Saturday, April 7, 2018

Samas Dahava Maya Nirupan समास दहावा मायानिरुपण


Dashak Choudava Samas Dahava Maya Nirupan 
Samas Dahava Maya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Maya. He has given many examples.
समास दहावा मायानिरुपण 
श्रीराम ॥
माया दिसे परी नासे । वस्तु न दिसे परी न नासे ।
माया सत्य वाटे परी मिथ्या असे । निरंतर ॥ १ ॥
१) माया दिसते पण ती नाश पावते. सद्वस्तु म्हणजे परब्रह्म दिसत नाहीं. पण तें कधीहीं नाश पावत नाहीं. माया मनाला सत्य वातते, पण ती निरंतर किंवा सदैव खोटी असते. 
करंटा पडोनी उताणा । करी नानापरी कल्पना । 
परी तें कांहींच घडेना । तैसी माया ॥ २ ॥  
२) एक करंटा माणूस उताणा पडून आकाशाकडे पाहात निरनिराळ्या कल्पना करतो, पण त्सें कांहींच घडत नाहीं. माया अशीच असतें.  
द्रव्यदारेचें स्वप्नवैभव । नाना विळासें हावभाव ।
क्षणीक वाटे परी माव । तैसी माया ॥ ३ ॥
३) एका माणसाला स्वप्न पडले. त्यांत त्यांनें बायकोसहीत मोठे वैभव पाहिले. नाना प्रकारचे विलास व भोग पाहिले. स्वप्नापुरते तें खरें वाटतात. पण तो सगळा भास असतो. माया अशीच असते. 
गगनीं गंधर्वनगरें । दिसताती नाना प्रकारें ।
नाना रुपें नाना विकारें । तैसी माया ॥ ४ ॥ 
४) आकाशांत नाना प्रकारची गंधर्वनगरें, निरनिराळे आकार दिसतात. त्यांत अनेक रुपें व अनेक विकार दिसतात. पण तो नुसता देखावा असतो. माया अशीच असते. 
लक्षुमी रायेविनोदाची । बोलतां वाटे साची । 
मिथ्या प्रचित तेथीची । तैसी माया ॥ ५ ॥
५) एखादा बहुरुपी असतो. तो श्रीमंताचें सोंग घेऊन ऐश्वर्याच्या गोष्टी बोलतो. तो बोलतो तेव्हां त्या खर्‍या वाटतात. पण त्या अनुभवाला कांहीं येत नाहींत. त्या खोट्या असतात. माया अशीच आहे.
दसर्‍याचे सुवर्णाचे लाटे । लोक म्हणती परी ते कांटे ।
परी सर्वत्र राहाटे । तैसी माया ॥ ६ ॥
६) दसर्‍याच्या दिवशीं सोनें लुटतात. लोक त्यास सोनें म्हणतात. पण तीं अपट्याची पानें असतात. त्याला काटे असतात. सर्वत्र हीच पद्धत आहे. माया अशीच असते. 
मेल्याचा मोहोछाव करणें । सतीचें वैभव वाढवणें ।
मसणीं जाउनी रुदन करणें । तैसी माया ॥ ७ ॥
७) एखाद्या प्रेताचा मोठा उत्सव करणें, सती निघालेल्या बाईचे वैभव वाढविणें, स्मशानांत जाऊन रडणें, तशी ही माया आहे.   
राखेसी म्हणती लक्षुमी । दुसरी भारदोरी लक्षुमी ।
तिसरी नाममात्र लक्षुमी । तैसी माया ॥ ८ ॥
८) ठेवलेल्या बाईला लक्ष्मी म्हणतात. गर्भपात न व्हावा म्हणून मंत्रानें भारलेली दोरी तिच्या कमरेला बांधतात. त्या भारदोरीला लक्ष्मी म्हणतात. तिसरी नावाची लक्ष्मी. यापैकी खरी लक्ष्मी एकही नाहीं. अशी ही माया असते.  
मुळीं बाळविधवा नारी । तिचें नांव जन्मसावित्री । 
कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥ ९ ॥ 
९) एखादी बालविधवा असते पण तिचे नाव मात्र जन्मसावित्री. आडनांव कुबेर पण दारोदार भीक मागत हिंडतो. अशी माया आहे.  
दशअवतारांतील कृष्णा । उपजे जीर्ण वस्त्रांची तृष्णा ।
नदी नामें पीयुष्णा । तैसी माया ॥ १० ॥
१०) दशावतारांचा खेळ करणारा माणूस कृष्णाचे सोंग घेऊन द्रौपदीला खूप वस्त्रें पुरवितो. पण ते झाल्यावर लोकांपाशी लगेच जुनेंपानें वस्त्र मागतो. बेताचे पाणी असलेली एखादी नदी असते, पण तिचें नांव असतें पियूष्णा म्हणजे अमृताची नदी. तशी ही माया आहे.  
बहुरुपांतील रामदेवराव । ग्रामस्तांपुढे दाखवी हावभाव । 
कां माहांराज म्हणोनि लाघव । तैसी माया ॥ ११ ॥ 
११) एखादा बहुरुपी रामदेव रामदेव राजाचें सोंग घेतो आणि गावकर्‍यांच्या समोर महाराजांप्रमाणें उत्तम हावभाव करतो. आपलें अभिनय कौशल्य दाखवितो. तशीही माया आहे.   
देव्हारां असे अन्नपूर्णा । आणी गृहीं अन्नचि मिळेना ।
नामें सरस्वती सिकेना । शुभावळु ॥ १२ ॥
१२) घरांतील देव्हार्‍यामध्यें अन्नपूर्णा आहे. पण घरांत खायला अन्न नाहीं. बाईचे नांव आहे सरस्वती. पण ती विद्याभ्यास करीत नाहीं. नुसत्या गोवर्‍या थापते. तशी ही माया आहे.      
सुण्यास व्याघ्र नाम ठेविलें । पुत्रास इंद्रनामें पाचारिलें ।
कुरुप परी आळविलें । सुंदरा ऐसें ॥ १३ ॥
१३) एखाद्या कुत्र्याचे नांव ठेवलें वाघ्या. इंद्र नावानें मुलाला हांक मारली. एखाद्या कुरुप स्त्रीचे सुंदरा म्हणून लाड केलें तशी ही माया आहे.  
मूर्ख नामें सकळकळा । राशभी नामें कोकिळा ।
नातरी डोळसेचा डोळा । फुटका जैसा ॥ १४ ॥ 
१४) एखाद्या मूर्खाला सकल कलावंत म्हणावें, गाढवी ओरडू लागली कीं तीला कोकिळा म्हणावें, फुटक्या डोळ्याच्या माणसाला डोळस किंवा सुंदर डोळ्याचा म्हणावें, तशी ही माया आहे.  
मातांगीचें नाम तुळसी । चर्मिकेचें नाम कासी ।
बोलती अतिशूद्रिणीसी । भागीरथी ऐसें ॥ १५ ॥
१५) एखाद्या मांगिणीचें नांव तुळशी, चांभारणीचें नांव काशी किंवा अतिशूद्रीणीचे नांव भागिरथी असावें, अशी ही माया आहे.    
साउली आणी अंधकार । येक होतां तेथीचा विचार ।
उगाचि दिसे भासमात्र । तैसी माया ॥ १६ ॥
१६) सावली आणि अंधार एकत्र मिसळले तर काय होते याचा विचार करावा. यांत जें कांहीं दिसतें तें भासमात्र असतें. तशी ही माया आहे.  
श्रवण बोटें संधी करतळा । रविरश्में दिसती इंगळा ।
रम्य आरक्तकल्होळ । तैसी माया ॥ १७ ॥  
१७) आपलें कान, बोटें, सांधें, तळहात हे सूर्याच्या प्रकाशांत निखार्‍यासारखें लाल दिसतात. तो लालपणा खरा नसतो. तशी ही माया आहे. 
भगवें वस्त्र देखतां मनाला । वाटे अग्नचि लागला ।
विवंचितां प्रत्ये आला । तैसी माया ॥ १८ ॥ 
१८) एखाद्यानें छान भगवें वस्त्र घातलेले दिसलें तर त्याच्या अंगाला आग लागली आहे असा भास होतो. पण नीट निरीक्षण केल्यावर तें तसेम नाहीं हेम पटतें. तशी ही माया आहे. 
जळीं चरणकरांगुळें । आखुड लांबें किरकोळें ।
विपरीत काणें दिसती जळें । तैसी माया ॥ १९ ॥
१९) हाताची बोटें पाण्यांत बुडविली तर आखूड, लांब, बारीक, विचित्र, वांकडी अशी दिसतात. पाण्यामुळें ती तशीं दिसतात. माया तशी आहे.  
भोवंडीनें पृथ्वी कलथली । कामिणीनें पिवळी जाली ।
सन्यपातस्थां अनुभवली । तैसी माया ॥ २० ॥
२०) भोवळ आलेल्या माणसाला पृथ्वी फिरल्यासारखीं वाटते. कावीळ झालेल्या माणसाला ती पिवळी दिसते. सन्नितापाचा ताप आलेल्या माणसाला  ती कांहींच्या कांहीं अनुभवास येते. तशी ही माया आहे.  
कोणीयेक पदार्थविकार । उगाचि दिसे भासमात्र ।
अनन्याचा अन्य प्रकार । तैसी माया ॥ २१ ॥
२१) एखाद्या पदार्थाचें मूळ स्वरुप एकअसतें. त्यामध्यें कांहीं बदल झाल्यानें तें निराळें आहे असा उगीच भास होतो. म्हणजे वस्तु एक असून निराळीच कांहींतरी दिसतें. माया तशी आहे. विश्र्व ब्रह्मस्वरुप असून दृश्यपणें दिसतें, मायेमुळें असें घडते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे मायानिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Maya Nirupan
समास दहावा मायानिरुपण Custom Search

No comments: