Thursday, April 19, 2018

Samas Sahava Chaturya Vivaran समास सहावा चातुर्य विवरण


Dashak Pandharava Samas Sahava Chaturya Vivaran 
Samas Sahava Chaturya Vivaran, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chaturya Lakshan. Chaturya means wiseness. Here in this samas Samartha is mainly addressing these gunas to Sadhak or Siddha, Because Siddha wants people to join Parmarth. How these people can come attracted towards Parmarth is described.
समास सहावा चातुर्य विवरण 
श्रीराम ॥
पीतापासून कृष्ण जालें । भूमंडळीं विस्तारलें ।
तेणेंविण उमजलें । हें तो घडेना ॥ १ ॥
१) दिवा पिवळा व त्याचे काजळ काळें. पिवळ्या दिव्यापासून काळें काजळ झालें. काजळापासून शाई तयार होते. शाईचा जगांत सगळीकडे प्रसार झाला. ग्रंथ लिहीले गेलें. म्हणून शाईशिवाय ज्ञान प्राप्त होणें शक्य नाहीं.   
आहे तरी स्वल्प लक्षण । सर्वत्रांची सांठवण ।
अद्धम आणी उत्तम गुण । तेथेंचि असती ॥ २ ॥
२) काजळ ही अगदी साधी वस्तु आहे पण सर्व ज्ञान सांठवूं शकते. वाईट व चांगलें गुण तिच्या साहाय्यानें राहतात. शाईमुळें हीन व उत्तम गुणांचे वर्णन करतां येतें. 
महीसुत सरसाविला । सरसाऊन द्विधा केला ।
उभयेता मिळोन चालिला । कार्येभाग ॥ ३ ॥
३) महीसुत म्हणजे बोरु. बोरु तासला व तासून त्याचें टोक मध्यें चिरलें. हें चिरलेलें दोन भाग मिळून लिहीणें चालते.   
स्वेतास्वेतास गांठीं पडतां । मधें कृष्ण मिश्रित होतां ।
इहलोकसार्थकता । होत आहे ॥ ४ ॥
४) पांढरा कागद व पांढरा नसलेला बोरु यांची गांठ पडते. दोघांच्यामधें शाई येऊन मिळते. ती येऊन मिळाली कीं जें लेखन होतें त्यानें इहलोकांतील जीवनाची सार्थकता घडते.   
विवरतां याचा विचार । मूर्ख तोचि होये चतुर ।
सद्यप्रचित साक्षात्कार । परलोकींचा ॥ ५ ॥
५) लेखनाबद्दल हा विचार नीट समजून घेतला, लिहिलेल्या ग्रंथांचें ज्ञानासंबंधीं महत्व ध्यानांत आलें तर मूर्खमाणूस शाहाणा बनतो. त्याचप्रमाणें परमार्थाचा अनुभव येण्यास उशीर लागत नाहीं.  
सकळांस जे मान्य । तेंचि होतसे सामान्य ।
सामान्यास अनन्य । होईजेत नाहीं ॥ ६ ॥
६) सर्वांना जी गोष्ट मान्य होते, तिचा प्रसार सामान्यपणें समाजांत होतो. पण चतुर माणूस त्याच्याशी सहमत नसतो. प्रारब्धाची रेषा पुसली जात नाहीं. ही गोष्ट सामान्यपणें सर्वजण मानतात, पण तें तसें नाहीं. 
उत्तम मध्यम कनिष्ठ रेखा । अदृष्टीची गुप्त रेखा ।
चत्वार अनुभव सारिखा । होत नाहीं ॥ ७ ॥
७) रेखांचा विचार करतां असे सांगतात कीं, त्यांत चार प्रकार आहेत. उत्तम रेखा, मध्यम रेखा, कनिष्ठ रेखा व चौथी अदृष्टाची गुप्त रेखा. या रेखा पाहून भविष्य सांगणार्‍यांच्या भविष्याचा कांहीं सारखा अनुभव येत नाहीं.   
चौदा पिड्यांचे पवाडे । सांगती ते शाहाणे कीं वेडे ।
ऐकत्यानें घडे कीं न घडे । ऐसें पाहवें ॥ ८ ॥
८) उगीच मागील चौदा पिढ्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगणारे लोक शहाणे कीं वेडे ? वेडेच समजावेत. कारण ऐकणार्‍यानें आपल्या हातून काय घडूं शकते व काय घडूं शकत नाहीं हें पहावें.   
रेखा तितुकी पुसोन जाते । प्रत्यक्ष प्रत्यया येतें ।
डोळेझांकणी करावी ते । कायेनिमित्य ॥ ९ ॥
९) कागदावरची रेखा पुसली जाते असा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्याचप्रमाणें हातावरील रेखा पुसली जाते असाही प्रत्यक्ष अनुभव येतो. मग अदृष्टाची गुप्त रेखादेखील पुसतां येईल याकडे डोळेझाक करुं नये. अशी डोळेंझाक करण्याचे कांहीं कारण नाहीं. 
बहुतांचे बोलीं लागलें । तें प्राणी अनुमानीं बुडाले ।
मुख्य निश्र्चये चुकलें । प्रत्ययाचा ॥ १० ॥
१०) जो माणूस पुष्कळ लोकांचे ऐकण्याच्या नादीं लागतो, तो ानुमानांत बुडतो. प्रत्यक्ष अनुभवाने मनाचा जो निश्र्चय होतो, तो त्यास होत नाहीं.  
उदंडाचें उदंड ऐकावें । परी तें प्रत्ययें पाहावे ।
खरेंखोटें निवडावें । अंतर्यामीं ॥ ११ ॥
११) खूप लोकांचे खूप ऐकावें. परंतु स्वतः अनुभव घेऊन त्याची किंमत ठरवावी. आपण आपल्या बुद्धीनें त्याचा खरें खोटेपणा ठरवावा.  
कोणासी नव्हे म्हणों नये । समजावे अपाये उपाये ।
प्रत्यये घ्यावा बहुत काये । बोलोनियां ॥ १२ ॥
१२) कोणाला नाही म्हणू नये, पण अपाय कोणता व उपाय कोणता हें जाणून असावें. आपण स्वतःप्रचीति पाहावे. उगाच जास्त बोलूं नये.  
माणुस हेंकाड आणी कच्चें । मान्य करावें तयाचें ।
येणें प्रकारें बहुतांचें । अंतर राखावें ॥ १३ ॥
१३) एखादा मनुष्य हेकाड आणि कमअक्कल असला तरी प्रसंगापाहून त्याचे बोलणें ऐकावें. अशा रीतीनें पुष्कळांचे मन सांभाळावें.    
अंतरीं पीळ पेच वळसा । तोचि वाढवी  बहुवसा । 
तरी मग शाहाणा कैसा । निवऊं नेणें ॥ १४ ॥
१४) माणसानें मनांत जर पीळ, पेंच अगर वाकडेपणा ठेवला तर तो वाढत जातो. अशा माणसाला शाहाणा म्हणता येत नाहीं. लोकांचें अंतःकरण तो समाधानी करुं शकत नाहीं.   
वेडें करावें शाहाणें । तरीच जिणें श्र्लाघ्यवाणें ।
उगेंच वादांग वाढविणें । हें मूर्खपण ॥ १५ ॥
१५) जो वेड्यांना शाहाणे करतो त्याचेच जीवन खरोखर प्रशंसा करण्यासारखें असतें. लोकांत उगीच वाद वाढविणें हा मूर्खपणा आहे.  
मिळोन जाऊन मेळवावें । पडी घेऊन उलथावें ।
कांहींच कळों नेदावें । विवेकबळें ॥ १६ ॥
१६) आपण दुसर्‍याशी समरस होऊन त्यास आपलासा करुन घ्यावा. प्रसंगानुसार पडतें घ्यावें. आणि दुसर्‍यास उलथे पाडावें. परंतु विवेकाच्या जोरावर आपलें अंतरंग कळूं देऊं नये.  
दुसर्‍याचे चालणीं चालावें । दुसर्‍याचे बोलणीं बोलावें ।
दुसर्‍याचे मनोगतें जावें । मिळोनियां ॥ १७ ॥
१७) दुसरा वागेल तसेम वागावे. तो बोलेल तसें बोलावें. अशा रीतीनें दुसर्‍या मनोगतामध्यें आपण समरस व्हावें.  
जो दुसर्‍याच्या हितावरी । तो विपट काहिंच न करी ।
मानत मानत विवरी । अंतर तयाचें ॥ १८ ॥
१८) जो दुसर्‍याचे हित पाहातो तो त्या हिताविरुद्ध कांहींच करीत नाहीं. दुसर्‍याला शिकवित त्याचे अंतरंग सुधारावें. 
आधीं अंतर हातीं घ्यावें । मग हळुहळु उकलावें ।
नाना उपायें न्यावें । परलोकासी ॥ १९ ॥
१९) प्रथम दुसर्‍याचे मन वश करुन घ्यावें. नंतर हळुहळु त्याच्या मनांतील गुंतागुंत उकलावी. अनेक उपाय करुन त्याला परमार्थ साधून द्यावा. 
हेंकाडास हेंकाड मिळाला । तेथें गल्बलाचि जाला ।
कळ्हो उठतां च्यातुर्याला । ठाव कैंचा ॥ २० ॥
२०) हेकट मनुष्याला दुसरा हेकटच भेटला तर भांडणतंटे होतात. भांडण निर्माण झालें तर चातुर्याला जागाच उरत नाहीं.  
उगीच करिती बडबड । परी करुन दाखविणें हें अवघड ।
परस्थळ साधणें जड । कठिण आहे ॥ २१ ॥ 
२१) वायफळ बडबड करणें सोपें आहे. प्रत्यक्ष कृति करुन दाखविणें कठीण आहे. दुसर्‍याचें स्थान, शत्रूचें स्थान हस्तगत करुन घेणें फार कठिण असतें     
धके चपेटे सोसावे । नीच शब्द साहात जावे ।
प्रस्तावोन परावे । आपले होती ॥ २२ ॥
२२) धक्के, चपेटे, संकटांचे आघात सहन करावें. कोणी अपशब्द बोलले तर तें गिळावेत. असें केल्यानें आपल्याला विरोध करणार्‍यांना पश्र्चाताप होऊन ते आपले होतात. 
प्रसंग जाणोन बोलावें । जाणपण कांहींच न घ्यावें ।
लीनता धरुन जावें । जेथतेथें ॥ २३ ॥
२३) प्रसंगानुसार विचारपूर्वक तसें बोलावें. परंतु जाणतेपण आपल्याकडे घेऊं नये. आपण जेथें असूं तेथें सदा नम्र असावें. जेथें जाऊं तेथे लीन होऊन जावें   
कुग्रामें अथवा नगरें । पाहावीं घरांचीं घरें ।
भिक्षामिसें लाहानथोरें । परीक्षा सोडावीं ॥ २४ ॥
२४) आपल्या संचारामध्यें वाईट गांवें, शहरें, घरें यांचे सूक्ष्म निरिक्षण करावें. भिक्षेच्यावेळीं सर्व लहान मोठी माणसें पारखून टाकावीत.
बहुतीं कांहींतरी सांपडे । विचक्षण लोकीं मित्री घडे ।
उगेच बैसतां कांहींच न घडे । फिर्णे विवरणें ॥ २५ ॥ 
२५) पुष्कळ माणसें पारखली म्हणजें कोणांतरी एखादा मोठा गुण घेण्यासारखा सापडतो. चतुर व शहाण्या माणसांशी मैत्री होते. पण माणुस जर एका ठिकाणीं बसुन राहीला तर फिरणें व आपापसांत चर्चा करणें राहून जाते. 
सावधपणें सर्व जाणावें । वर्तमान आधींच घ्यावें ।
जाऊं ये तिकडे जावें । विवेकें सहित ॥ २६ ॥
२६) सावधपणें सगळीकडील बातमी घेत जावी. जेथें जाणें असेल तेथील परिस्थिती आधीच माहीत करुन घ्यावी. मग विवेकपूर्वक तेथें जावें. 
नाना जिनस पाठांतरें । निवती सकळांचीं अंतरें ।
लेहोन देतां परोपकारें । सीमा सांडावी ॥ २७ ॥
२७) पुष्कळ विषयांचें ज्ञान पाठ असावें. तें सांगितल्यानें सगळ्यांच्या मनाचे समाधान होते. लोकांसाठी ग्रंथ लिहून ठेवल्यास त्याांच्यावर मोठे उपकार होतात.  
जैसे जयास पाहिजे । तैसें तयास दीजे ।
तरी मग श्रेष्ठचि होइजे । सकळां मान्ये ॥ २८ ॥
२८) ज्याला जें हवें असतें तें त्याला द्यावें. म्हणजे मग माणसाला मोठेपणा येतो. व तो सगळ्यांना मान्य होतो.  
भूमंडळीं सकळांस मान्य । तो म्हणों नये सामान्य ।
कित्येक लोक अनन्य । तया पुरुषासी ॥ २९ ॥
२९) जगामध्यें जो माणूस सर्वांना मान्य होतो; त्याला सामान्य समजू नये. समाजांतील पुष्कळ लोक त्याच्याशी अत्यंत एकनिष्ठ असतात.  
ऐसी चातुर्याचीं लक्षणें । चातुर्ये दिग्विजये करणें ।
मग तयास काये उणें । जेथतेथें ॥ ३० ॥
३०) चातुर्याची लश्रणें ही अशी आहेत. माणसानें चातुर्यानें वागून दिग्विजय करावा. मग त्यास कोठेही कांहीं कमी पडत नाहीं.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्यविवरणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Chaturya Vivaran
समास सहावा चातुर्य विवरण Custom Search

No comments: