Monday, April 30, 2018

Samas Pahila Valmik Stavan Nirupan समास पहिला वाल्मीकि स्तवन


Dashak Solava Samas Pahila Valmik Stavan Nirupan 
Samas Pahila Valmik Stavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Valmiki Rushi. Valmiki has written The great Ramayan before God Rama's Birth.
समास पहिला वाल्मीकि स्तवन
श्रीराम ॥
धव्य धन्य तो वाल्मीक । ऋषीमाजी पुण्यश्र्लोक ।
जयाचे हा त्रिलोक । पावन जाला ॥ १ ॥
१) ऋषींमधील पुण्यश्र्लोक असा तो वाल्मीकि अतिशय धन्य होय. हे तीन्ही लोक त्यानें पावन केलें. 
भविष्य आणी शतकोटी । हें तो नाहीं देखिलें दृष्टीं ।
धांडोळितां सकळ सृष्टि । श्रुत नव्हे ॥ २ ॥
२) भविष्यकाळीं घडणारेआणि तें शतकोटी रामायण वाल्मीकिनें आधींच रचिलें. सारी सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट दुसर्‍याकोणीं केलीली पाहण्यांत किंवा ऐकण्यांत नाहीं. 
भविष्याचें येक वचन । कदाचित जालें प्रमाण ।
तरी आश्र्चिर्य मानिती जन । भूमंडळीचे ॥ ३ ॥
३) भविष्यांत घडून येणारी गोष्ट जरी कोणीं आधीं सांगितलीं आणि ती त्याप्रमाणें घडून आली तर जगांतील लोकांना त्याचे मोठे आश्र्चर्य वाटते. 
नसतां रघुनाथ अवतार । नाहीं पाहिला शास्त्राधार ।
रामकथेचा विस्तार । विस्तारिला जेणें ॥ ४ ॥
४) पण रामाचा अवतार झालेला नव्हता, दुसरा कांहीं शास्त्राधार नव्हता असें असतांना देखील ज्यानें रामकथा सविस्तर सांगितलीं. 
ऐसा जयाचा वाग्विळास । ऐकोनी संतोषला महेश ।
मग विभागिलें त्रयलोक्यास । शतकोटी रामायेण ॥ ५ ॥
५) असा हा वाल्मीकिचा वाग्विलास होता. तो ऐकून श्रीशंकर प्रसन्न झालें. मग शतकोटी रामायणाचे तिन्ही लोकांसाठीं विभाग केलें.
ज्याचें कवित्व शंकरें पाहिलें । इतरां न वचे अनुमानलें ।
रामउपासकांसी जालें । परम समाधान ॥ ६ ॥
६) सामान्य माणसाला वाल्मीकीच्या काव्यशक्तीची कल्पना करतां येणें शक्य नाहीं. श्रीशंकराला ती करतां आली. श्रीरामाच्या उपासकांना फार मोठें समाधान वाटलें.   
ऋषी होते थोर थोर । बहुतीं केला कवित्वविचार ।
परी वाल्मीकासारिखा कवेश्र्वर । न भूतो न भविष्यति ॥ ७ ॥
७) पूर्वींच्या पुष्कळ मोठमोठ्या ऋषींनी कवित्व रचना केली. पण वाल्मीकि हा एकच कवीश्वर असा कीं जो न भूतो न भविष्यति. 
पूर्वीं केली दृष्ट कर्में । परी पावन जाला रामनामें ।
नाम जपतां दृढ नेमें । पुण्यें सीमा सांडिली ॥ ८ ॥
८) पूर्वायुष्यांत वाल्मीकिनें फार दुष्ट कर्में केली. परंतु रामनामानें तो पावन झाला. अत्यंत दृढ निश्र्चयानें त्यानें रामनाम जपलें. त्यामुळें त्याच्या पुण्याला कांहीं सीमा उरली नाहीं.
उफराटें नाम म्हणतां वाचें । पर्वत फु्टले पापाचे ।
ध्वज उभारले पुण्याचे । ब्रह्मांडावरुते  ॥ ९ ॥
९) तो आपल्या वाणीनें रामाचें नाम उलटें उच्चारीत होता. तरी त्याच्या पापाचे पर्वत फुटुन नाहींसें झालें. जगामध्यें त्याच्या पुण्याचे निशाण फडकले. 
वाल्मीकें जेथें तप केलें । तें वन पुण्यपावन जालें ।
शुष्क काष्ठीं अंकुर फुटले । तपोबळें जपाच्या ॥ १० ॥
१०) ज्या वनामध्यें वाल्मीकिनें तप केलें तें वन देखील त्याच्या पुण्याईनें पवित्र झालें. त्याच्या तपाच्या बळानें कोरड्या लाकडांना अंकुर फुटलें.
पूर्वी होता वाल्हाकोळी । जीवघातकी भूमंडळीं ।
तोचि वंदिजे सकळीं । विबुधीं आणि ऋषेश्र्वरीं ॥ ११ ॥
११) आधी वाल्हा कोळी होता. जगांत त्यानें पुष्कळ जीवांची हिंसा केली होती. पण पुढें पंडित व मोठमोठे ऋषी त्यास वंदन करुं लागले.  
उपरति आणि अनुताप । तेथें कैंचे उरेल पाप ।
देह्यांततपें पुण्यरुप । दुसरा जन्म जाला ॥ १२ ॥
१२) त्याला उपरति झाली व ज्याला पश्र्चाताप झाला त्याच्या ठिकाणीं पाप उरणें शक्य नसतें. देहाचा नाश करण्यापर्यंत तप केल्यानें त्या तपाचरणानें अत्यंत पुण्यरुप असा जणुं काय दुसरा जन्मच त्यास प्राप्त झाला.
अनुतापें आसन घातलें । देह्यांचें वारुळ जालें ।
तेंचि नाम पुढें पडिलें । वाल्मीक ऐसें ॥ १३ ॥
१३) पश्र्चाताप होऊन त्यानें आसान मांडलें. त्याच्या देहाभोवती वारुळ वाढलें. त्यामुळें त्याला लोक पुढें वाल्मीकि असें म्हणूं लागलें. 
वारुळास वाल्मीक बोलिजे । म्हणोनि वाल्मीक नाम साजे ।
जयाच्या तीव्र तपें झिजे । हृदय तापसाचें ॥ १४ ॥
१४) वारुळाला वाल्मीक म्हणतात. म्हणून त्याला वाल्मीकि नाव शोभतें. त्याची तपस्या पाहून तपस्वी लोकांचें हृदय कापतें. 
जो तापसांमाजीं श्रेष्ठ । जो कवेश्र्वरांमधें वरिष्ठ ।
जयाचें बोलणें पष्ट । निश्र्चयाचें ॥ १५ ॥
१५) वाल्मीकि तपस्वी लोकांत श्रेष्ठ आहे. कविगणांमध्यें तो फार वरच्या दर्जाचा आहे. त्याचे बोलणें फार स्पष्ट व निश्र्चित असतें.  
जो निष्ठावंतांचें मंडण । रघुनाथभक्तांचें भूषण ।
ज्याची धारणा असाधारण । साधकां सदृढ करी ॥ १६ ॥
१६) त्याच्या असाधारण निष्ठेमुळें तो निष्ठावंतांची शोभा आहे. श्रीराम भक्तांचे तो भूषण आहे. त्याची विलक्षण धारणा बघून साधकाची साधन निष्ठा पक्की होते.  
धन्य वाल्मीक ऋषेश्र्वर । समर्थाचा कवेश्र्वर ।
तयासी माझा नमस्कार । साष्टांगभावें ॥ १७ ॥
१७) समर्थ रामरायाचे यश गाणारा कवीश्र्वर वाल्मीकि धन्य होय. अशा या ऋषीश्र्वराला मी श्रद्धापूर्वक साष्टांग नमस्कार करतो.  
वाल्मीक ऋषी बोलिला नसता । तरी आम्हांसी कैंची रामकथा ।
म्हणोनियां समर्था । काय म्हणोनि वर्णावें ॥ १८ ॥
१८) वाल्मीकि ऋषीनें रामायण गायिलें नसतें तर आम्हाला रामकथा मिळाली नसती. अशा या थोर वाल्मीकिचे वर्णन करावें तितकें थोडेंच आहे. 
रघुनाथकीर्ति प्रगट केली । तेणें तयाची महिमा वाढली ।
भक्तमंडळी सुखी जाली । श्रवणमात्रें ॥ १९ ॥
१९) श्रीरामाचे यश गाऊन त्याची कीर्ति प्रगट केली त्यामुळें वाल्मीकिचा मोठेपणा वाढला. रामाची यशकीर्ति ऐकून भक्तमंडळीं सुखी झाली.   
आपुला काळ सार्थक केला । रघुनाथकीर्तिमधें बुडाला ।
भूमंडळीं उधरिला । बहुत लोक ॥ २० ॥
२०) श्रीरामाच्या कीर्तिमध्यें डुंबल्यानें वाल्मीकिनें आपला काळ सार्थकीं लावला. आणि त्याबरोबर जगांत पुष्कळ लोकांचा उद्धार झाला. 
रघुनाथभक्त थोर थोर । महिमा जयांचा अपार ।
त्या समस्तांचा किंकर । रामदास म्हणे ॥ २१ ॥
२१) ज्यांचा महिमा अपार आहे. असे थोर थोर श्रीरामभक्त होऊन गेले. श्रीरामदास म्हणतात कीं, त्या सर्व भक्तांचा मी दास आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वाल्मीकस्तवननिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila Valmik Stavan Nirupan
समास पहिला वाल्मीकि स्तवन


Custom Search