Saturday, June 9, 2018

Samas Sahava Uttam Purusha Nirupan समास सहावा उत्तमपुरुष निरुपण


Dashak Atharava Samas Sahava Uttam Purusha Nirupan 
Samas Sahava Uttam Purusha Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Uttam Purusha.
समास सहावा उत्तमपुरुष निरुपण
श्रीराम ॥
नाना वस्त्रें नाना भूषणें । येणेम शरीर श्रृंघारणें ।
विवेकें विचारें राजकारणें । अंतर श्रृंघारिजे ॥ १ ॥
१) अनेक प्रकारची वस्त्रें आणि भूषणें यांनीं शरीर शोभिवंत केलें जातें. विवेक, विचार आणि राजकारण यांनीं अंतर्याम शोभिवंत केलें जातें.
शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केलें सज्ज ।
अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ॥ २ ॥   
२) समजा, एखाद्याचें शरीर मोठें सुंदर आणि सतेज आहे. शिवाय चांगल्या वस्त्रांनी व भूषणांनीं तें शृंगारलें तरीपण अंतर्यामी चतुरपणा नसेल तर तें कांहीं शोभत नाहीं. 
तुंड हेंकाड कठोरवचनी । अखंड तोले साभिमानी । 
न्याय नेति अंतःकर्णी । घेणार नाहीं ॥ ३ ॥
३) तोंडाळ, हेकट स्वभावाचा आणि कठोर शब्द बोलणारा माणूस निरंतर अभिमानाच्या मदानें जणुं काय डोलत असतो. तो आपल्या मनांत न्याय नीतिचा विचार आणीत नाहीं. 
तर्‍हे सीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा ।
राजकारण संवादा । मिळोंचि नेणे ॥ ४ ॥
४) तो मोठा तर्‍हेवाईक असून शीघ्रकोपी असतो. कधीही कोणाची मर्यादा ठेवित नाहीं. राजकारणामध्यें जुळवून घ्यायला तो कधीं तयार होत नाहीं. 
ऐसे लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।
पापी अस्मार जनीं । राक्षेस जाणावे ॥ ५ ॥
५) असा दुष्ट माणूस बेईमानी किंवा बेभरवशाचा असतो. त्याच्या बोलण्यांत कधीही खरेंपणा नसतो. 
समयासारिखा समयो येना । नेम सहसा चालेना । 
नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ ६ ॥
६) वेळ सदैव सारखी नसतें. यासाठी एकच नियम सतत चालूं शकत नाहीं. नियम चालवण्याचा आग्रह धरला तर राजकारणामधें अडचणी येतात.
अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें ।
हटनिग्रहीं न पडावें । विवेकी पुरुषें ॥ ७ ॥
७) कोणत्याहि गोष्टीमधें अति वर्ज करावें. जसा प्रसंग असेल तसें वागावें. विचारवंत माणसानें हट्टीपणानें उगाच आग्रह धरुन बसूं नये.  
बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडिले तट ।
कोणीयेकाचा सेवट । जाला पाहिजे ॥ ८ ॥
८) एखाद्या गोष्टीचा फार आग्रह धरला तर आपसांत फूट पडतें. त्यामुळें दोन किंवा अधिक पक्ष निर्माण होतात. अशा परिस्थितींत कोणत्या तरी एका पक्षाचा शेवट व्हावा लागतो.  
बरें ईश्र्वर आहे साभिमानी । विशेष तुळजाभोवानी ।
परंतु विचार पाहोनी । कार्ये करणें ॥ ९ ॥
९) पण एक गोष्ट चांगली आहे, कीं, ईश्र्वराला आपला अभिमान आहे. त्यानें आपल्याला आपलें म्हटलें आहे. विशेषतः तुळजाभवानीची आपल्यावर कृपा आहे. हे जरी खरें आहे तरी नेहमी विचार करुनच कोणतेंहीं कार्य करावें. 
अखंडचि सावधाना । बहुत काये करावी सूचना ।
परंतु कांहीं येक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥ १० ॥
१०) जो सतत सावधपणें वागतो, त्याला आणखी वेगळी सूचना करण्याची गरज नाहीं. पण कांहीं गोष्टी त्यानें ध्यानांत ठेवून वागणें जरुर आहे. 
समर्थापासीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान ।
निश्र्चळ करुनियां मन । लोक असती ॥ ११ ॥
११) थोर व सामर्थ्यसंपन्न पुरुषाजवळ अनेक माणसें असतात. अशा माणसांचा आपण अभिमान धरला पाहिजे. असें पाहून तीं माणसें सुद्धा मग एकनिष्ठेनें वागतात.
म्लेच दुर्जन उदंड । बहुतां दिसाचें माजलें बंड ।
याकारणें अखंड । सावधान असावें ॥ १२ ॥
१२) फार दिवसांपासून दुर्जन म्लेंछांचे बंड माजलें आहे. या कारणानें आपण सतत सावघानपणानें राहावें. केव्हां धोका होईल याचा नेम नाहीं. 
सकळकर्ता तो ईश्र्वरु । तेणें केला अंगिकारु ।
तया पुरुषाचा विचारु । विरुळा जाणे ॥ १३ ॥
१३) ईश्र्वर खरा सर्व कर्ता आहे. तो ज्याचा अंगीकार करतो. त्याच्यावर कृपा करतो. अशा पुरुषाचे जीवन एखाद्यालाच कळतें.  
न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंग प्रकार ।
परीक्षिणें परांतर । देणें ईश्र्वराचें ॥ १४ ॥
१४) न्याय, नीति, विवेक,विचार, अनेक प्रकारच्या प्रसंगांना तोंड देणे, दुसर्‍याच्या अंतःकरणाची बरोबर परीक्षा होणें या गोष्टी ज्या पुरुषाच्या ठिकाणीं आधळतात. त्याच्यावर ईश्र्वराची कृपा झालेली असते.    
माहायेत्न सावधपणें । समईं धारिष्ट धरणें ।
अद्भुतचि कार्य करणें । देणें ईश्र्वराचें ॥ १५ ॥   
१५) खबरदारीनें केलेला अति मोठा प्रयत्न, कठीण प्रसंगामध्यें धरलेला मोठा धीर आणि अद्भुत कार्य घडवून आणणें, हीं ईश्र्वर कृपेची लक्षणें आहेत.   
येश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणासी नाहीं सीमा ।
नाहीं दुसरी उपमा । देणें ईश्र्वराचें ॥ १६ ॥
१६) ज्याच्या यश, कीर्ति, प्रताप, महिमाआणि उत्तम गुणांना सीमाच उरत नाहीं, ज्यास दुसर्‍याची उपमाच देता येत नाहीं, त्याच्यावर ईश्र्वराची कृपा आहे असें समजावें.  
देव ब्राह्मण आचार विचार । कितेक जनासी आधार ।
सदा घडे परोपकार । देणें ईश्र्वराचें ॥ १७ ॥
१७) जो पुरुष देव व ब्राह्मण यांना मानतो, आचार व विचार सांभाळतो, पुष्कळ लोकांना आधार देतो, आणि ज्याच्या हातून सतत परोपकार घडतो, तो माणूस ईश्र्वरीकृपेला पात्र झालेला असतो.  
येहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहाणें ।
बहुत जनाचें साहाणें । देणें ईश्र्वराचें ॥ १८ ॥
१८) प्रपंच व परमार्थ दोन्हीकडे ज्याचे योग्य लक्ष असते, जोसतत सावधानपणें राहतो, जो पुष्कळांचें पुष्कळ सोसतो, तो पुरुष ईश्र्वरी कृपेला पात्र झालेला असतो. 
देवाचा कैपक्ष घेणें । ब्राह्मणाची चिंता वाहाणें ।
बहु जनासी पाळणें । देणें ईश्र्वराचें ॥ १९ ॥   
१९) जो देवाचा कैवार घेतो, ब्राह्माणांची काळजी घेतो, पुष्कळ लोकांचा सांभाळ करतो त्याच्यावर ईश्र्वराची कृपा झालेली असते.
धर्मस्थापनेचे नर । ते ईश्र्वराचे अवतार ।
जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्र्वराचें ॥ २० ॥ 
२०) जे पुरुष धर्म स्थापन करतात, ते ईश्र्वराचा अवतार असतात. असे पुरुष पूर्वी झाले, आज आहेत व पुढेंही होतील. असें पुरुष होणें ही ईश्र्वराची कृपाच होय.  
उत्तम गुणाचा ग्राहिक । तर्क तीक्षण विवेक ।
धर्मवासना पुण्यश्रलोक । देणें ईश्र्वराचें ॥ २१ ॥
२१) जो पुरुष उत्तम गुणांचा चाहता आहे, ज्याच्यापाशीं तीव्र बुद्धी व विवेकशक्ती आहे, ज्याला केवळ शुभवासनाच आहेत, असा पुरुष ईश्र्वरी कृपेचेच फळ होय.   
सकळ गुणांमधें सार । तजविजा विवेक विचार ।
जेणें पाविजे पैलपार । अरत्रपरत्रींचा ॥ २२ ॥
२२) ज्या विवेकविचारानें आणि योजनेनें प्रपंच आणि परमार्थ दोन्ही नीटपणें पार पडतात, तो विचार व ती योजना सर्व गुणांचे सार आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमपुरुषनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava  Uttam Purusha Nirupan
समास सहावा उत्तमपुरुष निरुपण


Custom Search

No comments: