Friday, April 20, 2018

AatmaPanchakam आत्मपंचकम्

Shankaracharyas Spiritual Stotras
आत्मपंचक
नाहं देहो नेन्द्रियाण्यंतरंगो 
नाहंकारः प्राणवर्गो न बुद्धिः ।
दारापत्यक्षेत्रवित्तादिदूरः 
साक्षी नित्यः प्रत्यगात्मा शिवोऽहम् ॥ १ ॥
१) पंचमहाभूतांचें बनलेलें शरीर मीं नव्हें, म्हणून नामरुप, जन्ममरण मानापमान इत्यादि स्थूलदेहाचे धर्म मला कसे स्पर्श करुं शकणार ? चक्षुरादि इन्द्रियें मी नक्षल्यामुळें त्या इन्द्रियांचें पहाणें, ऐकणें इत्यादि धर्म असंग जो मी त्या मला स्पर्श करुं शकत नाहींत. संकल्पविकल्पात्मक मन व अहंकार मीं नव्हे. पंचप्रकारचे प्राण मी नव्हे, म्हणून त्याचे क्षुधापिपासादि धर्मही माझे नव्हेत. निश्र्चयात्मक बुद्धि मी नव्हें. स्त्री, पुत्र, धन, क्षेत्र इत्यादि संसारी पदार्थांहून मी अत्यंत विलक्षण आहें, म्हणजे मी असंग, नित्य, साक्षी प्रत्यगात्मा शिवस्वरुप आहे. 
रज्जवज्ञानाद् भाति रज्जुर्यथाऽहिः,
स्वात्माज्ञानादात्मनो जीवभावः ।
आप्तोक्त्या हि भ्रान्तिनाशे स रज्जु-
र्जीवो नाहं देशिकोक्त्या शिवोऽहम् ॥ २ ॥
२) जसें तिमिरादि दोषानें रज्जूचें, रज्जुरुपानें यथार्थ ज्ञान न झाल्यानें रज्जूच्या ठिकाणी सर्पभान होतें, तसें आत्मस्वरुप (ब्रह्माच्या) अज्ञानानें शुद्ध आत्मा, कर्ता, भोक्ता, सुखी, दुःखी, जन्ममरण धर्मवान् इत्यादि जीवभावानें भासतो. रज्जूच्या ठिकाणीं भ्रमानें सर्प पहाणार्‍याला, अरे ! हा सर्प नसोोन रज्जू आहे, असा रज्जूचे यथार्थ ज्ञान असणारा पुरुष उपदेश करतो, त्या उपदेशानें त्याची भ्रमनिवृत्ति होऊन रज्जूचे त्याला यथार्थ ज्ञान होतें. त्याप्रमाणें श्रोत्रीय, ब्रह्मनिष्ठ सद्गुरुच्या उपदेशानें आत्म्याच्या यथार्थ ज्ञानाचा उदय झाल्यावर, मी हीन, दीन, जीव नसोोन शुद्ध, निर्विकार, असंग शिवस्वरुप आहें असा मुमुक्षूचा निश्र्चय होतो.   
आभातीदं विश्र्वमात्मन्यसत्यं, 
सत्यज्ञानानन्दरुपे विमोहात् ।
निद्रामोहात्स्वप्नवत्तन्न सत्यम् 
शुद्धः पूर्णो नित्य एकः शिवोऽहम् ॥ ३ ॥      
३) सत्य, ज्ञान, आनन्दरुप, एक, अद्वितीय, अखण्ड अशा आत्मस्वरुपाचे ठिकाणीं अविद्यारुप भ्रान्तीनें कालत्रयी नसलेले हें नामरुपात्मक जग भासते; याचकरतां निद्रादोषानें भासणार्‍या, स्वप्नपदार्थाप्रमाणें हा जागृतादिरुप संसार मिथ्या, क्षणभंगुर आहे; सत्य नाहीं, सर्व संसाराचें अधिष्ठान एक मींच सत्य, शुद्ध, पूर्ण, अद्वय शिवरुप आहे. 
नामिथ्याहं जातो न प्रवृद्धो न नष्टो,
देहस्योक्ताः प्राकृताः सर्वधर्माः ।
कर्तृत्वादिश्र्चिन्मयस्यास्ति नाहं-
-कारस्यैव ह्यात्मनो मे शिवोऽहम् ॥ ४ ॥
४) जन्म, वृद्धि व नाश इत्यादि विकार माझ्या ठिकाणीं नाहींत. जन्ममरणादि सहा विकार प्राकृत अनात्म शरीराचे आहेत. नित्यमुक्त, असंग, शुद्ध आत्म्याचे नाहीत. कर्तृत्व, भोक्तृत्व, सुखित्व, दुःखित्व इत्यादि सर्व धर्म अहंकाराचे आहेत; चैतन्य शुद्धस्वरुप आत्म्याचे हे धर्म असणें शक्य नाहीं. मी तर चैतन्य आत्मा, शुद्धस्वरुप आहे.
मत्तो नान्यत्किंचिदत्रास्ति विश्र्वम्,
सर्वं बाह्यं वस्तुमायोपक्लृप्तम् ।
आदर्शान्तर्भासमानस्य तुल्यम ,
मय्यद्वैते भाति तस्माच्छिवोऽहम् ॥ ५ ॥   
५) एक, अद्वैत, अखण्ड आत्मव्यतिरिक्त सर्व दृश्याचा म्हणजे विश्र्वाचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे. आरशांत भासणार्‍या कल्पित पदार्थाप्रमाणें हा सर्व नामरुपात्मक संसार अघटित घटना मायेनें शुद्ध, अद्वैत आत्म्यांत मिथ्या भासते , एवढ्या चक्रांत मी आनंद शिवस्वरुप आहे. मद् व्यतिरिक्त अन्य पदार्थ नाहीं. 

Custom Search

No comments: