Dashak Visava Samas Panchava Chatvar Jinas
Samas Panchava Chatvar Jinas, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chatvar Jinas.
समास पांचवा चत्वारजिनस निरुपण
श्रीराम ॥
येथून पाहातं तेथवरी । चत्वार जीनस अवधारीं ।
येक चौदा पांच च्यारी । ऐसें आहे ॥ १ ॥
१) या विश्र्वरचनेमध्यें येथून तेथपर्यंत फक्त चारच पदार्थ आहेत. ते ऐकून ठेवा. एकब्रह्म, चौदा मायेची नांवें, पांच महाभूतें आणि चार खाणी असें हें पदार्थ आहेत.
परब्रह्म सकळांहून वेगळें । परब्रह्म सकळांहून आगळें ।
नाना कल्पनेनिराळें । परब्रह्म तें ॥ २ ॥
२) परब्रह्म सर्व पदार्थांहून वेगळें आणि आगळें म्हणजे श्रेष्ठ आहे. मानवी कल्पनांहून निराळे ासें तें ब्रह्म आहे.
परब्रह्माचा विचार । नाना कल्पनेहून पर ।
निर्मळ निश्र्चळ निर्विकार । अखंड आहे ॥ ३ ॥
३) आपण अनेक प्रकारच्या कल्पना केल्या तरी त्यांच्यापलीकडे परब्रह्माचा विचार जातो. परब्रह्म निर्मळ, निश्र्चल, निर्विकार, आणि अखंड आहे.
परब्रह्मास कांहींच तुळेना । हा येक मुख्य जिनसाना ।
दुसरा जिनस नाना कल्पना । मूळमाया ॥ ४ ॥
४) परब्रह्म हाच या विश्र्वरचनेमधील मुख्य जिन्नस आहे. त्याच्याबरोबर दुसर्या कशाचीही तुलना करतां येत नाहीं. अनेक कल्पनांनी भरलेली मूळमाया हा दुसरा जिन्नस आहे.
नाना सूक्ष्मरुप । सूक्ष्म आणी कर्दमरुप ।
मुळींच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया ॥ ५ ॥
५) मूळमायेची अनेक सूक्ष्मरुपें आहेत. ती अतिशय सूक्ष्म असून मिश्रणमय आहे. निर्भेळ नाहीं. परब्रह्माच्या ठिकाणीं जें मूळ स्फूरण झालें, त्याच्यावर जो आरोप करतात, त्यास मूळमाया म्हणतात.
हरिसंकल्प मुळींचा । आत्माराम सकळांचा ।
संकेत नामाभिधानाचा । येणें प्रकारें ॥ ६॥
६) या मूळच्या संकल्पाला हरिसंकेत असें म्हणतात. सर्वांच्या अंतर्यामीं वास करणारा आत्माराम अथवा अंतरात्मा तो हाच होय. त्याला जी नांवें दिलेली आहेत त्याचे संकेत पुढीलप्रमाणें आहेत.
निश्र्चळीं चंचळ चेतलें । म्हणौनि चैतन्य बोलिलें ।
गुणसमानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ७ ॥
७) निश्र्चल ब्रह्मामध्यें चैतन्य जागें झालें म्हणून त्यास चैतन्य म्हणतात. तेथें गुणांचे प्रमाण सम किंवा सारखें असतें म्हणून त्यास गुणसाम्य म्हणतात.
अर्धनारीनटेश्र्वर । तोचि शडगुणैश्र्वर ।
प्रकृतिपुरुषाचा विचार । शिवशक्ती ॥ ८ ॥
८) अर्धनारीनटेश्र्वर व षडगुणेश्वर तोच आहे. शिवशक्ति आणि प्रकृतिपुरुषाचा विचारही तोच आहे.
शुद्धसत्वगुणाची मांडणी । अर्धमात्रा गुणक्षोभिणी ।
पुढें तिही गुणांची करणी । प्रगट जाली ॥ ९ ॥
९) शुद्धसत्व गुणाची कल्पना, अर्धमात्रा असलेली गुणक्षोभिणी, तिच्यामधून पुढें प्रगट होणारे सत्व, रज व तम हे तीन गुण, मूळमायेची नांवें आहेत.
मन माया अंतरात्मा । चौदा जिनसांची सीमा ।
विद्यमान ज्ञानात्मा । इतुके ठाइं ॥ १० ॥
१०) मन, माया, अंतरात्माअसें मायेच्या नांवाचें एकंदर चौदा प्रकार आहेत. सदैव अस्तित्वांत असणारा तो ज्ञानात्मा अथवा आदिसंकल्प इतक्या प्रकारानें प्रत्ययास येतो.
ऐसा दुसरा जिनस । अभिधानें चतुर्दश ।
आतां तिसरा जिनस । पंचमाहाभूतें ॥ ११ ॥
११) चौदा नावांचा हा दुसरा जिन्नस आहे. पंचमहाभूतें हा तिसरा जिन्नस होय.
येथें पाहातां जाणीव थोडी । आदिअंत हे रोकडी ।
खाणी निरोपिल्या तांतडी । तो चौथा जिनस ॥ १२ ॥
१२) पंचमहाभूतांमध्यें जाणीवेचा अंश कमी प्रमाणांत आढळतो. परंतु त्यांच्या आधी व नंतर म्हणजे शेवटी जाणिवेचे अस्तित्व प्रत्यक्ष दिसते. आधीं मूळमायेमध्यें जाणीव असते. आणि नंतर चार खाणींमध्यें जाणीव दिसतें. म्हणून पंचभूतांच्या आदिअंती जाणीव असते. पूर्वी चात खाणी म्हणून घाईघाईनें सांगितलें तो चौथा जिन्नस होय.
च्यारी खाणी अनंत प्राणी । जाणीवेची जाली दाटणी ।
च्यारी जिनस येथुनी । संपूर्ण जाले ॥ १३ ॥
१३) चार खाणी अनंत प्राणी आहेत. त्या प्राण्यांच्या अंतर्यामीं जाणिवेची जणूं काय गर्दी झाली आहे. त्यांच्या ठिकाणीं पुष्कळच जाणीव आढळते. असो. असे हे विश्र्वरचनेचे चार जिन्नस सांगितलें.
बीज थोडें पेरिजेतें । पुढें त्याचें उदंड होतें ।
तैसें जालें आत्मयातें । खाणी वाणी प्रगटतां ॥ १४ ॥
१४) आपण थोडें बीज पेरतों. पण त्यापासून पुढें उदंड धान्य प्राप्त होते. चार खाणींमधील अनंत प्राण्यांमध्यें प्रगट होतांना अंतरात्म्याची स्थिति या बीजासारखी होते.
ऐसी सत्ता प्रबळली । थोडे सत्तेची उदंड जाली ।
मनुष्यवेषें सृष्टी भोगिली । नाना प्रकारें ॥ १५ ॥
१५) अशा रीतीनें सत्तेची वाढ झाली. मूळच्या थोड्या सत्तेचा सपाटून विस्तार झाला. अखेर मनुष्यदेहामध्यें ती सत्ता सृष्टीचा अनेक प्रकारे भोग घेते.
प्राणी मारुन स्वापद पळे । वरकड त्यास काये कळे ।
नाना भोग तो निवळे । मनुष्यदेहीं ॥ १६ ॥
१६) एखादा हिंस्त्र पशु दुसर्याला मारुन पळून जातो. त्याला यापेक्षां अधिक कांहीं कळत नाहीं. पण अनेक प्रकारचे भोग भोगण्यांत माणूस मोठा पटाईत आहे. उदा. पशु मारुन त्याच्या मांसाचे अनेक प्रकार करुन खाण्याचे ज्ञान त्याला आहे. इतर प्राण्यांना नाहीं.
नाना शब्द नाना स्पर्श । नाना रुप नाना रस ।
नाना गंध हे विशेष । नरदेह जाणे ॥ १७ ॥
१७) शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध यांचे नाना प्रकार माणूस विशेष रीतीनें जाणतो.
अमोल्य रत्नें नाना वस्त्रें । नाना यानें नाना शस्त्रें ।
नाना विद्या कळा शास्त्रें । नरदेह जाणे ॥ १८ ॥
१८) अनेक प्रकारची अमोल रत्नें, वस्त्रें वाहनें, शस्त्रें, नाना तर्हेच्या विद्या, कला, शास्त्रें माणसालाच माहित आहेत.
पृथ्वी सत्तेनें व्यापिली । स्थळोस्थळीं अटोपिली ।
नाना विद्या कळा केली । नाना धारणा ॥ १९ ॥
१९) त्या अंतरात्म्याच्या किंवा ईश्र्वराच्या सत्तेनें पृथ्वी व्यापली आहे. ठिकठिकाणीं ती सत्ताच व्यवस्था निर्माण करते. ज्या सत्तेच्या प्रेरणेनें अनेक प्रकारच्या विद्या, कला आणि धारणा प्रगट होतात.
दृश्य अवघेंचि पाहावें । स्थानमान सांभाळावें ।
सारासार विचारावें । नरदेहे जालियां ॥ २० ॥
२०) म्हणून नरदेह हातीं आल्यावर हें सगळें दृश्य पहावें. व्यवहारामधील आपलें स्थान आणी मान दोन्ही सांभाळावेत. आणि सारासार विचार करावा.
येहलोक आणी परलोक । नाना प्रकारींचा विवेक ।
विवेक आणी अविवेक । मनुष्य जाणे ॥ २१ ॥
२१) इहलोक आणि परलोक अनेक प्रकारचे इतर विवेक, शिवाय विवेक आणि अविवेक या गोष्टी माणूसच जाणतो.
नाना पिंडीं ब्रह्मांडरचना । नाना मुळींची कल्पना ।
नाना प्रकारीं धारणा । मनुष्य जाणे ॥ २२ ॥
२२) अनेक प्रकारच्या पिंडांची रचना, ब्रह्मांडरचना, मूळमायेंतील अनेक कल्पना, अनेक प्रकारच्या ध्यान धारणा माणूस जाणतो.
अष्टभोग नवरस । नाना प्रकारींचा विळास ।
वाच्यांश लक्ष्यांश सारांश । मनुष्य जाणे ॥ २३ ॥
२३) अन्न, उदक, तांबूल, पुष्प, चंदन, वसन, शय्या व अलंकार हे आठही प्रकारचे भोग किंवा सुगंध, स्त्री, तांबूल,वस्त्र, गायन, भोजन, शय्या आणि मादक द्रव्य हे आठ भोग, नऊ प्रकारचे रस, अनेक विलास, वाच्यांश, लक्ष्यांश व सारांश या गोष्टी माणूसच जाणतो.
मनुष्यें सकळांस आळिलें । त्या मनुष्यास देवें पाळिलें ।
ऐसे हें अवघें कळलें । नरदेहयोगें ॥ २४ ॥
२४) माणूसइतर सर्व प्राण्यांना आपल्या ताब्यांत ठेवतो. पण माणसाला देव पाळतो, सांभाळतो. आपल्या ताब्यांत ठेवतो. या सार्या गोष्टी मानव देहांतच कळतात.
नरदेह परम दुल्लभ । येणें घडे अलभ्य लाभ ।
दुल्लभ तें सुल्लभ । होत आहे ॥ २५ ॥
२५) मानवदेह अत्यंत दुर्लभ आहे. त्याच्या योगानें अलभ्य लाभ प्राप्त होतो. जी गोष्ट दुर्लभ आहे ती सुलभ होते.
वरकड देहे हे काबाड । नरदेह मोठें घबाड ।
परंतु पाहिजे जाड । विवेकरचना ॥ २६ ॥
२६) इतर देह हे रसहीन आहेत. नुसते कष्टकारक आहेत. पण मानवदेह म्हणजे फार मोठे घबाड आहे. त्याचा संपूर्ण फायदा होण्यास अतिशय मोठा किंवा विशाल विवेक केला पाहिजे.
येथें जेणें आळस केला । तो सर्वस्वें बुडाला ।
देव नाहीं वोळखिला । विवेकबळें ॥ २७ ॥
२७) माणसाचा देह मिळूनही जो आळशीपणानें वागतो, तो सर्व बाजूंनी बुडतो. त्याचे सर्वस्वीं नुकसान होते. कारण विवेकाच्या बळानें तो देवाची ओळख करुन घेत नाहीं.
नर तोचि नारायेण । जरी प्रत्ययें करी श्रवण ।
मननशीळ अंतःकर्ण । सर्वकाळ ॥ २८ ॥
२८) ज्याचे अंतःकरण निरंतर मननशील असतें आणि जो श्रवण केलेल्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतो. तो देहानें माणूस असला तरी देवपदाच्या पदवीला चढतो.
जेणें स्वयेंचि पोहावें । त्यास कासेस नलगे लागावें ।
स्वतंत्रपणें शोधावें । सकळ कांहीं ॥ २९ ॥
२९) ज्याला स्वतःला पोहायला येते, त्याला दुसर्याची कास धरण्याची गरज लागत नाहीं. त्याचप्रमाणें जो मननशील आहे, त्यानें सर्व कांहीं स्वतंत्रपणें शोधून पहावें.
सकळ शोधून राहिला । संदेह कैचा तयाला ।
पुढें विचार कैसा जाला । त्याचा तोचि जाणे ॥ ३० ॥
३०) आशा रीतीनें सर्व विष्वाचा जो स्वतंत्रपणें शोध घेतो, त्याला कोणताहि संदेह उरत नाहीं. अशा रीतीनें संपूर्ण संदेहरहित झाल्यावर पुढें जी अवस्था येते ती त्याची त्यालाच समजते.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चत्वारजिनसनाम समास पांचवा ॥
Samas Panchava Chatvar Jinas
समास पांचवा चत्वारजिनस निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment