Friday, June 1, 2018

Samas Navava TanuChatushtaya Nirupan समास नववा तनुचतुष्टय निरुपण


Dashak Satarava Samas Navava TanuChatushtaya Nirupan 
Samas Navava TanuChatushtaya Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Tanu Chatushtaya.
समास नववा तनुचतुष्टय निरुपण 
श्रीराम ॥
स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । ऐसे हे चत्वार देह जाण ।
जागृति स्वप्न सुषुप्ति पूर्ण । तुर्या जाणावी ॥ १ ॥
१) स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण असे चार देह आहेत. जागृति,स्वप्न, सुषुप्ति आणि तुर्या या चार अवस्था आहेत.     
विश्व तैजस प्राज्ञ । प्रत्यगात्मा हे अभिमान ।
नेत्रस्थान कंठस्थान हृदयस्थान । मूर्धनी ते ॥ २ ॥
२) विश्व, तेजस, प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे चार देहाचे चार अभिमान आहेत. जागेपणीं  " हा देह मी आहे " असा अभिमान असणारा तो विश्व होय. स्वप्न पडत असतांना वावरणारा " मी " तो तैजस होय. गाढ झोपेंत शांत असणरा " मी " तो प्राज्ञ होय. आणि तुरीय अवस्थेमध्यें जो साक्षीरुप अंतरात्मा असतो     , तो प्रत्यगात्मा होय. विश्र्वाचे स्थान नेत्र, तैजसाचे स्थान कंठ, प्राज्ञाचें स्थान हृदय आणि प्रत्यगात्म्याचे स्थान टाळू होय. 
स्थूळभोग प्रविक्तभोग । आनंदभोग आनंदावभासभोग ।
ऐसे हे चत्वार भोग । चौदेहाचे ॥ ३ ॥  
३) स्थूलभोग स्थूलदेहाचा, प्रविक्र भोग सूक्ष्म देहाचा, अनंदभोग कारण देहाचा आणि आनंदावभासभोग महाकारण देहाचा होय. प्रतिविविक्त म्हणजे निवडून वेगळा केलेला असा. स्वप्नामध्यें भोग असतो पण तो सामान्य स्थू;भोग नसतो. ज्ञात्यानें किंवा भोक्त्यानें एक प्रकारें निवडलेला भोग असतो. म्हणून तो प्रविविक्त भोग होय. सुषुप्तीच्या पलीकडे पण परब्रह्माच्या अलीकडे आनंदमय कोशामध्यें जो आनंदाचा भोग होतो तो महाकारण देहाचा आनंदावभासभोग होय.   
अकार उकार मकार । अर्धमात्रा तो ईश्र्वर ।
ऐस्या मात्रा चत्वार । चौदेहाच्या ॥ ४ ॥
४) अकार स्थूल देहाची मात्रा, उकार सूक्ष्म देहची मात्रा, मकार कारण देहाची मात्रा आणि जिला ईश्र्वर म्हणतात ती महाकारण देहाची अर्धमात्रा होय. ओंकारांतून सर्व विश्र्व निर्माण झालें असा सिद्धान्त आहे. ओंकारावरील जी अर्धमात्रा ती बिंदूनें दर्शवितात. अकार म्हणजेम जड पंचभूतें,  उकार म्हणजे जीवनकला,  मकार म्हणजे अंतःकरण आणि अर्ध मात्रा म्हणजे अंतरात्मा होय. 
तमोगुण रजोगुण । सत्वगुण शुद्धसत्वगुण ।
ऐसे हे चत्वार गुण । चौदेहाचे ॥ ५ ॥
५) तमोगुण स्थूलदेहाचा, रजोगुण सूक्ष्मदेहाचा, सत्त्वगुण कारणदेहाचा आणि शुद्धसत्त्वगुण महाकारण देहाचा होय.
क्रियाशक्ति द्रव्यशक्ती । इच्छाशक्ति ज्ञानशक्ती । 
ऐशा चत्वार शक्ती । चौदेहाच्या ॥ ६ ॥
६) क्रियाशक्ति म्हणजे कर्म करण्याची शक्ति, द्रव्यशक्ति म्हणजे दृश्य पदार्थांतील सुप्तशक्ति होय. इच्छाशक्ति म्हणजे माणसाच्या वासनांना ताजेपणा ठेवावयास लागणारी अविद्या होय. ज्ञानशक्ति म्हणजे '" मी आत्मस्वरुप आहे " या अनुभवांतून निर्माण होणारे सामर्थ्य होय.
ऐसीं हे बत्तिस तत्वें । दोहींचीं पन्नास तत्वें ।
अवघीं मिळोन ब्यासि तत्वें । अज्ञान आणि ज्ञान ॥ ७ ॥
७) अशी ही बत्तीस तत्वें आहेत. त्यांच्यामध्यें पूर्वींची स्थूलदेहाची पंचवीस व सूक्ष्मदेहाची पंचवीस मिळून पन्नास तत्वें मिसळलीं कीं, ब्याऐशीं तत्वें होतात. शिवाय ज्ञान आणि अज्ञान हीं दोन्ही आणखीं घालायची. अशी एकंदर चौर्‍यांशीं तत्वें होतात.  
ऐसीं हे तत्वें जाणावी । जाणोन माइक वोळखावीं ।
आपण साक्षी निरसावीं । येणें रीतीं ॥ ८ ॥
८) तत्त्वें अशी आहेत तें ओळखावें. तीं सारी मायिक आहेत हें जाणावें. आपण साक्षीपणानें राहून त्यांचे निरसन करावें. 
साक्षी म्हणिजे ज्ञान । ज्ञानें वोळखावें अज्ञान ।
ज्ञाानाज्ञानाचें निर्शन । देहासरिसें ॥ ९ ॥
९) साक्षीपणा म्हणजे ज्ञान होय. त्या ज्ञानानें अज्ञान ओळखावें. देहाचा निरास झाला म्हणजे ज्ञान व अज्ञान दोन्हींचा निरास होतो. 
ब्रह्मांडीं देह कल्पिले । विराट हिरण्यगर्भ बोलिले । 
ते हे विवेकें निर्शले । आत्मज्ञानें ॥ १० ॥
१०) पिंडाच्या देहावरुन ब्रह्मांडाच्या देहाची कल्पना केलेली आहे. त्यांना विराट व हिरण्यगर्भ अशीं नांवें आहेत. आत्मज्ञानानें विवेक केला म्हणजे त्यांचेही निरसन होऊन जाते.   
आत्मानात्मविवे करितां । सारासारविचार पाहातां ।
पंचभूतांची माइक वार्ता । प्रचित आली ॥ ११ ॥
११) आत्मानात्मविवेक केला असतां आणि सारासार विचार करुन पाहिलें असतां, पंचभूतें मायिक आहेत अशी प्रचिती येते. 
अस्ति मांष त्वचा नाडी रोम । हे पांचहि पृथ्वीचे गुणधर्म ।
प्रत्यक्ष शरीरीं हें वर्म । शोधून पाहावें ॥ १२ ॥
१२) हाडें, मांस, त्वाचा, नाडी व रोम हे पांचही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. आपण स्वतःच्या शरीरामध्यें हें वर्म प्रत्यक्ष शोधून पाहावें. 
शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । हे आपाचे पंचभेद । 
तत्वें समजोन विशद । करुन घ्यावीं ॥ १३ ॥
१३) रेत, रक्त, लाळ, मूत्र, व घाम हें पाण्याचें पंचक आहे. ही तत्त्वें समजून स्पष्ट कल्पना करुन घ्यावी.
क्षुधा त्रुषा आलस्य निद्रा मैथुन । हे पांचहि तेजाचे गुण ।
या तत्वांचें निरुपण । केलेंचि करावें ॥ १४ ॥
१४) भूक, तहान, आळस, निद्रा व मैथुन हे पांच तेजाचे गुण आहेत. या तत्त्वांचे विवेचन पुनः पुनः करावें.    
चळण वळण प्रासारण । निरोध आणि आकोचन ।
हे पांचहि वायोचे गुण । श्रोतीं जाणावे ॥ १५ ॥
१५) चळण, वळण, प्रसारण, निरोध आणि आकुंचन हें पांच गुण वायूचे आहेत. हे श्रोत्यांनी ओळखावें.   
काम क्रोध शोक मोहो भये । हा आकाशाचा परियाये ।
हें विवरल्याविण काये । समजों जाणें ॥ १६ ॥
१६) काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हे आकाशाशी संबंधित आहेत. याचें विवरण केल्यांवांचून ते समजणार नाहींत.
असो ऐसें हें स्थूळ शरीर । पंचविस तत्वांचा विस्तार ।
आतां सूक्ष्मदेहाचा विचार । बोलिजेल ॥ १७ ॥
१७) असो. असें हें स्थूल शरीर आहे. त्यामध्यें पंचवीस तत्त्वांचा विस्तार आढळतो. आतां सूक्ष्म देहाचा विस्तार सांगतो.  
अंतःकर्ण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाशपंचकाचा विचार ।
पुढें वायो निरोत्तर । होऊन ऐका ॥ १८ ॥
१८) अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार हेआकाशपंचक आहे. आतां वायूचा विचार सांगतो.  
व्यान समान उदान । प्राण आणी अपान ।
ऐसे हे पांचहि गुण । वायोतत्वाचे ॥ १९ ॥
१९) व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण हे पांच वायूचे गुण आहेत.  
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हें पांचहि तेजाचे गुण ।
आतां आप सावधान । होऊन ऐका ॥ २० ॥   
२०) कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक हे तेजाचे गुण आहेत. आतां आपगुण ऐका.    
वाचा पाणी पाद शिस्न गुद । हे आपाचे गुण प्रसिद्ध ।
आतां पृथ्वी विशद । निरोपिली ॥ २१ ॥
२१) वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद हे पाण्याचे प्रसिद्ध गुण आहेत. आतां पृथ्वीचे गुण ऐका. 
शब्द स्पर्श रुप रस गंध । हे पृथ्वीचे गुण विशद ।
ऐसे हे पंचवीस तत्वभेद । सूक्ष्म देहाचे ॥ २२ ॥
२२) शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध हे पृथ्वीचे प्रसिद्ध गुण आहेत. अशीं हीं सूक्ष्मदेहाची पंचवीस तत्त्वें आहेत.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तनुचतुष्टयेनाम समास नववा ॥
Samas Navava TanuChatushtaya Nirupan
समास नववा तनुचतुष्टय निरुपण 


Custom Search

No comments: