Tuesday, August 19, 2014

Gurucharitra Adhyay 37 Part 3/3 गुरुचरित्र अध्याय ३७ भाग ३/३


Gurucharitra Adhyay 37 
 Gurucharitra Adhyay 37 is in Marathi. This Adhyay describes many things such as the importance of devpooja, Manaspooja, Vaishvadev and so on. Name of this Adhyay is Karma-MargNirupanam. 
Gurucharitra Adhyay 37 Part 1 and 2 and 3 are only for Text Purpose. Adhyay 37 is full in Video.
गुरुचरित्र अध्याय ३७ भाग ३/३ 
न वाढावें भिन्न पात्रेंसी । पाहूं नये आणिक यातीसी । 
रजस्वला स्त्रियांसी । चांडाळ श्र्वान पाहूं नये ॥ १८१ ॥ 
दृष्टि पडे इतुकियांसी । ध्वनि ऐकतां कर्णांसी । 
त्यजावें अन्न त्वरितेसी । जेवितां दोष असे जाणा ॥ १८२ ॥ 
कलहशब्द कांडण दळण । ऐकतां जेवूं नये अन्न । 
अपशब्द स्पृष्टास्पृष्ट जाण । त्यजावें अन्न परियेसा ॥ १८३ ॥ 
नेणते लोक पंक्तीसी । घेऊं नये परियेसीं । 
अगत्य घडे संधीसी । उदकें भस्म करा पृथक् ॥ १८४ ॥ 
अथवा स्तंभ असेल मध्य । द्वारमार्ग असेल शुद्ध । 
उदकें वेष्टितां आपुले परिघ । दोष नाहीं परियेसा ॥ १८५ ॥ 
कृष्णवस्त्र नेसोनि आपण । अपार दोष जेवितां जाण । 
स्त्रीजन वाढिती कांसेवीण । उच्छिष्टसमान परियेसा ॥ १८६ ॥ 
ऐसा विचार करुनि मनीं । भोजन करावें विद्वज्जनीं । 
' विकिरिद विलोहित ' म्हणोनि । अभिमंत्रावें शेष अन्न ॥ १८७ ॥ 
' विकिरिदे ' इति मंत्रासी । म्हणावा अघोर-ऋषि । 
रुद्र-देवता अनुष्टुप्-छंदेसीं । ' अन्नाभिमंत्रणे विनियोगः ' ॥ १८८ ॥ 
ऐसा मंत्र म्हणोन । हातीं घ्यावें शेषान्न । 
यमाचे नांवे बळी घालोन । उत्तरापोशन मग घ्यावें ॥ १८९ ॥ 
उच्छिष्ट सर्व पात्रीचें । घेऊनि हाती, मंत्र वाचे । 
' रौरवे पूये 'ति म्हणावे, त्याच । पात्राजवळीं ठेवावें ॥ १९० ॥ 
उठोनि जावें प्रक्षालनासी । गंडूष करोनि मग हस्त प्रक्षीं । 
न करितां गंडूष प्रक्षाली हस्तासी । आत्मघातकी तोचि जाणा ॥ १९१ ॥ 
मुख प्रक्षाळितां परियेसीं । मध्यमांगुलीं दांत घासी । 
तर्जनीं अंगुष्ठें महादोषी । रौरव नरक परियेसा ॥ १९२ ॥ 
बरवें हस्त प्रक्षाळून । करावें दंतशोधन । 
हातीचें पवित्र सोडून । टाकावें नैऋत्य दिशे ॥ १९३ ॥ 
' अंगुष्ठमात्र पुरुष ' म्हणावा मंत्र परियेसा । 
 हस्त घासोनि चक्षुषी । उदक लावावें अवधारा ॥ १९४ ॥ 
ऐसा जरी न म्हणा मंत्र । चक्षुरोग होय त्वरित । 
याकारणें करा निश्र्चित । हस्तोदकें आरोग्यता ॥ १९५ ॥ 
द्विराचमन करोनि । ' अंयगौ ' मंत्र म्हणोनि । 
 ' द्रुपदादिवेन्मुमुचा ' उच्चारोनि । ' प्राणानां ग्रंथिरसि ' म्हणावें ॥ १९६ ॥ 
ऐसा मंत्र तुम्ही जपतां । भोजनठायीं जाऊनि बैसतां । 
द्विराचमन करुनि निरुता । नाभिस्पर्श मग करावा ॥ १९७ ॥ 
स्मरावें मग अगस्त्यासी । कुंभकर्ण-वडवाग्नीसी । 
 वृकोदर-शनैश्र्चरासी । ' इल्वल-वा तापिवज्जीर्यतां ' म्हणावें ॥ १९८ ॥ 
हस्त दाखवावे अग्नीसी । आणिक सांगेन परियेसीं । 
बंधुवर्ग असती जयासी । पुसूं नये वस्त्रें कर ॥ १९९ ॥ 
मग स्मरावें श्रीगुरुसी । आणिक स्मरावें कुळदेवतेसी । 
येणेंपरी विधीसीं । भोजन करावें द्विजोत्तमें ॥ २०० ॥ 
विप्र विनवी श्रीगुरुसी । भोजनप्रकार सांगितला आम्हांसी । 
विधिनिषिद्ध अन्नें कैसीं । निरोपावीं कृपेने ॥ २०१ ॥ 
विप्रवचन ऐकोनि । निरोपिती श्रीगुरु संतोषोनि । 
ऐक ब्राह्मणा म्हणोनि । अतिप्रेमें निरोपिती ॥ २०२ ॥ 
म्हणे सरस्वती-गंगाधरु । ब्राह्मणपणाचा आचारु । 
निरोप दिधला श्रीगुरु । म्हणोनि विनवी संतोषें ॥ २०३ ॥ 
वैश्र्वदेवाविणें अन्न । अथवा गणान्न परिपूर्ण । 
घातलें असेल बहु लवण । बहुमिश्रितान्न जेवूं नये ॥ २०४ ॥ 
लसुण गाजर कांदे मुळे । वृतांक श्र्वेत वाटोळे भोंपळे । 
छत्राकार शाका सकळ । वर्जाव्या तुम्हीं परियेसा ॥ २०५ ॥ 
धेनु-अजा-महिषीक्षीर । प्रसूतीचें वर्जावें दशरात्र । 
नूतनोदक पर्जन्य पूर । त्रिरात्री तुम्हीं वर्जावें ॥ २०६ ॥ 
कूष्मांड-डोरली-पडवळेसीं । मुळा-बेल-आंवळेसी । 
न भक्षावें प्रतिपदेसी । भक्षितां पाप परियेसा ॥ २०७ ॥ 
स्वर्गापवर्ग चाड ज्यासी । अष्टमी वर्जा औदुंबरासी । 
आमलकफळ रात्रीसी । वर्जावें भानुवार-सप्तमीं ॥ २०८ ॥ 
बेलफळ वर्ज शुक्रवारीं । शमीफळ मंदवारीं । 
भक्षितां लक्ष्मी जाय दुरी । वर्जावें तें दिवसीं परियेसा ॥ २०९ ॥ 
धात्रीफळ रात्रीसीं । भक्षितां हानि प्रज्ञेसी । 
नाश करी वीर्यासी । धात्रीफळ वर्जावें ॥ २१० ॥ 
नख केश पडलें अन्न । स्पर्श केलिया मार्जारें जाण । 
वायस-घारी-कुक्कुटादिकरुन । स्पर्शलें अन्न त्यजावें ॥ २११ ॥ 
धेनु-मूषक-मुखस्पर्श । अथवा संपर्क अधः-केश । 
त्यजावें अन्न भरवसें । असेल उच्छिष्ट अन्नाजवळी ॥ २१२ ॥ 
एके हातीं वाढिलें अन्न । शिळें असेल शीतल जाण । 
वर्जावें तुम्हीं ब्राह्मण । निषिद्ध बोलिलें आचारीं ॥ २१३ ॥ 
घृततैलसंमिश्रित । शिळें अन्न पवित्र । 
तळिलें असेल सर्वत्र । शिळें नव्हे सर्वथा ॥ २१४ ॥ 
विप्र विकिती गोरस । घृत क्षीर परियेस । 
घेतां घडती महादोष । साक्षात्-वन्हिपक्व जेवूं नये ॥ २१५ ॥ 
माषान्नाचे वटक देखा । शिळे नव्हती कधीं ऐका । 
जैसें लाह्यापीठ देखा । शिळें नव्हे परियेसा ॥ २१६ ॥ 
कंदमूळादि मसुरान्न । जवांचें असेल परमान्न । 
गुडयुक्त असेल अन्न । शिळें नव्हे परियेसा ॥ २१७ ॥ 
ऐशा शिळ्या अन्नासी । दोष नाही परियेसीं । 
विटाळ होतां महादोषी । शुचि स्थानीं असावें ॥ २१८ ॥ 
तिळमिश्रित भक्ष्यासी । जेवूं नये रात्रीसी । 
जेवितां होय महादोषी । श्रीगुरु म्हणती ब्राह्मणातें ॥ २१९ ॥ 
भोजन केलियानंतर । तांबूल घ्यावे परिकर । 
क्रमुक-चूर्ण-पर्ण सत्वर । घ्यावें द्यावें ब्राह्मणासी ॥ २२० ॥ 
क्रमुक एक सुखारोग्य । द्वय नेदावे निष्फळ अयोग्य । 
त्रीणि द्यावीं महाभाग्य । चतुर्थ देतां दुःख जाणा ॥ २२१ ॥ 
पंच क्रमुक देतां जरी । आयुःप्रज्ञा वाढे भारी । 
देऊं नये सहा सुपारी । मरण सांगे परियेसा ॥ २२२ ॥ 
पर्णमूल न काढी जरी । व्याधि संभवे अवधारीं । 
अग्र भक्षितां पाप भारी । जीर्णपर्णें आयुष्य क्षीण ॥ २२३ ॥ 
पर्णपृष्ठीं बुद्धिनाश । द्विपर्ण खातां महादोष । 
ऐश्र्वर्याचा होय विनाश । ऋषिसंमत असे जाणा ॥ २२४ ॥ 
पर्णेवीण क्रमुक मुखीं । घालतां आपण होय असुखी । 
सप्त जन्म दरिद्री दुःखी । अज्ञानी होय अंतकाळीं ॥ २२५ ॥ 
यतीश्र्वरादिब्रह्मचारीं । रजस्वला स्त्री विधवा जरी । 
तांबूल भक्षितां मांसापरी । रस त्याचा सुरापानसम ॥ २२६ ॥ 
तांबूल भक्षिल्यानंतरें । सायंसंध्या करावी विप्रें । 
सूर्य अर्धमंडळ उरे । अर्घ्यें द्यावीं परियेसा ॥ २२७ ॥ 
बैसोनि द्यावीं अर्घ्यें तीनि । चारी द्यावी काळ क्रमूनि । 
गायत्री मंत्र जपूनि । ' इमंमे वरुण ' म्हणावा ॥ २२८ ॥ 
गोत्रप्रवर उच्चारोन । मग करावें औपासन । 
करावें निशीं भोजन । क्षीरमिश्रित मुख्य असे ॥ २२९ ॥ 
रात्रीं करितां परिषिंचना । ' ऋतं त्वा सत्येन ' मंत्र म्हणावा । 
येणें विधीं करा भोजना । पूर्वी जैसे बोलिलें असे ॥ २३० ॥ 
भोजन झालियानंतर । वेदाभ्यास एक प्रहर । 
मग जावें शयन घर । येणें विधीं आचरावें ॥ २३१ ॥ 
शयन करावयाचें विधान । सांगेन ऐका विद्वज्जन । 
पराशर सांगे वचन । तेंचि विधान सांगतसें ॥ २३२ ॥ 
खट्वा निर्मळ असावी जाण । वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण । 
औदुंबर अश्र्वत्थ पिंपरी निर्गुण । न करावी खट्वा परियेसा ॥ २३३ ॥ 
निषिद्ध जांबूळ काष्ठाची । वर्जावी प्रेतगजदंताची । 
भिन्नकाष्ठ त्यजावी साची । बरवी असावी खट्वा देखा ॥ २३४ ॥ 
सुमुहुर्तें विणावी खट्वा देखा । धनिष्ठा-भरणी मृगशिरा दूषका । 
वार सांगेन विशेखा । शुभाशुभ असतीं फळें ॥ २३५ ॥ 
रविवारीं अति लाभ देखा । चंद्रवारीं महासुखा । 
भौमवारीं न करी पाविजे दुःखा । बुधवारीं सांगे महापीडा ॥ २३६ ॥ 
गुरुवारीं विणल्यासी । बहु पुत्र होती त्यासी । 
शुक्रवारीं अतिविशेषीं । मृत्यु पावे मंदवारीं ॥ २३७ ॥ 
स्वगृहीं शयन पूर्वमुखी । श्र्वशुरगृहीं दक्षिणमुखी । 
प्रवासकाळी पश्र्चिममुखी । शयन करावें परियेसा ॥ २३८ ॥ 
सदा निषिद्ध उत्तर दिशा । वरकड फळ सांगितलें विशेषा । 
विप्र-आचार आहे ऐसा । ऋषिमार्ग शुभाचार ॥ २३९ ॥ 
पूर्णकुंभ ठेवूनि उशीं । मंगळ द्रव्य घालावें बहुवसी । 
रात्रिसूक्त म्हणावें परियेसीं । विष्णुस्मरण करावें ॥ २४० ॥ 
मग स्मरावें अगस्त्य ऋषि । माधव मुचुकुंद परियेसीं । 
आस्तिक कपिल-महाऋषि । सर्पस्तुति करावी ॥ २४१ ॥ 
निषिद्ध स्थानें निजावयासी । सांगेन ऐका समस्त ऋषि । 
जीर्ण देऊळ स्मशानेसीं । एक वृक्षातळीं वर्जावें ॥ २४२ ॥ 
चारी बिदीं चोहाटेसी । ईश्र्वरस्थान परियेसीं । 
मातापिता निजते स्थळासी । निजूं नये परियेसा ॥ २४३ ॥ 
वर्जावें वारुळाजवळीं । वर्जावी आपण तळ्याचे पाळीं । 
नदीतीरीं स्वादुवस्तू जवळी । अघोर स्थळीं निजूं नये ॥ २४४ ॥ 
वर्जावें शयन धान्यावरी । निजूं नये मोडके घरीं । 
वडील खालती निजती जरी । खट्वा वर्जावी त्यांपुढें ॥ २४५ ॥ 
नेसून ओलें अथवा नग्न । निजूं नये शिर वेष्टून । 
आकाशाखालीं वर्जोन । दीप असतां निजूं नये ॥ २४६ ॥ 
पूर्वरात्रीं अपररात्रीसी । निजूं नये परियेसीं । 
असूं नये स्त्रियेपाशीं । रजस्वला चतुर्थदिनीं ॥ २४७ ॥ 
असावें जानवें उपवीतीसी । दृष्टीं पडों नये योनीसी । 
आयुःक्षीण परियेसीं । दीप वर्जावा याकारणें ॥ २४८ ॥ 
नीळ वस्त्र नेसले स्त्रियेशीं । करितां संग परियेसीं । 
पुत्र उपजे चांडाळ-ऐसी । शुभ वस्त्र विशेष ॥ २४९ ॥ 
रजस्वला न होतां स्त्रियेशीं । न करावा संग परियेसीं । 
संग करितां महादोषीं । आणिक प्रकार एक असे ॥ २५० ॥ 
दश वर्षें होतां कन्येसी । रजस्वला सर्वत्रांसी । 
ऐका तुम्ही समस्त ऋषि । पराशर सांगतसे ॥ २५१ ॥ 
ऋतुकाळ असतां स्त्रियेसी । गांवासी जातां पुरुषासी । 
भ्रूणहत्या महादोषी । प्रख्यात असे परियेसा ॥ २५२ ॥ 
वृद्ध अथवा वांझेसी । मरत असती पुत्र जिसी । 
बहु कन्या होती जिसी । चुकतां ऋतु दोष नाहीं ॥ २५३ ॥ 
ऋतु देतां चतुर्थ दिवसीं । पुत्र उपजे अल्पायुषी । 
कन्या होय पांचवे दिवसीं । सहावे दिनीं पुत्र परियेसा ॥ २५४ ॥ 
विषम दिवसीं कन्या जाण । सम-दिवशीं पुत्र सगुण । 
दहा दिवस ऋतुकाळ खूण । चंद्रबळ असावें ॥ २५५ ॥ 
मूळ-मघा-रेवतीसी । संग न करावा परियेसीं । 
कोप नसावा उभयतांसी । संतोषरुपें असावें ॥ २५६ ॥ 
ऋतुकाळीं स्त्रीपुरुषांसी । जे जे असेल मानसीं । 
सत्वरजतमोगुणेंसी । तैसा पिंड उपजे देखा ॥ २५७ ॥ 
ऐसा ब्राह्मणाचा आचार । सांगता झाला पराशर । 
ऐकोनि समस्त ऋषीश्र्वर । तेणेंपरी आचरती ॥ २५८ ॥ 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी । 
जो आचरे विधींसी । दैन्य कैंचे तया घरीं ॥ २५९ ॥ 
तो वंद्य होत देवांसी । कामधेनु येईल घरासी । 
लक्ष्मी राहे अखंडेसीं । पुत्रपौत्रीं नांदत ॥ २६० ॥ 
होय आपण शतायुषी । न घडती कांही दोष त्यासी । 
तो न भिये कळिकाळासी । ब्रह्मज्ञानी होय जाणा ॥ २६१ ॥ 
काळमृत्यु चुके देखा । अपमृत्यु घडे कैंचा ऐका । 
ऐसा आचार आहे निका । नित्य रहाटावें येणेंपरी ॥ २६२ ॥ 
ऐसें ऐकोनियां वचना । विप्र लागे श्रीगुरुचरणां । 
जाहला उपदेश मज उद्धारणा । कृपासागरा गुरुमूर्ति ॥ २६३ ॥ 
भक्तजन तारावयासी । अवतरलासी हृषीकेशी । 
परिहारिलें अंधकारासी । ज्ञानज्योति प्रकाशली ॥ २६४ ॥ 
ऐसें विनवोनि ब्राह्मण । पुनरपि धरिले दोनी चरण । 
श्रीगुरुमूर्ति संतोषोन । प्रसन्न झाले तये वेळीं ॥ २६५ ॥ 
म्हणती श्रीगुरु तयासी । आचार सांगितला तुज हर्षी । 
न जावें आतां भिक्षेसी । आचार करुनि सुखी ऐस ॥ २६६ ॥ 
जी जी इच्छिसी कामना । होईल निरुती सत्य जाणा । 
कन्या पुत्र नांदती सगुणा । संदेह न धरावा मानसीं ॥ २६७ ॥ 
ऐसा वर लाधोनि । विप्र गेला संतोषोनि । 
होता तैसाचि आचरोनि । सकळाभीष्टें लाधला ॥ २६८ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र आहे ऐसी । 
ऐकतां ज्ञान समस्तांसी । मूढ होय ब्रह्मज्ञानी ॥ २६९ ॥ 
अज्ञानतिमिरअंधकारासी । ज्योतिस्वरुप कथा सुरसीं । 
जें जें इच्छिलें मानसीं । पाविजे त्वरित अवधारा ॥ २७० ॥ 
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार । 
ऐकतां होय मनोहर । सकळाभीष्ट साधती ॥ २७१ ॥ 
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ ॥ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे कर्ममार्गनिरुपणं नाम सप्तत्रिंशोध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Gurucharitra Adhyay 37

गुरुचरित्र अध्याय ३७


Custom Search

No comments: