Saturday, June 16, 2018

Samas Tisara Karant Lakshan Nirupan समास तिसरा करंटलक्षण निरुपण


Dashak Aekonvisava Samas Tisara Karant Lakshan Nirupan 
Samas Tisara Karant Lakshan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about bad qualities of the Karanta are described here which are to be discarded to become a wise man.
समास तिसरा करंटलक्षण निरुपण
श्रीराम ॥
सुचित करुनी अंतःकर्ण । ऐका करंटलक्षण ।
हें त्यागितां सदेवलक्षण । आंगीं बाणे ॥ १ ॥
१) अंतःकरण एकाग्र करुन करंट्याची लक्षणें ऐकावीत.त्यांचा त्याग केल्यानें भाग्यवानाची लक्षणें अंगी बाणतात. 
पापाकरितां दरिद्र प्राप्त । दरिद्रें होये पापसंचित ।
ऐसेंचि होत जात । क्षणक्षणा ॥ २ ॥
२) पापाचे आचरण झाल्यानें दारिद्र्य प्राप्त होते. दातिद्र्यानें पाप सांठत जाते. असें एकामुळें एक सारखें होत जाते. 
याकारणें करंटलक्षणें । ऐकोनी त्यागचि करणें ।
म्हणिजे कांहीं येक बाणे । सदेवलक्षण ॥ ३ ॥
३) म्हणून करंटलक्षणें ऐकून त्यांचा त्याग करावा. असा त्याग केला म्हणजें कांहीं भाग्यलक्षणें अंगीं बाणतात. 
करंट्यास आळस आवडे । यत्न कदापि नावडे ।
त्याची वासना वावडे । अधर्मीं सदा ॥ ४ ॥ 
४) करंट्याला आळस आवडतो. प्रयत्न करणें कधींच आचडत नाही. त्याची वासना नेहमी अधर्मांत वावरते.  
सदा भ्रमिष्ट निदसुरा । उगेंचि बोले सैरावैरा ।
कोणीयेकाच्या अंतरा । मानेचिना ॥ ५ ॥
५) तो नेहमी भ्रमिष्ट व झोपाळू असतो. तो उगीच अव्वाच्यासव्वा बोलतो. कोणाच्याही अंतःकरणाला मानीत नाहीं. 
लेहों नेणे वाचूं नेणे । सवदासुत घेऊं नेणे ।
हिशेब कितेब राखों नेणे। धारणा नाहीं ॥ ६ ॥
६) त्याला लिहीणें वाचणें येत नाही. व्यापारांत करावें लागणारे देणेघेणें येत नाहीं. जमाकहर्च लिहीतां येत नाही. त्याच्या लक्षांतहि कांहीं राहात नाही. 
हारवी सांडी पाडी फोडी । विसरे चुके नाना खोडी ।
भल्याचे संगतीची आवडी । कदापी नाहीं ॥ ७ ॥
७) तो वस्तू हारवतो, सांडतो, पाडतो, फोडतो, विसरतो व चुकतो. या वअशा इतर खोडी त्याच्या अंगी असतात. चांगल्या माणसाची संगत धरण्याची त्याला मुळींच आवड नसतें.  
चाट गडी मेळविले । कुकर्मी मित्र केले ।
खट नट येकवटिले । चोरटे पापी ॥ ८ ॥
८) तो चावट सोबती मिळवितो. वाईट कृत्यें करण्यासाठीं मित्र जमा करतो. अशा रीतीनें दुष्ट, नष्ट,चोरटे व पापी लोक आपल्याभोवती जमा करतो. 
ज्यासीं त्यासीं कळकटा । स्वयें सदाचा चोरटा ।
परघातकी धाटामोटा । वाटा पाडी ॥ ९ ॥
९) ज्याच्यात्याच्याशी त्याची तक्रार, भांडण असते. स्वतः नेहमी चोरटा असतो. त्याचप्रमाणें दुसर्‍याचा घात करणारा, आडदांड व वाटमारेपणा करणारा असतो.  
दीर्घ सूचना सुचेचिना । न्याय नीति हे रुचेना ।
परअभिळासीं वासना । निरंतर  ॥ १० ॥
१०) त्याला दुरदर्शीपणा मुळींच नसतो. न्याय व नीति आवडत नाहीं. दुसर्‍याचे लुबाडावें हींच वासना त्याला नेहमी असते. 
आळसें शरीर पाळिलें । परंतु पोटेंविण गेलें ।
सुडकें मिळेनासें जालें । पांघराया ॥ ११ ॥ 
११) असा करंटा माणूस केवळ आळसानें आपलें शरीर पाळतो. त्याचा परिणाम असा होतो कीं, काळांतरानें त्याला खायला अन्न मिळत नाहीं. आणि पांघरायला पांढरें फडके देखील मिळत नाहीं.  
आळसें शरीर पाळी । अखंड कुंसी कांडोळी ।
निद्रेचे पाडी सुकाळीं । आपणासी ॥ १२ ॥
१२) अशा आळशीपणानें शरीर सांभाळणारा करंटा सारखा कुशी खाजवतो. नाहींतर आरामांत झोपून राहातो. 
जनासीं मीत्री करीना । कठीण शब्द बोले नाना ।
मूर्खपणें आवरेना । कोणीयेकासी ॥ १३ ॥
१३) तो लोकांशी स्नेह जोडीत नाहीं. ज्याला त्याला तो कठोर व लागणारे शब्द बोलतो. स्वतःच्या मूर्खपणामुळें तो कोणासहि आवरला जात नाहीं.  
पवित्र लोकांमधें भिडावे । वोंगळामधें निशंक धांवे ।
सदा मनापासून भावे । जननिंद्य क्रिया ॥ १४ ॥
१४) पवित्र लोकांमधें जायला त्याला संकोच वाटतो. पण अपवित्र व घाणेरड्या लोकांमधे तो निःशंक वावरतो. लोक ज्या क्रियांना निंद्य मानतात त्या क्रिया करंट्याला मनापासून आवडतात.  
तेथें कैचा परोपकार । केला बहुतांचा संव्हार ।
पापी अनर्थी अपस्मार । सर्वअबद्धी ॥ १५ ॥
१५) करंट्यापाशीं परोपकाराचे नांवच काढायला नको. तो पुष्कळांना जीवें मारतो. तो पापी, अनर्थ घडवून आणणारा, लहरी आणि सर्व दृष्टीनीं असंबद्ध असतो.  
शब्द सांभाळून बोलेना । आवरितां आवरेना ।
कोणीयेकासी मानेना । बोलणें त्याचें ॥ १६ ॥
१६) बोलतांना तो शब्द सामभाळून बोलत नाहीं. त्याचेबोलणें कोणी आवरु म्हटलें तर तें आवरलें जात नाहीं. व तेम बोलणें कोणालाच आवडणरे नसते.
कोणीयेकास विश्र्वास नाहीं । कोणीयेकासीं सख्य नाहीं ।
विद्या वैभव कांहींच नाहीं । उगाचि ताठा ॥ १७ ॥
१७) त्याचा कोणावर विश्र्वास नसतो. त्याचे कोणाशीं सख्य नसतें. विद्या, वैभव वगैरे कांहींसुद्धा बरोबर नसून अभिमान मात्र फार असतो.   
राखावीं बहुतांचीं अंतरें । भाग्य येतें तदनंतरें ।
ऐसीं हें विवेकाचीं उत्तरें । ऐकणार नाहीं ॥ १८ ॥
१८) पुष्कळ लोकांचें अंतःकरण सांभाळले तर मग कालांतरानें भाग्य लाभतें. असे विवेकाचे बोल ऐकण्याची त्याची तयारी नसते. 
स्वयें आपणास कळेना । शिकविलें तें ऐकेना ।
तयासी उपाय नाना । काये करिती ॥ १९ ॥
१९) आपल्याला स्वतःला कळत नाहीं आणि कोणी शिकवलें तर तें ऐकत नाहीं. अशा माणसाला कोणताच उपाय लागूं पडत नाहीं. 
कल्पना करी उदंड कांहीं । प्राप्तव्य तों कांहींच नाहीं ।
अखंड पडिला संदेहीं । अनुमानाचे ॥ २० ॥
२०) तो खूप मोठ्यामोठ्या कल्पना करतो. परंतु त्यातून त्याच्या पदरांत काहींच पडत नाहीं. तो कायमचा कल्पनांच्या जाळ्यांत अडकलेला राहतो.  
पुण्यमार्ग सांडिला मनें । पाप झडावें काशानें ।
निश्र्चय नाहीं अनुमानें । नास केला ॥ २१ ॥   
२१) मनापासून पुण्य मार्गाचा त्यानें त्याग केल्यानें त्याचेपाप क्षीण होण्यास उपाय उरत नाहीं. त्याच्याजवळ कोणताही एक निश्र्चय नसतो. त्यामुळें केवळ अनुमानाच्यामुळें त्याचा नाश होतो.     
कांहींयेक पुर्ते कळेना । सबहेमधें बोलों राहेना ।
बाष्कळ लाबाड ऐसें जना । कळों आलें ॥ २२ ॥
२२) कोणतीही गोष्ट त्याला संपूर्णपणें व नीटपणें कळत नाहीं. पण तो सभेमधें कांहीमतरी बोलल्यावाचून राहात नाहीं. तो चावट आहे, लबाड आहे असे लोकांना समजते. 
कांहीं नेमकपण आपुलें । बहुत जनासी कळों आलें ।
तेंचि मनुष्य मान्य जालें । भूमंडळीं ॥ २३ ॥
२३) ज्या माणसाच्या जीवनांत कांहींतरी निश्र्चितपणाचें वागणें आढळते आणि तें पुष्कळ लोकांना कळतें, त्याच माणसाला जगांत मान्यता मिळतें.  
झिजल्यावांचुनी कीर्ति कैंची । मान्यता नव्हे कीं फुकाची ।
जिकडे तिकडे होते ची ची । अवलक्षणें ॥ २४ ॥
२४) शरीरानें, मनाने व पैशानें झिजल्यावाचून जगांत कीर्ति मिळत नाहीं. जगाकडून मान्यता कांहीं फुकट प्राप्त होत नाहीं.ज्याच्या अंगीं कुलक्षणें असतात त्याची जिकडे तिकडे छी थू होतें. 
भल्याची संगती धरीना । आपणासी शाहाणे करीना ।
तो आपला आपण वैरी जाणा । स्वहित नेणे ॥ २५ ॥
२५) जो माणूस चांगल्याची संगत धरीत नाहीं, तो स्वतःला शाहाणा करीत नाहीं. तो स्वतःचे हित जाणीत नाहीं. तो स्वतःच आपला वैरी होतो हें ओळखावें.  
लोकांसी बरें करावें । तें उसिणें सवेंचि घ्यावें ।
ऐसें जयाच्या जीवें । जाणिजेना ॥ २६ ॥   
२६) आपण लोकांचें चांगलें केलें तर लोकही आपलें चांगलें करतात, ही गोष्ट करंट्याच्या जीवाला कळतच नाहीं.  
जेथें नाहीं उत्तम गुण । तें करंटपणाचें लक्षण ।
बहुतांसीं न मने तें अवलक्षण । सहजचि जालें ॥ २७ ॥
२७) सारांश ज्याच्याजवळ एकही उत्तम गुण नाहीं त्याच्यापाशी करंटेपण आहे असें समजावें. जें पुष्कळांना आवडत नाहीं ते सहजच अवलक्षण मानलें जातें. 
कार्याकारण सकळ कांहीं । कार्येविण तों कांहींच नाहीं ।
निकामी तो दुःखप्रवाहीं । वाहातचि गेला ॥ २८ ॥
२८) कामाच्या निमित्यानें सगळे लोक एकमेकांना विचारतात. कामाशिवाय कोणी कोणाला विचारत नाहीं. म्हणून जो माणूस कोणत्याही कामास उपयोगी पडत नाहीं तो दुःखाच्या प्रवाहांत वाहात जातो.   
बहुतांसीं मान्य थोडा । त्याच्या पापासी नाहीं जोडा ।
निराश्रई पडे उघडा । जेथें तेथें ॥ २९ ॥
२९) जो पुष्कळांनां मान्य नसतो, आवडत नसतो त्याच्या पापाला जोड नाहीं. त्याला कोणी कोठेंच आश्रय देत नाहीं. तो सर्व ठिकाणीं उघडा पडतो.  
याकारणें अवगुण त्यागावे । उत्तम गुण समजोन घ्यावे ।
तेणें मनासारिखें फावे । सकळ कांहीं ॥ ३० ॥
३०) म्हणून माणसानें आपलें अवगुण टाकावे. उत्तम जुण समजून अभ्यासावें. असें केलें तर सगळें कांहीं मनाप्रमाणें घडून येतें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे करंटलक्षणनिरुपणनाम समास तिसरा ॥  
Samas Tisara Karant Lakshan Nirupan
 समास तिसरा करंटलक्षण निरुपण


Custom Search

No comments: