Friday, April 20, 2018

ShriGurvashtakam श्रीगुर्वाष्टकम्


Adi Shankaracharyas Spiritual Stotras

श्रीगुर्वष्टकम्

शरीरं सुरुपं तथा वा कलत्रं, 
यशश्र्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ १ ॥
भावार्थ;
१) जर शुद्ध एकनिष्ठ भावानें, मन श्रीहरीच्या चरणीं लीन झालें नाहीं, तर शरीर सुन्दर, निरोगी असून त्याचा उपयोग काय? तसेंच सुंदर स्त्री, अगाध कीर्ति व मेरुपर्वताप्रमाणें धनप्राप्ती झाली तरीही त्याचा उपयोग काय? कांहीं नाहीं. विशेष काय सांगावें ! सांसारिक सर्व वैभव प्राप्त झालें, तरी तें सर्व वैभव हरिभक्तीवांचून व्यर्थ आहे. शोक व दुःखाचे साधन आहे.     
कलत्रं धनं पुत्रपौत्रादि कीर्तिः 
गृहं बांधवाः जातिमेतद्धि सर्वम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ २ ॥
२) स्त्री, धन, पुत्रपौत्रादि, कीर्ति, गृह, बन्धुवर्ग, उत्तम जाति, इत्यादि सर्व प्राप्त झालें , तरी त्याचा उपयोग काय ? कंहीं नाहीं. हरिभक्तीवांचून जगणें निष्फल होय. 
षडङ्गादि वेदो मुखे शास्त्रविद्या 
कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ३ ॥    
३) जगद्गुरु परमेश्र्वरचरणीं मन लीन झालें नाहीं, पण शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छन्द, ज्योतिष यांसहित ऋगवेदादि चार वेदांचें अध्ययन, पूर्वोत्तर मीमांसा, सांख्य, योग, न्याय तसेंच वैशेषिक इत्यादि चौदा विद्या कंठगत केल्या, पण त्याचा उपयोग काय? तसेंच गद्यपद्यसदि काव्यरचना केल्या, त्याचा तरी काय उपयोग? अर्थांत कांहींच नाहीं. हरिभक्तीवांचून सर्व विद्या प्राप्ती निष्फल होय. हरिभक्तिवांचून विद्वानाचें जीवन पशुतुल्य समजावें. हरिभक्तीनें पांडित्याला शोभा आहे.   
विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः 
सदाचारवृतेषु मत्तो न चान्यः ।
गुरोरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ४ ॥
४) विदेशांत मान आहे. स्वदेशीं लोकप्रशंसेस पात्र आहे. माझ्यावांचून सदाचारपरायणता कोणासही नाही म्हणजे माझ्यावांचून अधिक सदाचारी कोणीही नाही. हें सर्व असेल तरीही भगवान श्रीहरीचरणाच्या ठिकाणीं निष्कपट भावानें ज्याचें मन तल्लीन नाहीं, त्यास वरील गोष्टीनीं कोणताही लाभ होणार नाहीं.    
क्ष्मामंडले भूपभूपालवृन्दैः 
सदा सेवितं यस्य पादारविन्दम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ५ ॥
५) पृथ्वीवरील सर्व राजे ज्याच्या चरणकमलाची सेवा करीत आहेत, पण तो जर श्रीहरिचरणाच्या ठिकाणीं लीन नसेल, तर त्याचे सर्व ऐश्र्वर्य कवडीमोल आहे. हरिभक्तिविमुख दांभिक मनुष्याचा सर्व राजांनीं सन्मान केला तरी त्यापासून हित काय होणार? कांहीं नाहीं.
यशो मे गतं दिक्षु दानप्रतापात् 
जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रभावात् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ६ ॥
६) दानशूर म्हणून ज्याची कीर्ति दिगंती पसरली आहे, जगांतील सर्व संसारोपयोगी वस्तु स्वसामर्थ्यानें आज ज्याला प्राप्त आहेत, पण त्याचें चित्त जर श्रीहरिचरणकमलीं रत नसेल, तर त्याचें तें सर्व ऐश्र्वर्य व दानशूरपणा व्यर्थ आहेत. असें समजावें. 
न भोगे न योगे न वा वाजिराजौ, 
न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ७ ॥
७) ज्याचें चित्त भोगांत, योगांत, उत्तम अश्र्वविद्येंत, सुंदर स्त्रीच्या ठिकाणीं अथवा धनधान्यादि संग्रहांत आसक्त नाहीं, अशा प्रकारचें वैराग्य व अनासक्ति असूनहि, जर त्याचें चित्त हरिचरणकमलाच्या ठिकाणीं रत नसेल, तर त्याच्या त्या नुसत्या वैराग्यादिकांपासून कांहींच लाभ नाहीं.   
अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये,
न देहे मनो वर्तते मे त्वनर्घ्ये ।
गुरोरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ८ ॥
८) ज्याचें मन सुंदर व संपत्तिपरिपूर्ण घरांत, व्यापारांत, शरीरपालनपोषणादि व्यवहारांत, त्याचप्रमाणें मूल्यवान् पदार्थांचा संग्रह करणें इत्यादि कार्यांत आसक्त नाहीं, आणि जो अरण्यांत एकांतवासांत जाऊन बसला, पण तो जर हरिचरणांची भक्ति करीत नसेल तर त्याचें तें सर्व वैराग्य व्यर्थ आहे. 
अनर्घ्याणि रत्नानि भुक्तानि सम्यक्,
समालिङ्गिता कामिनी यामिनीषु ।
हरेरंघ्रिपद्मे मनश्र्चेन्न लग्नं 
ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ॥ ९ ॥ 
९) मौल्यवान रत्नांचा उपभोग, त्याचप्रमाणें रात्रीं उत्तम रुपवान् स्त्रीयांच्या आलिंगनादिकांपासून होणारें प्राकृत सुख प्राप्त झालें, पण जर भगवान् श्रीहरीच्या चरणकमळीं मन स्थिर नसेल तर वरील तुच्छ सुखाच्या प्राप्तीनें काय फल मिळणार ? कांहीं नाहीं !
गुरोरष्टकं यः पठेत् पुण्यदेही,
यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही ।
लभेद्वांछितार्थं पदं ब्रह्मसंज्ञं 
गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नं ॥ १० ॥
१०) जो शुभकर्मकृत संन्यासी, राजा, ब्रह्मचारी, तसाच गृहस्थाश्रमी या गुर्वष्टकाचें पठन व पाठण करील, तसेंच ज्याचें मन श्रीगुरुनें उपदेशिलेल्या वाक्यांच्या ठिकाणीं स्थिर होईल, तो अभिलाषित परमानन्दरुप ब्रह्मतत्वाला प्राप्त होईल म्हणजे ब्रह्मरुप होईल. 
वरील भावार्थ ह. भ. प. श्री भार्गव वासुदेव खांबेटे  यांनी केला आहे. तो त्यांच्या सार्थ स्तोत्ररत्नावली या पुस्तकांतून साभार घेतला आहे. 


Custom Search
Responsive Add unit.

No comments: