Dashak Solava Samas Navava NanaUpasana Nirupan
Samas Navava NanaUpasana Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Upasana.
समास नववा नानाउपासना निरुपण
श्रीराम ॥
पृथ्वीमधें लोक नाना । त्यास नाना उपासना ।
भावार्थें प्रवर्तले भजना । ठाईं ठाईं ॥ १ ॥
१) जगांत अनेक प्रकारचे लोक आहेत. त्यांच्या उपसना पण अनेक प्रकारच्या आहेत. ठिकठिकाणी लोक मोठ्या श्रद्धेने भजन पूजन करीत असतात.
आपुल्या देवास भजती । नाना स्तुती स्तवनें करिती ।
जे ते निर्गुण म्हणिती । उपासनेसी ॥ २ ॥
२) लोक आपापल्या उपास्य देवतेला भजतात. तिची स्तुतिस्तोत्रे गातात. हे सारे उपासक त्यांच्या त्यांच्या उपासनेला निर्गुण म्हणतात.
याचा कैसा आहे भाव । मज सांगिजे अभिप्राव ।
अरे हा स्तुतीचा स्वभाव । ऐसा आहे ॥ ३ ॥
३) त्यांचें हें म्हणणे खरें आहे कां? याबद्दल आपलें मत काय आहे तें मला सांगा. याचे उत्तर: अरे ! आपल्या देवतेची स्तुति करावी. हा माणसाचा स्वभाव आहे म्हणून असें घडतें.
निर्गुण म्हणिजे बहुगुण । बहुगुणी अंतरात्मा जाण ।
सकळ त्याचे अंश हे प्रमाण । प्रचित पाहा ॥ ४ ॥
४) निर्गुण म्हणजे बहुगुण किंवा पुष्कळ गुण. अंतरात्म्याच्या ठिकाणीं पुष्कळ गुण आहेत. सार्या उपास्य देवता निश्चितपणें अंतरात्म्याचे अंश आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.
सकळ जनासी मानावें तें । येका अंतरात्म्यास पावतें ।
अधिकारपरत्वें तें । मान्य कीजे ॥ ५ ॥
५) प्रत्येकाच्या अंतर्यामीअंतरात्म्याचे निवासस्थान आहे. म्हणून सर्व लोकांना जें मान्य होतें तें एका अंतरात्म्यास पोचतें. अर्थात सर्वांना मान्य तें कोणतें तें पाहातांना ज्याची त्याची पात्रता पाहाणें जरुरीचे आहे.
श्रोता म्हणे हा अनुमान । मुळीं घालावें जीवन ।
तें पावे पानोपान । हे सध्या प्रचिती ॥ ६ ॥
६) श्रोता यावर असा आक्षेप घेतो कीं, आपण म्हणता ही केवळ कल्पना आहे. झाडाच्या मुळांत जर पाणी घातलें तरच तें झाडाच्या सर्व पानांना मिळतें हा रोजचा अनुभव आहे.
वक्ता म्हणे तुळसीवरी । उदक घालावें पात्रभरी ।
परी न थिरे निमिषभरी । भूमीस भेदे ॥ ७ ॥
७) वक्ता म्हणतो कीं, अरे हें बघ तुळशीच्या झाडावर भांडे भरुन पाणी घातलें तर तें पानांवर क्षणभर स्थिर राहात नाही. तें खालीं जमिनींत शिरतें.
थोरा वृक्षास कैसें करावें । सेंड्या पात्र कैसें न्यावें ।
याचा अभिप्राव देवें । मज निरोपावा ॥ ८ ॥
८) यावर तू म्हणशील कीं तुळशीचें ठिक आहे पण मोठ्या वृक्षाला पाणी कसें घालावे? त्याच्या शेंड्यापर्यंत पाण्याचें भांडे कसें न्यावें? गुरुदेवांनी या अडचणींतून मार्ग दाखवावा.
प्रजन्याचें उदक पडतें । तें तों मुळाकडे येतें ।
हात चि पावेना तेथें । काये करिती ॥ ९ ॥
९) याचें उत्तर असें कीं, मोठ्या झाडाच्या शेंड्यावर पावसाचें पाणी पडतें. तेथून तें मूळाकडे जातें. जेथें आपलें हात पोचत नाहींत तेथें आपण काय करणार?
सकळास मूळ सांपडे । ऐसें पुण्य कैचें घडे ।
साधुजनाचें पवाडे । विवेकीं मन ॥ १० ॥
१०) मूळ सापडावें इतकें पुण्य सगळ्याकडे नसतें. जो साधु पुरुष असतो त्याचे मन मात्र विवेकानें मुळापर्यंत म्हणजे अंतरात्म्यापर्यंत पोचूं शकते बाकीच्यांचे नाही.
तथापी वृक्षांचेनि पडिपाडें । जीवन घालितां कोठें पडे ।
ये गोष्टचें सांकडें । कांहीं च नाहीं ॥ ११ ॥
११) वृक्षाच्या दृष्टांतावरुन असें ध्यानांत येईल कीं, पाणी शेंड्याला घातलें काय किंवा मुळाशीं घातलें काय., अखेर तें झाडाच्या मुळाला पोचतें. म्हणून येथें कांहींच अडचण नाहीं. उपास्यदेवतेची उपासना करणें हें झाडाच्या शेंड्याला पाणी घलण्यासारखें आहे, तर अंतरात्म्याची उपासना करणें हें मुळाला पाणी घालण्यासारखें आहे. पण अंतरात्म्याची उपासना करण्यास लागणारें सूक्ष्म मन पुण्याईनेंच लाभतें. सर्वांना तो अधिकार नाहीं.
मागील आशंकचें निर्शन । होतां जालें समाधान ।
आतां गुणास निर्गुण । कैसें म्हणती ॥ १२ ॥
१२) पहिल्या शंकेचे निरसन झालें. त्यामुळें श्रोत्यांचे समाधान झालें. आतां सगुणालाच निर्गुण कां व कसें म्हणतात तें सांगांवें.
चंचळपणें विकारलें । सगुण ऐसें बोलिलें ।
येर तें निर्गुण उरलें । गुणातीत ॥ १३ ॥
१३) जें जें कांहीं चंचळपणें, अशाश्वतपणें विकार पावतें किंवा बदलतें, त्यास सगुण असें म्हणतात. सर्व सगुण सोडून जें गुणातीत शिल्लक राहतें, त्यास निर्गुण असें म्हणतात.
वक्ता म्हणे हा विचार । शोधून पाहावें सारासार ।
अंतरीं राहातां निर्धार । नांव नाहीं ॥ १४ ॥
१४) वक्ता सांगतो कीं, सगुण निर्गुणाचा हा भेद बरोबर ध्यानांत येण्यास सारासार शोधून पाहावें. आपल्या अंतर्यामीं सूक्ष्म बुद्धि करुन जर आपण पाहिलें तर सगुण निश्चितपणें खरें नाहीं असें अनुभवास येईल.
विविकेंचि तो मुख्य राजा । आणि सेवकाचें नांव राजा ।
याचा विचार समजा । वेवाद खोटा ॥ १५ ॥
१५) राजे दोन प्रकारचे. एक खरा राजा सिंहासनावर बसणारा तर दुसरा " राजा " नांव असणारा नोकर तो खोटा राजा. हा भेद विवेकयुक्त विचारानें समजून घ्यावा. उगीच वाद घालीत बसूं नये. नोकराला राजा म्हणून हाक मारल्यानें तो जसा खरा राजा बनत नाहीं. त्याचप्रमाणें सगुण उपासनेला निर्गुण म्हटल्यानें ती निर्गुण होत नाहीं.
कल्पांतप्रळईं जे उरलें । तें निर्गुण ऐसें बोलिलें ।
येर तें अवघेंचि जालें । मायेमधें ॥ १६ ॥
१६) कल्पांतसमयीं सर्व विश्वाचा प्रलय झाला तरी जें शिल्लक उरतें त्यास निर्गुण असें म्हणतात. बाकीचे सगळें मायेच्या क्षेत्रांत झालेले असतें.
सेना शाहार बाजार । नाना यात्रा लाहानथोर ।
शब्द उठती अपार । कैसे निवडावे ॥ १७ ॥
१७) सैन्यामध्यें, शहरामध्यें, बाजारामध्यें मोठ्या यात्रेमध्यें पुष्कळ आवाज ऐकू येतात. त्यामध्यें निवडून काढणें कठिण असतें.
काळामधें प्रज्यन्यकाळ । मध्यरात्रीं होतां निवळ ।
नाना जीव बोलती सकळ । कैसे निवडावे ॥ १८ ॥
१८) पावसाळ्यांत खूप पाऊस पडून गेला आहे. मग मध्यरात्रीं पाऊस थांबल्यावर अनेक प्राणी आवाज करतात.त्यामध्यें निवडानिवड करणें कठीण असतें.
नाना देश भाषा मतें । भूमंडळीं असंख्यातें ।
बहु ऋषी बहु मतें । कैसीं निवडावी ॥ १९ ॥
१९) पृथ्वीवर अनेक देश आहेत. अनेक भाषा, अनेक मतें आहेत, अनेक ऋषि आहेत, व त्यांची नाना मतें आहेत. यासगळ्यामध्यें निवडानिवड करणें कठीण असतें.
वृष्टि होतां च अंकुर । सृष्टीवरी निघती अपार ।
नाना तरु लाहानथोर । कैसे निवडावे ॥ २० ॥
२०) पाऊस पडल्यावर जमिनींतोोन ानेक अंकुर वर येतात त्याचप्रमाणें लहानमोटह्या झाडांचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्यें निवडानिवड करणें कठीण असतें.
खेचरें भूचरें जळचरें । नाना प्रकारीची शरीरें ।
नाना रंग चित्रविचित्रें । कैसी निवडावीं ॥ २१ ॥
२१) पक्षी, जनावरें आणि मासें यांच्या शरीराच्या तर्हा नाना प्रकारच्या असतात. तसेच त्यांचे रंगदेखील नाना प्रकारचे असतात. त्यामधुन निवडानिवड करणें अति कठीण काम असतें.
कैसें दृश्य आकारलें । नानापरीं विकारलें ।
उदंडचि पैसावलें । कैसें निवडावें ॥ २२ ॥तिकड
२२) हें दृश्य विश्र्व कसें नाना प्रकारांनी भरलेलें आहे. त्यांत नाना प्रकारचे बदल सारखें होत असतात. आणि तें जिकडेेतिकडे अफाट पसरलेले आहे. अशा या विलक्षण गुंतागुंतीच्या विश्वामध्यें निवडानिवड करणें कठीण असतें.
पोकळीमधें गंधर्वनगरें । नाना रंग लाहानथोरें ।
बहु वेक्ति बहु प्रकारें । कैसीं निवडावीं ॥ २३ ॥
२३) आकाशाच्या पोकळींत नाना गंधर्वनगरें दिसतात. नाना प्रकारचे लहान मोठे रंग आढळतात, नाना प्रकारच्या आकृति नजरेस पडतात. त्यामध्यें निवडानिवड करणें कठीण असतें.
दिवसरजनीचे प्रकार । चांदिणें आणी अंधकार ।
विचार आणी अविचार । कैसा निवडावा ॥ २४ ॥
२४) दिवस आणि रात्र, चांदणें आणि अंधार, विचार आणि अविचार यांत निवडानिवड कशी करायची.
विसर आणी आठवण । नेमस्त आणी बाष्कळपण ।
प्रचित आणी अनुमान । येणें रीतीं ॥ २५ ॥
२५) स्मरण आणि विस्मरण, शिस्त आणि गैरशिस्त, प्रत्यक्ष अनुभव आणि केवळ अनुमान यांच्यामध्यें देखील निवडानिवड करणें कठीण असतें.
न्याय आणी अन्याय । होय आणी न होये ।
विवेकेंविण काये । उमजों जाणे ॥ २६ ॥
२६) तसेंच न्याय आणि अन्याय, होणारें आणि न होणारें, यांच्यामध्यें विवेकावाचून निवडानिवड होत नाहीं.
कार्यकर्ता आणी निकामी । शूर आणी कुकर्मी ।
धर्मी आणी अधर्मी । कळला पाहिजे ॥ २७ ॥
२७) कार्य करणारा व कार्य करुं न शकणारा, शूर आणि वाईट कर्में करणारा धार्मिक वृत्तीचा आणि अधार्मिक वृत्तीचा कोण आहे हा भेद कळणें अवश्य आहे.
धनाढ्य आणि दिवाळखोर । साव आणि तश्कर ।
खरें खोटें हा विचार । कळला पाहिजे ॥ २८ ॥
२८) धनसंपन्न कोण आणि दिवाळखोर कोण, साव कोण आणि थोर कोण, खरें काय आणि खोटें काय, याचा विचार बरोबर झाला पाहिजे.
वरिष्ठ आणी कनिष्ठ । भ्रष्ट आणी अंतरनिष्ठ ।
सारासार विचार पष्ट । कळला पाहिजे ॥ २९ ॥
२९) वरिष्ठ म्हणजे श्रेष्ठ कोण, आणि कनिष्ठ कोण भ्रष्ट कोण आणि अंतरनिष्ठ कोण हा सारासार विचार अगदी स्पष्टपणें कळला पाहिजे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे नानाउपासनानिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava NanaUpasana Nirupan
समास नववा नानाउपासना निरुपण

Custom Search
No comments:
Post a Comment