Saturday, May 5, 2018

Samas Choutha Aap Nirupan समास चौथा आपनिरुपण


Dashak Solava Samas Choutha Aap Nirupan 
Samas Choutha Aap Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Aap. Aapi stuti i.e. praise of Aap is done in this samas. Every animal and every living is dependent on Aap i.e. water.
समास चौथा आपनिरुपण
श्रीराम ॥
आतां सकळांचें जन्मस्थान । सकळ जीवांचें जीवन ।
जयास आपोनारायेण । ऐसें बोलिजे ॥ १ ॥
१) पाणी सकळ जीवांचे जन्मस्थान आहे. सर्व जीवांचे जगणें त्यावर अवलंबून असते. पाण्यास आपोनारायण असें म्हणतात.
पृथ्वीस आधार आवर्णोदक । सप्तसिंधूचें सिंधोदक ।
नाना मेधीचें मेधोदक । भूमंडळीं चालिलें ॥ २ ॥ 
२) पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे. पृथ्वीवर सात समुद्रांचे पाणी आहे. तसेंच पावसाचें पाणी वाहात असते.  
नाना नद्या नाना देसीं । वाहात मिळाल्या सागरासी ।
लाहानथोर पुण्यरासी । अगाध महिमे ॥ ३ ॥
३) निरनिराळ्या देशांतील नद्या वाहात वाहात अखेर समुद्राला जाऊन मिळतात. नद्या कमी जास्त पुण्याच्या समजाव्यात. कांहीं नद्यांचा महिमा अगाध आहे. 
नद्या पर्वतींहून कोंसळल्या । नाना सांकडीमधें रिचवल्या ।
धबाबां खळाळां चालिल्या । असंभाव्य ॥ ४ ॥
४) नद्या पर्वतावरुन कोसळतात. दर्‍या, कपारी व खळगें यांच्यामधें त्या अडतात. आणि धबधब्यानें व खळखळाटानें वाहातात. 
कूप बावी सरोवरें । उदंड तळीं थोरथोरें ।
निर्मळें उचंबळती नीरें । नाना देसीं ॥ ५ ॥  
५) आड, विहिरी, सरोवरें, अतिशय प्रचंड जलाशयें असतात. त्याचें स्वच्छ पाणी निरनिराळ्या देशांत उचंबळत असतें.
गायेमुखें पाट जाती । नाना कालवे वाहाती ।
नाना झर्‍या झिरपती । झरती नीरें ॥ ६ ॥
६) गायमुखें, पाट, कालवे, अशा अनेक प्रकारांनी पाणी वाहात असते. अनेक ठिकाणीं झरींतून पाणी झिरपते. झरें झिरपत असतात.  
डुरें विहिरे पाझर । पर्वत फुटोन वाहे नीर ।
ऐसे उदकाचे प्रकार । भूमंडळीं ॥ ७ ॥
७) पर्वत फुटुन पाण्याचे लहान जलसंचय तयार होतात. पाणदुरे पाझर वाहात राहातात. पृथ्वीवर पाण्याचे असें अनेक प्रकार आढळतात. 
जितुकें गिरी तितुक्या धारा । कोंसळती भयंकरा ।
पाभळ वाहाळा अपारा । उकळ्या सांडिती ॥ ८ ॥
८) जितके डोंगर आहेत तितक्यावरुन प्रचंड पाण्याच्या धारा वाहातात. झरे व ओढे तर वाहात असतात. जमिनींतून कारंजासारखे उडणारे पाणीही सारखें उडत असते.   
भूमंडळीचें जळ आघवें । किती म्हणोनी सांगावें ।
नाना कारंजीं आणावें । बांधोनी पाणी ॥ ९ ॥
९) पृथ्वीवर आढळणार्‍या सार्‍या पाण्याचे वर्णन करणें शक्य नाहीं. नळ टाकून कारंजांत पाणी आणून सोडतात.   
डोहो डबंकें खबाडीं टाकीं  । नाना गिरिकंदरीं अनेकीं ।
नाना जळें नाना लोकीं । वेगळालीं ॥ १० ॥
१०) डोह, डबकीं, लहान टाकी, मोठी टाकीं, असे लहानमोठे जलाशय डोंगरामध्यें आढळतात. निरनिराळ्या देशांत पाणी निरनिराळें असते.  
तीर्थें येकाहून येक । माहां पवित्र  पुण्यदायक ।
अगाध महिमा शास्त्रकारक । बोलोनि गेले ॥ ११ ॥
११) अतिशय पवित्र, आणि पुण्यदायक अशीं एकापेक्षां एक श्रेष्ठ तीर्थें आहेत. शास्त्रकारांनी त्यांचा फार मोठा महिमा वर्णन केला आहे.  
नाना तीर्थांचीं पुण्योदकें । नाना स्थळोस्थळीं सीतळोदकें ।
तैसींच नाना उष्णोदकें । ठाईं ठाईं ॥ १२ ॥
१२) अनेक तीर्थांचे पाणी पुण्यदायक आहे. अनेक ठिकाणीं पाणी फार थंड आहे. तर अनेक ठिकाणीं पाणी फार गरम आहे.    
नाना वल्लीमधे जीवन । नाना फळीं फुलीं जीवन ।
नाना कंदीं मुळीं जीवन । गुणकारकें ॥ १३ ॥
१३) सर्व प्रकारच्या वेलींमध्यें, फळामध्यें व फुलांमध्यें पाणी असतेच. कांहीं कंदमुळांतींल पाणी गुणकारक असते. 
क्षारोदकें सिंधोदकें । विषोदकें पियूषोदकें ।
नाना स्थळांतरीं उदकें । नाना गुणाचीं ॥ १४ ॥
१४) खारें, गोडें, विषारी, अमृतासारखें मधुर अशा प्रकारचे गुण असणारे पाण्याचे प्रकार निरनिराळ्या जागीं आढळतात. 
नाना युक्षदंडाचे रस । नाना फळांचे नाना रस ।
नाना प्रकारीचे गोरस । मद पारा गुळत्र ॥ १५ ॥
१५) अनेक प्रकारचे उसाचे रस, निरनिराळ्या फळांचे रस, अनेक प्रकारचे गोरस, मादक रस, पारद रस, राब, काकवी व गुळपाणी हे गुळाचे तीन रस, असे पुष्कळ प्रकारचे रस आहेत.  
नाना मुक्तफळांचें पाणी । नाना रत्नीं तळपे पाणी ।
नाना शस्त्रामधें पाणी । नाना गुणाचें ॥ १६ ॥
१६) निरनिराळ्या मोत्यांत पाणी असते. निरनिराळ्या रत्नांचे पाणी झळकते. निरनिराळ्या हत्यारांना निरनिराळ्या गुणांचे पाणी असते. 
शुक्लीत श्रोणीत लाळ मूत्र स्वेद । नाना उदकाचे नाना भेद ।
विवरोन पाहातां विशद । होत जातें ॥ १७ ॥
१७) रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम हे सगळे पण्याचेच प्रकार आहेत. त्यांच्यावर विचार केला कीं तें ध्यानांत येते.   
उदकाचे देह केवळ । उदकाचेंचि भूमंडळ ।
चंद्रमंडळ सूर्यमंडळ । उदकाकरितां ॥ १८ ॥
१८) देह पाण्यापासून बनतात. पृथ्वी पाण्यापासूनच झाली आहे. चंद्रमंडळ व  सूर्यमंडळ सूर्यापासूनच झाली आहेत. 
क्षारसिंधु क्षीरसिंधु । सुरासिंधु आज्यसिंधु ।
दधिसिंधु युक्षरससिंधु । शुद्ध सिंधु उदकाचा ॥ १९ ॥
१९) खारा समुद्र, दुधाचा समुद्र, दारुचा समुद्र, तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र, शुद्ध गोड पाण्याचा समुद्र,
ऐसें उदक विस्तारलें । मुळापासून सेवटा आलें ।
मधेंहि ठाईं ठाईं उमटलें । ठाईं ठाईं गुप्त ॥ २० ॥
२०) अशा रीतीनें पाणी जिकडे तिकडे पसरलेले आहे. मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी जाते, मधें जागोजागी तें प्रगट होते. तसेंच जागोजागीं तें गुप्त राहाते. 
जे जे बीजीं मिश्रित जालें । तो तो स्वाद घेऊन उठिलें ।
उसानधें गोडीस आलें । परम सुंदर ॥ २१ ॥
२१) ज्या प्रकारच्या बीजाशी पाण्याचें मिश्रण होते, त्या बीजाचा स्वाद पाण्यांत उतरतो. उसामध्यें पाण्याला सुदंर माधुर्य येते. 
उदकाचें बांधा हें शरीर । उदक चि पाहिजे तदनंतर ।
उदकचि उत्पत्तिविस्तार । किती म्हणोनी सांगावा ॥ २२ ॥
२२) आपले शरीर पाण्यापासूनच बांधलें जाते. मग बांधल्यानंतरही त्याला पाणी लागतेच. पाण्यापासून किती गोष्टी उत्पन्न होतात  याचा सर्व विस्तार सांगणें शक्य नाहीं. 
उदक तारक उदक मारक । उदक नाना सौख्यदायेक ।
पाहातां उदकाचा विवेक । अलोलीक आहे ॥ २३ ॥
२३) पाणी जसें तारक आहे तसेंच मारकही आहे. पाणी माणसाला अनेक प्रकारचे सुख देते. विचार केला तर पाणी मोठे अलौकिक आहे असें दिसेल.  
भूमंडळीं धांवे नीर । नाना ध्वनी त्या सुंदर ।
धबाबां धबांबा थोर । रिचवतीधारा ॥ २४ ॥
२४) जमीनीवर जें पाणी वाहाते त्याचा आवाज मोठा सुंदर असतो. पाण्याच्या धारांचा धबाबा धबाबा असा आवाज मनाला मोठा आनंद देतो.
ठाईं ठाईं डोहो तुंबती । विशाळ तळीं डबाबिती ।
चबाबिती थबाबिती । कालवे पाट ॥ २५ ॥
२५) ठिकठिकाणीं डोह तुंबतात. प्रचंड जलाशय पाण्यानें तुडुंब भरलेले असतात. कालवे व पाण्याचे पाट पाण्यानें थबतहबलेले व चबचबलेले असतात. 
येकीं पालथ्या गंगा वाहाती । उदकें सन्निधचि असती ।
खळाळां झरे वाहाती । भूमीचे पोटीं ॥ २६ ॥
२६) कांहीं ठिकाणीं पालथ्या गंगा वाहतात. त्यांचे पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असते. कित्येक ठिकाणीं जमिनीच्या पोटांत झरे खळाळत वाहात असतात.
भूमीगर्भी डोहो भरले । कोण्ही देखिले ना ऐकिले ।
ठाईं ठाईं झोवीरे जाले । विदुल्यतांचे ॥ २७ ॥
२७) कोणी कधी पाहिलेले नाही व ऐकलेले नाहींत असे पाण्याचे डोह पृथ्वीच्या पोटांत भरलेले आहेत. कांहीं ठिकाणीं वीज पडून मोठा खड्डा पडतो. व त्यांतून वाहणारे झरे आढळतात.    
पृथ्वीतळीं पाणी भरलें । पृथ्वीमधें पाणी खेळे ।
पृथ्वीवरी प्रगटलें । उदंड पाणी ॥ २८ ॥
२८) अशा रीतीनें पृथ्वीच्या खाली पाणी भरलेले आहे. पृथ्वीच्या पोटांत पाणी खेळते. आणि पृथ्वीतलावर देखील पाणी सपाटून भरले आहे.  
स्वर्गमृत्यपाताळीं । येक नदी तीन ताळीं ।
मेघोदक अंतराळीं । वृष्टी करी ॥ २९ ॥
२९) स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ या तिन्ही लोकांत एकच गंगा नदी वाहते. तसेंच आकाशांतून मेघ वृष्टी करतात. 
पृथ्वीचे मूळ जीवन । जीवनाचें मूळ दहन ।
दहनाचें मूळ पवन । थोराहून थोर ॥ ३० ॥
३०) पृथ्वीचे मूळ आहे पाणी. पाण्याचे मूळ आहे अग्नि. अग्नीचें मूळ आहे वायु. हा वायु थोराहून थोर आहे. 
त्याहून थोर परमेश्र्वर । महद्भूतांचा विचार ।
त्याहून थोर परात्पर । परब्रह्म जाणावें ॥ ३१ ॥
३१) वायुहून थोर आहे परमेश्र्वर म्हणजे अंतरात्मा. अंतरात्मा म्हणजे सर्व भूतांमधील श्रेष्ठ भूत होय. परब्रह्म हें त्याहून थोर व श्रेष्ठांमधील श्रेष्ठ जाणावें.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे आपनिरुपणनाम समास चौथा ॥  
Samas Choutha Aap Nirupan 
समास चौथा आपनिरुपण


Custom Search

No comments: