Thursday, May 10, 2018

Samas Sahava Vayu Stavan समास सहावा वायुस्तवन


Dashak Solava Samas Sahava Vayu Stavan 
Samas Sahava Vayu Stavan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Vayu. Vayu stuti i.e. praise of Vayu is done in this samas. Every animal and every living is dependent on Vayu i.e. Air.
समास सहावा वायुस्तवन 
श्रीराम ।
धन्य धन्य हा वायदेव । याचा विचित्र स्वभाव ।
वायोकरितां सकळ जीव । वर्तती जनीं ॥ १ ॥
१) हा वायुदेव धन्य होय. याचा स्वभाव मोठा विलक्षण आहे. या वायुच्यामुळें जगांत सर्व प्राणी वर्तन करतात. 
वायोकरितां श्र्वासोश्र्वास । नाना विद्यांचा अभ्यास ।
वायोकरितां शरीरास । चळण घडे ॥ २ ॥
२) वायुच्या योगानें श्वासोश्र्वास चालतो. अनेक विद्यांचा अभ्यास याच्यामुळें करता येतो. वायुमुळें शरीराचे चलनवलन करतां येते. 
चळण वळण प्रासारण । निरोधन आणी आकोचन ।
प्राण अपान व्यान उदान । समान वायु ॥ ३ ॥
३) चलन, वलन, प्रसारण, आणि आकुंचन या गोष्टी वायु घडवून आणतो. प्राण, अपान, व्यान, उदान व समान अशा पांच प्रकारानें तो माणसाच्या शरीरांत वावरतो. हे पांच मुख्य प्राण आहेत. 
नाग कूर्म कर्कश वायो । देवदत्त धनंजयो ।
ऐसे हे वायोचे स्वभावो । उदंड असती ॥ ४ ॥
४) नाग, कुर्म, कृकल, देवदत्त व धनंजय हे पांच उपप्राण आहेत. अशा रीतीनें वायु विभागून शरीर चालवितो.  
वायो ब्रह्मांडीं प्रगटला । ब्रह्मांडदेवतांस पुरवला ।
तेथुनी पिंडीं प्रगटला । नाना गुणें ॥ ५ ॥
५) वायु प्रथम ब्रह्मांडामधें प्रगट झाला. त्यानें अनेक ब्रह्मांडदेवता निर्माण केल्या. मग तो अनेक प्रकारांनीं पिंडांत प्रगट झाला. 
स्वर्गलोकीं सकळ देव । तैसेचि पुरुषार्थी दानव ।
मृत्यलोकींचें मानव । विख्यात राजे ॥ ६ ॥ 
६) स्वर्गलोकांतील सर्व देव, तसेच मोठे [राक्रमी राक्षस, मृत्युलोकांतील विख्यात मानव राजे, 
नरदेहीं नाना भेदे । अनंत भेदाची श्वापदें ।
वनचरें जळचरें आनंदें । क्रिडा करिती ॥ ७ ॥
७) त्याचप्रमाणें अनेक प्रकारचे भेद असलेले नरदेह, अनेक प्रकारचे भेद असलेली श्वापदे, वनचरें, जळचरें, आनंदानें क्रिडा करणारे हे प्राणी, 
त्या समस्तांमधें वायु खेळे । खेचरकुळ अवघें चळे ।
उठती वन्हीचे उबाळे । वायोकरितां ॥ ८ ॥
८) या सगळ्यांमध्यें वायु खेळतो. आकाशांत राहणारे पक्षी वायुमुळे उडूं शकतात. आगीचे लोळ वायुमुळें उठतात. 
वायो मेघाचे भरण भरी । सवेंच पिटून परतें सारी ।
वायो ऐसा कारबारी । दुसरा नाहीं ॥ ९ ॥
९) वायु प्रथम आकाशांत खूप मेघ भरतो. मग लगेच त्यांना दूर लोटतो.  म्हणून वायुसारखा कारभार करणारा दुसरा कोणी नाहीं.
परी ते आत्मयाची सत्ता । वर्ते शरीरीं तत्वता ।
परी व्यापकपणें या समर्था । तुळण नाहीं ॥ १० ॥
१०) या वायुला अंतरात्म्याची सत्ता पाठीशी आहे. ती सत्ताच वायुच्यारुपानें शरीरांत काम करतअसते. पण व्यापकपणाच्या दृष्टीनें पाहिलें तर या समर्थ वायुची तुलना दुसर्‍या कोणाशी होऊं शकत नाहीं.
गिरीहून दाट फौजा । मेघ उठिले लोककाजा ।
गर्जगर्जो तडक विजा । वायोबळें ॥ ११ ॥
११) पर्वतांच्यामाथ्यावर ढगांचे सैन्य लोकांच्या कल्याणासाठीं वायुच जमवतो. मोठमोठ्या विजा चमकतात आणि मग पाऊस पडतो. हे सगळें वायुच्या बळानेंच होते.   
चंद्र सूर्य नक्षत्रमाळा । ग्रहमंडळें मेघमाळा ।
ये ब्रह्मांडीं नाना कळा । वायोकरितां ॥ १२ ॥
१२) चंद्र, सूर्य, नक्षत्रमाला, ग्रहमंडळ, मेघमाला, इत्यादि ज्या उत्तम गोष्टी या चिश्र्वांत आधळतात, त्या वायुमुळेंच घडून आल्या आहेत.  
येकवटलें तें निवडेना । कालवलें तें वेगळें होयेना ।
तैसें हे बेंचाड नाना । केवी कळे ॥ १३ ॥
१३) वायूच्या बळानेंच पंचभूतें एके ठिकाणी येऊन एकमेकांत मिसळली. ती आतां वेगळीं करतां येत नाहीत. पंचभूतांचा हा गुंतडा सहज उकलणार नाहीं. 
वायो सुटे सरारां । असंभाव्य पडती गारा ।
तैसे जीव हे नीरा- । सरिसे पडती ॥ १४ ॥
१४) मोठा सोसाट्याचा वारा सुटला कीं गारांची प्रचंड वृष्टी होते. त्या पाण्याबरोबर पुष्कळ जीव पृथ्वीवर पडतात.  
वायुरुपें कमळकळा । तोचि आधार जळा ।
तया जळाच्या आधारें भूगोळा । शेषें धरिलें ॥ १५ ॥
१५) ज्या सूक्ष्म कमळामध्यें ब्रह्मदेव राहतो, तो कमलकोष वायुरुपच आहे. पाण्याला त्याचाच आधार आहे. पाण्याच्या आधारानें शेषानें डोक्यावर भूगोळ धरला आहे.   
शेषास पवनाचा आहार । आहारें फुगे शरीर ।
तरी मग घेतला भार । भूमंडळाचा ॥ १६ ॥
१६) वायु हा शेषाचा आहार आहे. त्या वायुनें त्याचे शरीर फुगते. त्यामुळें भूगोलाचे वजन त्याला सहन करता येते.  
माहांकूर्माचें शरीर भलें । नेणों ब्रह्मांड पालथें घातलें ।
येवढें शरीर तें राहिलें । वायोचेनी ॥ १७ ॥
१७) महाकूर्माचे शरीर इतके प्रचंड, येवढें मोठे होतें कीं, त्याचें वरचे कवच पाहून जणूं काय ब्रह्मांड पालथें घातलें आहे असें वाटते. येवढे मोठें त्याचे शरीर वायुमुळेंच टिकतें. 
वाराहें आपुलें दंतीं । पृथ्वी धरिली होती ।
तयाची येवढी शक्ती । वायुबळें ॥ १८ ॥
१८) वराह अवतारामधें वराहानें आपल्या दातांवर पृथ्वी धरली. वायुमुळेंच येवढी शक्ती त्यास लाभली. 
ब्रह्मा विष्णु महेश्र्वर । चौथा आपण जगदेश्र्वर ।
वायोस्वरुप विचार । विवेकी जाणती ॥ १९ ॥
१९) ब्रह्मा, विष्णु, महेश आणि चौथा जगदीश्र्वर अंतरात्मा हे सारे वायुस्वरुपीं  आहेत. असें विचार करुन विवेकीं पुरुष जाणतात.   
तेतिस कोटी सुरवर । अठ्यासी सहस्त्र ऋषेश्र्वर ।
सिध योगी भारेंभार । वायोकरितां ॥ २० ॥
२०) तेहतीस कोटी देव, अठ्याऐंशी हजार ऋषी, सिद्ध व योगी यांचे मोठे समुदाय, या सर्वांना वायुमुळेंच बळ आहे. 
नव कोटी कात्यायणी । छेपन कोटी च्यामुंडिणी ।
औट कोटी भूतखाणी । वायोरुपे ॥ २१ ॥
२१) नऊ कोटी कात्यायनी, छप्पन कोटी चामुंडा साडेतीन कोटी भूतें ही सगळीं वायुरुपच आहेत.   
भूतें देवतें नाना शक्ती । वायोरुप त्यांच्या वेक्ती ।
नाना जीव नेणो किती । भूमंडळीं ॥ २२ ॥
२२) भुतें, दैवतें, ानेक प्रकारच्या शक्ती ही सर्व वायुरुपच घेऊन प्रगट होतात. अशा प्रकारचें वायुरुप जीव या भूमंडळांत कितेेआहेत तें सांगतां येणार नाहीं.
पिंडीं ब्रह्मांडीं पूरवला । बाहेर कंचुकास गेला ।
सकळां ठाईं पुरवला । समर्थ वायु ॥ २३ ॥
२३) पिंडांत व न्रह्मांडांत वायु आहेच. पण बाहेर कंचुकापर्यंत देखील त्याचा व्याप आहे. अशा रीतीनें सर्वांना पुरुन उरणारा वायु मोठा सामर्थ्यवान आहे.  
ऐसा हा समर्थ पवन । हनुमंत जयाचा नंदन ।
रघुनाथस्मर्णीं तनमन । हनुमंताचें ॥ २४ ॥
२४) अशा या समर्थ वायुचा मुलगा हनुमंत होय. श्रीरामाच्या स्मरणामधें त्याचे तन व मन अखंड गुंतलेलें होते.  
हनुमंत वायोचा प्रसीध । पित्यापुत्रांस नाहीं भेद ।
म्हणोनि दोघेहि अभेद । पुरुषार्थविषीं ॥ २५ ॥
२५) हनुमंत वायुचाच आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे. बापलेकामधें मुळींच भेद नाही. म्हणून दोघांच्या पराक्रमांतहि मुळींच भेद नाहीं.   
हनुमंतास बोलिजे प्राणनाथ । येणें गुणें हा समर्थ ।
प्राणेंविण सकळ वेर्थ । होत जातें ॥ २६ ॥
२६) हनुमंताला प्राणनाथ म्हणतात. यावरुन त्याचे सामर्थ्य काय ते लक्षांत येईल. एक प्राण नसेल तर सर्व व्यर्थ होऊन जाते. 
मागें मृत्य आला हनुमंता । तेव्हां वायो रोधला होता ।
सकळ देवांस आवस्ता । प्राणांत मांडलें ॥ २७ ॥
२७) मागें एकदां हनुमंताचा मृत्यु प्रसंग ओढवला असतां वायुनें सर्वांचे प्राण आकर्षून घेतले, यामुळें सर्व देव घाबरले त्यांच्यापुढें मृत्यु उभा राहीला.  
देव सकळ मिळोन । केलें वायूचें स्तवन ।
वायो प्रसन्न होऊन । मोकळें केलें ॥ २८ ॥
२८) मग सर्व देवांनीं एकत्र येऊन वायुची स्तुती केली. मग वायु प्रसन्न होऊन त्यानें सर्वांचा प्राण मोकळा केला.  
म्हणोनी प्रतापी थोर । हनुमंत ईश्र्वरी अवतार ।
याचा पुरुषार्थ सुरवर । पाहातचि राहिले ॥ २९ ॥
२९) म्हणुन मोठा प्रतापी असा हनुमान ईश्र्वरी अवतार आहे. याचा पराक्रम देव नुसता पाहातच राहिले.  
देव कारागृहीं होते । हनुमंते देखिलें अवचितें ।
संव्हार करुनी लंकेभोंवतें । विटंबून पाडिलें ॥ ३० ॥ 
३०) सगळे देव रावणाच्या कैदेंत होते. हनुमंतानें एकाएकी त्यांना पाहिलें. त्यानें राक्षसांची विटंबना केली. त्यांना मारुन लंकेभोवती टाकून दिलें. 
उसिणें घेतलें देवांचें । मूळ शोधिलें राक्षसांचें ।
मोठे कौतुक पुछ्याकेताचें । आश्र्चीर्य वाटे ॥ ३१ ॥
३१) देवांना कैदेंत टाकले त्याचा बदला मारुतीनें घेतला. राक्षसांची पाळेंमुळें खणून काढली. पुच्छकेतु मारुतीचे कौतुक पाहून मोठे आश्र्चर्य वाटलें.  
रावण होता सिंह्यासनावरी । तेथें जाऊन ठोसरें मारी ।
लंकेमधें निरोध करी । उदक कैचें ॥ ३२ ॥  
३२) रावण सिंहासनावर बसला होता. मारुतीनें तेथें जाऊन त्याला ठोसे मारले. लंकेमधें निरोध केला. तेथें पाणी मिळेनासे झालें.                
देवास आधार वाटला । मोठा पुरुषार्थ देखिला ।
मनामधें रघुनाथाला । करुणा करिती ॥ ३३ ॥
३३) मारुतीचा मोठा पराक्रम पाहून देवांना मोठा आधार वाटला. देवांनी मनानें श्रीरामाची करुणा भाकली.
दैत्य आवघे संव्हारिले । देव तत्काळ सोडिले ।
प्राणीमात्र सुखी जाले । त्रयलोक्यवासी ॥ ३४ ॥
३४) सगळे दैत्य मारुन टाकले. देवांना ताबडतोप मोकळें केलें. तिन्ही लोकांतील प्राणीमात्रांस अशाप्रकारें सुखी केलें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे वायोस्तवननिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Vayu Stavan
समास सहावा वायुस्तवन 
Custom Search

No comments: