Tuesday, May 29, 2018

Samas Sahava Dehatma Nirupan समास सहावा देहात्म निरुपण


Dashak Satarava Samas Sahava Dehatma Nirupan 
Samas Sahava Dehatma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Deha (body) and Aatma. Body and Aatma both are related to each other.
समास सहावा देहात्म निरुपण
श्रीराम ॥
आत्मा देहामध्यें असतो । नाना सुखदुःखें भोगितो ।
सेवटीं शरीर सांडून जातो । येकायेकीं ॥ १ ॥
१) आत्मा देहांत राहतो आणि अनेक प्रकारची सुखदुःखें भोगतो. अखेर तो एकाएकी देह सोडून जातो.     
शरीरीं शक्ति तारुण्यपणीं । नाना सुखें भोगी प्राणी ।
अशक्त होतां वृद्धपणीं । दुःखें भोगी ॥ २ ॥
२) तरुणपणीं शरीरांत शक्ति असते त्या जोरावर माणूस अनेक सुखें भोगतो. म्हातारपणीं शक्ति क्षीण होते व मग अनेक दुःखें भोगावी लागतात. 
मरावेना ऐसी आवडी । हातपाये खोडून प्राण सोडी ।
नाना दुःखें अवघडी । वृद्धपणीं ॥ ३ ॥
३) आपण मरुं नये असें प्रत्येकास मनापासून वाटतें. पण मृत्यु आला कीं, माणूस हातपाय झाडून प्राण सोदतो. म्हातारपणीं अनेक प्रकारच्या दुःखांनीं माणूस अवघडून जातो. 
देहआत्मयांची संगती । कांहींयेक सुख भोगिती ।
चर्फडचर्फडून जाती । देहांतकाळीं ॥ ४ ॥
४) देह व आत्मा यांची संगत झाली म्हणजे कांहीं सुखें भोगायला मिळतात. हें खरें, पण देह सुटायच्यावेळीं जीव अगदी धडपडून मरतो.  
ऐसा आत्मा दुःखदायेक । येकांचे प्राण घेती येक ।
आणी सेवटीं निरार्थक । कांहींच नाहीं ॥ ५ ॥
५) देहात्मयोग अशारीतीनें दुःख देणारा होतो. जगांत स्वार्थानें माणसें एकमेकांचा प्राण घेतात. पण शेवटीं हें सगळें व्यर्थ जातें. त्याचा कांहीं उपयोग होत नाहीं. 
ऐसा दों दिसांचा भ्रम । त्यास म्हणती परब्रह्म ।
नाना दुःखाचा संभ्रम । मानून घेतला ॥ ६ ॥
६) असा हा दोन दिवसांचा दृश्याचा भ्रम आहे. त्यालाच परब्रह्म समजून, सर्वस्व मानून लोक जगतात. या दुःखाच्या पसार्‍याला लोक गोड मानून घेतात. 
दुःखी होऊन चर्फडून गेले । तेथें कोण समाधान जालें ।
कांहींयेक सुख भोगिलें । तों सवेंचि दुःख ॥ ७ ॥
७) दुःख भोगावें लागल्यानें चरफडत जाण्याची पाळी आली तर त्यांत कांहींही समाधान मिळत नाहीं. थोडें कांहीं सुख भोगायला जावें तर त्याच्याबरोबर दुःख भोगावें लागतें. 
जन्मदारभ्य आठवावें । म्हणिजे अवघें पडेल ठावें ।
नाना दुःख मोजावें । काये म्हणोनी ॥ ८ ॥
८) जन्मल्यापासूनचें आपलें जीवन आपण आठवावें, म्हणजे सगळें आपोआप ध्यानांत येईल. आपण इतकीं दुःखें भोगलेलीं असतात कीम त्यांची मोजदाद करतां येणार नाहीं.  
ऐसी आत्मयांची संगती । नाना दुःखें प्राप्त होती ।
दैन्यवाणे होऊन जाती । प्राणीमात्र ॥ ९ ॥
९) देहाशीं आत्म्याची संगत ही अशी आहे. देहात्मयोगानें जीवाला अनेक दुःखें भोगावीं लागतात. आयुष्याच्या शेवटीं सारे प्राणी दीनवाणें होऊन मरतात.   
कांहीं आनंद कांहीं खेद । जन्मवरी पडिला समंध ।
नाना प्रकारीं विरुद्ध । तडातोडी ॥ १० ॥
१०) कांहीं सुख व कांहीं दुःख, असा हा जन्माचा संबंध असतो. त्यामध्यें नाना प्रकारच्या मनाविरुद्ध गोष्टी घडतात, तसेंच अनेकांची ताटातूट होते.   
निद्राकाळीं ढेकूण पिसा । नाना प्रकारीं वळसा ।
नाना उपायें वळसा । त्यांस होये ॥ ११ ॥
११) झोपेच्या वेळीं ढेकूण आणि पिसवा अनेक प्रकारें माणसाला त्रास देतात. माणूस त्यांचा प्रतिकार करतो. तेव्हां त्यांनाहीं अनेक प्रकारें त्रास होतो. 
भोजनकाळीं माश्या येती । नाना पदार्थ उंदीर नेती ।
पुढें त्यांची हि फजिती । मार्जारें करिती ॥ १२ ॥
१२) जेवायला बसलें कीं माश्या येऊन त्रास देतात. उंदीर कितीतरी पदार्थ घेऊन जातात. नंतर मांजरें त्यांची फजिती करतात. त्यांना त्रास देतात. 
वा चामवा गोंचिड । गांधेलें कानटें उदंड ।
येकास येक चर्फड । दोहिकडे ॥ १३ ॥
१३) उवा, चामवा, कातड्यांत शिरणारे किडे, गोचीड, गांधील माश्या, कानटे नावाचे सर्प, असे नाना प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यांत एकमेकाविषयीं वैर असतें. त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागतें. 
विंचु सर्प वाग रिसें । सुसरी लांडिगे माणसास माणसें ।
परस्परें सुखसंतोषें । येकहि नाहीं ॥ १४ ॥
१४) विंचू, साप, वाघ, अस्वल, सुसरी, लांडगे आणि माणसाला माणसें या सर्व प्राण्यांमध्यें परस्परांबद्दल प्रेम, सुख व संतोष कोठेंहि आढळत नाहीं.
चौर्‍यासि लक्ष उत्पत्ती । येकास येक भक्षिती ।
नाना पीडा दुःखणी किती । म्हणौन सांगावें ॥ १५ ॥
१५) जगांत येवढे चौर्‍यांशी लक्ष प्राणी आहेत, पण ते एकमेकांना खातात. जगांत पीडांचे व दुःखांचे इतके प्रकार आहेत कीं, त्या सर्वांचे वर्णन करणें अशक्य आहे.   
ऐसी अंतरात्म्याची करणी । नाना जीव दाटले धरणी ।
परस्परें संव्हारणी । येकायेकांची ॥ १६ ॥
१६) त्या अंतरात्म्याची करणी अशी विलक्षण आहे. या पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव गर्दी करुन आहेत. ते परस्परांचा संहार करतात. 
अखंड रडती चर्फडिती । विवळोंविवळ प्राण देती ।
मूर्ख प्राणी त्यास म्हणती । परब्रह्म ॥ १७ ॥
१७) जीवनामध्यें माणूस दुःखानें सारखा रडतो., चरफडतो, दुःखानेम विव्हळून प्राण देतो. अशा या दुःखमय जीवात्म्याला लोक परब्रह्म मानतात.
परब्रह्म जाणार नाहीं । कोणास दुःख देणार नाहीं ।
स्तुति निंदा दोनी नाहीं । परब्रह्मीं ॥ १८ ॥
१८) परब्रह्म शाश्वत असल्यानें तें कधीं जात नाहीं. तें कोणास दुःख देणार नाहीं. त्याच्या ठिकाणीं निंदा व स्तुति दोन्ही स्पर्श करुं शकत नाहीं.
उदंड शिव्या दिधल्या । तितुक्या अंतरात्म्यास लागल्या ।
विचार पाहातां प्रत्यया आल्या । येथातथ्य ॥ १९ ॥
१९) एखाद्यानें खूप शिव्या दिल्या तर त्या सगळ्या अंतरात्म्यास लागतात. विचार करुन पाहिलें तर हा अगदी असाच अनुभव येतो. 
धगडीचा बटकीचा लवंडीचा । गधडीचा कुतरीचा वोंगळीचा ।
ऐसा हिशेब सिव्यांचा । किती म्हणोनि सांगावा ॥ २० ॥
२०) धगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गधडीचा, कुतरीचा, चांडाळणीचा अशा कितीतरी शिव्या आहेत. त्या सर्व सांगता येणार नाहींत. 
इतुकें परब्रह्मीं लागेना । तेथें कल्पनाचि चालेना ।
तडातोडीचें ज्ञान मानेना । कोणीयेकासी ॥ २१ ॥
२१) पण यापैकीं कांहींसुद्धा परब्रह्मास स्पर्श करुं शकत नाहीं. परब्रह्माच्या ठिकाणीं मानवी कल्पना चालूंच शकत नाहीं. असंबद्ध ज्ञान कोणासही मान्य होणार नाहीं.  
सृष्टीमधें सकळ जीव । सकळांस कैचे वैभव ।
याकारणें ठायाठाव । निरमिला देवें ॥ २२ ॥   
२२) सगळे प्राणी या पृथ्वीवर जगतात. पण ते सगळें कांहीं वैभव भोगित नाहीत. सगळ्यांना वैभव भोगावयास मिळत नाहीं याचा अर्थ असा कीं, भगवंतानें प्रत्येकाचें स्थान ठरवून त्यास निर्माण केलें आहे.                 
उदंड लोक बाजारीचे । जें जें आलें तें तें वेंचे ।
उत्तम तितुके भाग्याचे । लोक घेती ॥ २३ ॥
२३) बाजार भरला म्हणजे पुष्कळ लोक बाजारांत येतात. त्यापैंकी बहुतेक माणसें अशीं असतात कीं, जो कांहीं माल विकायला आला असेल तो ते विकत घेतात. परंतु त्यांच्यापैकीं जे भाग्यवान असतात तेच तेवढें उत्तम वस्तु घेऊन जातात. त्याचप्रमाणें या संसाराच्या बाजारांत बहुजनसमाज प्रपंचाच्या मागें धांवतो. थोडीं पुण्यवान माणसें भगवंताच्या नादी लागून भगवंताची प्राप्ती करुन घेतात.  
येणेंचि न्यायें अन्न वसन । येणेंचि न्यायें देवार्चन ।
येणेंचि न्यायें ब्रह्मज्ञान । प्राप्तव्यासारिखें ॥ २४ ॥
२४) अन्नवस्त्र, देवपूजा आणि ब्रह्मज्ञान यांच्या बाबतींत हाच न्याय लागूं पडतो. माणसाचें अन्नवस्त्र, त्याच्या हातून घडणारें देवतार्चन आणि त्यास प्राप्त होणारे ब्रह्मज्ञान या तिन्ही गोष्टी नियतीवर अवलंबून असतात.  
अवघेच लोक सुखी असती । संसार गोड करुन नेती ।
माहाराजे वैभव भोगती । तें करंट्यास कैचें ॥ २५ ॥
२५) जगांत सगळेच लोक सुखी असतात. आपला संसार जसा असेल तसा तें गोड करुन घेतात. परंतु महाराजे जें वैभव भोगतात तें कांहीं करंट्यांच्या वाट्यास येत नाहीं. 
परंतु अंती नाना दुःखें । तेथें होतें सगट सारिखें ।
पूर्वी भोगिलीं नाना सुखें । अंतीं दुःख सोसवेना ॥ २६ ॥
२६) माणसाला शेवटीं अनेक प्रकारची दुःखें भोगावी लागतात. सर्व माणसांना ती सारख्याच स्वरुपांत भोगावी लागतात. अयुष्यांत आधी सुखें भोगलेलीं असल्यामुळें अंतकाळीं होणारीं दुःखें सोसवत नाहींत.    
कठिण दुःख सोसवेना । प्राण शरीर सोडिना ।
मृत्यदुःख सगट जना । कासाविस करी ॥ २७ ॥
२७) कठीण दुःखें सोसवत नाहींत आणि प्राण तर जाता जात नाहीं. अशा रीतीनें मरणकाळचें दुःख सर्व लोकांना सारखेंच कासावीस करुन सोडते. 
नाना अवेवहीन जालें । तैसेंचि पाहिजे वर्तलें ।
प्राणीं अंतःकाळीं गेलें । कासाविस होऊनी ॥ २८ ॥
२८) रोगानें किंवा अपघातानें कोणाचें अवयव निकामी होतात किंवा तोडावें लागतात. पण अशा अवयवहीन अवस्थेंत माणसाला जीवनाचे व्यवहार करावें लागतात. अशी सगळीं माणसें अंतकाळीं कासावीस होऊन मरतात.  
रुप लावण्य अवघें जातें । शरीरसामर्थ्य अवघें राहातें ।
कोणी नस्तां मरतें । आपदआपदों ॥ २९ ॥
२९) माणसाचें रुप किंवा सौंदर्य तें सगळें नष्ट होतें. शरीरांतील सामर्थ्य नाहींसें होतें. जवळ कोणी असत नाहीं. अशा परिस्थितींत यातना भोगीत माणूस मरतो.  
अंतकाळ दैन्य दीन । सकळिकांस तत्समान । 
ऐसें चंचळ अवलक्षण । दुःखकारी ॥ ३० ॥
३०) अंतकाल सर्वंना सारखाच असतो. त्यावेळीं माणसाची फार दीनवाणी अवस्था होतें. अशाश्वताचे दुःखकारक अवलक्षण हें असें आहे. 
भोगून अभोक्ता म्हणती । हे तों अवघीच फजिती ।
लोक उगेच बोलती । पाहिल्याविण ॥ ३१ ॥
३१) भोग भोगून अभोक्तेपणा ठेवावा अशी भाषा लोक बोलतात. पण ही सगळी फजिती आहे. खरें पाहिल्यावाचून लोक उगीच कांहींतरी बोलतात. भोग भोगीत असतांना मनानें त्यापासून अलिप्त राहणें ही कांहीं सामान्य गोष्ट नव्हें. देहदुःख आलें असतां मोठमोठे साधक अनुसंधानापासून खालीं घसरतात. किंबहुना देहदुःख व दारिद्र्य या दोन अवस्थांत भगवंतास यत्किंचित दोष न देतां जो आपलें अनुसंधान यथास्थित सांभाळतो, तोच साधकाच्या पदावर स्थिर झाला असें खात्रीनें समजावें. बाकीचे साधक खरें पण परीक्षा पास झालेले साधक नव्हेत.    
अंतकाळ आहे कठिण । शेरीर सोडिना प्राण ।
बराड्यासारिखें लक्षण । अंतःकाळीं ॥ ३२ ॥ 
३२) अंतकाळ फार कठीण आहे. जीव वासनेंत गुंतल्यानें प्राण शरीराला सोडता सोडीत नाहीं. त्यामुळें सामान्य माणसाची अवस्था एखाद्या भिकार्‍यासारखीं अगदी दीनवाणी बनतें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देहात्मनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Dehatma Nirupan
समास सहावा देहात्म निरुपण


Custom Search

No comments: