Thursday, June 14, 2018

Samas Dahava Shrota AwaLakshan Nirupan समास दहावा श्रोताअवलक्षण निरुपण


Dashak Atharava Samas Dahava Shrota AwaLakshan Nirupan 
Samas Dahava Shrota AwaLakshan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Shrota. Shrota means people who came for listening Nirupan.
समास दहावा श्रोताअवलक्षण निरुपण 
श्रीराम ॥
कोणीयेका कार्याचा साक्षप । कांहीं तर्‍ही घडे विक्षेप ।
काळ साहे तें आपोंआप । होत जातें ॥ १ ॥
१) आपण एखादे कार्य सिद्ध करण्यासाठीं उद्योग आरंभला तर कांहींतरी विघ्न येते पण काळाचें सहाय्य असेल तर तें कार्य आपोआप होत जातें.  
कार्यभाग होत चालिला । तेणें प्राणी शोक जाला ।
विचारहि सूचों लागला । दिवसेंदिवस ॥ २ ॥
२) कार्यामध्यें जसजशी प्रगती होत जाते तसतसा काम करणार्‍या माणसाचा उत्साह वाढत जातो. दिवसेंदिवस त्याला नवें नवें विचार सुचु लागतात.   
कोणीयेक प्राणी जन्मासी येतो । कांहीं तर्‍ही काळ साहे होतो ।
दुःखाउपरी सुख देतो । देव कृपाळुपणें ॥ ३ ॥
३) जगांत असे आढळतें, कीं, एखादा माणूस जन्मास येतो. त्याला कांहींतरी काळाची अनुकूलता सहाय्य करते. प्रथम तो दुःख भोगतो. पण त्यानंतर देवाच्या कृपाळूपणानें त्याला सुख लाभते.   
अवघाचि काळ जरी  सजे । तरी अवघेचि होती राजे ।
कांहीं सजे कांहीं न सजे । ऐसें आहे ॥ ४ ॥
४) काळ जर नेहमींच अनुकुल राहून सहाय करुं लागला तर सगळेच राजे होतील. पण कांहीं प्रसंगीं काळ अनुकूल तर कांहीं प्रसंगीप्रतिकूल असा क्रम जीवनांत चालतो. 
येहलोक अथवा परलोक । साधतां कोणीयेक विवेक ।
अद्भुत होये स्वभाविक । देणें ईश्र्वराचें ॥ ५ ॥
५) प्रपंचांत किंवा परमार्थांत जर खरा विवेक करणें साधलें तर सहजरीतीनें कांहींतरी अद्भुत कार्य हातुन घडतें. हें असें घडणें हें ईश्र्वरीकृपेचेच फळ होय.
ऐकल्याविण कळलें । शिकल्याविण शहाणपण आलें ।
देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥
६) कोणाकडून ऐकल्यावांचून कळतें. कोणाकडून शिकल्यावांचून शहाणपण आलें. असें जगांत कोणी कधीम पाहिलें नाहीं किंवा ऐकलें नाहीं.  
सकळ कांहीं ऐकतां कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे ।
नेमस्त मनामधें आकळे । सारासार ॥ ७ ॥
७) दुसर्‍याकडून ऐकून सर्व कांहीं कळूं लागते. असें कळत गेल्यानें आपली वृत्ती निवळते आणि मग सार कोणतें व असार कोणतें, याचें निश्र्चित ज्ञान आपल्या मनाला आकलन होते.   
श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें ।
येणें उपायें स्वभावें । त्रयलोक्य चाले ॥ ८ ॥
८) श्रवण म्हणजें ऐकणें होय. मनन म्हणजें मनांत धरणें होय. मनन म्हणजे धारणा. याच उपायानें त्रैलोक्यांतील ज्ञानव्यवहार चालत आलेला आहे.  
श्रवणाआड विक्षेप येती । नाना जिनस सांगों किती ।
सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥ 
९) श्रवणाचा उपयोग होण्यास ज्या अडचणी येतात, त्यांचे सगळें प्रकार सांगणें शक्य नाहीं. मनुष्य जर सावध राहिला तर त्या अडचणींची कल्पना त्याला येते.  
श्रवणीं लोक बैसले । बोलतां बोलतां येकाग्र जाले ।
त्याउपरी जे नूतन आले । ते येकाग्र नव्हेती ॥ १० ॥ 
१०) समजा लोक ऐकायला बसले आणि वक्त्याचे बोलणें ऐकतां ऐकतां एकाग्र झालें. पण नंतर नंतर म्हणजे उशीरानें येणारे लोक एकाग्र नसतात. त्यांचा आधीच्या लोकांना विक्षेप होतो.    
मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें ।
उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥
११) एखादा मनुष्य पुष्कळ ठिकाणीं हिंडून येतो. तो अनेक प्रकारचे ऐकून येतो. फार ऐकल्यानें त्याच्या मनांत घोटाळा उत्पन्न होतो. त्याला मग चैन पडत नाहीं.  
प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक थोडे असती ।
श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥
१२) प्रसंगओळखून वागणारे लोक थोडेच असतात. त्यामुळें श्रवणांत येणार्‍या अडचणी अनेक प्रकारच्या असतात. त्यापैकीं कांहीं ऐका.  
श्रवणीं बैसले ऐकाया । अडों लागली काया ।
येती कडकडां जांभया । निद्राभरें ॥ १३ ॥
१३) सभेमध्यें ऐकायला बसलें कीं, शरीर अवघडतें. त्यांत फार झोप आल्यामुळें सारख्या जांभया येऊं लागतात.
बैसले सुचित करुनि मना । परी तें मनचि ऐकेना ।
मागें होतें ऐकिलें नाना । तेंचि धरुनी बैसलें ॥ १४ ॥ 
१४) एखादा माणूस मन शांत करुन ऐकायला बसतो. पण त्याचे मन ऐकत नाहीं. पूर्वीं जें ऐकलेले असेल तेंच मनांत सारखें येऊं लागते. त्यामुळें वक्ता जें सांगत असतो त्याकडे लक्ष लागत नाहीं.
तत्पर केलें शरीर । परी मनामधें आणीक विचार ।
कल्पना कल्पी तो विस्तार । किती म्हणौनि सांगावा ॥ १५ ॥
१५) शरीर अगदी आवरुन ऐकायला बसलें तर मनांत इतर विचार येऊं लागतात. एकामागून एक कल्पना विस्तार घेऊं लागतात. त्या सगळ्या सांगणें शक्य नाहीं. 
जें जें कांहीं श्रवणीं पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।
तरीच कांहीं सार्थक जालें । निरुपणीं ॥ १६ ॥ 
१६) जें जें आपण ऐकतो तें नीट समजून त्यावर मनन केलें तरच निरुपणानें कांहीं सार्थक झालें असें म्हणावें.
मन दिसतें मां धरावें । ज्याचें त्यानें आवरावें ।
आवरुन विवेकें धरावें । अर्थांतरी ॥ १७ ॥
१७) मन जर दिसत असतें तर त्याला धरतां आलें असतें. तें दिसत नाहीं म्हणून ज्याचे त्यानें मन आवरावे. तसें तें आवरुन विवेकानें तें अर्थ शोधण्याकडे गुंतवावें.
निरुपणीं येऊन बैसला । परी तो उदंड जेऊन आला ।
बैसतांच कासाविस जाला । त्रुषाकांत ॥ १८ ॥
१८) समजा एखादा माणूस भरपेट जेवला आणि निरुपणाला येऊन बसला, बसल्याबसल्या तो तहानेनें कासावीस झाला. 
आधीं उदक आणविलें । घळघळां उदंड घेतलें ।
तेणें मळमळूं लागलें । उठोनी गेला ॥ १९ ॥
१९) म्हणून त्यानें पाणी आणविलें आणि ते घटाघटा पोटभर प्यायला. मग त्याच्या पोटांत मळमळूं लागलें. म्हणून तो उठून गेला. अशाप्रकारें त्याचें श्रवण हुकलें. 
कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा सरतां मोठी फजिती ।
क्षणाक्षणा उठोनी जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥
२०) एखाद्याला सारख्या करपट ढेकरा येतात. एखादा सारख्या उचक्या देतो. तर एखाद्याचा वारासरुन मोठी फजिती होते. एखाद्याला वारंवार लघुशंकेसाठीं उठून जावें लागतें. या सर्वांचे श्रवण नीट होत नाहीं. 
दिशेनें कासाविस केला । आवघेंचि सांडून धांविला ।
निरुपणप्रसंगी निघोनी गेला । अखंड ऐसा ॥ २१ ॥
२१) एखाद्यास मधेच शौचास लागते. तो अगदी अस्वस्थ होतो व सगळें सोडून धांवत जातो. अशारीतीनें कांहीं ना कांहीं कारणानें निरुपणाच्यावेळीं नेहमी माणूस गैरहजर असतो.   
दृष्टांतीं कांहीं अपूर्व आलें । अंतःकर्ण तेथेंचि राहिलें ।
कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥
२२) वक्त्यानें एखादा अपूर्व दृष्टांत सांगितला तर मन त्यालाच चिकटून राहाते. मग ग्रंथाचे वाचन कुठचे झालें याचे भान राहात नाहीं. 
निरुपणीं येऊन बैसला । तो विंचुवें फणकाविला ।
कैंचे निरुपण जाला । कासावीस ॥ २३ ॥
२३) एखादा निरुपणाला येुन बसतो व त्याला विंचू चावतो. मग कसलें आलें निरुपण? त्याचा जीव नुसता कासावीस होतो.  
पोटामधें तिडिक उठिली । पाठीमधें करक भरली ।
चालक चिखल्या पुळी जाली । बैसवेना ॥ २४ ॥
२४) पोटांत कळ आली, पाठींत उसण भरली, संधिॉतानें सांधें धरलें, पायाच्या बोटांत चिखल्या झाल्या, बसायच्या जागीं पुळी झाली, तर माणसाला निरुपणाला बसवत नाहीं. 
पिसोळा चाऊन पळाला । तेणें प्राणी दुश्र्चीत जाला ।
कोणें नेटें गल्बला केला । तेथेंचि धावें ॥ २५ ॥
२५)  एखादा पिसोळ पाहून पळाला तर मनाची एकाग्रता भंगून जातें. तेवढ्यांत बाहेर कोणी खूप गडबड केली तर माणूस निरुपण सोडून तिकडे धावतो.   
विषई लोक श्रवणीं येती । ते बायेकांकडेच पाहाती ।
चोरटे लोक चोरुन जाती । पादरक्षा ॥ २६ ॥
२६) कामवासनेने पछाडलेले लोक श्रवण करायला येतात पण त्यांचें लक्ष स्त्रियांकडे असतें. आणि चोर श्रवणास आलेल्या लोकांची पादत्राणेंच चोरुन नेतात. 
होये नव्हे वादवेवाद । तेणें उदंड जाला खेद ।
सिव्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥
२७) एखाद्या प्रसंगीं श्रवण करीत असतां " अस्ति आणि नास्ति " असा वाद होतो. त्यामुळें मनाला मोठा खेद होतो. कारण त्यामधें शिव्याशाप होतात. आगळीक घडते. आपल्या हातून चूक घडतें. अर्थांत श्रवण बाजूलाच राहून जातें.
कोणीं निरुपणी बैसती । सावकास गोष्टी लाविती ।
हरिदास ते रें रें करिती । पोटासाठीं ॥ २८ ॥
२८) कांहीं लोक निरुपण श्रवणास बसतात. पण आपसांत गप्पा सुरु करतात. समोत हरिदास मात्र पोटासाठीं रटाळ किर्तन करत असतो.
बहुत जाणते मिळाले । येकापुढें येक बोले ।
लाकांचे आशये राहिले । कोण जाणे ॥ २९ ॥
२९) एखादे प्रसंगी पुष्कळ विद्वान लोक निरुपणास येतात. तेच एकामागून एक बोलूं लागतात. इतर श्रोत्यांना काय हवें इकडे कोणीच लक्ष देत नाहीं.
माझें होये तुझें नव्हे । ऐसा अखंड जयास सवे ।
न्याये नीति सांडून धावे । अन्यायाकडे ॥ ३० ॥
३०) माझेंच म्हणणें खरें तुझे म्हणणे खरें नाहीं, असा हेका धरण्याची सवय कांहीं लोकांस असते. अशी माणसें न्यायनीति सोडून अन्यायाकडे धांव घेतात. 
आपल्या थोरपणासाठीं । अच्यावाच्या तोंड पिटी ।
न्याये नाहीं ते सेवटीं । परम अन्याई ॥ ३१ ॥
३१) आपल्याला मोठेपणा यावा यासाठीं कांहीं माणसें आच्यावाच्या बोलत सुटतात. त्यांचें बोलणें कांहीं न्यायाचे नसतें. अखेर ते अगदी अन्यायाचे ठरतें. 
येकेकडे अभिमान उठे । दुसरेकडे उदंड पेटे ।
ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२ ॥
३२) एकजण गर्वानें बोलत सुटतो तर दुसरा भयंकर संतापतो. अशा प्रकारच्या श्रोत्यांमधे खरा कोण व खोटा कोण हें सांगणें कठिण आहे.   
म्हणोन जाणते विचक्षण । तें आधींच धरिती नेणपण ।
मूर्ख टोणपा आपण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥
३३) म्हणून जे खरें जाणते व शहाणे असतात, ते प्रथमच स्वतःकडे नेणतेपणा घेतात. आपण मूर्ख आहोत, अज्ञानी आहोत, आपण कोणींच नाहीं अशी भूमिका तें घेतात.   
आपणाहून देव थोर । ऐसा जयास कळला विचार ।
सकळ कांहीं जगदांतर । तेहिं राखावें ॥ ३४  ॥
३४) आपल्याहून देव थोर आहे हा विचार ज्याला खर्‍या अर्थानें समजला, तो सगळ्या लोकांचें अंतःकरण सांभालतो.जनीं जनार्दन आहे अशी त्याची खात्री असल्यानें तो समुदायाचे अंतःकरण दुखवीत नाहीं.  
सभेमधें कळ्हो जाला । शब्द येतो जाणत्याला ।
अंतरें राखों नाहीं सिकला । कैसा योगी ॥ ३५ ॥ 
३५) सभेमध्यें जर भांडण निर्माण झालें, तर त्याचा दोष जाणत्याकडे जातो. जों लोकांचें अंतःकरण सांभाळू शकत नाहीं तो योगी म्हणवून घेण्यास योग्य नाहीं.       
वैर करितां वैरचि वाढे । आपणास दुःख भोगणें घडे ।
म्हणोनि शाहाण्याचे कुकडे । कळों आलें ॥ ३६ ॥
३६) वैर केल्यानें वैर वाढतें. आणि आपल्याला दुःख भोगावें लागतें. यावरुन शहाणपणाचे रहस्य ध्यानांत येईल.   
अखंड आपणा सांभाळिती । क्षुल्लकपण येऊं नेदिती ।
थोर लोकांस क्ष्मा शांति । अगत्य करणें ॥ ३७ ॥
३७) जो खरा थोर असतो तो नेहमीं आपला थोरपणा सांभाळून वागतो. आपल्याकडे हीनपणा तो येऊं देत नाहीं. थोर लोकांच्या वागण्यांत क्षमा व शांती हे गुण अति आवश्यक असतात. 
अवगुणापासीं बैसला गुणी । आवगुण कळतो तत्क्षणीं ।
विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥ ३८ ॥
३८) अवगुणी माणसाच्या संगतीला गुणवान माणूस राहिला तर त्याला अवगुण ताबडतोप ध्यानांत येतात. जो विवेकी बनतो त्याच्या हातून विवेकी पुरुषासारखेंच वर्तन घडतें.  
उपाये परियाये दीर्घ प्रेत्न । विवेकबळें नाना येत्न ।
करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥
३९) लोकसंग्रह करण्याचे उपाय, त्याचे पर्याय, दीर्घ प्रयत्न, विवेकाच्या बळावर अनेक प्रकारचे यत्न करणें, जो जाणतो त्याचा मोठेपणा सामान्यांना कळणें कठीण असतें., त्याचा तोच जाणतो.  
दुर्जनीं वेवदरुन घेतला । बाश्कळ लोकीं घसरिला ।
विवेकापासून चेवला । विवेकी कैसा ॥ ४० ॥
४०) ज्याच्या भोवती दुर्जन आहेत, जो स्वैर लोकांच्या नादीं लागून घसरला आहे, जो विवेकापासून भ्रष्ट झाला आहे. अशा माणसाला विवेकी म्हणता येणार नाहीं.
न्याये परियाये उपाये । मूर्खास हें कळे काये ।
मूर्खाकरितां चिवडा होये । मज्यालसीचा ॥ ४१ ॥ 
४१) न्याय म्हणजे काय, उपाय व पर्याय म्हणजे काय, या गोष्टी मूर्खास कळत नाहेंत. मूर्ख माणसामुळें सभेचा विचका होतो. 
मग ते शाहाणे नीट करिती । स्वयें साहोन साहविती ।
स्वयें करुन करविती । लोकांकरवीं ॥ ४२ ॥
४२) सभेमधें गोंधळ झाल्यावर शाहाणे तो नीट करतात. स्वतः सोसून ते इतरांना सहन करायला शिकवतात.. त्याचप्रमाणें तें स्वतः करतात व इतरांकडून करवून घेतात. 
पृथ्वीमधें उदंड जन । जनामधें असती सज्जन ।
जयांकरितां समाधान । प्राणीमात्रासी ॥ ४३ ॥
४३) जगांत पुष्कळ माणसें आहेत. त्यापैकी कांहीं सज्जन असतात. त्या सज्जनांकडून लोकांना समाधान मिळतें. 
तो मनोगतांचीं आंगें जाणे । मान प्रसंग समये जाणे ।
संतप्तालागीं निवऊं जाणे । नाना प्रकारें ॥ ४४ ॥
४४) सज्जन म्हणजे संत. संताला लोकांचें अंतःकरण बरोबर कळतें. मान, प्रसंग, काळवेळ त्याला बरोबर समजतात. भडकलेल्या लोकांना शांत कसें करायचे याचे अनेक प्रकार त्यांना माहीत असतात.  
ऐसा तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक ।
त्याचें करणें कांहीं येक । जनास कळेना ॥ ४५ ॥ 
४५) असा जो ज्ञानी पुरुष असतो त्याचा विवेक फारच सामर्थ्यसमपन्न असतो.  त्याचेम कार्य करणें लोकांना आकलन होत नाहीं. 
बहुत जनास चालवी । नाना मंडळें हालवी ।
ऐसी हे समर्थपदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥
४६) तो अनेक लोकांना मार्गदर्शन करतो. अनेक लोकसंग्रह कार्यरत करतो. अशा विवेकपूर्ण वागण्यानें समर्थ ही पदवी प्राप्त होते. 
विवेक एकांतीं करावा । जगदीश धारणेनें धरावा ।
लोक आपला आणी परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥
४७) एकांतामधें विवेक करावा.भगवंताला मनांत धारणेच्या जोरावर धरुन ठेवावा. हा आपला आणि हा परका असा लोकांमधें भेद करुं नये. 
येकांतीं विवेक ठाईं पडे । येकांतीं येत्न सांपडे ।
येकांतीं तर्क वावडे । ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥ 
४८) एकांतांत विवेक बरोबर चालतो. एकांतांत यत्न कोणता करावा तें समजतें. एकांतांमधें आपली बुद्धी संपूर्ण ब्रह्मांड फिरुन येते.  
येकांतीं समरण करावें । चुकलें निधान पडे ठावें ।
अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥
४९) एकांतांत बसून स्मरण करावें. म्हणजे आपल्या हातून झालेल्या चुका आपल्या ध्यानांत येतात. एकांतामधे आपण अमतरात्म्यायेवढें होऊन फिरावें. आपण त्याच्यासारखें व्यापक व्हावें आणि जगदांतरी फिरावें.  
जयास येकांत मानला । अवघ्या आधीं कळे त्याला ।
त्यावेगळें वडिलपणाला । ठावचि नाहीं ॥ ५० ॥
५०) ज्या माणसाला एकांत आवडला त्याला सर्वांच्या अगोदर ज्ञान होतें. ज्याला मोठेपणा मिळवायचा असेल त्याला एकांतसेवनाखेरीज मार्ग नाहीं. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रोताअवलक्षणनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Shrota AwaLakshan Nirupan
समास दहावा श्रोताअवलक्षण निरुपण 


Custom Search

No comments: