Wednesday, April 11, 2018

Samas Dusara Nispruha Vyapa समास दुसरा निस्पृह व्याप


Dashak Pandharava Samas Dusara Nispruha Vyapa 
Samas Dusara Nispruha Vyapa, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Nispruha Sadhak. He uses his knowledge to bring people in Parmarth. It is dscribed how he looks, where he leaves and how he behaves with others.
समास दुसरा निस्पृह व्याप 
श्रीराम ॥
पृथ्वीमधें मानवी शरीरें । उदंड दाटलीं लाहान थोरें ।
पालटती मनोविकारें । क्षणाक्षणा ॥ १ ॥
१) जगामधें अक्षरशः असंख्य लहानमोठी माणसें आहेत. ती आपापल्या मनोविकाराप्रमाणें क्षणाक्षणाला वेगवेगळी वागतात. 
जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती । सारिख्या नस्ती आदिअंतीं ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काये म्हणोनी ॥ २ ॥
२) जितक्या मूर्ति तितक्या प्रकृति. सुरवातीपासून अखेरपर्यंत माणसांचें वागणें सारखें नसतें. त्यांचा कांहीं नेम नसल्यानें माणसांच्या तर्‍हा किती व काय म्हणून सांगाव्यात.  
कित्येक म्लेंच होऊन गेले । कित्येक फिरंगणांत आटले ।
देशभाषानें रुधिले । कितीयेक ॥ ३ ॥
३) पुष्कळ लोक बाटून मुसलमान झाले. कित्येक लोक पोर्तुगीजराज्यांत नाहींसे झाले. पुष्कळ लोक देशी भाषांच्या भेदानें एकमेकांपासून दुरावले आहेत. 
मर्‍हाष्टदेश थोडा उरला । राजकारणें लोक रुधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ॥ ४ ॥
४) त्यांतल्या त्यात महाराष्ट्रामधें थोडे चैतन्य आहे. तेथें राजकारण करण्यास वाव आहे. माणसांना जेवायला वेळ नाहीं. येवढी कामें पडली आहेत.   
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त जाले ।
रात्रंदिवस करुं लागले । युद्धचर्चा ॥ ५ ॥
५) पुष्कळ माणसें युद्धामध्यें गुंतली आहेत. तेंच डोक्यांत असल्यानें दिवसरात्र ती माणसें युद्धचर्चाच करतात.  
उदिम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा जाला ।
अवघा पोटधंदाच लागला । निरंतर ॥ ६ ॥
६) व्यापारी माणसांच्यामागें त्यांचा व्यापार लागला आहे. त्यांत त्यांना फुरसत नाहीं. बाकीच्यांना त्यांचा पोटाचा धंदा सदैव मागें लागला आहे.  
शडदर्शनें नाना मतें । पाषांडें वाढलीं बहुतें ।
पृथ्वीमधें जेथतेथें । उपदेसिती ॥ ७ ॥
७) बुद्धीच्या क्षेत्रांत षड्दर्शनें, इतर अनेक मतें आणि पुष्कळ समाजघातक मतें यांची खूप वाढ झाली आहे. जगांत जिकडे पहावें तिकडे उपदेश देणेंच चाललेले आहे. 
स्वार्थी आणि वैष्णवी । उरलीं सुरलीं नेलीं आघवी ।
ऐसी पाहातां गथागोवी । उदंड जाली ॥ ८ ॥
८) यांतून जें लोक उरले त्यांना स्मार्तांनी व वैष्णवांनी आपापल्या संप्रदायांत ओढून घेतलें. एकंदरींत फारच गुंतागुंत झाली आहे.  
कित्येक कामनेचे भक्त । ठाइं ठाइं जाले आसक्त ।
युक्त अथवा अयुक्त । पाहातो कोण ॥ ९ ॥
९) कांहीं सकाम भक्त ठिकठिकाणीं आसक्त होऊन बसलें आहेत. त्यांत योग्य काय व अयोग्य काय याचा कोणीच विचार करीत नाहीं. 
या गलबल्यामधें गल्बला । कोणीं कोणीं वाढविला ।
त्यास देखों सकेनासा जाला । वैदिक लोक ॥ १० ॥
१०) या सगळ्या गडबडींत कोणीकोणी आपला पंथ वाढविला. त्यांचा वैदिक लोक द्वेष करतात.  
त्याहिमधें हरिकिर्तन । तेथें वोढले कित्येक जन ।
प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान । कोण पाहे ॥ ११ ॥
११) त्यांत आणखीं कांहीं लोक हरिकिर्तनाकडे ओढले जातात. प्रत्यक्ष आनुभवाचें ज्ञान आहें किंवा नाहीं याची कोणीच चौकशी करित नाहीं. 
या कारणें ज्ञान दुल्लभ । पुण्यें घडे अलभ्य लाभ ।
विचारवंतां सुल्लभ । सकळ कांहीं ॥ १२ ॥
१२) या सगळ्यामुळें खरें ज्ञान दुर्लभ झालें आहे. पुण्य पदरीं असेल तरच तो अलभ्य लाभ घडतो. परंतु जो विचारवंत आहे त्याला ज्ञान सुलभ आहे. 
विचार कळला सांगतां नये । उदंड येती अंतराये ।
उपाये योजितां अपाये । आडवे येती ॥ १३ ॥
१३) एखाद्याला खरें ज्ञान झालें तर तें  कोणास सांगतां येत नाही. त्यामध्यें फार अडचणी येतात. उपाय करायला जावें तर अपाय आडवें येतात. 
त्याहिमधें जो तिक्षण । रिकामा जाऊं नेदी क्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । सकळां माने ॥ १४ ॥
१४) अशा सगळ्या परिस्थितीमध्यें एखादा शहाणा माणूस निघतो. एक क्षण देखील तो वाया जाऊं देत नाहीं. तो चतुर, बुद्धिमान आणि तारतम्य जाणणारा असल्यानें सर्वांना पसंत पडतो.  
नाना जिनस उदंड पाठ । वदों लागला धडधडाट ।
अव्हाटचि केली वाट । सामर्थ्यबळें ॥ १५ ॥
१५) त्याला अनेक विषयांचें ज्ञान पाठ असतें. तो बोलूं लागला कीं तें ज्ञान तो घडाघडा सांगू लागतो. आपल्या ज्ञानाच्या सामर्थ्यानें तो वाकडी वाट सरळ करतो. 
प्रबोधशक्तीची अनंत द्वारें । जाणे सकळांची अंतरें ।
निरुपणें तदनंतरें । चटक लागे ॥ १६ ॥
१६) लोकांना जागे करुन  शहाणें करण्याचे पुष्कळ मार्ग तो जाणतो. लोकांचें अंतःकरण तो ओळखतो. त्यामुळें त्याचे निरुपण ऐकल्यावर लोकांना त्याची चटक लागते. 
मतें मतांतरें सगट । प्रत्येय बोलोन करी सपाट ।
दंदक सांडून नीट । वेधी जना ॥ १७ ॥
१७) आपल्या अनुभवांच्या बोलांनी इतर सर्व मतें आणि मतांतरें तो जमीनदोस्त करुन टाकतो. अर्थहीन परंपरा सोडून तो लोकांना बरोबर मार्गदर्शन करतो.  
नेमकें भेदकें वचनें । अखंड पाहे प्रसंगमानें ।
उदास वृत्तीच्या गुमानें । उठोन जातो ॥ १८ ॥
१८) त्याचे बोलणें बरोबर लागूं पडणारे व संशय छेदणारें असतें. प्रसंग काय व कसा आहे हे तो नेहमी पाहातो. आपल्या वैराग्यशील वृत्तीच्या बलानें तो उठून चालता होतो.   
प्रत्यये बोलोन उठोन गेला । चटक लागली लोकांला ।
नाना मार्ग सांडून त्याला । शरण येती ॥ १९ ॥
१९) स्वानुभवाचें ज्ञान बोलून निघून गेल्यानें लोकांना त्याची चटक लागते. मग इतर नाना प्रकारचे मार्ग सोडून लोक त्याला शरण जातात.
परी तो कोठें आडळेना । कोणे स्थळीं सांपडेना ।
वेष पाहातां हीन दीना । सारिखा दिसे ॥ २० ॥
२०) पण त्याला शोधला तर तों कोठेंच आढळत नाहीं. कोणत्याही एका जागीं सांपडत नाहीं. त्याचा वेशही अगदी हीनदीनासारखा असतो.
उदंड करी गुप्तरुपें । भिकार्‍यासारिखा स्वरुपें ।
तेथें येककीर्तिप्रतापें । सीमा सांडिली ॥ २१ ॥
२१) स्वतः गुप्त राहून तो कार्य करतो. बाहेरुन दिसावाला तो भिकार्‍यासारखा दिसतो.पण त्याचे यश, त्याची कीर्ति, त्याचा प्रताप जिकडेतिकडे पसरतात.  
ठाइं ठाइं भजन लावी । आपण तेथून चुकावी ।
मछरमतांची गोवी । लागोंच नेदी ॥ २२ ॥
२२) ठिकठिकाणी तो लोकांना भजनाकडे परंतु आपण तेथून गायब होतो. कोणी आपला मत्सर करील अशा गुंतागुंतींत तो अडकत नाहीं.     
खनाळामधें जाऊन राहे । तेथें कोणीच न पाहे ।
सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ ॥ २३ ॥  
२३) तो डोंगराच्या घळींत जाऊन राहातो. तेथें जाऊन त्याला कोणी भेटू शकत नाही. पण तेथें तो सर्वांची नेहमी काळजी करतो. 
अवघड स्थळीं कठीण लोक । तेथें राहाणें नेमक ।
सृष्टीमधें सकळ लोक । धुंडीत येती ॥ २४ ॥
२४) डोंगरांत अवघड ठिकाणीं तो राहातो. तेथें त्याचे नेहमीचे वास्तव असते. तरी जगांतील लोक त्याला शोधत येतात.  
तेथें कोणाचें चालेना । अनुमात्र अनुमानेना ।
कट्ट घालून राजकारणा । लोक लावी ॥ २५ ॥
२५) त्याच्यासमोर कोणचे कांहीं चालत नाही. त्याची थोडीही कल्पना येत नाहीं. समूह निर्माण करुन तो लोकांना राजकारण करायला शिकवतो. 
लोकीं लोक वाढविले । तेणें अमर्याद जाले ।
भूमंडळीं सत्ता चाले । गुप्तरुपें ॥ २६ ॥
२६) समूहानें समूह निर्माण होतात. त्यामुळें मोठी संघटना तयार होते. अशा रीतीनें तो गुप्त राहून त्याची सत्ता समाजावर चालते. 
ठाइं ठाइं उदंड ताबे । मनुष्यमात्र तितुकें झोंबे ।
चहुंकडे उदंड लांबे । परमार्थबुद्धी ॥ २७ ॥
२७) ठिकठिकाणीं त्याच्या अनुयायांचे समुह असल्यानें त्याकडे लोक आकर्षिले जातात. समाजामध्यें सर्वत्र परमार्थबुद्धि पसरते.  
उपासनेचा गजर । स्थळोस्थळीं थोर थोर ।
प्रत्ययानें प्राणीमात्र । सोडविले ॥ २८ ॥
२८) त्यामुळें जागोजागीं उपासनेचा गजर ऐकूं येऊं लागतो. अशारीतीनें आपल्या स्वानुभवाच्या सामर्थ्यानें तो लोकांना मुक्त करतो. 
ऐसे कैवाडे उदंड जाणे । तेणें लोक होती शहाणे ।
जेथें तेथें प्रत्येय बाणे । प्राणीमात्रासी ॥ २९ ॥  
२९) लोकसंग्रहाच्या अनेक क्लुप्त्या त्याच्यापाशीं असतात. त्याचा वापर केल्यानें लोक शहाणें होतात. प्रत्येक ठिकाणीं त्याच्या ज्ञानाचा लोकांना प्रत्यय येतो.            
ऐसी कीर्ति करुन जावें । तरीच संसारास यावें ।
दास म्हणे हें स्वभावें । संकेतें बोलिलें ॥ ३० ॥ 
३०) अशी कीर्ति संपादून जाण्यांतच संसारांत येण्याचें सार्थक आहे. रामदासस्वामी म्हणतात कीं, अगदीं सहज पण थोडक्यांत खुणेप्रमाणें मी हें सांगितलें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहव्यापलक्षणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Nispruha Vyapa
समास दुसरा निस्पृह व्याप Custom Search

No comments: