Monday, June 18, 2018

Samas Panchava DeheManya Nirupan समास पांचवा देहमान्य निरुपण


Dashak Aekonvisava Samas Panchava DeheManya Nirupan 
Samas Panchava DeheManya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Body. Why Body is required for spiritual progress. Name of this Samas is Dehe Manya Nirupan.
समास पांचवा देहमान्य निरुपण
श्रीराम ॥
मातीचे देव धोंड्याचे देव । सोन्याचे देव रुप्याचे देव ।
काशाचे देव पितळेचे देव । तांब्याचे देव चित्रलेपे ॥ १ ॥ 
१) देव कसलेले बनवतात? माती, दगड, सोनें, चांदी, कासें, पितळ च तांबें यांपासून देव बनवतात. कांहीं देव रंगाच्या लेपानें केलेले असतात.  
रुविच्या लांकडाचे देव पोंवळ्यांचे देव । बाण तांदळे नर्मदे देव ।
शालिग्रा, काश्मिरी देव । सूर्यकांत सोमकांत ॥ २ ॥
२) कांहीं देव रुईच्या लाकडाचे तर कांहीं देव पोवळ्याचे असतात. शिवाय तांदळे, नर्मदे,शाळीग्राम, स्फटिकाचे देव, सूर्यकांत, व सोमकांत हे देव आहेतच.  
तांब्रनाणीं हेमनाणीं । कोणी पूजिती देवार्चनीं ।
चक्रांगीत चक्रतीर्थाहुनी । घेऊन येती ॥ ३ ॥
३) कांहीं जण तांब्याच्या व सोन्याच्या नाण्यांची पूजा करतात. कांहीं लोक चक्रतीर्थाहून चक्रांकित दगड आणतात व देव म्हणून त्यांची पूजा करतात.
उदंड उपासनेचे भेद । किती करावे विशद ।
आपलाले आवडीचा वेध । लागला जनीं ॥ ४ ॥
४) देवांच्याप्रमाणें उपासनेचे देखील पुष्कळ प्रकार आहेत. ते सगळे कसें सांगणार? लोकांना आपापल्या आवडीच्या देवाचे आकर्षण असते.   
परी त्या सकळांचें हि कारण । मुळीं पाहावें स्मरण ।
तया स्मरणाचे अंश जाण । नाना देवतें ॥ ५ ॥
५) पण या सगळ्या देवांचे कारण एकच आहे. तें म्हणजे अगदी मुळामधें झालेला स्मरणरुप संकल्प होय. निरनिराळे देव या स्मरणाचे लहानमोठे अंश आहेत.  
मुळीं द्रष्टा देव तो येक । त्याचे जाहाले अनेक ।
समजोन पाहातां विवेक । उमजों लागे ॥ ६ ॥
६) अगदी मूळचा द्रष्टा देव एकच आहे. यापासून हे अनेक देव झाले. विवेकानें शोधून पाहिलें तर हें समजेल. 
देह्यावेगळी भक्ति फावेना । देह्यावेगळा देव पावेना ।
याकारणें मूळ भजना । देहेचि आहे ॥ ७ ॥
७) देहाच्या साधनाखेरीज भक्ति करतां येत नाहीं. देहाच्या साधनाखेरीज देव पावत नाहीं. यावरुन असें स्पष्ट दिसतें कीं, देह हाच देवाच्या भजनाचें मूळ आहे. देवाची भक्ति असो वा दर्शन असो ते घडण्यास देह हें एकच साधन आहे.
देहे मुळींच केला वाव । तरी भजनासी कैंचा ठाव ।
म्हणोनी भजनाचा उपाव । देह्यात्मयोगें ॥ ८ ॥
८) देहाला संपूर्ण मिथ्या मानलें तर मग भजनाला जागाच उरत नाहीं. अंतरात्म्याचा देहाशी संयोग घडतोम्हणून माणूस भजन करुं लागतो.
देहेंविण देव कैसा भजावा । देहेंविण देव कैसा पुजावा ।     
देह्याविण मोहछाव कैसा करावा । कोण्या प्रकारें ॥ ९ ॥
९) देह नसेल तर देवाला भजता येणार नाहीं. देह नसेल तर देवाची पूजा करतां येणार नाहीं. देह नसेल तर देवाचा महोत्सव करतां येणार नाहीं.
अत्र गंध पत्र पुष्प । फल तांबोल धूप दीप ।
नाना भजनाचा साक्षेप । कोठें करावा ॥ १० ॥त्र, पुष्प, फल, तांबूल, 
१०) अत्तर, गंध, पत्र, पुष्प, फल, तांबोोल, धूप, दीप वगैरे अनेक भजनाचे, पूजनाचे विधी देहाच्या अभावी करतां येणार नाहींत. 
देवाचें तीर्थ कैसें घ्यावें । देवासी गंध कोठें लावावें ।
मंत्रपुष्प तरी वावें । कोणें ठाईं  ॥ ११ ॥
११) देह नसेल तर देवाचे तीर्थ घेता येणार नाहीं. देवाला गंध लावता येणार नाहीं. देवाला मंत्रपुष्प वाहता येणार नाहीं.
म्हणोनी देह्याविन आडतें । अवघें सांकडेचि पडतें ।
देह्याकरितां घडतें । भजन कांहीं ॥ १२ ॥
१२) अशा रीतीनें सगळीकडे देहावांचून अदतें. देह नसेल तर मोठी अडचण पडतें. देहाच्या सहाय्यानेंच भगवंताचें भजन घडूं शकतें.  
देव देवता भूतें देवतें । मुळींचें सामर्थ्ये आहे तेथें । 
अधिकारें नाना देवतें । भजत जावीं ॥ १३ ॥
१३) देव, देवता, भुतें आणि दैवतें यांच्या ठिकाणीं मुळांतील सामर्थ्य असतें. ज्याच्यात्याच्या अधिकाराप्रमाणें अनेक प्रकारची दैवतें पूजावी. सर्व देवांचा व दैवतांचा अधिकार सारखा नसतो. हेम ध्यानांत ठेवून त्यांना मानावें.   
नाना देवीं भजन केलें । तें मूळ पुरुषासी पावलें ।
याकारणें सन्मानिलें । पाहिजे सकळ कांहीं ॥ १४ ॥
१४) अनेक प्रकारच्या देवांचे जरी भजन केलें तरी तें अखेर मूळ पुरुषास जाऊन पोचतें. या कारणानें सर्व प्रकारच्या देवांना त्यांच्या त्यांच्यापरी मान द्यावा.  
मायावल्ली फांपावली । नाना देहेफळीं लगडली ।
मुळींची जाणीव कळों आली । फळामधें ॥ १५ ॥
१५) मायारुपी वेल भरमसाट वाढली. तिला अनेक प्रकारची देहरुपी फळें आली. त्या फळांनी ती अगदी भरुन गेली. मूळ पुरुषाच्या ठिकाणीं जी जाणीव आहे, तीच अखेर देहरुपी फळामधें प्रगट झाली.
म्हणोनी येळील न करावें । पाहाणें तें येथेंचि पाहावें ।
ताळा पडतां राहावें । समाधानें ॥ १६ ॥
१६) म्हणून कंटाळा करुं नये. टाळाटाळ करुं नये. अंतरात्म्याबद्दल जें कांहीं पहायचे असेल तें येथेंच या देहांतच पहावें. आणि विवेकानें तत्वांचा मेळ बसला कीं समाधान पावून मग स्वस्थ राहावें. 
प्राणी संसार टाकिती । देवास धुंडीत फिरती ।
नाना अनुमानीं पडती । जेथ तेथें ॥ १७ ॥
१७) माणसें संसार सोडतात व देवाला धुंडीत फिरतात. आणि जेथें तेथें विनाकारण कल्पनेच्या गुंत्यांत अडकतात.  
लोकांची पाहातां रीती । लोक देवार्चनें करिती ।
अथवा क्षत्रदेव पाहाती । ठाईं ठाईं ॥ १८ ॥
१८) लोकांची तर्‍हा अशी आहे कीं, देवाची पूजाअर्चा करावी किंवा अनेक ठिकाणच्या क्षेत्रांमधील देव बघावे, याचा त्यांना हव्यास असतो.  
अथवा नाना अवतार । ऐकोनी धरिती निर्धार ।
परी तें अवघें सविस्त‍हार । होऊन गेलें ॥ १९ ॥
१९) कांहीं लोक अनेक अवतारांच्या कथा ऐकतात. आणि त्यापैकी एका अवतारावर निष्ठा ठेवतात. पण सगळे अवतार आपआपले कार्य संपवून मूळपुरुषाशी गेलेले असतात. 
येक ब्रह्माविष्णुमहेश । ऐकोन म्हणतीं हे विशेष ।
गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे ॥ २० ॥
२०) कांहीं लोकांना ब्रह्मा, विष्णु, महेश यांच्याविषयीम श्रवण करुन आकर्षण उत्पन्न होते. पण क्षेत्रांतील देव काय, किंवा अवतार काय किंवा त्रिमूर्ति काय हे सारे देव त्रिगुणाच्या राज्यांत वावरतात. म्हणून त्रिगुणांच्या पलीकडे असणारा जगदीश्र्वर अथवा परमात्मा पाहणें खरें आवश्यक आहे.
देवासी नाहीं थानमान । कोठें करावें भजन ।
हा विचार पाहातां अनुमान । होत जातो ॥ २१ ॥
२१) देव सर्व ठिकाणीं असल्यानें त्याचे राहण्याचे एकअसें ठिकाण नाहीं. अशा देवाचें भजन कोठें करावें, असा विचार जर आपण करीत बसलो तर आपण कल्पनांच्या घोटाळ्यांत अडकून बसूं. 
नसतां देवाचें दर्शन । कैसेन होईजे पावन ।
धन्य धन्य ते साधुजन । सकळ जाणती ॥ २२ ॥   
२२) प्रत्यक्ष सगुण व साकार मूर्तीचे दर्शन होणें म्हणजें देवाचे दर्शन होय. अशी आपली भ्रामक समजूत असते. म्हणून आपल्या मनांत येते कीं, देवाचे दर्शन झाले नाहीं तर आपण पावन होणार नाहीं. यासाठी देव व देव दर्शन यांचे रहस्य संपूर्णपणें ज्यांना माहित असते असे साधुपुरुष धन्य असतात.  
भूमंडळीं देव नाना । त्यांची भीड उलंघेना ।
मुख्य देव तो कळेना । कांहीं केल्यां ॥ २३ ॥
२३) जगांत पुष्कळ देव आढळतात. त्यांची भीड उल्लंघन करुन पलीकडे जाववत नाहीं. म्हणून खरा व मुख्य देव कांहीं केल्या कळत नाहीं. मानवसमाजांत आढळणारे नाना देव अखेर सारे मानवनिर्मित आहेत आणि त्या सर्वांना निर्भयपणें बाजूस सारुन जो देवाचा शोध करतो, त्यासच खरा गुणातीत देव सांपडतो. 
कर्तुत्व वेगळें करावें । मग त्या देवासी पाहावें ।
तरीच कांहींयेक पडे ठावें । गौप्यगुह्य ॥ २४ ॥
२४) माणूस कर्तेपणाच्या भ्रमांत वावरत असतो. त्यामुळें देवाचे कर्तृत्व आकलन करण्यास लागणारी सूक्ष्म ज्ञानदृष्टी त्याच्या ठिकाणीं नसतें. म्हणून आपण कर्तेपणाहून बाजूस सरावें, म्हणजे मग खर्‍या देवाला पहाता येते. आपण कर्तेपण सोडून पाहूं लागल्यावर देवाचें गुप्त रहस्य थोडेंसे आकलन होऊं लागतें.    
तें दिसेना ना भासेना । कल्पांतीं हि नासेना ।
सुकृतावेगळें विश्र्वासेनाा । तेथें मन ॥ २५ ॥ 
२५) खरा देव किंवा शाश्वत परमात्मस्वरुप इंद्रियांना दिसत नाहीं. व मनाला भासत नाहीं. कल्पान्ताच्या वेळीं देखील त्यास नाश नाहीं. चांगलें पुण्यबल नसेल तर त्याच्यावर मनाचा विश्र्वास बसत नाहीं.  
उदंड कल्पिते कल्पना । उदंड इच्छिते वासना ।
अभ्यांतरीं तरंग नाना । उदयातें पावती ॥ २६ ॥
२६) माणसाच्या मनांत उदंड कल्पना येत राहतात. त्याचप्रमाणें त्याची वासना नाना प्रकारच्या खूप इच्छा करीत राहते. त्याच्या अंतरंगांत अनेक वृत्ति उदय पावतात. मनाची अशी स्थिति जोपर्यंत आहे, तोपर्यंत खर्‍या देवाचे दर्शन होणें शक्य नाहीं. 
म्हणोनी कल्पनारहित । तेचि वस्तु शाश्र्वत । 
अंत नाहीं म्हणोनी अनंत । बोलिजे तया ॥ २७ ॥
२७) म्हणून जें कल्पनारहित तत्व आहे तीच शाश्वत वस्तु होय. त्या वस्तुला अंत नाहीं म्हणून तिला अनंत असें म्हणतात. 
हें ज्ञानदृष्टीनें पाहावें । पाहोनी तेथेंचि राहावें ।
निजध्यासें तद्रूप व्हावें । संगत्यागें ॥ २८ ॥
२८) ज्ञानदृष्टीनें ती वस्तु पहावी. आणि पाहून तिच्यापाशी राहावें. आपण आधी निःसंग बनावें आणि नंतर निदिध्यासनानें त्या वस्तुशी तद्रुप होऊन जावें.  
नाना लीळा नाना लाघवें । तें काये जाणिजे बापुड्या जीवें ।
संतसंगें स्वानुभवें । स्थिति बाणे ॥ २९ ॥
२९) तसे तद्रुप झाल्यावर माणसाच्या हातून ज्या अनेक लीला व विस्मयकारक गोष्टी घडतात, त्याची कल्पना बिचार्‍या सामान्य जीवाला येऊं शकत नाहीं. संतांची संगत व स्वतःचा अनुभव या दोन्ही साधनांनी ही स्थिति अंगी बाणतें.  
ऐसी सूक्ष्म स्थिति गती । कळतां चुके अधोगती ।
सद्गुरुचेनि सद्गती । तत्काळ होते ॥ ३० ॥
३०) खर्‍या देवाच्या दर्शनाची स्थिति व परिणामीं अवस्था अशीं सूक्ष्म आहे. ती कळली तर अधोगती चुकते. सद्गुरुचा लाभ झाला तर त्याच्या कृपेनें उत्तम अवस्था फार लवकर लाभते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहेमान्यनिरुपणनाम समास पांचवा ॥  
   Samas Panchava DeheManya Nirupan
समास पांचवा देहमान्य निरुपण


Custom Search

No comments: