Friday, April 20, 2018

UpadeshPanchakam उपदेपंचकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras


उपदेशपंचकम्
वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयताम् ,
तेनेशस्य विधीयतामपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम् ।
पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसंघीयताम् 
आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात्तूर्णं विनिर्गम्यताम्  ॥ १ ॥
१) ' स्वाध्यायोऽध्येतव्यः ' या न्यायानें नित्य ऋग्वेदादि वेदांचे अध्ययन करावें, वर्णााश्रमधर्माप्रमाणें वेदानें प्रतिपादित याग, दान, तप इत्यादि कर्मांचें श्रद्धापूर्वक अनुष्ठान करावें. या यागादि कर्मांनी ब्रह्मार्पणद्वारा जगदन्तर्यामी, चराचरव्यापी परमेश्र्वराची निष्कामबुद्धीनें व मोठ्या प्रेमानें उपासना कर; संसार फलदायी, असार सकाम कर्माचा मनापासून त्याग कर, अंतःकरणांत उद्भवणार्‍या अशुभ वासनांचा, सदाचारानें व सद्विचारानें नाश कर, क्षणलविरस व बाह्यात्कारी सुखरुप दिसणारें पण स्वरुपानें दुःखरुप, क्षणिक संसारसुखांतील दोषांचें अनुसंधान कर; जीव व ब्रह्म यांचें तत्त्व जाणण्याच्या प्रबल इच्छेनें, तद्विषयक शास्त्रांचा, संतसमागमांत राहून विचार कर; अशा रीतीनें जीवब्रह्मैक्य ज्ञान संपादन करण्याकरतां तुझें अंतःकरण मल व विक्षेपरहित झालें म्हणजे ममतास्पद ग्रहादि परिग्रहाचा त्याग कर, अर्थात् संन्यास ग्रहण कर. 
संगः सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाऽऽधीयताम् ,
शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु संत्यज्यताम् ।
सद्विद्वानुपसृप्यतां प्रतिदिनं तत्पादुके सेव्यताम् ,
ब्रह्मैकाक्षरमर्थ्यतां श्रुतिशिरोवाक्यं समाकर्ण्यताम् ॥ २ ॥
२) सदाचारी, उदारचरित, महानुभाव व प्राणिमात्रावर निरपेक्ष कृपा करणार्‍या संतांचा संग कर. म्हणजे त्यांच्या सान्निध्यांत जाऊन रहा; जगत्कर्ता , आनन्दरुप भगवंताची, अनन्य, निष्काम, प्रेमार्द्र अंतःकरणानें दृढ भक्ति कर; शान्ति दान्ति, अभय, उपरम, अहिंसा, इत्यादि दैवी संपत्तीचा आश्रय कर. रागद्वेषप्रचुर व व्यग्रता उत्पन्न करणार्‍या कर्मांचा त्वरित त्याग कर. वेदाधीत, ब्रह्मनिष्ठ व विरक्त अशा महानुभाव संताच्या नित्य सान्निध्यांत रहा; व प्रेमळ अंतःकरणानें त्यांच्या चरणांची सेवा कर; म्हणजे संताच्या मनोगताप्रमाणें तूं आपलें आचरण ठेव. तात्पर्य काय तर त्यांना कायावाचामनानें शरण जा. अशा तुझ्या निरलस सेवेनें तूं त्यांच्या कृपेला पात्र होशील. मग तुझ्या सेवेनें संतुष्ट होऊन त्यांनीं उपदेशिलेल्या ओंकाररुप एकाक्षरब्रह्माचें अर्थानुसंधानपूर्वक निरंतर चिंतन कर. तसेंच वेदांतील शिरोभाग जें उपनिषदशास्त्र त्यानें प्रतिपादिलेल्या तत्त्वमस्यादि महावाक्यांचें त्यांच्यापासून अर्थसहित श्रवण कर. 
 वाक्यार्थश्र्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयताम् ,
दुस्तर्कात्सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् ।
ब्रह्मैवास्मि विभव्यतामहरहर्गर्वः परित्यज्यताम् 
देहेऽहं मतिख्झ्यतां बुधजनैर्वादः परित्यजताम् ॥ ३ ॥
३) ' अयमात्मा ब्रह्म ' , अहं ब्रह्मास्मि ' , ' तत्त्वमसि ',' प्रज्ञानं ब्रह्म ' या श्रुतींत सांगितलेल्या महावाक्यांचा अर्थ,  ब्रह्मनिष्ठ सद्गुरुच्या मुखानें श्रवण करुन त्यांचा एकाग्र चित्तानें विचार कर. वेदांतील शिरोभाग जी उपनिषदें त्यांनी प्रतिपादन केलेल्या अद्वैत सिद्धान्त पक्षाचा अवलंब कर. बहिर्मुख, दुराग्रही, तार्किक लोकांनी कल्पना केलेल्या तर्क वितर्कांचा त्याग कर. आणि श्रुतिसंमत सत्तर्काचें अनुसंधान कर. सच्चिदानंद, परिपूर्ण, शुद्ध ब्रह्म मी आहे अशी निरंतर आपल्या आत्मस्वरुपाविषयीं भावना ठेव. विद्या, जाति, कुल, पाण्डित्य, इत्यादिविषयक उत्पन्न होणारा अभिमान सोडून दे. क्षणभंगुर, तुच्छ, मलीन, कालग्रस्त, अशा शरीरविषयक अहंभावाच्या ध्यासाचा त्याग कर. ब्रह्मनिष्ठ, संसारविमुख, निरंतर, ईश्रवरध्यानरत, विद्वानांबरोबर आपल्या शुष्क पाण्डित्याच्या जोतावर वादविवाद न करितां त्यांनी दाखविलेल्या शास्त्रसंमत मार्गाचा श्रद्धेनें अवलंब कर. 
क्षुद्व्याधिश्र्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यताम् ,
स्वाद्वन्नं न तु याच्यतां विधिवशात्प्राप्तेन संतुष्यताम् ।
शीतोष्णादि विषह्यतां न तु वृथा वाक्यं समुच्चार्यताम् ,
औदासीन्यमभीप्स्यतां जनकृपानैष्ठुर्यमुत्सृज्यताम् ॥ ४ ॥
४) क्षुधारुप रोगनिवारणार्थ भिक्षारुप औषध सेवन कर म्हणजे क्षुधाशमनार्थ अनासक्त होऊन भिक्षान्नसेवन कर, स्वादिष्ट अन्नाविषयीं मनांत कदापि अभिलाषा धरुं नको. प्रारब्धवशात् असें भिक्षान्न मिळेल त्यांतच संतुष्ट रहा. शीत-उष्ण,मान-अपमान, राग-द्वेष, सुख-दुःख, इत्यादि प्राप्त झाली असतां अंतःकरणाचा क्षोभ न होऊं देतां त्यांचे धैर्यानें सहन कर, चुकूनही व्यर्थवाक्य उच्चार केव्हाही करुं नको, नेहमी उदासीन असंग, निर्विकार, शांत, अशा स्थितींत रहा. आणि अन्य व्यक्तीवर कृपा अगर निष्ठुरता या दोहोंचा त्याग कर.
एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतः समाधीयताम् ,
पूर्णात्मा सुसमीक्ष्यतां जगदिदं तद्वाधितं दृश्यताम् ।
प्राक्कर्मप्राविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरैः श्र्लिष्यताम् 
प्रारब्धं त्त्रिह भुज्यतामथ परब्रह्मात्मना स्थीयताम् ॥ ५ ॥
५) एकान्त, पवित्र व संतांनीं सेवित व जनसंपर्करहित अशा एकान्तस्थलीं मोठ्या सुखानें वास्तव्य करावें, सर्वजगदात्मक, सच्चिदानंद जो नारायण त्याचे स्वरुपाचे ठिकाणी चित्त स्थिर करावें, खालीम, वर, आंत, बाहेर, सर्व दिशांमध्यें एकमात्र जो पूर्णब्रह्म श्रीकृष्ण तो भरलेला आहे असें नित्य अनुसंधान करावें. हें मायाकार्य नामरुपात्मक जगत् कल्पित म्हणजे मिथ्या आहे असें समजून त्या जगताचें अधिष्ठान जें ब्रह्म त्याच्या ठिकाणीं त्याचा बाध कर म्हणजे ' अध्यस्त वस्तू अधिष्ठानरुप असते ' या न्यायानें जगत् ब्रह्मरुप पहा; आत्मतत्त्वज्ञानानें संचित कर्माचा नाश कर, क्रियमाण अंगीं लागूं देऊं नको, आणि प्रारब्ध कर्माचा भोगानें नाश कर; व नित्य आपल्या परब्रह्मरुप स्थितींत निमग्न होऊन रहा.
यः श्र्लोकपंचकमिदं पठते मनुष्यः ,
संचितयत्यनुदिनं स्थिरतामुपेत्य ।
तस्याशु संसृतिदवानलतीव्रघोर-
-तापः प्रशान्तिमुपयाति चिति प्रसादात् ॥ ६ ॥
६) जो कोणी साधक भगवत्पूज्यपाद श्रीशंकराचार्यप्रणीत वरील पांच श्र्लोकांचें मोठ्या आदरानें पठन करील व नित्य एकाग्र अंतःकरणानें त्यांच्या अर्थाचे चिंतन करील, तर शुद्ध, सर्वान्तर्यामी, ज्ञानस्वरुप ईश्र्वर कृपाप्रसादानें त्याच्या संसाररुप दावानलापासून प्राप्त होणार्‍या आध्यात्मिक, आधिभौतिक व आधिदैविक या त्रिविध तापांचा नाश होईल. Custom Search

No comments: