Wednesday, May 23, 2018

Samas Tisara Shravan Nirupan समास तिसरा श्रवणनिरुपण


Dashak Satarava Samas Tisara Shravan Nirupan 
Samas Tisara Shravan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Shravan.
समास तिसरा श्रवणनिरुपण 
श्रीराम ॥
थांबा थांबा ऐका ऐका । आधींच ग्रंथ सोडू नका ।
सांगितलें तें ऐका । सावधपणें ॥ १ ॥
१) श्रीसमर्थ श्रोत्यांना म्हणतात कीं, " अहो थोडे थांबा, माझे म्हणणे जरा ऐकून घ्या. ग्रंथ वाचणें आधींच सोडू देऊं नका. ग्रंथामध्यें जें सांगितलें आहे तें लक्षपूर्वक ऐकून घ्या. 
श्रवणामध्यें सार श्रवण । तें हें अध्यात्मनिरुपण ।
सुचित करुन अंतःकर्ण । ग्रन्थामधें विवरावें ॥ २ ॥
२) ज्ञान संपादन करण्यासाठीं आपण जें श्रवण करतो, त्यामध्यें आत्मस्वरुपाबद्दल श्रवण करणें हें सर्वोत्तम होय. आपलें अंतःकरण एकाग्र करावें आणि ग्रंथामध्यें जें प्रतिपादन केलें आहे त्याचे विवरण करावें.   
श्रवणमननाचा विचार । निजध्यासें साक्षात्कार ।
रोकडा मोक्षाचा उधार । बोलोंचि नये॥ ३ ॥
३) जें श्रवण केलें त्याचें मनन करुन विचार वाढवावा. त्यानंतर निदिध्यास धरुन साक्षात्कार करुन घ्यावा. मोक्षाचा व्यवहार हा असा रोकडा आहे. त्यामध्यें उधारीची भाषा बोलूंच नये. 
नाना रत्नें परीक्षितां । अथवा वजनें करितां ।
उत्तम सोनें पुटीं घालितां । सावधान असावें ॥ ४ ॥
४) अनेक रत्नांची परीक्षा करतांना, अनेक मौल्यवान वस्तूंचे वजन करतांना किंवा उत्तम सोनें मुशींत घालतांना अतिशय सावध रहावें लागते. 
नाना नाणीं मोजून घेणें । नाना परीक्षा करणें ।
विवेकी मनुष्यासी बोलणें । सावधपणें ॥ ५ ॥
५) अनेक नाणीं मोजून घेतांना, अनेक वस्तूंची परीक्षा करतांना, विवेकी माणसाशी बोलतांना फार सावधपणा बाळगावा लागतो. 
जैसें लाखोलीचें धान्य । निवडून वेंचितां होतें मान्य । 
सगट मानितां अमान्य । देव क्षोभे ॥ ६ ॥
६) देवाला धान्याची लाखोली वाहतांना तें निवडून वाहिलें तरच देवाला मान्य होतें. चांगल्यावाईटाची निवड न करतां जर तें सरसकट देवाला वाहिलें तर तें त्याला मान्य होत नाहीं. देवाचा क्षोभ होतो. 
येकांतीं नाजुक कारबार । तेथें असावें अति तत्पर ।
त्याच्या कोटिगुणें विचार । अध्यात्मग्रन्थीं ॥ ७ ॥
७) एकांतात बसून एखाद्या अत्यंत नाजूक व गुप्त गोष्टीची चर्चा करणें असेल तर तेथें मन अगदी दक्ष व सावध लागतें. अध्यात्म ग्रंथामध्यें त्याच्यापेक्षां कितीतरी पटीनें अधिक सूक्ष्म विचार असतो.
काहिण्या कथा गोष्टी पवाड । नाना अवतारचरित्रें वाड ।
त्या समस्तांमध्यें जाड । अध्यात्मविद्या ॥ ८ ॥
८) कहाण्या, कथा, गोष्टी, पोवाडे अनेक देवांच्या अवतारांची चरित्रें यापेक्षां अध्यात्मविद्या अधिक गहन आहे. 
गत गोष्टीस ऐकिलें । तेणें काये हातास आलें ।
म्हणती पुण्य प्राप्त जालें । परी तें दिसेना कीं ॥ ९ ॥
९) पूर्वी होऊन गेलेल्या गोष्टी ऐकल्या तर काय हातीं लागतें असें विचारलें असतां पुण्य पदरांत पडलें असें लोक म्हणतात. पण तें पुण्य कांहीं दिसत नाहीं. 
तैसें नव्हे अध्यात्मसार । हा प्रचितीचा विचार ।
कळतां अनुमानाचा संव्हार । होत जातो ॥ १० ॥
१०) अध्यात्मविद्येचे रहस्य असें नाहीं. अध्यात्मामध्यें प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असतो. म्हणून येथें जसजसा अनुभव येत जातो. तसतशी कल्पना नाश पावतें.  
मोठे मोठे येऊन गेले । आत्म्याकरितांच वर्तले ।
त्या आत्म्याचा महिमा बोले । ऐसा कवणु ॥ ११ ॥
११) जगामध्यें जें मोठेमोठे पुरुष होऊन गेले ते आत्म्याचा शोध करितच जगले. त्या आत्म्याचा महिमा कोणासहि सांगता येत नाहीं.
युगानयुगें येकटा येक । चालवितो तिनी लोक ।
त्या आत्म्याचा विवेक । पाहिलाच पाहावा ॥ १२ ॥
१२) हा एकटा अंतरात्मा युगानुयुगें झालीं तरी तिन्ही लोक चालवतो. त्या आत्म्याचा पुनः पुनः शोध घ्वावा.  
प्राणी आले येऊन गेले । ते जैसे जैसे वर्तले ।
ते वर्तणुकेचे कथन केलें । इछेसारिखें ॥ १३ ॥   
१३) या जगांत पुष्कळ प्राणी जन्मास आले आणि जग सोडून गेले. ते जसें जसें वागलें त्या त्यांच्या वागणुकीचे आपल्या मनाप्रमाणें वर्णन करतां येते. पण त्यांच्या वागणुकीच्यामागें अंतरात्म्याची प्रेरणा होती हें आपण विसरतो.          
जेथें आत्मा नाहीं दाट । तेथें अवघें सरसपाट ।
आत्म्याविण बापुडें काष्ठ । काये जाणे ॥ १४ ॥
१४) जेथें सूक्ष्म व घनदाट भरलेला अंतरात्मा नाहीं तेथें सारे चैतन्यहीन असतें. अंतरात्मा जेथें नसतो तेथें चैतन्यहीन शुष्क लाकूड उरतें. त्याला अंतरात्मा कळत नाहीं. जेथें अंतरात्मा प्रगट होतो तेथेंच त्याचें ज्ञान करुन घेण्याची शक्यता असते.
ऐसें वरिष्ठ आत्मज्ञान । दुसरें नाहीं यासमान ।
सृष्टीमधें विवेकी सज्जन । तेचि हें जाणती ॥ १५ ॥
१५) या जगामध्यें आत्मज्ञान सर्वांत श्रेष्ठ आहे. त्याच्यासारखें दुसरें कांहीं नाहीं. जगांत जे विवेकी सज्जन असतात तेच ही गोष्ट जाणतात.
पृथ्वी आणी आप तेज । याचा पृथ्वीमध्यें समज ।
अंतरात्मा तत्वबीज । तें वेगळेंचि राहिलें ॥ १६ ॥
१६) पृथ्वी, आप आणि तेज या तिन्हींची गणना पृथ्वीतत्वांतच करणें योग्य आहे. या सगळ्या तत्वांचें मूळ असलेला अंतरात्मा सर्व भूतांहून भिन्न आहे.   
वायोपासून पैलिकडे । जो कोणी विवेकें पवाडे ।
जवळीच आत्मा सांपडे । तया पुरुषासी ॥ १७ ॥
१७) जो कोणी आत्मानात्मविवेकानें वायूच्या पलीकडे जातो त्याला स्वतःपाशींच अंतरात्मा सापडतो. 
वायो आकाश गुणमाया । प्रकृतिपुरुष मूळमाया ।
सूक्ष्मरुपें प्रचित येया । कठिण आहे ॥ १८ ॥
१८) वायु, आकाश, गुणमाया, प्रकृतिपुरुष, आणि मूळमाया ही सारीं अति सूक्ष्म आहेत. पृथ्वी, आप, तेज या तत्वांना कांहीतरी व्यक्त स्वरुप असल्यानें त्यांचा अनुभव घेतां येतो. परंतु त्यांच्या पलीकडील तत्वें सूक्ष्म असल्यानें त्यांचा अनुभव घेणें कठीण असतें. त्यांच्या पलीकडे अंतरात्मा आहे. 
मायादेवीच्या धांदली । सूक्ष्मीं कोण मन घाली ।
समजला त्याची तुटली । संदेहवृत्ती ॥ १९ ॥
१९) मूळमायेंतून निर्माण झालेल्या या पंचभूतांच्या धुमाकुळांत सूक्ष्म अंतरात्म्याचा विचार करण्यास कोणाला अवसर मिळत नाहीं. पण जो कोणी सूक्ष्माचा विचार करतो, त्याचे अज्ञान किंवा संदेह नाहीसा होतो. हे मात्र अगदी खरें आहे.  
मूळमाया चौथा देह । जाला पाहिजे विदेह ।
देहातीत होऊन राहे । धन्य तो साधु ॥ २० ॥
२०) मूळमाया म्हणजे मूळ संकल्प; " मी ब्रह्म आहे " ही जाणीव तेथें असते. ब्रह्मांडाचा तो चौथा देह होय. त्याचें भान गेलें पाहिजे. म्हणजे तेथें विदेह होतां येते. अशारीतीनें जो सर्व देह ओलांडून जातो तो साधु धन्य होय. 
विचारें ऊर्ध चढती । तयासी च ऊर्धगती ।
येरां सकळां अधोगती । पदार्थज्ञानें ॥ २१ ॥  
२१) जो कोणी विचारानें अधिकाधिक सूक्ष्मांत जातो, तो अत्यंत सूक्ष्म असणार्‍या ब्रह्मापर्यंत वर जातो. बाकीचे सारे दृश्य पदार्थंच्या ज्ञानामध्यें गुंततात. ते अर्थांतच खालीच अडकतात.
पदार्थ चांगले दिसती । परी ते सवेंचि नासती ।
अतो भ्रष्ट ततो भ्रष्ट होती । लोक तेणें ॥ २२ ॥
२२) दृश्य पदार्थ दिसायला चांगलें असतात खरें, पण ते लगेच नाश पावतात. असें असल्यानें दृश्यांत गुंतून राहणार्‍यांना हा लोक आणि परलोक दोन्ही अंतरतात.
याकारणें पदार्थज्ञान । नाना जिनसीचा अनुमान ।
सर्व सांडून निरंजन । धुंडीत जावें ॥ २३ ॥
२३) या कारणांसाठी अनेक दृश्य पदार्थाचें ज्ञान सोडावें. अनेक प्रकारच्या दृश्यासंबंधी कल्पना बाजूस साराव्यात. आणि सारें सोडून स्वच्छ ब्रह्म शोधावें. 
अष्टांग योग पिंडज्ञान । त्याहून थोर तत्वज्ञान ।
त्याहून थोर आत्मज्ञान । तें पाहिलें पाहिजे ॥ २४ ॥
२४) अष्टांगयोग आणि पिंडज्ञान हें ज्ञान आहें खरें, पण त्याहून तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. तत्वज्ञानाहून आत्मज्ञान थोर आहे. म्हणून माणसानें आत्मज्ञान करुन घ्यावें.   
मूळमायेचे सेवटीं । हरिसंकल्प मुळीं उठी ।
उपासनायोगें मिठी । तेथें घातली पाहिजे ॥ २५ ॥
२५) तत्वांचा शोध घेतां घेतां मूळमायेच्या मुळापर्यंत जावें. तेथें प्रथम स्फूरण आढळेल. त्या प्रथम संकल्पाला उपासनेच्या सहाय्यानें मिठी मारावी. उपासनेंत मी उपासक व अंतरात्मा उपास्य असतो. मी अंतरात्म्याशी तदाकार झाला कीं उपासना फळास आली असें समजावें. 
मग त्यापैलिकडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण ।
निर्मळ निश्र्चळ त्याची खूण । गगनासारिखी ॥ २६ ॥
२६) अंतरात्म्याच्या पलीकडे अगदी एकरस, निर्गुण, निर्मळ व निश्र्चळ परब्रह्म आहे. तें आकाशासारखें आहे. हीच त्याची खूण समजावी. 
येथून तेथवरी दाटलें । प्राणीमात्रास भेटलें ।
पदार्थमात्रीं लिगटलें । व्यापून आहे ॥ २७ ॥
२७) येथून तेथपर्यंत तें ब्रह्म सगळीकडें दाट भरलेलें आहे. सर्व प्राण्यांना तें सर्वकाळ भेटतें. सर्व पदार्थांना तें आंतबाहेर लागून आहे. कारण तें सर्व ठिकाणीं व्याप्त आहे.  
त्याऐसें नाहीं थोर । सूक्ष्माहून सूक्ष्म विचार ।
पिंडब्रह्मांडाचा संव्हार । होतां कळे ॥ २८ ॥   
२८) त्या ब्रह्माहून दुसरें कांहींहि श्रेष्ठ नाहीं. तें सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म विचारानें पिंडब्रह्मांडाचा निरास झाला म्हणजे तें ब्रह्म कळतें.
अथवा पिंड ब्रह्मांड असतां । विवेकप्रळये पाहों जातां ।
शाश्वत कोण हें तत्वता । उमजों लागे ॥ २९ ॥
२९) अथवा पिंडब्रह्मांड जसेंच्या तसें राहून विवेकप्रलयानें पाहूं गेलें तर खरें शाश्वत काय हें उमजायला लागते. 
करुन अवघा तत्वझाडा । सारासाराचा निवाडा । 
सावधपणें ग्रन्थ सोडा । सुखिनावें ॥ ३० ॥
३०) सर्व तत्वांचा शोध घेऊन त्यांचा निरास करावा. , सारासार विचार करुन सार निवडावें, आणि मग सावधपणें ग्रंथ बाजूस ठेवून सुखी व्हावें. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रवणनिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Shravan Nirupan
समास तिसरा श्रवणनिरुपण 
Custom Search

No comments: