Friday, April 27, 2018

Samas Dahava Siddhanta Nirupan समास दहावा सिद्धांत निरुपण


Dashak Pandharava Samas Dahava Siddhanta Nirupan 
Samas Dahava Siddhanta Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Adawaita. He is telling us that after acquiring knowledge, Sadhak knows that there is no Dwait. Dwait means there is God and Sadhak but after acquiring Sadhak knows that God and Sadhak are one.
समास दहावा सिद्धांत निरुपण 
श्रीराम ।
गगनीं अवघेंचि होत जातें । गगनाऐसें तगेना तें ।
निश्र्चळीं चंचळ नाना तें । येणेंचि न्यायें ॥ १ ॥
१) आकाशामध्यें सर्व घटना होतात व जातात. तसेंच होणार्‍या व जाणार्‍या घटना कायम टिकत नाहीत.निश्र्चळामध्यें चंचळाचे अनेक प्रकार असेच होतात व जातात ते कायम टिकत नाहीत. 
अंधार दाटला बळें । वाटे गगन जालें काळें ।
रविकिर्णे तें पिवळें । सवेंचि वाटे ॥ २ ॥
२) अगदी दाट अंधार पडला तर आकाश काळें झालें असें वाटते. सूर्याच्या किरणांनीं तेंच आकाश पिवळें झाले असें वाटते. 
उदंड हिंव जेव्हां पडिलें । गमे गगन थंड जालें ।
उष्ण झळेनें वाळलें । ऐसें वाटे ॥ ३ ॥
३) अतिशय कडक थंडी पडते तेव्हां आकाश थंड झालें असें वाटते. उष्णता भडकली तर हेंच आकाश वाळलें असें वाटते.   
ऐसें जें कांहीं वाटलें । तें तें जालें आणि गेलें ।
आकाशासारिखें तगलें । हें तो घडेना ॥ ४ ॥
४) अशा रीतीनें जें जें कांहीं वाटते, तें तें आकाशामध्यें झालें आणि गेलें पण तें आकाशाप्रमाणें कायम टिकते असें कधीं होत नाही. 
उत्तम जाणीवेचा जिनस । समजोन पाहे सावकास ।
निराभास तें आकाश । भास मिथ्या ॥ ५ ॥
५) शुद्ध जाणीव ही सर्वोत्तम वस्तु आहे. ती ओळखून जर स्वच्छपणें पाहिलें तर असें आढळते कीं, आकाशाचा भास होत नाही. जो जो भास होतो तो तो मिथ्या असतो. 
उदक पसरे वायो पसरे । आत्मा अत्यंतचि पसरे ।
तत्वें तत्व अवघेंचि पसरे । अंतर्यामीं ॥ ६ ॥
६) पाणी व्यापक बनते. वायु व्यापक बनतो, आत्मा अतिशय व्यापक बनतो. एकूणएक तत्व अंतर्यामीं व्यापकपणें अनुभवास येते.   
चळतें आणि चळेना तें । अंतरीं अवघेंच कळतें ।
विवरणेंचि निवळतें । प्राणीमात्रासी ॥ ७ ॥
७) मग जें चळते तें आणि जें चळत नाहीं तें, सगळें आपल्या अंतर्यामीं कळतें. मनन-चिंतनानेंच माणसाला तें अंतर्यामीं स्पष्ट होतें.     
विवरतां विवरतां शेवटीं । निवृत्तिपदीं अखंड भेटी ।
जालियानें तुटी । होणार नाहीं ॥ ८ ॥
८) निरंतर चिंतन करतां करतां अखेर निवृत्तिपदाला माणूस पोचतो. तेथें स्वरुपाची अखंड भेट होते. एकदा भेट झाली कीं मग कधीही ताटातूट होत नाहीं.     
जेथें ज्ञानाचें होतें विज्ञान । आणि मनाचें होतें उन्मन ।
तत्वनिर्शनीं अनन्य । विवेकें होतें ॥ ९ ॥
९) तेथें ज्ञानाचे विज्ञान होतें आणि मनाचें उन्मन होतें. सर्व तत्वांचे निरसन झाल्यानें विवेकानें परब्रह्माशी अनन्यपणा घडतो. 
वडिलांस शोधून पाहिलें । तों चंचळाचें निश्र्चळ जालें ।
देवभक्तपण गेलें । तये ठाइं ॥ १० ॥
१०) अंतरात्म्याचा शोध करायला निघालेला साधक असें अनुभवतो कीं, जें चंचळ आहे तें निश्र्चळ बनतें. त्या ठिकाणीं देव व भक्त यांचें निराळेपण संपतें. दोघे एक जीव होऊन जातात.  
ठाव म्हणतां पदार्थ नाहीं । पदार्थमात्र मुळीं नाहीं ।
जैसें तैसें बोलों कांहीं । कळावया ॥ ११ ॥
११) तेथें असा जरी शब्द वापरला असला तरी या अनुभवामध्यें स्थल नाहीं. कोणताही दृश्य पदार्थ मुळींच नाहीं. त्या अनुभवाची कांहीं कल्पना यावी, यासाठी जसें येईल तसें मी बोलत आहे.  
अज्ञानशक्ति निरसली । ज्ञानशक्ति मावळली ।
वृत्तिसुन्यें कैसी जाली । स्थिती पाहा ॥ १२ ॥
१२) ही स्थिती अशी आहे कीं, तिच्यामध्यें अज्ञान व त्याचे सर्व भ्रम नाश पावतात. तसेंच ज्ञान व त्याचे परिणाम शांत होतात. व अखेर वृत्ति शून्य होऊन केवलपणा उरतो. 
मुख्य शक्तिपात तो ऐसा । नाहीं चंचळाचा वळसा ।
निवांतीं निवांत कैसा । निर्विकारी ॥ १३ ॥
१३) जीव आजपर्यंत चंचळाच्या भोवर्‍यांत गिरक्या खात होता. त्या भोवर्‍यांतून त्याला बाहेर खेचणें हें शक्तिपाताचे प्रमुख लक्षण आहे. चंचळाच्या चक्रांतून बाहेर पडलेला जीव परमात्मस्वरुप बनतो. त्या निवांत व निर्विलारी स्वरुपांत निवांतपणें स्थिर होतो.
चंचळाचीं विकार बालटें । तें चंचळचि जेथें आटे ।
चंचळ निश्र्चळ घनवटे । हें तो घडेना ॥ १४ ॥
१४) जोपर्यत चंचळ असते तोपर्यंत या बदलणार्‍या दृश्याचा भ्रम राहतो. ते चंचळ आटल्यावर मग भ्रम शिल्लक उरत नाहीं. चंचळ व निश्र्चळ दोन्ही एकरुप कधींच होत नाहीत.  
माहावाक्याचा विचारु । तेथें संन्याशास अधिकारु ।
दैवीकृपेचा जो नरु । तोहि विवरोन पाहे ॥ १५ ॥
१५) जो संन्यासी आहे त्याला महावाक्याचा विचार करण्याचा अधिकार आहे.  ईश्र्वरीकृपा ज्याच्यावर असते असा भाग्यवान पुरुष देखील महावाक्याचा विचार करुं शकतो.
संन्यासी म्हणिजे शडन्यासी । विचारवंत सर्व संन्यासी ।
आपली करणी आपणासी । निश्र्चयेंसीं ॥ १६ ॥
१६) मनांतील सहाही विकार जो सोडतो तो खरा संन्यासी होय. खरे विचारवंत पुरुष सगळे संन्यासी समजावे. आपण जेवढी साधना करावी तेवढी आपल्या उपयोगास खात्रीनें येते. यांत शंका नाहीं.  
जगदीश वोळल्यावरी । तेथें कोण अनुमान करी ।
आतां असो हें विचारी । विचार जाणती ॥ १७ ॥
१७) एकदां विश्र्वाचा मालक प्रसन्न झाल्यावर मग उगीच कल्पना करत कोणी बसत नाहीं. असो. जे विचारवंत आहेत त्यांना हा विचार समजतो.  
जे जे विचारी समजले । ते ते निःसंग होऊन गेले ।
देहाभिमानी जे उरले । ते देहाभिमान रक्षिती ॥ १८ ॥
१८) ज्या ज्या विचारवंत पुरुषांना हें समजलें तें सगळें निःसंशय बनलें अभिमानशून्य झालें.जे देहाभिमानाला चिकटून बसलें, ते  देहाभिमानाला सांभाळत बसलें. 
लक्षीं बैसलें अलक्ष । उडोन गेला पूर्वपक्ष । 
हेतुरुपें अंतरसाक्ष । तोहि मावळला ॥ १९ ॥
१९) जेथें लक्ष पोंचत नाहीं असें अलक्ष ब्रह्म मनाला व्यापून राहिल्यावर मायारुप पूर्वपक्ष नाहींसा होतो. वासनेच्या अनुरोधानें असणारा व अंतर्यामीं साक्षीरुपानें राहाणारा तोहि नाहींसा होतो.    
आकाश आणि पाताळ । दोनी नामें अंतराळ ।
काढितां दृश्याचें चडळ । अखंड जालें ॥ २० ॥
२०) आकाश व पाताळ हीं दोन नांवें एका अवकाशाचींच आहेत. त्यामध्यें भेद उत्पन्न करणारा दृश्याचा पडदा गेला कीं केवळ एकच सलग अवकाश उरते. 
तें तों अखंडचि आहे । मन उपाधी लक्षून पाहे ।
उपाधीनिरासें साहे । शब्द कैसा ॥ २१ ॥
२१) मुळांत सारा अवकाश एकच आहे. अखंड आहे. उपाधीकडे पाहून मन त्यामध्यें खंड पाडतें. ती उपाधी नाहींशी झाल्यावर तेथें शब्दाचा व्यवहार सहन होत नाहीं.  
शब्दपर कल्पनेपर । मनबुद्धिअगोचर ।
विचारें पहावा विचार । अंतर्यामीं ॥ २२ ॥
२२) परमात्मा अवकाशासारखा अखंड व निराभास आहे. तो शब्दाच्या व कल्पनेच्या पलीकडे आहे. मन व बुद्धि यांना अगोचर आहे. आपल्याला अंतर्यामीं वारंवार विचार करुन हें समजते. 
पाहातां पाहातां कळों येतें । कळलें तितुकें वेर्थ जातें ।
अवघड कैसें बोलावें तें । कोण्या प्रकारें ॥ २३ ॥
२३) सतत चिंतन करीत गेल्यास अशा गोष्टी कळूं लागतात. पण आपणास जेवढें कळले तेवढें व्यर्थ आहे असें अनुभवाला येते. मला कळलें असें वाटतें तोपर्यंत तें खरें कळलेले नसते. हा विषय अवघड आहे. तो कसा सांगावा व कोणत्याप्रकारें मांडावा तें समजत नाहीं.  
वाक्यार्थवाच्यांश शोधिला । अलक्षीं लक्ष्यांश बुडाला ।
पुढें समजोन बोला । कोणीतरी ॥ २४ ॥
२४) स्वानुभवाचा प्रकार असा आहे.महावाक्यांतील शब्दांचा जो अर्थ तो वाच्यांश.तो नीट शोधून पाहिला. " मी ब्रह्म आहें " असा त्याचा अर्थ कळला त्याचे सतत मनन चिंतन करीत गेल्यानें अनुसंधान लागलें. मन सारखें स्वस्वरुपांत रमूं लागलें. हा लक्ष्यांश होय. लक्ष्य जें स्वस्वरुप तेथें स्थिर होणें म्हणजे लक्ष्यांश साधणें होय. त्यानंतर ध्यान करणारें मन नाहींसे होऊन वृत्तिशून्यता आली; लक्ष्यांश अलक्ष्यपरब्रह्मांत लीन झालें. अनुभव घेणारा, बोलणारा, सांगणारा, पाहणारा, साक्षी सर्व लय पावल्यावर पुढें बोलण्याचें शिल्लक उरत नाहीं.  
शाश्र्वतास शोधीत गेला । तेणें ज्ञानी साच जाला । 
विकार सांडून मिळाला । निर्विकारी ॥ २५ ॥ 
२५) जो शाश्र्वताचा शोध करीत गेला तोच यथार्थ ब्रह्मज्ञानी झाला. विकाररुपी चंचळ मागें टाकून तो निर्विकार ब्रह्माशीं तदाकार होतो. 
दुःस्वप्न उदंड देखिलें । जागें होतां लटिकें जालें ।
पुन्हां जरी तें आठविलें । तरी तें मिथ्या ॥ २६ ॥
२६) अज्ञानाच्या अवस्थेंत असतांना हें दृश्यरुप वाईट स्वप्न त्यानेम फार मोठ्या प्रमाणांत पाहिलें. पण ब्रह्मज्ञानरुपी जागृति आल्यावर तें सारें खोटे होते असा अनुभव आला. आणि पुन्हा जरी तें आठवलें तरी तें खोटे होतें अशी त्याची खात्री असते.  
प्रारब्धयोगें देह असे । असे अथवा नासे ।
विचार अंतरीं बैसे। चळेना ऐसा ॥ २७ ॥
२७) ज्ञान आल्यावर प्रारब्धानुसार त्याचा देह चालतो. तो राहील अथवा जाईल. पण त्याच्या अंतःकरणांत ब्रह्मविचार अत्यंत स्थिर असतो. 
बीज अग्नीनें भाजलें । त्याचें वाढणें खुंटलें ।
ज्ञात्यास तैसें जालें । वासनाबीज ॥ २८ ॥
२८) बीज जर आगींत भाजलें तर तें वाढत नाहीं. त्याचप्रमाणें ज्ञानी पुरुषाच्या वासनेचे बीज जळून जाते. त्यामुळें त्याला वासना उरत नाहीं.
विचारें निश्र्चळ जालीं बुद्धि । बुद्धिपासीं कार्यसिद्धि ।
पाहातां वडिलांची बुद्धि । निश्र्चळीं गेलीं ॥ २९ ॥
२९) साधकानें आत्मविचार सतत करुन आपली बुद्धि निश्र्चल करावी. निश्र्चल बुद्धिनेंच भ्रह्मज्ञान सिद्ध होते. पूर्वी होऊन गेलेल्या थोर संतांची बुद्धि अशा रीतीनें निश्र्चळ ब्रह्मामध्यें गेली असें आढळते.
निश्र्चळास ध्यातो तो निश्र्चळ । चंचळास ध्यातो तो चंचळ ।
भूतास ध्यातो तो केवळ । भूत होये ॥ ३० ॥
३०) जो निश्र्चळ ध्यान करतो तो निश्र्चळ बनतो. तर जो चंचळाचे ध्यान करतो  तो चंचळ बनतो. जो दृश्याचे ध्यान करतो तो दृश्यरुप बनतो. 
जो पावला सेवटवरी । तयास हें कांहींच न करी ।
अंतरनिष्ठा बाजीगरी । तैसी माया ॥ ३१ ॥
३१) जो शेवटपर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत जातो त्याला चंचळ आणि दृश्य कांहीं करुं शकत नाहीं. जो खरा अंतरनिष्ठ आहे, त्याला माया जादूप्रमाणें खोटी दिसते. 
मिथ्या ऐसें कळों आलें । विचारानें सदृढ जालें ।
अवघें भयेंचि उडालें । अकस्मात ॥ ३२ ॥
३२) हें दृश्य सारें मिथ्या आहे हे प्रथम कळतें. मग सतत चिंतनानें तें मनामध्यें अगदी घट्ट स्थिर होतें. अशा रीतीनें दृश्याचे मिथ्यापण अंतरीं स्थिर झालें कीं एकाएकी भय समूळ नाश पावतें.  
उपासनेचें उतीर्ण व्हावें । भक्तजनें वाढवावें ।
अंतरीं विवेकें उमजावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥
३३) ज्या उपासनेनें साधक ब्रह्मज्ञानापर्यंत पोचला त्याचे ऋण फेडणें अवश्य असतें. जगांत भक्तीचा प्रसार करुन तें ऋण ज्ञानी माणसानें फेडावे. भक्त निर्माण करावे. अंतर्यामी विवेक करुन सगळें कांहीं बरोबर समजलेले असावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसांवादे सिद्धांतनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Siddhanta Nirupan
समास दहावा सिद्धांत निरुपण


Custom Search

No comments: