Tuesday, May 22, 2018

Samas Dusara ShivShakti Nirupan समास दुसरा शिवशक्ति निरुपण


Dashak Satarava Samas Dusara ShivShakti Nirupan 
Samas Dusara ShivShakti Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about ShivShakti.
समास दुसरा शिवशक्ति निरुपण 
श्रीराम ॥
ब्रह्म निर्मळ निश्र्चळ । जैसें गगन अंतराळ ।
निराकार केवळ । निर्विकारी ॥ १ ॥
१) ज्याप्रमाणें अवकाशरुपी आकाश निर्मळ व निश्र्चळ आहे. तसेंच ब्रह्मदेखील आहे. निराकार असून ते अगदी निर्विकार आहे.    
अंतचि नाहीं तें अनंत । शाश्र्वत आणी सदोदित ।
असंत नव्हे तें संत । सर्वकाळ ॥ २ ॥
२) शाश्वत आणी सदैव विलसणारें ब्रह्म अंत नसल्यानें अनंत आहे. कधीहीं नाहीं असें होत नसल्यानें तें सर्वकाळ असतेंच असतें.  
परब्रह्म तें अविनाश । जैसें आकाश अवकाश ।
न तुटे न फुटे  सावकाश । जैसें तैसें ॥ ३ ॥
३) अवकाशमय आकाश जसें अविनाशीं असतें तसेंच ब्रह्म अविनाशी आहे. तें तुटत नाहीं किंवा फुटत नाहीं. तें जसेंच्या तसें अगदी शांत असते.   
तेथें ज्ञान ना अज्ञान । तेथें स्मरण ना विस्मरण ।
तेथें अखंड निर्गुण । निरावलंबी ॥ ४ ॥
४) ब्रह्माच्या ठिकाणीं जसें अज्ञान नाहीं तसें ज्ञान पण नाहीं. जसें विस्मरण नाहीं तसेंच स्मरण पण नाहीं. तें अखंड, निर्गुण आणि संपूर्ण निरावलंबी आहे.  
तेथें चंद्र सूर्य ना पावक । नव्हे काळोखें ना प्रकाशक ।
उपाधीवेगळें येक । निरोपाधी ब्रह्म ॥ ५ ॥
५) तेथें विश्वाचा मागमूस नसल्यानें चंद्र, सूर्य व अग्नि यांचें अस्तित्व नाहीं. अंधार व उजेड करणारें कांहीं नाहीं. कोणतीहि उपाधी नसलेलें असें अगदी निरुपाधी ब्रह्म असते. 
निश्र्चळीं स्मरण चेतलें । त्यास चैतन्य ऐसें कल्पिलें ।
गुणासमानत्वें जालें । गुणसाम्य ऐसें ॥ ६ ॥
६) अशा या निश्र्चळ ब्रह्मामध्यें स्वतःचे स्मरण स्फूरलें. तें चित्स्वरुप आहे अशी कल्पना केली. त्या मूळ संकल्पांत गुणांचा समतोलपणा असल्यानें गुणसाम्य असतें.  
गगनीं आली अभ्रछाया । तैसी जाणिजे मूळमाया ।
उद्भव आणी विलया । वेळ नाहीं ॥ ७ ॥
७) आकाशांत ज्याप्रमाणें अभ्र येते, व आकाश झाकतें; त्याप्रमाणें ब्रह्मामध्यें स्मरणरुप मूळमाया उत्पन्न झाली.ती निर्माण होण्यास व लयास जाण्यास वेळ लागत नाहीं.     
निर्गुणीं गुणविकारु । तोचि शड्गुणैश्र्वरु ।
अर्धनारी नटेश्र्वरु । तयास म्हणिजे ॥ ८ ॥
८) निर्गुणामध्यें जो संकल्परुप गुणविकार निर्माण होतो त्यास षड्गुणैश्र्वर किंवा अर्धनारी नटेश्र्वर म्हणतात. 
आदिशक्ति शिवशक्ति । मुळीं आहे सर्वशक्ति ।
तेथून पुढें नाना वेक्ती । निर्माण जाल्या ॥ ९ ॥
९) आदिशक्ति, शिवशक्ति इत्यादि सर्वशक्ति मूळमायेंतच असतात. त्यांच्यातूनच पुढें अनेक व्यक्त दृश्य पदार्थ निर्माण होतात.  
तेथून पुढें शुद्धसत्व । रजतमाचें गूढत्व । 
तयासि म्हणिजे महत्तत्त्व । गुणक्षोभिणी ॥ १० ॥
१०) मूळमायेंतूनच नंतर शुद्धसत्त्व निर्माण होते. त्याच्यामध्यें रजोगुण व तमोगुण गुप्तपणें वास करतात. त्यास महत्तत्व किंवा गुणक्षोभिणी म्हणतात.
मुळीं असेचिना वेक्ती । तेथें कैंची शिवशक्ती ।
ऐसें म्हणाल तरी चित्तीं । सावधान असावें ॥ ११ ॥
११) मूळमायेमध्यें व्यक्ति नसते. तेथें आकार नसतो, मग शिवशक्ति कशी असणार.? असा प्रश्र्ण विचाराल तर नीट लक्ष देऊन ऐका. 
ब्रह्मांडावरुन पिंड । अथवा पिंडावरुन ब्रह्मांड ।
अधोर्ध पाहातां निवाड । कळों येतो ॥ १२ ॥
१२) ब्रह्मांडाचा शोध घेऊन पिंड ओळखावा. किंवा पिंदाचा शोध घेऊन ब्रह्मांड ओळखावें. स्थूलाकडून सूक्ष्माकडे किंवा सूक्ष्माकडून स्थूळाकडे विचार करीत गेल्यास याचा उलगडा होतो.
बीज फोडून आणिलें मना । तेथें फळ तों दिसेना ।
वाढत वाढत पुढें नाना । फळें येती ॥ १३ ॥
१३) फळांमध्यें बी असतें. तें बी फोड ून पाहिलें तर तर त्यामध्यें फळ दिसत नाहीं. परंतु तेंच बी पेरलें व उगवलें म्हणजें वाढत जातें व त्यास अनेक फळें येतात.   
फळ फोडितां बीज दिसे । बीज फोडितां फळ नसे ।
तैसा विचार असे । पिंडब्रह्मांडीं ॥ १४ ॥
१४) फळ फोडून पाहिलें तर त्यांत बी दिसतें पण बी फोडून पाहिलें तर त्यांत फळ दिसत नाहीं. हाच विचार पिंडब्रह्मांडाच्या विवरणाला लागूं पडतो.    
नर नारी दोनी भेद । पिंडीं दिसती प्रसिद्ध ।
मुळीं नस्तां विशद । होतील कैसीं ॥ १५ ॥
१५) पिंडामध्यें नरनारी असा भेद दिसतो हें प्रसिद्ध आहे. मुळांतच हा भेद असला पाहिजे नाहींतर हा पुढें प्रगट झाला नसता. या कारणानें मूळमायेला शिवशक्ति किंवा अर्धनारीनटेश्र्वर म्हणतात.   
नाना बीजरुप कल्पना । तींत काये येक असेना ।
सूक्ष्म म्हणोनि भासेना । येकायेकीं ॥ १६ ॥ 
१६) मूळमायेमध्यें अनेक कल्पना बीजरुपानें असतात. पुढें व्यक्त दशेंत दिसणारे सर्वकांहीं तिच्यांत असतें. पण तें अत्यंत सूक्ष्म असल्यानें सहजगत्या अनुभवास येत नाहीं.             
स्थूळाचें मूळ ते वासना । ते वासना आधीं दिसेना ।
स्थूळावेगळें अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥
१७) जें दृश्य स्थूल दिसतें त्याचे मूळ वासनेमधें असतें. वासना सूक्ष्म असल्यानें ती आधीं दिसत नाहीं. म्हणून स्थूलाहून वेगळें कांहीं सूक्ष्म आहे अशी कल्पना होत नाहीं. 
कल्पनेची सृष्टी केली । ऐसीं वेदशास्त्रें बोलिलीं । 
दिसेना म्हणोन मिथ्या केली । न पाहिजेत कीं ॥ १८ ॥
१८) केवळ कल्पनेंतूनच सृष्टि निर्माण झाली असें वेद व शास्त्रें सांगतात. ती कल्पना स्थूलपणें दिसत नाहीं म्हणून ती खोटी मानणें बरोबर नाहीं. 
पडदा येकायेका जन्माचा । तेथें विचार कळे कैंचा ।
परंतु गूढत्व हा नेमाचा । ठाव आहे ॥ १९ ॥
१९) जीव आणि ब्रह्मांड यांच्यामधें अनेक पडदे आहेत. जीवाचा एकेक जन्म म्हणजे एकएक पडदा असतो. अनेक जन्मांचे पडदे असल्यानें जीवाला सूक्ष्माचा विचार आकलन होत नाहीं. परंतु विश्वामधील रहस्य सूक्ष्मच आहे. गूढाच आहे. रहस्य सूक्ष्म व गूढ असणें हा विश्वाचा नियमच आहे.     
नाना पुरुषांचे जीव । नाना स्त्रियांचे जीव । 
येकचि परी देहस्वभाव । वेगळाले ॥ २० ॥
२०) जगांत इतकें पुरुष व इतक्या स्त्रीया आहेत . प्रत्येकाचा देहस्वभाव निराळा असतो. परंतु सर्वांचा जीव मात्र एकच असतो.   
नवरीस नवरी नलगे । ऐसा भेद दिसों लागे ।
पिंडावरुन उमगे । ब्रह्मांडबीज ॥ २१ ॥
२१) नवरीला नवरी नको असते, नवरा हवा असतो. असा भेद आढळतो. पिंडामध्ये दिसणार्‍या या भेदावरुन ब्रहमांडाचे बीज कसें असेल याची कल्पना येते. 
नवरीचें मन नवर्‍यावरी । नवर्‍याचें मन नवरीवरी ।
ऐसी वासनेची परी । मुळींहून पाहावी ॥ २२ ॥
२२) नवरीचे मन नवर्‍यावर असते. तर नवर्‍याचे मन नवरीवर असते. वासनेचा हा प्रकार अगदी मुळापर्यंत शोधून बघावा.   
वासना मुळींची अभेद । देहसमंधें जाला भेद ।
तुटतां देहाचा समंध । भेद गेला ॥ २३ ॥
२३) वास्तविक मूळ वासनेमध्यें स्त्री पुरुष भेद नाहीं.केवळ देहासंबंधानें आपल्याला भेद दिसतो. देहाचा संबंध सुटला कीं भेद नाहींसा होतो.
नरनारीचें बीजकारण । शिवशक्तीमधें जाण ।
देह धरितां प्रमाण । कळों आलें  ॥ २४ ॥
२४) स्त्री पुरुष या भेदाचे मूळ कारण शिवशक्तीमधें आहे. देह आकाराला आला कीं त्यावरुन हें कळतें. 
नाना प्रीतीच्या वासना । येकाचें येकास कळेना ।
तिक्षण दृष्टीनें अनुमाना । कांहीसें येतें ॥ २५ ॥
२५) प्रेमाच्या वासनेचे अनेक प्रकार आहेत. एक प्रकार दुसर्‍यासारखा नसतो. सूक्ष्म दृष्टीनें पाहिलें तर हें थोडें ध्यानांत येते.  
बाळकास वाढवी जननी । हें तों नव्हे पुरुशाचेनी ।
उपाधी वाढे जयेचेनी । ते हे वनिता ॥ २६ ॥
२६) आई मुलाला वाढवते, हे पुरुषाच्यानें होणार नाहीं. स्त्रीच्या योगानें उपाधी वाढत असते.  
वीट नाहीं कंटाळा नाहीं । आलस्य नाहीं त्रास नाहीं ।
इतुकी माया कोठेंचि नाहीं । मातेवेगळी ॥ २७ ॥
२७) खरोखर आईला वीट नाहीं, आळस नाहीं आणि त्रासही वाटत नाहीं. आईखेरीज इतकी माया कोठेंच आढळत नाहीं.    
नाना उपाधी वाढऊं जाणे । नाना मायेनें गोऊं जाणे ।
नाना प्रीति लाऊं जाणे । नाना प्रपंचाची ॥ २८ ॥ 
२८) मानवी जीवनांत स्त्री अनेक उपाधि वाढवते. प्रेमानें गुंतवून ठेवते. आणि अनेक प्रकारेप्रपंचाचें प्रेम लावतें.           
पुरुषास स्त्रीचा विश्र्वास । स्त्रीस पुरुशाचा संतोष ।
परस्परें वासनेस । बांधोन टाकिलें ॥ २९ ॥
२९) पुरुषाला स्त्रीचा विश्र्वास असतो. स्त्रीला पुरुषाचा संतोष असतो. अशा रीतेेनें वासना एकमेकांस एके ठिकाणीं बांधून ठेवते.
ईश्र्वरें मोठें सूत्र केलें । मनुष्यमात्र गुंतोन राहिलें ।
लोभाचे गुंडाळें केलें । उगवेना ऐसें ॥ ३० ॥
३०) ईश्र्वरानें ही एक मोठी युक्ती केली आहे. तिनें सारी माणसें परस्परांत गुंतून राहीली आहेत. त्यानें लोभाचे असें गुंडाळें करुन ठेवलें आहे कीं तें उकलत नाहीं. 
ऐसी परस्परें आवडी । स्त्रीपुरुषांची माहां गोडी ।
हे मुळींहून चालिली रोकडी । विवेकें पाहावी ॥ ३१ ॥
३१) स्त्रीपुरुषांमधें परस्परांत अशी आवड असते. त्यांना एकमेकांची मोठीच गोडी वातते. हें परस्परांचे आकर्षण अगदी मुळापासून चालत आलेले आहे. असें स्पष्टपणें दिसतें. सूक्ष्म विवेकानें तें पाहावें.  
मुळीं सूक्ष्म निर्माण जालें । पुढें पष्ट दिसोन आलें ।
उत्पत्तीचे कार्य चाले । उभयतांकरितां ॥ ३२ ॥
३२) अगदी मुळांत स्त्रीपुरुष भेद अत्यंत सूक्ष्मपणें निर्माण होतो. नंतर तो स्पष्टपणें दिसूं लागतो. स्त्रीपुरुषांच्या जोडीनें उत्पत्तीचे कार्य चालते. 
मुळीं शिवशक्ति खरें । पुढें जालीं वधुवरें ।
चौर्‍यासि लक्ष विस्तारें । विस्तारली जे ॥ ३३ ॥
३३) आरंभी मुळांत शिवशक्ति ही खरी, तीच पुढें नवराबायको झाली. त्यांच्यापासून चौर्‍यांशी लक्ष योनींचा विस्तार झाला. 
येथें शिवशक्तीचें रुप केले । श्रोतीं मनास पाहिजे आणिलें ।
विवरलियांविण बोलिलें । तें वेर्थ जाणावें ॥ ३४ ॥
३४) या समासांत शिवशक्तीचें स्वरुप वर्णन केले.श्रोत्यांनी तें समजून घ्यावें. नीट विवरण केल्यांवाचून बोलूं नये.; नाहींतर तें बोलणें व्यर्थ असते.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शिवशक्तिनिरुपणनाम समसा दुसरा ॥   
Samas Dusara ShivShakti Nirupan 
समास दुसरा शिवशक्ति निरुपण 


Custom Search

No comments: