धदिवसीं ।
आसन आपुलें आपणासी । घालूं नये ब्राह्मणानें ॥ १२३ ॥
आपोशन आपुले हातीं । घेऊं नये मंदमतीं ।
तेल घालुनी स्वहस्तीं । आपण अभ्यंग न करावें ॥ १२४ ॥
भोजनकाळीं मंडळ देखा । करुं नये स्वहस्तका ।
आयुष्यक्षय पुत्रघातका । म्हणिजे नाम तयासी ॥ १२५ ॥
नमस्कारावें वाढितां अन्न । अभिधारावें पहिलेंचि जाण ।
प्राणाहुति घेतां क्षण । घृत न घालावें स्वहस्तें ॥ १२६ ॥
उदक घेऊनि व्याहृतिमंत्रीं । प्रोक्षोनि अन्न पवित्री ।
परिषिंचावें तेचि रीतीं । मग नमावें चित्रगुप्ता ॥ १२७ ॥
बळी घालोनि चित्रगुप्तासी । काढवावें सवेंचि परियेसी ।
वाम हस्त धुवोनि विशेषीं । पात्र दृढ धरावें ॥ १२८ ॥
अगुष्ठतर्जनीमध्यमांगुलीसी । धरावें पात्र वामहस्तेसीं ।
आपोशन घ्यावें सव्यकरेसीं । आणिकाकरी घालवावें ॥ १२९ ॥
आपोशन उदक सोडोनि जरी । आणिक उदक घेती करीं ।
श्र्वानमूत्र घेतल्यापरी । एकचित्तें परियेसा ॥ १३० ॥
धरिले आपोशन ब्राह्मणासी । नमस्कारितां महादोषी ।
आशीर्वाद घेऊं नये तयापाशीं । उभयतांसी दोष घडे ॥ १३१ ॥
मौन असावें आपण देखा । बोलूं नये शब्दादिका ।
आपोशन घ्यावें मंत्रपूर्वका । मग घ्याव्या प्राणाहुति ॥ १३२ ॥
आपोशनावीण भोजन करी । पापविमोचन करा तरी ।
अष्टोत्तरशत गायत्री । जपतां दोष परिहरे ॥ १३३ ॥
प्राणाहुतीचें विधान । सांगेन ऐका ब्राह्मण ।
प्राणाग्निहोत्र करणें जाण । समस्त पापें जाती देखा ॥ १३४ ॥
जैसा कार्पासराशीसी । अग्नि लागतां परियेसीं ।
जळोनि जाय त्वरितेसी । तैसीं पापें नासतीं ॥ १३५ ॥
प्राणाहुतीचें लक्षण । चतुर्विध पुरुषार्थ जाण ।
मंत्र म्हणा अन्न स्पर्शोन । गीताश्र्लोक प्रख्यात ॥ १३६ ॥
श्र्लोक अहं वैश्र्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ १३७ ॥
( टीका ) ' अन्नं ब्रह्मरसो विष्णु । भोक्ता देव गिरिजारमणु ' ।
ऐसा तुम्ही मंत्र म्हणोनु । ' अग्निरस्मि ' मंत्र जपावा ॥ १३८ ॥
मग घ्याव्या प्राणाहुति । आहुति-मंत्र पंच ख्याति ।
तर्जनी-मध्यमा-अंगुष्ठघृती । ' प्राणाय स्वाहा ' म्हणावें ॥ १३९ ॥
मध्यमा-आनामिका-अंगुष्ठेंसी । ' अपानाय स्वाहा ' म्हणा ऐसी ।
' व्यानाय स्वाहा ' म्हणावयासी । अनामिका-कनिष्ठिका-अंगुष्ठानें ॥ १४० ॥
अंगुष्ठ-तर्जनी-कनिष्ठिकेसीं । ' उदानाय स्वाहा ' म्हणा हर्षी ।
पंचांगुलीनें परियेसीं । ' समानाय स्वाहा ' म्हणावें ॥ १४१ ॥
प्राणाहुति घेतलें अन्न । दंतां स्पर्शों नये जाण ।
जिव्हेनें गिळोनि तत्क्षण । मग धरावें मौन देखा ॥ १४२ ॥
मौन धरावयाचें स्थान । सांगेन ऐका तुम्हां विधान ।
स्नानसमयीं धरा निर्गुण । न धरितां फल वरुण नेई ॥ १४३ ॥
होम करितां न धरी मौन । लक्ष्मी जाय तत्क्षण ।
जेवितां मौन न धरी आपण । अपमृत्यु घडे त्यासी ॥ १४४ ॥
अशक्य असेल मौन जरी । प्राणाहुति घे तंववरी ।
मौन धरावें अवधारीं । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ १४५ ॥
पिता जिवंत असे ज्यासी । अथवा ज्येष्ठ बंधु परियेसीं ।
धरुं नये मौनासी । श्राद्धान्न जेवितां धरावें ॥ १४६ ॥
पंच प्राणाहुति घेतां । सर्वांसी मौन-ग्राह्यता ।
असेल पिता, वडील भ्राता । मौन धरिल्या अधःपात ॥ १४७ ॥
जेवावें प्रथम मधुरान्न । भोजन करावें नरें जाण ।
भक्षून पूर्वी द्रव्यान्न । कठिणान्न मध्यें परियेसा ॥ १४८ ॥
भोजनान्त-समयासी । जेवावें पुनः द्रव्यान्नासी ।
बळ न जाय परियेसीं । शीघ्र भोजन करावें ॥ १४९ ॥
धेनू उदक प्यावयासी । जितुका वेळ लागे तिसी ।
भोजन करावें परियेसीं । शीघ्र भोजन सुखी जाणा ॥ १५० ॥
भोजन करावयाची स्थिति । सांगेन ऐका ग्रासमिति ।
संन्यासी-मुनीश्र्वर-यतीं । अष्ट ग्रास घ्यावे जाण ॥ १५१ ॥
षोडश ग्रास अरण्यासीं । द्वात्रिंशत् गृहस्थासी ।
मिति नाहीं ब्रह्मचार्यासी । एकचित्तें परियेसा ॥ १५२ ॥
जितुका मावेल आपल्या मुखीं । तितुका ग्रास घ्यावा विशेखीं ।
अधिक घेतां ग्रास मुखीं । उच्छिष्ट भक्षिलें फळ देखा ॥ १५३ ॥
अर्धा ग्रास भक्षूनि । उरलें ठेविती आपुल्या भाणी ।
चांद्रायण आचरावें त्यांनी । उच्छिष्ट भोजन तया नांव ॥ १५४ ॥
न बैसावें सहभोजनासी । इष्टसोयरे इत्यादिकांशीं ।
व्रतबंधावबिणें पुत्रासी । कन्याकुमारांसी दोष नाहीं ॥ १५५ ॥
सांडू नये अन्न देखा । घृत-पायस विशेषका ।
सांडावें थोडें ग्रास एका । जेवूं नये सर्व अन्न ॥ १५६ ॥
भोजन पूर्ण होईपर्यंत । पात्रीं धरावा वामहस्त ।
जरी सोडील अज्ञानता । अन्न वर्जोनि उठावें ॥ १५७ ॥
याकारणें विद्वजनें । सोडूं नये पात्र जाण ।
अथवा पूर्वीच न धरावें आपण । दोष नाहीं परियेसा ॥ १५८ ॥
वस्त्र गुंडोनि डोईसी । अथवा सन्मुख दक्षिणेसी ।
वामपादावरी हस्तेसीं । जेवितां अन्न राक्षस नेती ॥ १५९ ॥
वामहस्त भूमीवरी । ठेवूनि नर भोजन करी ।
रोग होय त्या शरीरीं । अंगुली सोडोनि जेवूं नये ॥ १६० ॥
अंगुली सोडूनि जेवी जरी । दोष गोमांस भक्षिलेपरी ।
दोष असती नानापरी । स्थानें असती भोजनाचीं ॥ १६१ ॥
अश्र्वगजारुढ होउनि । अथवा बैसोनि स्मशानीं ।
देवालयीं शयनस्थानीं । जेवूं नये परियेसा ॥ १६२ ॥
निषिद्ध जेवण करपात्रेसीं । ओलें नेसोनि, आर्द्रकेशी ।
बहिर्हस्त करुनि जानूसी । जेवितां दोष परियेसीं ॥ १६३ ॥
यज्ञोपवीताच्या उपवीतीसीं । भोजन करावें परियेसीं ।
जेवितां आपुल्या सन्मुखेसीं । पादरक्षा असूं नये ॥ १६४ ॥
ग्रास-उदक-कंद-फळ । इक्षुदंडादि केवळ ।
भक्षोनि पात्रीं ठेवितां सकळ । उच्छिष्ट होय अवधारा ॥ १६५ ॥
भोजन करी स्नानावीण । होम न करितां जेवी कवण ।
अन्न नव्हे तें कृमि जाण । म्हणे पराशरऋषि ॥ १६६ ॥
पर्णपृष्ठावरी रात्रीसी । दीपावीण जेविल्यासी ।
महादोष घडती त्यासी । कृमि भक्षिले पाप जाणा ॥ १६७ ॥
दीप जाय भोजन करितां । पात्र धरावें स्मरत सविता ।
पुनरपि दीप आणोनि लावितां । मग भोजन करावें ॥ १६८ ॥
पात्रीं असेल जितुकें अन्न । तितुकेंच जेवावें परिपूर्ण ।
आणिक घेतां दोष जाण । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी ॥ १६९ ॥
स्पर्शों नये जेवितां केश । कथा सांगतां महादोष ।
दिसूं नये व्योमआकाश । अंधकारीं जेवूं नये ॥ १७० ॥
न ठेवितां शेष स्त्रियेसी । जेवितां अत्यंत दोषी ।
ठेविलें न जेवितां स्त्रिया दोषी । महापातकें घडती जाणा ॥ १७१ ॥
शून्यदेव-देवालयीं । देवता स्थान आपुले गृही ।
जलसमीप संध्यासमयीं । जेवूं नये परियेसा ॥ १७२ ॥
पात्र ठेवूनि दगडावरी । जेवूं नये अवधारीं ।
अवलोकूं नये मुखावरी । स्त्रीजनाचे परियेसीं ॥ १७३ ॥
न करावें सहभोजन । जेवितां होय उच्छिष्टभक्षण ।
कुलस्त्रियेशीं भोजन । करितां निर्दोष परियेसा ॥ १७४ ॥
प्राशनशेष-उदकासी । घेऊं नये परियेसीं ।
अगत्य घडे, संधीसी । किंचित् सांडूनि घेइजे ॥ १७५ ॥
वस्त्रोदक घेतल्यासी । अपार दोष घडती तयासी ।
जन्म पावे श्र्वानयोनीसी । पडे मागुती नरकांत ॥ १७६ ॥
शब्द होय उदक घेतां । अथवा क्षीर घृत जेवितां ।
आपोशनोदक प्राशितां । सुरापानसमान ॥ १७७ ॥
महाजळी रिघोनि । उदक घेती मुखांतुनी ।
अथवा उभा पिये पाणी । सुरापानसमान जाणा ॥ १७८ ॥
द्वयहस्त अंजुळोनि । घेऊं नये उदक ज्ञानीं ।
घ्यावें एक हस्तेंकरुनि । वाम हस्त वर्जावा ॥ १७९ ॥
सभे बैसोनि एकासनीं । अथवा आपुले अंथुरणीं ।
प्राशन न करावें पाणी । महादोष परियेसा ॥ १८० ॥
Gurucharitra Adhyay 37
गुरुचरित्र अध्याय ३७
Custom Search
No comments:
Post a Comment