Saturday, June 23, 2018

Samas Navava Rajkaran Nirupan समास नववा राजकारण निरुपण


Dashak Aekonvisava Samas Navava Rajkaran Nirupan 
Samas Navava Rajkaran Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Leader and his behavior with people. Name of this Samas is Rajkaran Nirupan.
समास नववा राजकारण निरुपण
श्रीराम ॥
ज्ञानी आणि उदास । समुदाताचा हव्यास ।
तेणें अखंड सावकाश । येकांत सेवावा ॥ १ ॥
१)  एक आत्मज्ञानी व अत्यंत अलिप्त वृत्ति असलेला माणूस आहे. त्याला लोकसमुदाय करायची हौस असेल तर त्यानें तसें करावें पण प्रथम अखंड एकांत सेवन करुन विवेक करावा व विचारानें कार्य कोणतें करावें, तें कसें करावें याची योजना आखावी.  
जेथें तजवीजा कळती । अखंड चाळणा निघती ।
प्राणीमात्राची स्थिती गती । कळों येते ॥ २ ॥
२) ज्याला योजना सुचतात आणि तो ज्यांच्यावर विचार करतो, त्याला उपायही पुष्कळ सुचतता. त्याला लोकांची परिस्थिति समजते व त्यांना पुढें कसें न्यावें हे समजते. 
जरी हा चाळणाचि करीना । तरी कांहींच उमजेना ।
हिसेबझाडाचि पाहीना । दिवाळखोर ॥ ३ ॥
३) अशा रीतीनें लोकांच्या परिस्थितिचा जो विचार करीत नहीं त्याला उपायही सुतच नाहींत. एखादा दिवाळखोर  माणूस जसा हिशोबझाडा करीत नाहीं, तसें हें घडते. 
येक मिरासी साधिती । येक सीध्या गवाविती ।
व्यापकपणाची स्थिती । ऐसी आहे ॥ ४ ॥
४) एकजण विचारानें व शहाणपणानें वागून इनामी वतन मिळवितो, तर दुसरा आविचारानें व मूर्खपणानें वागून आपलें वतन गमावून बसतो. सगळीकडे लक्ष देऊन वागण्याची स्थिति ही अशी आहे.  
जेणें जें जें मनीं धरिलें । तें तें आधींच समजलें ।
कृत्रिम अवघेंचि खुंटलें । सहजचि येणें ॥ ५ ॥
५) दुसर्‍याच्या मनांत जे हेतु असतात, तें जर आपल्याला आधींच समजलें तर मग त्यांचे कपट आपल्याला आपोआपच थांबविता येईल.
अखंड राहतां सलगी होते । अतिपरिचयें अवज्ञा घडते ।
याकारणें विश्रांती ते । घेता नये ॥ ६ ॥
६) एकाच ठिकाणीं सतत राहिल्यानें सलगी वाढते. अति परिय झाल्यामुळें मान तेथे राहात नाहीं. यासाठी महंतानें एकाच ठिाकाणी विश्रांती घेत सतत राहूं नये.  
आळसें आळस केला । तरी मग कारबारचि बुडाला ।
अंतरहेत चुकत गेला । समुदायाचा ॥ ७ ॥ 
७) आळसाच्या आवडीनें जर कामाचा आळस केला तर मग सगळ्या कारभाराचा नाश होतो. लोकसमुदायाला मार्गदर्शन करुन कार्यरत करण्याचा मनामधील हेतू तसाच राहून जातो.
उदंड उपासनेचीं कामें । लावीत जावीं नित्यनेमें ।
अवकाश कैंचा कृत्रिमें । करावयासी ॥ ८ ॥
८) नित्यनेमानें करायची अशी उपासनेची पुष्कळ कामें लोकसमुदायामागें लावून द्यावी. लोक त्यामधें गुंतून राहिले कीं मग लबाडी करायला कोणासही सवड मिळत नाहीं.
चोर भांडारी करावा । घसरतांच सांभाळावा । 
गोवा मूर्खपणाचा काढावा  । हळु हळु ॥ ९ ॥
९) चोराला भांडारावर मुख्य नेमावा. जर तो कधी  घसरला, जर त्यानें कधीं चोरी केली तर त्याला क्षमा करुन सांभाळून घ्यावा. त्याच्या मूर्खपणांतून त्यला हळुंहळुं बाहेर काढावा.     
या अवघ्या पहिल्याच गोष्टी । प्राणी कोणी नव्हता कष्टी ।
राजकारणें मंडळ वेष्टी । चहुंकडे ॥ १० ॥
१०) या सार्‍या गोष्टी पूर्वीपासून चालत आल्या आहेत. चोरासगट कोणत्याही माणसाला त्याज्य न समजतां सर्वांना आपल्या कार्यामधे खुबीनें गुंतवून ठेवावें. 
नष्टासी नष्ट योजावे । वाचाळासी वाचाळ आणावे ।
आपणावरी विकल्पाचे गोवे । पडोंच नेदी ॥ ११ ॥
११) जो नष्ट आहे त्याच्या मुकाबल्यासाठी नष्ट आणून ठेवावा. जो वाचाळ असेल त्याच्या समोर दुसरा वाचाळ आणून ठेवावा. आपल्यासंबंधी दुसर्‍याच्या मनांत संशय किंवा विकल्प निर्माण होईल असें कांहीं करुं नये. आपलें अलिप्तपण सांभाळून आपण वागावें. 
कांटीनें कांटी झाडावी । झाडावी परी तें कळों नेदावी ।
कळकटेपणाची पदवी । असों द्यावी ॥ १२ ॥
१२) काट्यानें काटा काढावा म्हणजे एका दुर्जनाकडून दुसर्‍या दुर्जनाचा बंदोबस्त करावा. पण तें कोणीं घडवून आणलें तें कोणास कळूं देऊं नये. आपण बावळट आहोत, चतुर नाहीं; असा लोकांचा आपल्याबद्दल असलेला समज तसाच राहूं द्यावा.    
न कळतां करी कार्य जें तें । तें काम तत्काळचि होतें ।
गचगर्चेंत पडतां तें । चमत्कारें नव्हे ॥ १३ ॥
१३) लोकांत फारसा बोभाटा न करतां जें कार्य करावें तें चटकन पार पडतें. लोकांत त्याचा फार गवगवा झाला तर त्यामधील नवलाई नाहींशी होतें. 
ऐकोनी आवडी लावावी । देखोनी बळकटचि व्हावी ।
सलगीनें आपली पदवी । सेवकामधें ॥ १४ ॥  
१४) महंताची कीर्ति ऐकून त्याच्याविषयीं लोकांच्या मनांत आवड उत्पन्न व्हावी. त्याच्या प्रत्यक्ष दर्शनानें ती बळकट व्हावी. आणि त्याच्याशी सलगी झाल्यावर त्याच्या सेवकांपैकी एक होण्यांत भूषण वाटावें.     
कोणीयेक काम करितां होतें । न करितां तें पडतें ।
या कारणें ढिलेपण तें । असोंचि नये ॥ १५ ॥
१५) काम कोणतेहि असो तें केलें तर सिद्धिस जातें, केले नाहीं तर तें मागें पडतें. म्हणून कोणतेही काम करण्यामधे ढिलेपण असूं नये.  
जो दुसर्‍यावरी विश्र्वासला । त्याचा कार्यभाग बुडाला ।
जो आपणचि कष्टत गेला । तोचि भला ॥ १६ ॥
१६) जोदुसर्‍यावर  विश्र्वासून राहतो त्याचा कार्यभाग नाश पावतो. जो आपण स्वतः कष्ट करतो तोच भला होय. 
अवघ्यास अवघें कळलें । तेव्हां तें रितें पडिलें ।
याकारणें ऐसें घडलें । न पाहिजें कीं ॥ १७ ॥
१७) एकाद्या कार्याबद्दल सर्वांना सर्व गोष्टी कळल्या तर तें कार्य मागें पडते. तें नीट होणार नाहीं. म्हणून असें होणार नाहीं याची काळजी घेतली पहिजे. ज्या माणसाकडून कार्याचा जेवढा भाग करुन घ्यावयाचा असेल तेवढ्यापुरतीच माहिती त्यास द्यावी. सबंध कार्याची माहिती देऊं नये. 
मुख्य सूत्र हातीं घ्यावें । करणें तें लोकांकरवी करवावें ।
कित्तेक खलक उगवावे । राजकारणामधें ॥ १८ ॥
१८) कार्याचे मुख्य सूत्र आपल्या हातीं ठेवावे. जें कांही करायचे ते लोकांकडून करवून घ्यावें. आपल्या कार्याच्या व्यवहारामधें पुष्कळ साधी माणसें पुढें आणावी. त्यांना कार्यकर्ते बनवावे.
बोलके पहिलवान कळकटे । तयासीच घ्यावे झटे । 
दुर्जनें राजकारण दाटे । ऐसें न करावें ॥ १९ ॥
१९) जे बडबडे व भांडकुदळ बळकट पुढारी असतात त्यांच्याशी झुंज द्यावी. व त्यांना पराजीत करावें. दुर्जनांमुळें आपलें राजकारण अडून बसलें असें होवूं देऊं नये. 
ग्रामण्य वर्मीं सांपडावें । रगडून पीठचि करावें ।
करुनि मागुती सांवरावें । बुडऊं नये ॥ २० ॥
२०) गांवगुंडीचें रहस्य शोधून काढावें आणि गांवगुंडांना हैराण करुन नरम पाडावें. व आपलेसें करुन घ्यावें. त्यांना साफ नाहिसें करुं नये.  
खळदुर्जनासी भ्यालें । राजकारण नाहीं राखिलें ।
तेणें अवघें प्रगट जालें । बरें वाईट ॥ २१ ॥
२१) दुष्ट व दुर्जन यांच्या भयानें जर आपण आपलें राजकारण सांभाळलें नाहीं तर राजकारणांतील बरें वाईट सर्व उघड होऊन कार्याचा नाश होईल.
समुदाव पाहिजे मोठा । तरी तनावा असाव्या बळकटा ।
मठ करुनी ताठा । धरुं नये ॥ २२ ॥
२२) मोठा लोकसमुदाय करायचा असेल तर त्याला सावरुन धरणारे नियम देखील तसेंच बळकट असावयास हवेत. महंतानें मठ करुन उगीच अभिमान धरुं नये.
दुर्जन प्राणी समजावे । परी ते प्रगट न करावे ।
सज्जनापरीस आळवावे । महत्व देउनी ॥ २३ ॥   
२३) समुदायामधील दुर्जन माणसें ओळखून ठेवावीत. पण त्यांना प्रगट करुं नये. त्यांना सज्जनासारखें महत्व द्यावें. त्यांना मोठेपणादेऊन आपलेसें करावे.     
जनामधें दुर्जन प्रगट । तरी मग अखंड खटपट ।
याकारणें ते वाट । बुझुनि टाकावी ॥ २४ ॥
२४) दुर्जनाला लोकांमध्यें प्रगट केला तर ती एक कायमची कटकट होवून बसते.  म्हणून तो मार्ग बंदच करुन टाकावा.
गनीमाच्या देखतां फौजा । रणशूरांच्या फुर्फुरिती भुजा ।
ऐसा पाहिजे कीं राजा । कैपक्षी परमार्थी ॥ २५ ॥
२५) शत्रूचे सैन्य पाहिलें कीं रणशूरांचे बाहू स्फूरण पावूं लागतात. त्याचप्रमाणें राजा परमार्थाचा कैवार घेणारा असला पाहिजे. 
तयास देखतां दुर्जन धाके । बैसवी प्रचीतीचे तडाखे ।
बंडपाषांडाचे वाखे । सहजचि होती ॥ २६ ॥
२६) तो राजा असा पाहिजे कीं, त्याला पाहून दुर्जनांना भय वाटावें. तो दुर्जनांना तडाखे मारतो. अशी प्रचीति पाहिजे म्हणजे बंडे आणि पाखंडें आपोआपच बंद होतात. 
हे धूर्तपणाची कामें । राजकारण करावें नेमें ।
ढिलेपणाच्या संभ्रमें । जाऊं नये ॥ २७ ॥
२७) हीं खरोखर मोठ्या चतुराईची कामें आहेत. महंतानें अगदी व्यवस्थितपणें राजकारण करावें. उगीच ढिलेपणाच्या भ्रमानें वागूं नये.  
कोठेंच पडेना दृष्टीं । ठाईं ठाईं त्याच्या गोष्टी ।
वाग्विळासें सकळ सृष्टी । वेधिली तेणें ॥ २८ ॥
२८) अशा पुढारी महंताला पाहायला जावें तर तों कोठें दृष्टीस पडूं नये. पण ठिकठिकाणी लोकांनी त्याच्याबद्दल चर्चा करावी. आपल्या वक्तृत्वानें असा महंत सर्व लोकांना आपल्याकडे आकर्षून घेत असतो. 
हुंब्यासीं हुंबा लाऊन द्यावा । टोणप्यास टोणपा आणावा ।
लौंदास पुढें उभा करावा । दुसरा लौंद ॥ २९ ॥
२९) घुम्याची घुम्याशी जोड घालून द्यावी. मूर्खाशी मूर्खाची जोड व धटिंगणाशी धटिंगणाची जोड घालून द्यावी. एका धटिंगणासमोर दुसरा धटिमगण उभा करावा. 
धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।
खटनटासी खटनट । अगत्य करी ॥ ३० ॥
३०) दांडग्यासमोर दांडगा उभा करावा. उद्धटाच्या तोंडाशी दुसरा उद्धटच द्यावा. दुष्ट भांडखोर दुर्जनाला तसाच दुष्ट व भांडखोर दुर्जन आणून ठेवावा.
जैशास तैसा जेव्हां भेटे । तेव्हां मज्यालसी थाटे ।
इतुकें होतें परी धनी कोठें । दृष्टीस न पडे ॥ ३१ ॥
३१) अशा रीतीनें जशास तसा भेटला म्हणजे सभेला रंग भरतो. परंतु या सर्व राजकारणाचीं सूत्रें हालवणारा मालक मात्र कोठेंच दृष्टीस पडूं नये. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे राजकारणनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Rajkaran Nirupan
समास नववा राजकारण निरुपण


Custom Search

No comments: