Sunday, June 10, 2018

Samas Satava Jan Swabhav Nirupan समास सातवा जनस्वभाव निरुपण


Dashak Atharava Samas Satava Jan Swabhav Nirupan 
Samas Satava Jan Swabhav Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Jan Swabhav. Jan Swabhav means how people behave. Generally people are selfish. They want everything without making any efforts. All these are discussed in this samas.
समास सातवा जनस्वभाव निरुपण
श्रीराम ॥
जनाचा लालची स्वभाव । आरंभींच म्हणती देव ।
म्हणिजे मला कांहीं देव । ॥ ऐसी वासना ॥ १ ॥ 
१) सामान्य जनांचा स्वभाव मुळांत स्वार्थी व लोभी असतो. ते जेव्हां देव हा शब्द उच्चारतात, तेव्हां आधींच मला कांहींतरी द्यावे. अशी वासना त्यांच्या मनांत असतें. 
कांहींच भक्ति केली नस्तां । आणी इच्छिती प्रसन्नता ।
जैसें कांहींच सेवा न करितां । स्वामीस मागती ॥ २ ॥
२) ते देवाची भक्ती मुळींच करीत नाहींत आणि देवानें प्रसन्न व्हावें अशी अपेक्षा बाळगतात. एखादा नोकर कांहीं काम न करतां मालकाजवळ पगार मागतो तसा हा प्रकार आहे.  
कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं ।
केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥
३) या जगांत कष्टावांचून फळ मिळत नाहीं. कष्टावांचून राज्य मिळत नाहीं. कष्ट केल्यावांचून जगांत कोणतीहि गोष्ट साध्य होत नाहीं. 
आळसें काम नासतें । हें तो प्रत्ययास येतें ।
कष्टाकडे चुकावितें । हीन जन ॥ ४ ॥
४) आळशीपणानें कार्याचा नाश होतो. असा प्रत्यक्ष अनुभव येतो. असें असूनही हीन प्रतीचे लोक कष्ट करण्यांत चुकारपणा करतात.  
आधीं कष्टाचें दुःख सोसिती । ते पुढें सुखाचें फळ भोगिती ।
आधीं आळसें सुखावती । त्यासी पुढें दुःख ॥ ५ ॥
५) जे लोक आधी कष्टाचे दुःख सोसतात तेंच लोक पुढें सुखाचें फळ भोगतात. जे लोक आधी आळसानें सुखावतात तें लोक पुढें दुःख भोगतात.   
येहलोक अथवा परलोक । दोहिमकडे सरिखाचि विवेक ।
दीर्घ सूचनेचें कौतुक । कळलें पाहिजे ॥ ६ ॥  
६) प्रपंच असो कीं परमार्थ असो, दोन्हीकडे विवेक सारखाच असतो. पुढची योजना आखून वागण्याचे महत्व कळलें पाहिजे. 
मेळविती तितुकें भक्षिती । ते कठीण काळीं मरोन जाती ।
दीर्घ सूचनेनें वर्तती । तेंचि भले ॥ ७ ॥ 
७) आपण जेवढें मिळवलें त्यापैकीं कांहीं शिल्लक न ठेवतां सगळें खाऊन फस्त केलें तर पुढें कठीण काळ आल्यावर जगणें मुश्किल होते. म्हणून पुढची योजना आखून जें वागतात ते शाहाणें ठरतात.    
येहलोकींचा संचितार्थ । परलोकींचा परमार्थ ।
संचितेविण वेर्थ । जीत मेलें ॥ ८ ॥
८) या जगांत सुखानें जगण्यास सांठविलेला पैसा उपयोगी पडतो. तर परलोकांत समाधानी परमार्थ उपयोगी पडतो. ज्याच्यापाशी सांठविलेला पैसा नसतो तो जिवंत असून मृतवत होतो.  
येकदा मेल्यानें सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना ।
आपणास मारी वांचविना । तो आत्महत्यारा ॥ ९ ॥
९) एकदा मरुन माणूस सुटत नाहीं. त्याला पुनः पुनः जन्म येतात व यातना भोगाव्या लागतात. जो स्वतःला न वांचवतां स्वतःचाच घात करतो, तो आत्महत्यारा होय. 
प्रतिजन्मीं आत्मघात । कोणें करावें गणीत । 
याकारणें जन्ममृत्य । केवी चुके ॥ १० ॥
१०) अशा रीतीनें प्रत्येक जन्मांत घात चालतो. असें किती जन्म होतांत याचे गणित करतां येत नाहीं. अशा रीतीनें जीवन जगून जन्ममृत्यु चुकत नाहींत.
देव सकळ कांहीं करितो । ऐसें प्राणिमात्र बोलतो ।
त्याचे भेटीचा लाभ तो । अकस्मात जाला ॥ ११ ॥
११) देव सर्व कांहीं करतो ासें सगळीं माणसें म्हणतात. भगवंताची भेट मात्र अकस्मात होते. 
विवेकाचा लाभ घडे । जेणें परमात्मा ठाईं पडे ।
विवेक पाहातां सांपडे । विवेकी जनीं ॥ १२ ॥
१२) ज्याच्याजवळ खरा आत्मानात्मविवेक असतो, त्याला परमात्मा सांपडतो. आणि विवेकी पुरुषापाशी विेवेकाचा लाभ होतो. 
देव पाहातां आहे येक । परंतु करितो अनेक ।
त्या अनेकास येक । म्हणों नये कीं ॥ १३ ॥
१३) खरें पाहिलें तर देव एकच आहे. सामान्य माणूस अनेक देव मानतो. त्या अनेक देवांना एक देव म्हणतां येत नाहीं.  
देवाचें कर्तुत्व आणि देव । कळला पाहिजे अभिप्राव ।
कळल्याविण कितेक जीव । उगेच बोलती ॥ १४ ॥
१४) देवांचे मूळ स्वरुप व देवांचें कर्तेपण हीं दोन खरी कशीं आहेत हेम बरोबर समजून घ्यावें. तें न कळतांच पुष्कळ लोक त्याबद्दल बोलतात.   
उगेच बोलती मूर्खपणें । शाहाणपण वाढायाकारणें ।
त्रुप्तिलागीं उपाव करणें । ऐसें जालें ॥ १५ ॥
१५) आपला शहाणपणा दाखवण्यासाठीं काहीं लोक उगीच मूर्खपणानें देवाबद्दल व त्याच्या कर्तेपणाबद्दल बोलतात.एखाद्या माणसाला भूक लागलीं असतां भुकेची तृप्ती होण्यासाठीं भोजन करणें हा सरळ उपाय आहे. तो न करतां इतर उपाय करीत बसण्यासारखें हें आहे.  
जेहीं उदंड कष्ट केले । ते भाग्य भोगून ठेले ।
येर ते बोलताचि राहिले । करंटे जन ॥ १६ ॥
१६) जें लोक मनस्वी कष्ट करतात तेच भाग्य भोगित राहातात. बाकीचे भाग्यहीन लोक नुसती बडबड करीत जगतात.  
करंट्याचें करंट लक्षण । समजोन जाती विचक्षण ।
भल्याचें उत्तम लक्षण । करंट्यास कळेना ॥ १७ ॥
१७) जें शहाणें असतात तें करंट्याचे करंतपण समजून जातात. पण चांगल्याचे चांगुलपणाचें लक्षण मात्र करंट्यास समजत नाहीं. 
त्याची पैसावली कुबुद्धी । तेथें कैंची असेल शुद्धी ।
कुबुद्धी तेचि सुदुद्धी । ऐसी वाटे ॥ १८ ॥
१८) जो करंटा असतो त्याच्या अंगी कुबुद्धीचे प्राबल्य असतें. त्याच्या ठिकाणी जणूं शुद्धीच नसतें. कुबुद्धीलाच तो सुबुद्धी समजतो. 
मनुष्य शुद्धीस सांडावें । त्याचें काये खरें मानावें ।
जेथें विचाराच्या नांवें । सुन्याकार ॥ १९ ॥
१९) जो माणूस नीट शुद्धीमध्यें नाहीं, त्याचे कोणतेही बोलणें खरें मानता येत नाही. त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावांनें शून्य असतें.
विचारें येहलोक परलोक । विचारें होतसे सार्थक ।
विचारें नित्यानित्य विवेक । पाहिला पाहिजे ॥ २० ॥
२०) विचारानें इहलोक व परलोक साधतो. विचारानें सार्थक होतें. विचारानें नित्यानित्यविवेक पाहिला पाहिजे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जनस्वभावनिरुपणनाम समास सातवा ॥
Samas Satava  Jan Swabhav Nirupan 
समास सातवा जनस्वभाव निरुपण


Custom Search

No comments: