Tuesday, May 8, 2018

Samas Pachava Agni Nirupan समास पांचवा अग्निनिरुपण


Dashak Solava Samas Pachava Agni Nirupan 
Samas Pachava Agni Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Agni. Agni stuti i.e. praise of Agni is done in this samas. Every animal and every living is dependent on Agni i.e. Fire.
समास पांचवा अग्निनिरुपण
श्रीराम ॥
धन्य धन्य हा वैश्वानर । होये रघुनाथाचा श्वशुर । 
विश्वव्यापक विश्वंभरु । पिता जानकीचा ॥ १ ॥
१) हा वैश्वानर अग्नि धन्य आहे. तो रामाचा सासरा आहे. सीतेनें अग्निदिव्य केले तेव्हां तो प्रकट होऊन म्हणाला, " रामा ही माझी कन्या अत्यंत पवित्र आहे. म्हणून तो सीतेचा पिता आहे. वैश्र्वानर विश्र्व व्यापतो. विश्र्वाचे पोषण करतो. 
ज्याच्या मुखें भगवंत भोक्ता । जो ऋषीचा फळदाता ।
तमहिमरोगहर्ता । भर्ता विश्वजनाचा ॥ २ ॥
२) अग्निच्या मुखानें सर्व देवांना यज्ञामधील हविर्भाग पोचतो. ऋषींच्या तपश्चर्येला अग्नी फळ देतो. अंधार, थंडी व रोग यांचे तो निवारण करतो. तो सर्व जीवांना पोसतो व सांभाळतो.
नाना वर्ण नाना भेद । जीवमात्रास अभेद ।
अभेद आणी परम शुध । ब्रह्मादिकासी ॥ ३ ॥  
३) प्राण्यांमध्ये वर्ण व भेद पुष्कळ आहेत. पण अग्नि सर्वांना म्हणजे ब्रह्मादिकांनाही अभेदानें असतो. तसाच तो सर्वांना अत्यंत शुद्ध असतो.    
अग्नीकरितां सृष्टी चाले । अग्निकरिता लोक धाले ।
अग्नीकरितां सकळ ज्याले । लाहानथोर ॥ ४ ॥
४) अग्नीमुळेंच सृष्टी चालते, लोक तृप्त होतात. सर्व लहानमोठे प्राणी अग्नीमुळेंच जिवंत राहतात. 
अग्नीनें आळलें भूमंडळ । लोकांस राहाव्या जालें स्थळ ।
दीप दीपिका नाना ज्वाळ । जेथें तेथें ॥ ५ ॥
५) अग्नीमुळें पाणी आटून पृथ्वी तयार झाली. प्राणीमात्रांना रहावयास जागा झाली. अग्नीमुळें दिवे, पणत्या, अनेक प्रकारचे जाळ जिकडेतिकडे आढळतात. 
पोटामधें जठराग्नी । तेणें क्षुधा लागे जनीं ।
अग्नीकरितां भोजनीं । रुची येते ॥ ६ ॥
६) पोटांत जठराग्नी असतो. त्यामुळें माणसांना भूक लागते. अग्नीमुळें अन्नाला चव येते. 
अग्नी सर्वांग व्यापक । उष्णें राहे कोणी येक ।
उष्ण नस्तां सकळ लोक । मरोन जाती ॥ ७ ॥
७) माणसाच्या अंगभर अग्नि व्यापून राहतो. त्याच्या उष्णतेनें सर्व प्राणी जिवंत राहतात.  अंगामधील उष्णता नाहींशी झाली तर सर्व प्राणी मरुन जातात.
आधीं अग्नी मंद होतो । पुढें प्राणी तो नासतो ।
ऐसा हा अनुभव येतो । प्राणीमात्रासी ॥ ८ ॥
८) प्रथम देहामधील अग्नी मंद होतो. नंतर प्राण्याची प्रकृति बिघडते. असा प्रत्यक्ष अनुभव सगळ्यांना येतो. 
असतां अग्नीचें बळ । शत्रु जिंके तात्काळ ।
अग्नी आहे तावत्काळ । जिणे आहे ॥ ९ ॥
९) अग्नीचें म्हणजे युद्धसामग्रससचे बळ असेल तर शत्रूला तत्काळ जिंकता येते. जोपर्यंत उष्णता असते, तोपर्यंत जिवंतपणा असतो.  
नाना रस निर्माण जाले । अग्नीकरितां निपजले ।
माहांरोगी आरोग्य जाले । निमिषमात्रें ॥ १० ॥
१०) जगांत अनेक निरनिराळे रस निर्माण झालेले आहेत. ते सगळे अग्नीपासून उत्पन्न झाले आहेत.अग्नीमुळें महारोगीसुद्धा ताबडतोप बरें होतात. 
सूर्य सकळांहून विशेष । सूर्याउपरी अग्नीप्रकाश ।
रात्रभागीं लोक अग्नीस । साहें करिती ॥ ११ ॥
११) सूर्य सर्वांहून विशेष आहे, यांत वाद नाहीं. पण सूर्य मावळल्यावर अग्नीच प्रकाश देतो. रात्रीच्यावेळीं लोक अग्नीचीच मदत घेतात.  
अंत्यजगृहींचा अग्नी आणिला । त्यास दोष नाहीं बोलिला ।
सकळां गृहीं पवित्र जाला । वैश्र्वानर ॥ १२ ॥
१२) शूद्राच्या घरचा अग्नी आणला तरी चालतो. त्याला दोष नाहीं असें शास्त्रकार सांगतात. सर्व घरांतील अग्नी सारखाच पवित्र आहे असें समजावे. 
अग्नीहोत्र नाना याग । अग्नीकरितां होती सांग ।
अग्नी तृप्त होतां मग । सुप्रसन्न होतो ॥ १३ ॥
१३) अग्निहोत्र व अनेक यज्ञयाग अग्नीमुळे यथासांग होतात. अग्नि तृप्त झाला कीं मग तो अति प्रसन्न होतो. 
देव दानव मानव । अग्नीकरितां चाले सर्व ।
सकळ जनासी उपाव । अग्नी आहे ॥ १४ ॥
१४) देव, दानव आणि मानव या सर्वांचे व्यवहार अग्नीच्या बळावर चालतात. सर्व लोकांना अग्नि हाच तारक उपाय आहे. 
लग्नें करिती थोर थोर । नाना दारुचा प्रकार ।
भूमंडळीं यात्रा थोर । दारुनें शोभती ॥ १५ ॥
१५) श्रीमंत लोक लग्नसमारंभ करतात, त्यांत शोभेच्या दारुचा वापर करतात.. जगांत मोठमोठ्या यात्रा भरतात. त्यांत दारुकामाचा शोभेसाठी वापर करतात. पण हा सगळा अग्नीचाच खेळ असतो.  
नाना लोक रोगी होती । उष्ण औषधें सेविती ।
तेणें लोक आरोग्य होती । वन्हीकरितां ॥ १६ ॥
१६) बर्‍याच लोकांना रोग होतात. त्यासाठी ते उष्ण औषधेम घेतात त्यामुळें त्यांना बरें वाटते. त्यांना आरोग्य लाभते. हा परिणाम अखेर अग्नीचाच असतो.  
ब्राह्मणास तनुमनु । सूर्यदेव हुताशनु ।
येतद्विषईं अनुमानु । कांहींच नाहीं ॥ १७ ॥
१७) सूर्य व अग्नि हेंच ब्राह्मनांचे सर्वस्व होय. ही गोष्ट प्रत्यक्ष आहे. याबद्दल कल्पना करण्याचे कारण नाहीं. 
लोकामध्यें जठरानळु । सागरीं आहे वडवानळु ।
भूगोळाबाहेर आवर्णानळु । शिवनेत्रीं विदुल्यता  ॥ १८ ॥
१८) लोकांच्या अंगांत जठरानल असतो. सागरामध्यें वडवानल असतो. भूगोलाबाहेर आवरणानल असतो. आणि शंकराच्या डोळ्यांत वीजरुपी अनल असतो.   
कुपीपासून अग्नी होतो । उंचदर्पणीं अग्नी निघतो ।
काष्ठमंथनी प्रगटतो । चकमकेनें ॥ १९ ॥
१९) काचेंतून अग्नी निघतो तसा तो उंच आरशांतून प्रगट होतो. लाकडावर लाकूड घासल्यानें व चकमकीनें अग्नि प्रगट होतो.  
अग्नी सकळां ठाईं आहे । कठीण घिंसणीं प्रगट होये ।
आग्यासर्पें दग्ध होये । गिरीकंदरें ॥ २० ॥
२०) अग्नि सर्व ठिकाणीं आहे. जोराच्या घर्षणानें तो प्रगट होतो. आग्यासापाच्या तोंडामधील अग्नि डोंगरदर्‍या जाळून टाकतो.
अग्नीकरितां नाना उपाये । अग्नीकरितां नाना अपाय ।
विवेकेंविण सकळ होये । निरार्थक ॥ २१ ॥
२१) अग्नीनें अनेक उपाय होतात. तसेंच अनेक अपायही होतात. विवेक केल्यावांचून हें सारें व्यर्थ जाते.  
भूमंडळीं लाहानथोर । सकळांस वन्हीचा आधार ।
अग्नीमुखें परमेश्र्वर । संतुष्ट होये ॥ २२ ॥
२२) जगांतील सगळ्या लहानथोरांना एका अग्नीचा आधार आहे. अग्नीच्या मुखानें परमेश्र्वर संतोष पावतो.  
ऐसा अग्नीचा महिमा । बोलिजे तितुकी उणी उपमा ।
उत्तरोत्तर अगाध महिमा । अग्नीपुरुषाचा ॥ २३ ॥
२३) अग्नीचा महिमा असा आहे. अग्नीचा महिमा वर्णन करण्यास कोणतीही उपमा कमी पडते. अग्निपुरुषाचा महिमा विचार करतां अधिकच वाढत जातो.   
जीत असतां सुखी करी । मेल्यां प्रेत भस्म करी ।
सर्वभक्षकु त्याची थोरी । काये म्हणोनी सांगावी ॥ २४ ॥
२४) माणूस जिवंत असतांना अग्नि त्यास सुख देतो. तसेच तो मेल्यावर त्यास भस्म करतो. अग्नि सर्वभक्षक आहे. त्याचा मोठेपणा सांगावा तितका थोडाच आहे. 
सकळ सृष्टीचा संव्हार । प्रळय करी वैश्र्वानर । 
वैश्र्वानरें पदार्थमात्र । कांहींच उरेना ॥ २५ ॥
२५) प्रलयकाळीं अग्नि सर्व सृष्टीचा सांहार करतो. प्रलयाकालच्या अग्नीमुळें पदार्थ म्हणून कांहीं शिल्लक उरत नाहीं.
नाना होम उदंड करिती । घरोघरीं वैश्र्वदेव चालती ।
नाना क्षेत्रीं दीप जळती । देवापासीं ॥ २६ ॥
२६) अग्नीच्या योगानें अनेक होम करतात. घरोघरीं वैश्र्वदेव करतात. निरनिराळ्या क्षेत्रांमध्यें अग्निमुळें देवापाशी दिवे जळतात. 
दीपाराधनें निलांजनें । देव वोवाळिजे जनें ।
खरें खोटें निवडणें । दिव्य होतां ॥ २७ ॥
२७) दीपाराधनें आणि निरांजनें अग्नीनें पेटवून लोक देवास ओवाळतात. अग्निदिव्य करुन लोक खरें खोटे निवडतात.  
अष्टधा प्रकृती लोक तिन्ही । सकळ व्यापून राहिला वन्ही ।
अगाध महिमा वदनीं । किती म्हणोनी बोलावा ॥ २८ ॥  
२८) तीन लोक व अष्टधा प्रकृति यांस अग्नीनें व्यापलें आहे. त्याचा महिमा तोंडानें सांगता येणार नाहीं.
च्यारी श्रृंगें त्रिपदीं जात । दोनी शिरें सप्त हात ।
ऐसा बोलिला शास्त्रार्थ । प्रचितीविण ॥ २९ ॥
२९) अग्नीचें रुप वर्णन करतांना त्यास चार शिंगें, तीन पाय, दोन डोकीं आणि सात हात आहेत, असें शास्त्र सांगतें. मग ते प्रचितीनेंच सांगतें.   
ऐसा वन्ही उष्णमूर्ती । तो मी बोलिलों येथामती ।
न्यून्यपूर्ण क्षमा श्रोतीं । केलें पाहिजे ॥ ३० ॥ 
३०) उष्णमूर्ति अग्नि असा आहे. माझ्या बुद्धीप्रमाणें मी त्याचे वर्णन केलें. जें कमीजास्त झालें असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अग्नीनिरुपणनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Agni Nirupan
समास पांचवा अग्निनिरुपण
Custom Search

No comments: