Sunday, June 17, 2018

Samas Choutha Sadev Lakshan Nirupan समास चौथा सदेवलक्षण निरुपण


Dashak Aekonvisava Samas Choutha Sadev Lakshan Nirupan 
Samas Choutha Sadev Lakshan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about bad qualities of the Good Sadhak are described here in this Samas. Name of this Samas is Sadev Lakshan.
समास चौथा सदेवलक्षण निरुपण
श्रीराम ॥
मागां बोलिलें करंटलक्षण । तें विवेकें सांडावें संपूर्ण ।
आतां ऐका सदेवलक्षण। परम सौख्यदायेक ॥ १ ॥
१) मागील समासांत करंट्याची लक्षणें सांगितलीं. विवेकानें ती संपूर्ण सोडावी. आतां अतिशय सुख देणारी सदेव लक्षणें सांगतों तीं ऐका.
उपजतगुण शरीरीं । परोपकारी नानापरी ।
आवडे सर्वांचे अंतरीं । सर्वकाळ ॥ २ ॥
२) ज्याच्या अंगीं कांहीं गुण उपजत असतात, तो अनेक मार्गांनी परोपकार करतो. आणि जो सर्वकाळ सर्वांना आवडतो तो सदेव होय.   
सुंदर अक्षर लेहों जाणे । चपळ शुद्ध वाचूं जाणे ।
अर्थांतर सांगो जाणे । सकळ कांहीं ॥ ३ ॥
३) तो सुंदर अक्षर लिहीतो. भरभर पण शुद्ध वाचतो. आणि तो जें वाचतो त्याचा सगळा व सखोल अर्थ सांगू शकतो. 
कोणाचे मनोगत तोडीना । भल्यांची संगती सोडीना ।
सदेवलक्षण अनुमाना । आणून ठेवी ॥ ४ ॥
४) तो कोणाचे मन मोडित नाहीं. चांगल्यांची संगत सोडित नाहीं. भग्यवंताच्या लक्षणांची त्याला बरोबर कल्पना असते.  
तो सकळ जनासी व्हावा । जेथें तेथें नित्य नवा ।
मूर्खपणें अनुमानगोवा । कांहींच नाहीं. ॥ ५ ॥ 
५) सर्वांना तो हवाहवासा वाटतो. जेथें जेथें तो जातो तेथें तेथें तो नवीनपणानें लोकांना आवडतो. म्हणजे त्याची लोकप्रियता वाढतच जाते. मूर्खपणामुळें उत्पन्न होणारा कल्पनेचा घोटाळा त्याच्याजवळ नसतो.
नाना उत्तम गुण सत्पात्र  । तेचि मनुष्य जगमित्र ।
प्रगट कीर्ति स्वतंत्र । पराधेन नाहीं ॥ ६ ॥
६) अनेक उत्तम गुणांचें स्थान असणारा म्हणून तो सत्पात्र असतो. असा मनुष्य खरा जगमित्र असतो. त्याची कीर्ति त्याच्या गुणांच्या योगानें स्वतंत्ररित्या जगांत पसरते. त्याच्या कीर्तिला कोणाचा आधार लागत नाहीं.    
राखे सकळांचे अंतर । उदंड करी पाठांतर । 
नेमस्तपणाचा विसर । पडणार नाहीं ॥ ७ ॥
७)  तो सर्वांचें अंतःकरण सांभालतो. त्याचें पाठांतर खूप असते. नियमितआचरणाचा त्याला कधीच विसर पडत नाहीं. 
नम्रपणें पुसों जाणे । नेमस्त अर्थ सांगो जाणे ।
बोलाऐसें वर्तो जाणे । उत्तम क्रिया ॥ ८ ॥
८) त्याचें कोणास कांहीं विचारणें नम्रपणाचे असते. ग्रंथाचा बरोबर नेमका अर्थ कसा सांगावा हे तो जाणतो.जसें तो बोलतों तसें तो चालतो. आणि त्याच्या हातून नेहमी उत्तम क्रियाच घडतात.
जो मानला बहुतांसी । कोणी बोलों न शके त्यासी ।
धगधगीत पुण्यरासी । माहांपुरुष ॥ ९ ॥
९) त्याला पुष्कळ लोक मानतात. म्हणून त्याला कोणी उगीच कांहीहि बोलूं शकत नाहीं. तो मोठा तेजस्वी व पुण्यवान महापुरुष असतो. 
तो परोपकार करितांचि गेला । पाहिजे तो ज्याला त्याला ।
मग काये उणें तयाला। भूमंडळीं ॥ १० ॥
१०) तो अविरत परोपकार करीत जातो. या कारणानें ज्याला त्याला तो हवासा वाटतो.अशा परोपकारी पुरुषाला या जगांत कांहींच कमी पडत नाहीं.  
बहुत जन वाट पाहे । वेळेसी तत्काळ उभा राहे ।
उणें कोणाचें न साहे । तया पुरुषासी ॥ ११ ॥
११) पुष्कळ लोक त्याची वाट पाहातात. आणि तो देखिल प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळीं मदत करण्यासाठीं उभा राहतो. त्या महापुरुषाला कोणाचेहि उणे पडलेले सहन होत नाहीं. 
चौदा विद्या चौसष्टी कला । जाणे संगीत गायेनकळा ।
आत्मविद्येचा जिव्हाळा । उदंड तेथें ॥ १२ ॥
१२) त्याच्यापाशी चौदा विद्या व चौसष्ट कला असतात. तो संगीत जाणतो. स्वतः गाऊं शकतो. त्याच्या अंतर्यामीं आत्मविद्येविषयीं अतिशय जिव्हाळा असतो. 
सकळांसी नम्र बोलणें । मनोगत राखोन चालणें ।
अखंड कोणीयेकाचें उणें । पडोंचि नेदी ॥ १३ ॥
१३) सर्वांशीं तो नम्रपणें बोलतो. दुसर्‍याच्या मनांतलें ओळखून वागतो. केव्हांहि तो कोणाचे उणे पडूं देत नाहीं. 
न्याय नीति भजन मर्यादा । काळ सार्थक करी सदा ।
दरिद्रपणाची आपदा । तेथें कैची ॥ १४ ॥
१४) न्याय, नीति, भजन, मर्यादा सांभाळून तो आपला काळ सार्थकीं लावतो. अशा माणसाच्या जीवनांत दारिद्र्याचे संकट येणें अशक्य असतें. 
उत्तमगुणें श्रृंघारला । तो बहुतामधें शोभला ।
प्रगट प्रतापें उगवला । मार्तंड जैसा ॥ १५ ॥
१५) अशा प्रकारच्या उत्तम गुणांनी शृमगारलेला तो पुरुष पुष्कळांच्यामध्यें शोभून दिसतो. सूर्य जसा उगवला कीं, त्याचा प्रखर प्रकाश पडतो, त्याचप्रमाणें अशा पुरुषाचे तेज पडते.   
जाणता पुरुष असेल जेथें । कळ्हो कैचा उठेल तेथें ।
उत्तम गुणाविषीं रितें । तें प्राणी करंटे ॥ १६ ॥
१६) ज्या ठिकाणीं शहाणा पुरुष असतो त्या ठिकाणी भांडणतंटा होत नाहीं.ज्यांच्यापाशीं उत्तम गुण नसतात तें लोक करंटे असतात. त्यांच्यापाशीं भांडणतंटे होतात.  
प्रपंची जाणे राजकारण । परमार्थी साकल्य विवरण ।
सर्वांमधें उत्तम गुण । त्याचा भोक्ता ॥ १७ ॥
१७) उत्तम पुरुष प्रपंचांत व्यवहारचातुर्य जाणतो. आणि परमार्थांत आत्मानात्मविवेक आणि सारासार विचार जाणतो. सगळ्यांत जो उत्तम आढळेल त्याचा तो रसिक असतो. 
मागें येक पुढें येक । ऐसा कदापी नाहीम दंडक ।
सर्वत्रांसीं अलोलिक । तया पुरुषाची ॥ १८ ॥   
१८) मागें एक व पुढें एक असा दुटप्पी वर्तनाचा प्रघात त्याच्यापाशीं नसतो. म्हणून सगळ्यांना त्या पुरुषाचे मोठे कौतुक वाटते.      
अंतरासी लागेल ढका । ऐसी वर्तणूक करुं नका ।
जेथें तेथें विवेका । प्रगट करी ॥ १९ ॥
१९) कोणाचेहि अंतकरण दुखावेल असें तो कधीहि वागत नाहीं. प्रत्येक प्रसंगी वागण्यांत तो विवेक प्रगट करतो.  
कर्मविधी उपासनाविधी । ज्ञानविधी वैराग्याविधी ।
विशाळ ज्ञात्रुत्वाची बुद्धी । चळेल कैसी ॥ २० ॥
२०) कर्म, उपासना, ज्ञान आणि वैराग्य हीं चारहि त्याच्या ठिकाणीं अगदी योग्य पद्धतीनें आढलतात. जाणतेपणाची त्याची बुद्धि मोठी विशाल असते. ती कधीं चुकत नाहीं, चळत नाहीं. 
पाहातां अवघे उत्तम गुण । तयास वाईट म्हणेल कोण ।
जैसा आत्मा संपूर्ण । सर्वां घटीं ॥ २१ ॥  
२१) माणसाच्याअंगीं असे उत्तम गुण दृष्टीस पडल्यावर मग त्याला कोणी वाईट म्हणत नाहीं. ज्याप्रमाणें सर्व देहांमध्यें आत्मा भरलेला आहे, त्याचप्रमाणें असा उत्तम पुरुष सर्वांच्या अंतःकरणांत प्रेमरुपानें आपलेपणानें भरुन राहतो.
आपल्या कार्यास तत्पर । लोक असती लाहानथोर ।
तैसाचि करी परोपकार । मनापासुनी ॥ २२ ॥
२२) ज्याप्रमाणें लहान मोठी माणसें आपापल्या कार्याला तत्पर असतात, त्याचप्रमाणें हा उत्तम पुरुष परोपकार करण्यास मनापासून तत्पर असतो. 
दुसर्‍याच्या दुःखें दुखते । दुसर्‍याच्या सुखें सुखावे ।
आवघेचि सुखी असावे । ऐसी वासना ॥ २३ ॥
२३) दुसर्‍याच्या दुःखानें तो दुःखी होतो तसाच दुसर्‍याच्या सुखानें तो सुखी होतो. जगांत सारे सुखी असावेत अशी त्याची मनापासून इच्छा असते.  
उदंड मुलें नानापरी । वडिलांचें मन अवघ्यांवरी ।
तैसी अवघ्यांची चिंता करी । माहांपुरुष ॥ २४ ॥
२४) समजा एखाद्याला बरीच मुलें आहेत. त्याचे लक्ष सगळ्या मुलांवर सारखेंच असते. त्याचप्रमाणें या महापुरुषाला सगळ्यांची काळजी असते.
जयास कोणाचें सोसेना । तयाची निःकांचन वासना ।
धीकारिल्या धीकारेना । तोचि महापुरुष ॥ २५ ॥
२५) त्याला कोणाचे उणे सहन होत नाहीं. त्याला चूकुन कधी पैशाची वासना होत नाही. कोणी त्याचा धिक्कार केला तरी तो मनांत चळत नाहीं. 
मिथ्या शरीर निंद लें । तरी याचें काये गेलें ।
ज्ञात्यासी आणि जिंतिलें । देहबुद्धीनें ॥ २६ ॥ 
२६) आपल्या शरीराला तो मिथ्या समजतो. म्हणून कोणी त्याची निंदा केली तरी तो ती देहापुरती आहे या खात्रीनें स्वस्थ राहतो. जो खरा ज्ञाता आहे त्याला देहबुद्धि जिंकु शकत नाहीं. मी आत्माच आहे हें खरें ज्ञातेपणाचे लक्षण आहे. मी देहच आहे हें देहबुद्धिचें लक्षण आहे. दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध असल्यानें एक असेल तेथें दुसरें असूं शकत नाहीं. म्हणून ज्ञात्याला देहाची निंदा स्पर्श करुं शकत नाहीं. 
हें अवघें अवलक्षण । ज्ञाता देहीं विलक्षण ।
कांहीं तर्‍ही उत्तम गुण । जनीं दाखवावे ॥ २७ ॥
२७) देहबुद्धि हे सगळें अवलक्षण समजावें. ज्ञाता पुरुष देहामध्यें असला तरी तो देहापासून अलिप्त असतो. विलक्षणपणें देहांत राहतो. देहांत विदेहीपणें राहतो. सारांश माणसानें लोकांमधें कांहीं तरी उत्तम गुण प्रगट करावे. 
उत्तम गुणास मनुष्य वेधे । वाईट गुणासी प्राणी खेदे ।
तीक्ष्ण बुद्धि लोक साधे । काये जाणती ॥ २८ ॥
२८) उत्तम गुण पाहून माणसें आकर्षिली जातात. वाईट गुणाची माणसें लोकांना दुःख देतात. जाणत्या माणसाच्या अंगीं असलेल्या तीक्ष्ण बुद्धिची कल्पना सामान्य लोकांना येत नाहीं. देहबुद्धि नाहींशी करुन उत्तम गुणांची जोपासना करण्यासाठीं ज्ञानी पुरुषास तीक्ष्ण व सूक्ष्म बुद्धि लागते. 
लोकीं अत्यंत क्षमा करिती । आलियां लोकांचे प्रचिती ।
मग ते लोक पाठी राखती । नाना प्रकारीं ॥ २९ ॥
२९) थोर पुरुष लोकांचे अन्याय व अपराध यांना क्षमा करतो. जो पुरुष असा अत्यंत क्षमाशील असतो, त्याच्या क्षमेचा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे मग लोक अनेक प्रकारें त्याच्या पाठीशी उभे राहतात. 
बहुतांस वाटे मी थोर । सर्वमान्य पाहिजे विचार । 
धीर उदार गंभीर । माहांपुरुष ॥ ३० ॥
३०) आपण थोर आहोत असें पुष्कळांना वाटते. पण सर्व लोक ज्याला थोर म्हणतात तोच खरा थोर असतो. महापुरुष सदैव धीर, उदार व गंभीर असतो. 
जितुके कांहीं उत्तम गुण । तें समर्थाचें लक्षण ।
अवगुण तें करंटलक्षण । सहजचि जालें ॥ ३१ ॥ 
३१) जेवढें उत्तम गुण आहेत ते समर्थ पुरुषाचे लक्षण समजावें. मग अवगुण हें करंट्याचे लक्षण हें सहजच ठरते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सदेवलक्षणनिरुपणनाम समास चौथा ॥
Samas Choutha Sadev Lakshan Nirupan
समास चौथा सदेवलक्षण निरुपण


Custom Search

No comments: