Saturday, April 21, 2018

Samas Satava Adhordha Nirupan समास सातवा अधोर्ध निरुपण


Dashak Pandharava Samas Satava Adhordha Nirupan 
Samas Satava Adhordha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aatma. Everybody is connected with everybody in this world. This is because the Aatma resides in everybody is the same. We have forgetting it because of lack of knowledge. It is explained here.
समास सातवा अधोर्ध निरुपण 
श्रीराम ॥
नाना विकारांचे मूळ । तें हे मूळमायाच केवळ ।
अचंचळीं जे चंचळ । सूक्ष्मरुपें ॥ १ ॥
१) या जगांत जें निरनिराळें बदल आढळतात, त्यांचें मूळ ही मूळमायाच आहे. निश्र्चळ परब्रह्मामध्यें ती चंचळपणाने पण अतिसूक्ष्मपणानें राहाते.   
मूळमाया जाणीवेची । मुळींच मूळ संकल्पाची । 
वोळखी शङगुणैश्र्वराची । येणेंचि न्यायें ॥ २ ॥
२) मूळमाया ही जाणीवेची बनलेली असते. मूळ परब्रह्मामधें जो संकल्प निर्माण झाला, तो जाणीवरुप आहे. ाणि तेंच मूळमायेचे स्वरुप समजावें. समग्र षड्गुण जे ऐश्र्वर्य, धर्म, यशश्री, ज्ञान, आणि वैराग्य हे गुण ज्याच्याठिकाणीं आहेत, त्या ईश्र्वराची ओळख येथेच होते.    
प्रकृतिपुरुष शिवशक्ती । अर्धनारी नटेश्र्वर म्हणती ।
परी ते आवघी जगज्जोती । मूळ त्यासी ॥ ३ ॥
३) प्रकृति, पुरुष, शिव-शक्ति, अर्धनारी नटेश्र्वर अशी आणखी नांवें त्यास आहेत. पण या सर्वांचे मूळ जगत्ज्योतीच होय. 
संकल्पाचें जें चळण । तेंचि वायोचें लक्षण ।
वायो आणी त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ ४ ॥
४) मूळ संकल्प जो प्रकट झाला तेव्हां निश्र्चळामधें चंचळ निर्माण झालें. निश्र्चळ सद्वस्तुला चंचळपण आलें. हे चंचळपण आणणारी शक्ति म्हणजेच वायु होय. तो त्रिगुण व पंचभूतें आणतो. चंचळपणांत प्रथमपासून तीन गुण व पंचभूतें असतात.  
पाहातां कोणी येक वेल । त्याच्या मुळ्या असती खोल ।
पत्रें पुष्पें फळें केवळ । मुळाचपासीं ॥ ५ ॥
५) एखादी वेल पहा. तीची मूळें जमिनींत खोल गेलेली असतात. वेलीवर दिसणार्‍या पानांचें, फुलांचे व फळांचे मूळ या वेलीच्या मूळांमध्यें असतें. 
याहिवेगळे नाना रंग । आकार विकार तरंग ।
नाना स्वाद अंतरंग । मुळामध्यें ॥ ६ ॥
६) वेलीचे निरनिराळे रंग, आकार, विकार, तरंग त्याचप्रमाणें निरनिराळे स्वाद व अंतरंग या सार्‍या गोष्टी त्या मुळांध्यें असतात.
तेंचि मूळ फोडून पाहातां । कांहींच नाहीं वाटे आतां ।
पुढें वाढतां वाढतां । दिसों लागे ॥ ७ ॥
७) पण त्या मुळ्या फोडून पाहिल्या तर त्यांच्यामध्यें वर वर्णन केलेले कांहींच  आढळत नाहीं. वेलींची जशी जशी वाढ होऊं लागते तसतशा सर्व गोष्टी प्रगट होऊं लागतात.  
कड्यावरी वेल निघाला । अधोमुखें बळें चालिला ।
फांपावोन पुढें आला । भूमंडळीं ॥ ८ ॥
८) वेल डोंगफाच्या कड्यावर उगवते. आणि अधोमुखानें म्हणजे खालीं तोंड करुन वाढतेंमात्र भूमीच्या दिशेनें. आणि फोफावून जमीनीच्यावर येते.  
तैसी मूळमाया जाण । पंचभूतें आणी त्रिगुण ।
मुळीं आहेत हें प्रमाण । प्रत्ययें जाणावें ॥ ९ ॥
९) मूळमायेचा प्रकार अगदी तसाच आहे. हें ओळखावें. तीन गुण व पंचभूतें दोन्हीही अगदी सूक्ष्मरुपानें मूळमायेंत असतात. याबद्दल अनुमानानें खात्री करुन घ्यावी.  
अखंड वेल पुढें वाढला । नाना विकारीं शोभला ।
विकारांचा विकार जाला । असंभाव्य ॥ १० ॥
१०) मूळमायेचा वेल सारखा वाढतच जातो. अनेक प्रकारचे बदल होऊन तो शोभूं लागतो. बदलांत पुन्हां बदल होऊन वेलाचा विस्तार कल्पनेपलीकडे वाढतो.  
नाना फडगरें फुटलीं । नाना जुंबाडे वाढलीं ।
अनंत अग्रें चालिलीं । सृष्टीमधें ॥ ११ ॥
११) त्या वेलाला निरनिराळ्या फांद्या फुटतात. त्या एकमेकांत गुंतुन त्यांची झुंबाडे बनतात. त्या फांद्यांची असंख्य टोके विश्वांत पसरली आहेत.  
कित्येक फळें ती पडती । सवेंचि आणीक निघती । 
ऐसीं होती आणि जाती । सर्वकाळ ॥ १२ ॥
१२) कांहीं फळें पडतात पण नवी फळेंही धरतात. फळांचे हें होणें जाणें सतत चालूं राहाते.
येक वेलचि वाळले । पुन्हां तेथेंचि फुटले ।
ऐसे आले आणी गेले । कितीयेक ॥ १३ ॥
१३) एखादा वेल वाळला तर पुन्हा तेथेंच दुसरा वेल उगवतो. अशा रीतीनें आतापर्यंत कितीतरी वेल उगवले आणि सुकले.  
पानें झडती आणि फुटती । पुष्पें फळें तेणेंचि रीतीं ।
मध्यें जीव हे जगती । असंभाव्य ॥ १४ ॥
१४) पानें झडतात व पुन्हां फुटतात. फुलांना व फळांना हाच नियम लागूं पडतो. या क्रियेमधें अक्षरशः असंख्य जीव जगतात. 
अवघा वेलचि कर्पतो । मूळापासून पुन्हा होतो ।
ऐसा अवघा विचार जो तो । प्रत्यक्ष जाणावा ॥ १५ ॥
१५) पुढें सबंध वेल करपून जातो. मग मूळापासून तो पुन्हा वाढतो. हा सगळा विचार माणसानें विश्वरचना प्रत्यक्ष पाहून समजून घ्यावयास हवा.  
मूळ खाणोन काढिलें । प्रत्ययेज्ञानें निर्मूळ केलें ।
तरी मग वाढणेंचि राहिलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥
१६) वेलाचें मूळ खणून बाहेर काढलें, स्वानुभवाच्या ज्ञानानें त्या वेलास निर्मूळ केलें तर मग वेलाचे वाढणें आपोआप थांबते.   
मुळीं बीज सेवटीं बीज । मध्यें जळरुप बीज ।
ऐसा हा स्वभाव सहज । विस्तारला ॥ १७ ॥
१७) आरंभीं मुळांत बीजावस्था, अखेर पर्यवसान बीजावस्था, मध्यें बीजाची जळरुप अवस्था, असा हा विश्वामधील घटनांचा स्वभाव सर्व ठिकाणीं पसरलेला आढळतो.  
मुळामधील ज्या गोष्टी । सांगताहे बीजसृष्टी । 
जेथील अंश तेथें कष्टी । न होतां जातो ॥ १८ ॥
१८) बीजापासून ज्या गोष्टी उत्पन्न होतात, त्यांच्यावरुन मुळांत काय होतें तें सांगता येते. ज्याच्यामधून जें निर्माण होतें तें त्याच्यामध्यें विनासायास विलीन होते. विश्वामधील तीन गुण व पंचभूतें यांच्या पसार्‍यावरुन मूळमाया कशी असावी याची कल्पना आपल्याला येते. 
जातो येतो पुन्हा जातो । ऐसा प्रत्यावृत्ति करितो ।
परंतु आत्मज्ञानी जो तो । अन्यथा न घडे ॥ १९ ॥
१९) सामान्य अज्ञानी जीव मरतो, जन्मास येतो व पुन्हां मरतो. अशा जन्म मृत्युच्या त्याच्या खेपा चालू असतात. पण आत्मज्ञानी पुरुषाला अशा खेपा घालाव्या लागत नाहीत.
न घडे ऐसें जरीं  म्हणावें । तरी कांहींतरी लागे जाणावें ।
अंतरींच परी ठावें । सकळांस कैचें ॥ २० ॥ 
२०) आत्मज्ञानी पुरुषाला जन्म-मरण उरत नाहीं. परंतु आत्मज्ञान मिळविण्यासाठी  त्याला साधना करावी लागते. प्रत्येकाच्या अंतरीं आत्मज्ञान असतें, पण तें आहे ही गोष्ट सर्वांना कळत नाहीं. तें कळ्ण्यासाठीं साधना करावी लागते.     
तेणेंसींच कार्यभाग करिती । परंतु तयास नेणती ।
दिसेना ते काये करिती । बापुडे लोक ॥ २१ ॥
२१) अंतरीं वसणार्‍या आत्मज्ञानाच्या प्रकाशामधेंच सर्व जीव ापापलें कर्म करतात. परंतु त्या ज्ञानाची त्यांना जाणीव नसते. तें ज्ञान प्रगटपणें दिसत नाहीं. त्याला बिचार्‍या अज्ञानी लोकांनीं काय करावें.  
विषयेभोग तेणेंचि घडे । तेणेंविण कांहींच न घडे ।
स्थूळ सांडून सूक्ष्मीं पवाडे । ऐसा पाहिजे ॥ २२ ॥
२२) त्याच्या प्रकाशानेंच इंद्रियांचे भोग आपण भोगतो. त्याच्यावाचून कांहीं घडत नाहीं. त्या ज्ञानाचे भान होण्यास स्थूलाचा त्याग करुन सूक्ष्माच्या क्षेत्रांत शिरणारा व व्यापक बनणारा मनुष्य लागतो.   
जें आपलेंचि अंतर । तद्रूपचि जगदांतर ।
शरीरभेदाचे विकार । वेगळाले ॥ २३ ॥
२३) आपल्या अंतर्यामीं जें स्वरुप आहे तेच जगाच्या अंतर्यामीं भरलेले आहे. प्राण्यांच्या शरीराचे आकार केवळ निरनिराळे दिसतात. 
आंगोळीची आंगोळीस वेधना । येकीची येकीस कळेना ।
हात पाये अवेव नाना । येणेंचि न्यायें ॥ २४ ॥   
२४) माणसाला असें वाटतें कीं, एका बोटाची वेदना दुसर्‍या बोटाला कळत नाहीं. हात, पाय वगैरे निरनिराळे अवयव आहेत त्यांना हाच नियम लागूं आहे. 
अवेवाचे अवेव नेणे । मा तो परांचें काये जाणे ।
परांतर याकारणें । जाणवेना ॥ २५ ॥
२५) एका अवयवाचे दुःख जर दुसर्‍या अवयवास कळत नाहीं, तर आपल्याला दुसर्‍याचे शरीरदुःख अनुभवणें कसें शक्य आहे ? या कारणानें दुसर्‍याचें अंतःकरण नीट ओळखतां येत नाहीं.  
येकाचि उदकें सकळ वनस्पती । नाना अग्रेंभेद दिसती ।
खुडिलीं तितुकींच सुकती । येर ते टवटवीत ॥ २६ ॥ 
२६) पाणी एकच असते. एकाच पाण्यावर सगळ्यां वनस्पती वाडतात, जगतात. त्या वाढतात तेव्हां त्यांच्या फांद्या, पानें, टोकें, यांच्यांत भेद आढळतो. त्यापैकीं आपण जी तोडतो तेवढी सुजतात. बाकीची टवटवीत राहतात.  
येणेंचि न्यायें भेद जाला । कळेना येकाचें येकाला ।
जाणपणें आत्मयाला । भेद नाहीं ॥ २७ ॥
२७) हें असें घडते त्याचप्रमाणें देहांचे निरनिराळे भेद होतात व एका देहाचे दुसर्‍या देहाला कळत नाहीं. पण जाणीवेच्या दृष्टीनें आत्म्याच्या ठिकाणी भेद नाहीं. ज्या जाणीवेनें एका देहाला दुःख कळते त्याच जाणीवेनें दुसर्‍या देहाला त्याचे दुःख समजते.  
आत्मत्वीं भेद दिसे । देहप्रकृतिकरितां भासे ।
तरी जाणतचि असे । बहुतेक ॥ २८ ॥
२८) प्रत्येक देहामधील आत्मा वेगवेगळा आहे असें वाटते. पण प्रत्येक देहस्वभाव भिन्न असल्यानें हा भेद भासतो. तो खरा नसतो. ही गोष्ट बहुतेक लोक जाणतात.  
देखोन ऐकोन जाणती । शाहाणे अंतर परीक्षिती ।
धूर्त ते अवघेंच समजती । गुप्तरुपें ॥ २९ ॥ 
२९) कांहीं लोक पाहून व ऐकून जाणतात. शहाणे लोक अंतरंगाची परीक्षा करुन जाणतात. चतुर माणुस गुप्तपणें कोणास कळूं न देतां हें सर्व समजून घेतो. 
जो बहुतांचें पाळण करी । तो बहुतांचें अंतर विवरी ।
धूर्तपणें ठाउकें करी । सकळ कांहीं ॥ ३० ॥
३०) जो चतुर माणुस पुष्कळांचा सांभाळ करतो, जो पुष्कळ लोकांचे अंतःकरण वश करुन घेतो, तो चतुरपणानें सर्व कांहीं माहीत करुन घेतो. 
आधीं मनोगत पाहाती । मग विश्र्वास धरिती ।
प्राणीमात्र येणें रितीं । वर्तताहे ॥ ३१ ॥
३१) लोक आधीं मनांत काय आहे तें पाहतात आणि मग विश्र्वास ठेवतात. सर्व लोक अशा पद्धतीनें वागतात.  
स्मरणमागें विस्मरण । रोकडी प्रचित प्रमाण ।
आपलें ठेवणें आपण । चुकताहे ॥ ३२ ॥
३२) स्मरणानंतर आपल्याला विस्मरण घडतें. हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. आपण ठेवलेली वस्तु विस्मरणानें आपल्यालाच सापडत नाहीं. 
आपलेंच आपण स्मरेना । बोलिलें तें आठवेना ।
उठती अनंत कल्पना । ठाउक्या कैंच्या ॥ ३३ ॥  
३३) आपलेंच आपल्याला स्मरत नाहीं. आपण बोललेले आपल्याला आठवत नाहीं. आपल्या मनांत अनंत कल्पना येतात. त्या सगळ्या स्मरणांत राहाणें शक्य नाहीं.  
ऐसें हें चंचळ चक्र । कांहीं नीट कांहीं वक्र ।
जाला रंक अथवा शक्र । तरी स्मरणास्मरणें ॥ ३४ ॥
३४) असें हें चंचळचक्र विचित्र आहे. कांहीं ठिकाणीं सरळ तर कांहीं ठिकाणी तें वाकड्या गतीनें फिरते. रंक असो वा इंद्र असो, त्याची अवस्था स्मरण व विस्मरण यावर अवलंबून राहते. 
स्मरण म्हणिजे देव । विस्मरण म्हणिजे दानव ।
स्मरणविस्मरणें मानव । वर्तती आतां ॥ ३५ ॥
३५) स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव आणि स्मरण व विस्मरण यांचे मिश्रण म्हणजे मनुष्यप्राणी होय. 
म्हणोनि देवी आणि दानवी । संपत्ति द्विधा जाणावी ।
प्रचित मानसीं आणावी । विवेकेंसहित ॥ ३६ ॥
३६) यामुळें दैवी संपत्ती व आसुरी संपत्ती असें दोन प्रकार या जगांत आढळतात. विचारानें जगांत त्यांचीं प्रचीति मनानें घ्यावी. 
विवेकें विवेक जाणावा । अत्म्यानें आत्मा वोळखावा ।
नेत्रें नेत्रचि पाहावा । दर्पणींचा ॥ ३७ ॥
३७) विवेक चालवून विवेक कसा असतो तें जाणावें. त्याचप्रमाणें आपल्या आत्म्यानें दुसर्‍याचा आत्मा जाणावा. आपण आत्मस्वरुप होऊन आत्म्यास ओळखावें. आरशामधें दिसणारा डोळा अपल्या डोळ्यानीच पाहावा लागतो, तसाच हा प्रकार आहे.    
स्थूळें स्थूळ खाजवावें । सूक्ष्में सूक्ष्म समजावें ।
खुणेनें खुणेसी बाणावें । अंतर्यामीं ॥ ३८ ॥
३८) ज्याप्रमाणें स्थूलानें स्थूल खाजवावें त्याचप्रमाणें सूक्ष्मानें सूक्ष्म समजून घ्यावें. सूक्ष्माची खूण सूक्ष्मानेंच अंतर्यामी बाणवून घ्यावी. 
विचारें जाणावा विचार । अंतरें जाणावें अंतर ।
अंतरें जाणावें परांतर । होउनियां ॥ ३९ ॥ 
३९) आपल्या विचारामवरुन दुसर्‍यांचा काय विचार आहे तो जाणावा. आपल्या अंतरंगावरुन दुसर्‍याचे अंतरंग कसें आहे तें ओळखावें. दुसर्‍याच्या अंतरंगाशी तदाकार होऊन त्याचें अंतरंग जाणावें.  
स्मरणामाजीं विस्मरण । हेंचि भेदाचें लक्षण ।
येकदेसी परिपूर्ण । होत नाहीं ॥ ४० ॥ 
४०) स्मरणामध्यें विस्मरण घडणें हेच भेदाचे लक्षण आहे. विस्मरणानें एकदेशीपणा येतो. जो अपूर्ण आहे तो पूर्ण होऊं शकत नाहीं.  
पुढें सिके मागें विसरे । पुढें उजेडे मागें अंधारे ।
पुढें स्मरे मागें विस्मरे । सकळ कांहीं ॥ ४१ ॥
४१) पुढचे शिकतो पण मागचे विसरतो. पुढें उजेड पण मागें अंधार, पुढचें स्मरतो पण मागचें सारें विसरतो. माणसांत स्मरण व विस्मरण यांचे मिश्रण असल्यानें त्याची ही अशी अवस्था होते. 
तुर्या जाणावी स्मरण । सुषुप्ति जाणावी विस्मरण ।
उभयेता शरीरीं जाण । वर्तती आतां ॥ ४२ ॥
४२) तुर्या ही ज्ञानमय अवस्था स्मरणरुप जाणावी. तर सुषुप्ति ही अज्ञानमय अवस्था विस्मरणरुप जाणावी. माणसाच्या शरीरांत या दोन्ही अवस्था राहतात.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अधोर्धनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava Adhordha Nirupan 
समास सातवा अधोर्ध निरुपण 



Custom Search

No comments: