Sunday, May 20, 2018

Samas Pahila DevBalatkar Nirupan समास पहिला देवबळात्कार निरुपण


Dashak Satarava Samas Pahila DevBalatkar Nirupan
Samas Pahila DevBalatkar Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Antaratma.
समास पहिला देवबळात्कार निरुपण
श्रीराम ॥
निश्र्चळ ब्रह्मीं चंचळ आत्मा । सकळां पर जो परमात्मा ।
चैतन्य साक्षी ज्ञानात्मा । शड्गुणैश्र्वरु ॥ १ ॥
१) मूळ परब्रह्म निश्र्चळ आहे. त्यामध्यें चंचल निर्माण होते. तोच आत्मा होय. सर्वांच्याहून श्रेष्ठ असल्यानें त्यास परमात्मा म्हणतात. चैतन्य, साक्षी, षड्गुणेश्र्वर ही त्याचीच नांवें आहेत. 
सकळ जगाचा ईश्र्वरु । म्हणौन नामें जगदेश्र्वरु ।
तयापासून विस्तारु । विस्तारला ॥ २ ॥
२) तो सर्व जगाचा स्वामी असल्यानें त्याचें नांव जगदीश्र्वर आहे. त्याच्यापासून सर्व सृष्टीचा येवढा विस्तार झाला. 
शिवशक्ति जगदेश्र्वरी । प्रकृतिपुरुष परमेश्र्वरी ।
मूळमाया गुणेश्र्वरी । गुणक्षोभिणी ॥ ३ ॥
३) शिवशक्ति, जगदीश्र्वरी,प्रकृतिपुरुष, परमेश्र्वरी, मूळमाया, गुणेश्र्वरी, गुणक्षोभिणी अशी मूळ मायेची नांवे आहेत.  
क्षेत्रज्ञ द्रष्टा कूटस्त साक्षी । अंतरात्मा सर्वलक्षी ।
शुद्धसत्व महत्तत्व परीक्षी । जाणता साधु ॥ ४ ॥
४) क्षेत्रज्ञ, द्रष्टा, कूटस्थ, साक्षी, अंतरात्मा, सर्व कांही पाहाणारा, शुद्ध सत्व, महत्तत्व, या सगळ्यांची जो परीक्षा करतो, या सर्वांना जो यथार्थपणें समजतो, तोच खरा जाणता साधु होय.   
ब्रह्मा विष्णु महेश्र्वरु । नाना पिंडीं जीवेश्र्वरु ।
त्यास भासती प्राणीमात्रु । लहानथोर ॥ ५ ॥
५) ब्रह्मा, विष्णु, महेश्र्वर, पिंडामधें राहणारा जीवेश्र्वर, त्याच्याकडे दृष्टी ठेवूनच सर्व लहानथोर प्राणी तो पाहातो. साधु सर्व प्राणी पाहातो पण त्याची दृष्टि प्राण्यांच्या अंतर्यामी राहणार्‍या अंतरात्म्याकडे असते.  
देहदेऊळामधें बैसला । न भजतां मारितो देहाला ।
म्हणौनि त्याच्या भेणें तयाला । भजती लोक ॥ ६ ॥  
६) हा अंतरात्मा देहरुपी देवळांत बसलेला असतो. त्याची सेवा केली नाहीं, त्याला हवें तें दिलें नाही तर तो देहाला जिवंत ठेवित नाहीं. म्हणून त्याच्या भीतीनें लोक त्याला भजतात.
जे वेळेसी भजन चुकलें । तें तें तेव्हां पछ्याडिलें ।
आवडीनें भजों लागले । सकळ लोक ॥ ७ ॥
७) ज्या ज्या वेळीं त्याला हवें तें मिळत नाहीं, त्या त्या वेळीं तो लोकांना छळतो. म्हणून लोक त्यास आवडीनें हवें ते देतात.
जें जें जेव्हां आक्षेपिलें । तें तें तत्काळचि दिधलें ।
त्रैलोक्य भजों लागलें । येणें प्रकारें ॥ ८ ॥
८) ज्यावेळीं जी गोष्ट तो मागतो त्यावेळीं लोक ती गोष्ट त्यास पुरवतात. अशा रीतीनें सारेम त्रैलोक्य त्याची सेवा करते.  
पांचा विषयांचा नैवेद्य । जेव्हां पाहिजे तेव्हां सिद्ध ।
ऐसें न करितां सद्य । रोग होती ॥ ९ ॥
९) पांच इंद्रियभोगांचा नैवेद्य जेव्हां हवा तेव्हां तयार असतो. असें जर केलें नाहीं तर देहांत रोग होतात.
जेणें काळें नैवेद्य पावेना । तेणें काळें देव राहेना ।
भाग्य वैभव पदार्थ नाना । सांडून जातो ॥ १० ॥
१०) ज्यावेळी अंतरात्मारुपी देवाला नैवेद्य मिळत नाहीं, तेव्हां तो देहांत राहात नाही. भाग्य, वैभव आणि इतर सारे पदार्थ टाकून तो चालता होतो. मनुष्य मरतो.
जातो तो कळों देईना । कोणास ठाउकें होयेना ।
देवेंविण अनुमानेना । कोणास देव ॥ ११ ॥
११) तो देह सोडून जातो, हें कळूं देत नाही, कोणास समजत नाहीं. देवाशिवाय देवाचे रहस्य इतर कोणासच आकलन होत नाहीं. 
देव पाहावयाकारणें । देउळें लागती पाहाणें ।
कोठेंतरी देउळाच्या गुणें । देव प्रगटे ॥ १२ ॥
१२) देवाचें दर्शन घ्यावयाचे असेल तर देवालयें पहावीं लागतात. देवळाच्या मादह्यमानें देव कोठेंतरी प्रगट होतोच. पुष्कळ माणसें पाहीली तर एखादा आत्मज्ञानी आढळतो.
देउळें म्हणिजे नाना शरीरें । तेथें राहिजे जीवेश्र्वेरे ।
नाना शरीरें नाना प्रकारें । अनंत भेदें ॥ १३ ॥
१३) देवळें म्हणजे नाना प्रकारची शरीरें. शरीराच्या अंतरी जीवेश्र्वर राहतो. अनेक प्रकारची अनेक शरीरें आहेत. त्यांच्यामधें अनेक प्रकारचे भेद आहेत. 
चालतीं बोलतीं देउळें । त्यामधें राहिजें राउळें ।
जितुकीं देउळें तितुकीं सकळें । कळलीं पाहिजे । १४ ॥
१४) शरीरें म्हणजे चालती बोलती देवळें असून त्यामधें देव राहतो. जितकी देवळें म्हणजे शरीरें आहेत तितकी सारी कळणें अवश्य आहे. शरीरांचे जे नाना प्रकार जगांत आढळतात, ते सारे माहीत असावेत.
मछ कूर्म वाराह देउळें । भूगोळ धरिला सर्वकाळें ।
कराळें विक्राळें निर्मळें । कितियेक ॥ १५ ॥
१५) मत्स्य, कूर्म, व वराह हीं जीं देवळें आहेत, त्यांनी तर हा भूगोळ धरला आहे. सर्व काळ त्यास आधार दिला आहे. या तीहींमध्यें कांही फार अक्राळविक्राळ आहेत. तर कांहीं सौम्य आहेत.
कित्येक देउळीं सौख्य पाहे । भरतां आवघें सिंध आहे ।
परी तें सर्वकाळ न राहे । अशाश्वत ॥ १६ ॥
१६) कित्येक देवळांत सुखाला इतकी भरती येते कीं, तेथें सुखसमुद्र आहे असा भास होतो. पण ती भरती अशाश्वत असते, ती कायम टिकत नाहीं. 
अशाश्वताचा मस्तकमणी । जयाची येवढी करणी ।
दिसेना तरी काय जालें धनी । तयासीच म्हणावें ॥ १७ ॥
१७) हें अशाश्वत विश्व ज्यानें निर्माण केलें आणि नीट चालवलेले तो अंतरात्मा अशाश्वतांचा राजा आहे. अशाश्वतांमधील सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे. तो इंद्रियगोचर नाहीं. ही गोष्ट खरी. पण त्यालाच सर्व दृशंचा स्वामी मानला पाहिजे.  
उद्भवोन्मुख होतां अभेद । विमुख होतां उदंड खेद ।
ऐसा अधोर्ध संवाद । होत जातो ॥ १८ ॥
१८) अंतरात्म्याकडे तोंड केलें कीं भेदाकडे पाठ झाल्यानें जिकडेतिकडे अभेद अनुभवास येतो. अंतरात्म्याकडून तोंड फिरवलें कीं अभेदाकडे पाठ होते. आणि मग जिकडे तिकडे भेद अनुभवास येतो.त्यामुळें फार दुःख भोगावें लागतें. मन अंतरात्म्याकडे लागणें हीं ऊर्ध्वगति तर मन दृश्याकडे लागणें ही अधोगति समजावी. वरखालीं जाण्याचा हा क्रम विश्वामध्यें नीटपणें चालत असतो.  
सकळांचें मूळ दिसेना । भव्य भारी आणी भासेना ।
निमिष्य येक वसेना । येके ठाइं ॥ १९ ॥
१९) या अवाढव्य विश्वाचे मूळ जो अंतरात्मा तो फार भव्य व प्रचंड आहे. पण तो अतिसूक्ष्म असल्यानें सहज अनुभवास येत नाहीं. अति चंचल असल्यानें तो क्षणभरदेखील एके ठिकाणी स्थिर राहात नाहीं. 
ऐसा अगाध परमात्मा । कोण जाणे त्याचा महिमा ।
तुझी लीळा सर्वोत्तमा । तूंच जाणसी ॥ २० ॥
२०) तो अंतरात्मा किंवा परमात्मा असा अगाध आहे. त्याचा महिमा जाणणारा कोणीं नाहीं. हे सर्वोत्तमा तुझी लीला फक्त तुलाच माहीत आहे. 
संसारा आलियांचें सार्थक । जेथें नित्यानित्यविवेक ।
येहलोक आणी परलोक । दोनी साधिले ॥ २१ ॥
२१) जीवनामध्यें नित्यानित्य विवेक करावा. त्याच्या बळावर इहलो आणि परलोक दोन्हींकडे यश मिळवावें. तर जगांत जन्मास आल्याचें सार्थक होतें. 
मननसीळ लोकांपासीं । अखंड देव आहिर्निशीं ।
पाहातां त्यांच्या पूर्वसंचितासी । जोडा नाहीं ॥ २२ ॥
२२) चिंतनशील माणसापाशी देव अखंड चोवीस तास राहतो. अशा व्यक्तिच्या पुण्याईला जोड नाहीं असें समजावें. 
अखंड योग म्हणोनि योगी । योग नाहीं तो वियोगी ।
वियोगी तोहि योगी । योगबळें ॥ २३ ॥
२३) ज्याचा भगवंताशी अखंड योग असतो त्यास योगी म्हणावें. असा योग ज्याला साधला नाहीं तो वियोगी होय. पण सतत चिंतनाचा अभ्यास केला तर त्या योगाच्या बळानें वियोगीदेखील योगी बनतो.  
भल्यांची महिमा ऐसी । जे सन्मार्ग लावी लोकांसी ।
पोहणार असतां बुडतयासी । बुडों नेदावें ॥ २४ ॥
२४) थोर पुरुषाचा थोरपणा असा कीं, तो लोकांना सन्मार्गास लावतो. तो स्वतः पोहणारा आहे त्याने बुडणार्‍या माणसाला बुडूं देऊं नये.  
स्थूळसूक्ष्मतत्वझाडा । पिंडब्रह्मांडाचा निवाडा ।
प्रचित पाहे ऐसा थोडा । भूमंडळीं ॥ २५ ॥
२५) जो स्थूल व सूक्ष्म तत्त्वांचा शोध घेतो आणि पिंड व ब्रह्मांड यांचें बरोबर विवरण करतो, त्याला आत्मप्रचिती येते. पण जगांत अशी माणसें थोडी असतात. 
वेदांतीचें पंचिकर्ण । अखंड तयाचें विवर्ण । 
महांवाक्यें अंतःकरण । रहस्य पाहे ॥ २६ ॥
२६) ही माणसें वेदांतामधील संपूर्ण पंचीकरण अखंड विवरीत असतात. त्याचप्रमाणें आपल्या अंतःकरणांत माहावाक्यांचे रहस्य शोधतात. 
ये पृथ्वीमधें विवेकी असती । धन्य तयांची संगती ।
श्रवणमात्रें पावती गती । प्राणीमात्र ॥ २७ ॥
२७) या जगांत अशी जी माणसें असतात, त्यांचीं संगत लाभणें खरोखर धन्य होय. त्यांच्याकडूनच परमार्थ नुसता श्रवण करुनच समान्य लोकांना उत्तम गति प्राप्त होतें.   
सत्संग आणी सत्शास्त्रश्रवण । अखंड होतसे विवर्ण ।
नाना सत्संगआणी उत्तम गुण । परोपकाराचे ॥ २८ ॥
२८) संतांची संगत आणि त्यांच्याकडून सत् शास्त्राचें क्षवण असा योग यावा. तेथें अखंड आत्मानात्मविवरण चालतें. अनेक संतांचा सहवास घडतो. आणि लोकांवर उपकार करतां येण्यासारखें अनेक सद्गुण अंगी जडतात. 
जे सद्कीर्तीचे पुरुष । ते परमेश्र्वराचे अंश ।
धर्मस्थापनेचा हव्यास । तेथेंचि वसे ॥ २९ ॥
२९) अखंड चिंतनशील असणारे जे किर्तिमान पुरुष असतात ते परमेश्र्वराचे अंश समजावे. धर्मस्थापना करण्याची उत्कट इच्छा व खटाटोप त्यांचेपाशींच आढळतो. 
विशेष सारासार विचार । तेणें होय जग्गोद्धार । 
संगत्यागें निरंतर । होऊन गेले ॥ ३० ॥  
३०) त्यांच्या ठिकाणीं सारासार विचार विशेषपणें असतो. त्या विचारानें जगाचा उद्धार घडून येतो. पण ते स्वतः मी पणाचा त्याग करुन चिरंजीव स्वरुपमय होऊन जातात. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे देवबळात्कारनाम समास पहिला ॥
Samas Pahila DevBalatkar Nirupan
समास पहिला देवबळात्कार निरुपण


Custom Search

Post a Comment