Saturday, May 12, 2018

Samas Satava MahatBhoot Nirupan समास सातवा महदभूत निरुपण


Dashak Solava Samas Satava MahatBhoot Nirupan
Samas Satava MahatBhoot Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about MahatBhoot i.e. Anaratma. information of Antaratma is given in this samas. Every animal and every living is dependent on Antaratma.
समास सातवा महदभूत निरुपण 
श्रीराम ।
पृथ्वीचें मूळ जीवन । जीवनाचें मूळ अग्न ।
अग्नीचें मूळ पवन । मागां निरोपिलें ॥ १ ॥
१) पृथ्वीचे मूळ पाणी, पाण्याचे मूळ अग्नि, अग्निचे मूळ वायु हे मागें सांगून झालें.
आतां ऐका पवनाचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।
अत्यंतचि चंचळ । सकळांमधें ॥ २ ॥
२) आतां वायुचे मूळ ऐका. अंतरात्मा हा वायुचे मूळ आहे. सर्व सगुणांमधें तो चंचळ आहे.  
तो येतो जातो दिसेना । स्थिर होऊन बैसेना ।
ज्याचें रुप अनुमानेना । वेदश्रुतीसी  ॥ ३ ॥ 
३) अंतरात्मा येतो व जातो, पण तो दिसत नाहीं. तो कधीं स्थिर होऊन बसत नाहीं. वेदश्रुतींना त्याच्या रुपाची कल्पना करतां येत नाहीं.
मुळीं मुळींचें स्फुर्ण । तेंचि अंतरात्म्याचें लक्षण ।
जगदेश्र्वरापासून त्रिगुण । पुढें जाले ॥ ४ ॥
४) मूळ परब्रह्मामध्यें अगदी पहिलें जे स्फुरण झाले तेंच अंतरात्म्याचे लक्षण होय. तोच जगदीश्वर असून त्याच्यापासून पुढें तीन गुण झालें.
त्रिगुणापासून जालीं भूतें । पावलीं पष्ट दशेतें ।
त्या भूतांचें स्वरुप तें । विवेकें वोळखावें ॥ ५ ॥
५) तीन गुणांपासून पंचभूतें झाली. आणि पुढें त्यांना व्यक्तदशा आली. पंचभूतांचें व्यक्त किंवा अव्यक्त स्वरुप विवेकानें ओळखावें.
त्यामधें मुख्य आकाश । चौ भूतांमधें विशेष ।
याच्या प्रकाशें प्रकाश । सकळ कांहीं ॥ ६ ॥
६) पंचभूतांमध्यें आकाश मुख्य आहे. बाकीच्या चार भूतामपेक्षां आकाश कांहीं तरी विशेष आहे. त्याच्या प्रकाशानें इतर सर्व कांहीं प्रकाशते. 
येक विष्णु महद्भूत । ऐसा भूतांचा संकेत ।
परंतु याची प्रचीत । पाहिली पाहिजे ॥ ७ ॥
७) सर्व भूतांमध्यें एक विष्णु हें महद्भूत आहे, अशी सर्व भूतांची खूण आहे. परंतु याचा अर्थ काय आहे तें स्वानुभवानें पाहिलें पाहीजे.
विस्तारें बोलिलीं भूतें । त्या भूतामधें व्यापक तें ।
विवरोन पाहातां येते । प्रत्ययासी ॥ ८ ॥
८) पूर्वीं पंचभूतांचें विस्तारानें वर्णन केलें. त्याच्यामधें कोणतें मूळतत्व व्यापून आहे, ते विवरुन पाहावें. म्हणजे अंतरात्म्याचा प्रत्यय येतो. 
आत्मयाच्या चपळपणापुढें । वायो तें किती बापुडें ।
आत्म्याचे चपळपण रोकडें । समजोन पाहावें ॥ ९ ॥
९) अंतरात्मा अत्यंत सूक्ष्म व चंपळ आहे. गतिमान आहे. त्याच्या तुलनेनें वायुचे चपळपण कमी पडते. अंतरात्म्याचे चपलपण प्रत्यक्ष अनुभवानें समजून घ्यावें. 
आत्म्यावेगळें काम चालेना । आत्मा दिसेना ना आडळेना ।
गुप्तरुपें विचार नाना । पाहोन सोडी ॥ १० ॥
१०) आत्म्याशिवाय कोणतेही कार्य घडत नाहीं. पण अमतरात्मा कोठें दिसत नाही. तो स्वतः गुप्त राहून अनेक प्रकारचे विचार करतो. 
पिंड ब्रह्मांड व्यापून धरिलें । नाना शरीरीं विळासलें ।
विवेकी जनासी भासलें । जगदांतरीं ॥ ११ ॥   
११) पिंडांत तसेंच ब्रह्मांडांत तो व्यापून राहिला आहे. अनेक प्रकारच्या देहांत त्याचा विलास आढळतो. आत्मानात्मविवेकी पुरुषांना तो जगाच्या अंतर्यामी अनुभवास येतो. 
आत्म्याविण देहे चालती । हें तों न घडे कल्पांतीं ।
अष्टधा प्रकृतींच्या वेक्ती । रुपासी आल्या ॥ १२ ॥
१२) आत्म्याशिवाय देह चालणें कधींच शक्य नाहीं. अष्टधा प्रकृतीमधें असणारे अव्यक्त घटक म्हणजें पंचभूतें आणि तीन गुण. त्यांना अंतरात्म्यामुळें व्यक्त रुप प्राप्त होते. 
मुळापासून सेवटवरी । सकळ कांहीं आत्माच करी ।
आत्म्यापैलीकडे निर्विकारी । परब्रह्म तें ॥ १३ ॥
१३) अगदी मूळापासून तें थेट अखेरपर्यंत जें जें कांहीं होत जाते तें तें सर्व कांहीं अंतरात्माच घडवून आणतो. या अंतरात्म्याच्या पलीकडे निर्विकार असें परब्रह्म आहे. 
आत्मा शरीरीं वर्ततो । इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।
नाना सुखदुःखें भोगितो । देह्यात्मयोगें ॥ १४ ॥
१४) अंतरात्मा देहांत राहतो. तोच सर्व इंद्रियांना चेतना देतो. देहाशी संबंध आल्यानें अनेक प्रकारची सुखदुःखे तो भोगतो.  
सप्तकंचुक हें ब्रह्मांड । त्यामधें सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें आत्मा जाड । विवेकें वोळखा ॥ १५ ॥
१५) ब्रह्मांड सप्तकंचुकानें वेढलेलें आहे. तसेंच पिंडदेखील सप्तकंचुकानें वेढलेला आहे. पिंडामधें असणारा अतिसूक्ष्म अंतरात्मा विवेकानें ओळखावा.  
शब्द ऐकोन समजतो । समजोन प्रत्योत्तर देतो ।
कठीण मृद सीतोष्ण जाणतो । त्वचेमधें ॥ १६ ॥
१६) शब्द ऐकला कीं, आत्म्यास त्याचा अर्थ समजतो. अर्थ समजून तो त्याचे उत्तर देतो. त्वचेच्या द्वारा आत्मा मऊ, कठिण, थंड, गरम जाणतो. 
नेत्रीं भरोनी पदार्थ पाहाणें । नाना पदार्थ परीक्षणें ।
उंच नीच समजणें । मनामधें ॥ १७ ॥
१७) डोळ्यांत भरुन आत्मा पदार्थ पाहातो. अनेक वस्तूंची परीक्षा करतो. भारी आणी हलकी मनानें समजतो. 
क्रूरदृष्टी सौम्यदृष्टी । कपटदृष्टी कृपादृष्टी ।
नाना प्रकारींच्या दृष्टी । भेद जाणे ॥ १८ ॥
१८) क्रूर, सौम्य, कपट, कृपा असे नानाप्रकारचे दृष्टीभेद आत्माच जाणतो.  
जिव्हेमधें नाना स्वाद । निवडूं जाणे भेदाभेद ।
जें जें जाणें तें तें विशद । करुनी बोले ॥ १९ ॥
१९) जिभेनें तो अनेक प्रकारचे स्वाद ओळखतो, आणि त्यांच्यामधील भेद व अभेद दोन्ही जाणतो. त्याचप्रमाणें इतर जें जें जाणतो तें तें स्पष्ट करुन सांगतो. 
उत्तम अन्नाचे परिमळ । नाना सुगंध परिमळ ।
नाना फळांचे परिमळ । घ्राणइंद्रियें जाणे ॥ २० ॥
२०)  नाकाने तोच आत्मा उत्तम अन्नाचें सुगंध जाणतो. त्याचप्रमाणें इतर सुगंध  व फळांचे सुगंध तो नाकानें ओळखतो. 
जिव्हेने स्वाद घेणें बोलणें । पाणीइंद्रियें घेणें देणें ।
पादइंद्रियें येणें जाणें । सर्वकाळ ॥ २१ ॥
२१) जिभेनें स्वाद घेणें व बोलणें, हातांनी देणें व घेणें, पायांनी नेहमी येणें व जाणें,
शिस्नइंद्रियें सुरतभोग । गुदइंद्रियें मळोत्सर्ग ।
मनेंकरुनी सकळ सांग । कल्पून पाहे ॥ २२ ॥  
२२) जननेद्रियांनें कामसुख भोगणें, गुदानें मलोत्सर्ग करणें, मनानें सर्व सांगकल्पना करुन पाहणें,         
ऐेसे व्यापार परोपरी । त्रिभुवनीं येकलाचि करी ।
त्याची वर्णावया थोरी । दुसरा नाहीं ॥ २३ ॥
२३) असें नानाप्रकारचे व्यापार त्रिभुवनामध्यें हा एकटा अंतरात्माच करतो. त्याचा महिमा वर्णन करण्यास त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाहीं. 
त्याविण दुसरा कैचा । जे महिमा सांगावा तयाचा ।
व्याप आटोप आत्मयाचा । न भूतो न भविष्यति ॥ २४ ॥
२४) ज्याचा महिमा सांगता येईल असा अंतरात्म्याखेरीज जगांत दुसरा कोणी नाही. अंतरात्म्याचा विस्तार व त्याची कार्यशक्ति आजपर्यंत कधीं झाली नाही आणि पुढें कधी होणार नाहीं, अशी अद्वितीय आहे. 
चौदा विद्या चौसष्टी कळा । धूर्तपणाच्या नाना कळा ।
वेद शास्त्र पुराण जिव्हाळा । तेणेंविण कैचा ॥ २५ ॥ 
२५) चौदा विद्या, चौसष्ट कला, चतुरपणाच्या अनेक कला, वेदशास्त्रपुराणें यांचे रहस्य, या सर्व गोष्टी अंतरात्म्यामुळें होऊं शकतात. 
येहलोकींचा आचार । परलोकीं सारासार विचार ।
उभय लोकींचा निर्धार । आत्माच करी ॥ २६ ॥
२६) या जगांतील आचार, परमार्थांतील सारासार विचार, प्रपंच व परमार्थ दोन्हीचें निश्र्चित ज्ञान, अंतरात्माच करुन देतो.
नाना मतें नाना भेद । नाना संवाद वेवाद  ।
नाना निश्र्चय भेदाभेद । आत्माच करी ॥ २७ ॥
२७) अनेक प्रकारची मतें, त्यांच्यामधील अनेक प्रकारचे भेद, नाना प्रकारचे वाद, आणि संवाद, नाना प्रकारचे निश्र्चित निर्णय, आणि अनेक प्रकारचे भेदाभेद हे सर्व आत्माच करतो.  
मुख्य तत्व विस्तारलें । तेणें तयास रुप आणिलें ।
येणेंकरितां सार्थक जालें । सकळ कांहीं ॥ २८ ॥
२८) या सबंध चंचळ विश्वाचे मुख्य तत्व अंतरात्मा होय. त्या एकट्याचा विस्तार झाला. त्यामुळें त्याची अनेक व्यक्त रुपें झाली. यामुळें या सार्‍या दृश्य विश्वाला एक प्रकारचे सार्थकपण आले.   
लिहिणें वाचणें पाठांतर करणें । पुसणें सांगणें अर्थ करणें ।
गाणें वाजवणें नाचणें । आत्म्याचकरितां ॥ २९ ॥
२९) लिहिणें, वाचणें, पाठांतर करणें, विचारणें, सांगणें, अर्थ करणें, गाणें, बजावणें, नृत्य करणें या सगळ्या गोष्टी आत्म्याचे प्रेरणेनें घडतात. 
नाना सुखें आनंदतो । नाना दुःखें कष्टी होतो ।
देहे धरितो आणी सोडितो । नाना प्रकारें ॥ ३० ॥
३०) हा अंतरात्मा सुखानें आनंदून जातो. तर दुःखानें कष्टी होतो. तो अनेक प्रकारे देह धरतो आणि देह सोडतो. 
येकलाचि नाना देहे धरी । येकलाचि नटे परोपरी ।
नट नाट्यकळा कुसरी । त्याविण नाहीं ॥ ३१ ॥
३१) हा एकच एक अंतरात्मा अनेक देह धारण करतो. एकटाच तो नानापरीनें नटतो. नटाचें सोंग, नाट्य, आणि अभिनयाचे चातुर्य सारें अंतरात्म्याच्या योगानें चालते.
येकलाचि जाला बहुरुपी ।  बहुरुपी बहुसाक्षपी ।
बहुरुपें बहुप्रतापी । आणी लंडी ॥ ३२ ॥
३२) अंतरात्मा हा एकटाच एक खरा, पण बहुरुप्याप्रमाणें अनेक सोंगे घेतो, तो बहुरुपी असून मोठ उद्योगी आहे. त्याचा पुष्कळ पराक्रम व रुपें आहेत.  
येकलाचि विस्तारला कैसा । पाहे बहुविध तमासा ।
दंपत्येंविण कैसा । विस्तारला ॥ ३३ ॥
३३) अंतरात्मा हा एकच एक असतांना त्याचा येवढा विस्तार कसा झाला. हें एक आक्ष्चर्यच आहे. त्याचा देखावा नाना प्रकारचा आहे. दांपत्य नसून अंतरात्म्याचें  कुटुंब केवढे तरी विस्तारलें.  
स्त्रियांस पाहिजे पुरुष । पुरुषासी पाहिजे स्त्रीवेष ।
ऐसा आवडीचा संतोष । परस्परें ॥ ३४ ॥
३४) स्त्रीला पुरुष हवासा वाटतो तर पुरुषाला स्त्री हवीशी वाटते. एकमेकांच्या परस्पर आवडीमधें एकमेकांना संतोष वाटतो. 
स्थूळाचें मूळ तें लिंग । लिंगामधें हें प्रसंग ।
येणें प्रकारें जग । प्रत्यक्ष चाले ॥ ३५ ॥
३५) स्थूल देहाचे मूळ लिंगदेहामध्यें वावासनात्मक सूक्ष्मदेहामध्यें असतें. तेथील वासनेप्रमाणें पुरुष किंवा स्त्रीदेह प्राप्त होतो. याप्रमाणें जगप्रत्यक्ष चाललेलें आहे. 
पुरुषांचा जीव स्त्रियांची जीवी । ऐसी होती उठाठेवी ।
परी या सूक्ष्माची गोवी । समजली पाहिजे ॥ ३६ ॥
३६) पुरुषांचा तो जीव व स्त्रियांची ती जीवी, असें अज्ञानी लोक चुकीनें बोलतात. पण पुरुष किंवा स्त्रीदेह येणें हें सूक्ष्मदेजाच्या गुंतागुंतीवर अवलंबून असतें हें ध्यानांत ठेवावे.  
स्थूळाकरितां वाटे भेद । सूक्ष्मीं आवघेंचि अभेद ।
ऐसें बोलणें निरुध । प्रत्यया आले ॥ ३७ ॥ 
३७) स्थूलामध्यें हा भेद दिसतो खरा, पण सूक्ष्मामधें असा भेद मुळींच नाहीं. तेथें सगळा अभेद आहे. हें बोलणें निश्र्चितपणें अनुभवास येणारें आहे.     
बायकोनें बायकोस भोगिलें । ऐसें नाहीं कीं घडलें ।
बायकोस अंतरी लागलें । ध्यान पुरुषाचें ॥ ३८ ॥  
३८) स्त्रीनें स्त्रीचा उपभोग घेतला असें कांहीं कधीं घडत नाहीं. स्त्रीला मनांत पुरुषाचे ध्यान लागतें.   
स्त्रीसी पुरुष पुरुषास वधु । ऐसा आहे हा संमधु ।
याकारणें सूक्ष्म संवादु । सुक्ष्मीं च आहे ॥ ३९ ॥
३९) स्त्रीला पुरुष आणि पुरुषाला स्त्री हवी, असा हा संबंध आहे. या कारणानें या संबंधाची सूक्ष्म प्रक्रिया सूक्ष्म देहांतच सापडते. 
पुरुषइछेमधें प्रकृती । प्रकृतीमधें पुरुषवेक्ती । 
प्रकृतीपुरुष बोलती । येणें न्यायें ॥ ४० ॥
४०) पुरुषाच्या इच्छेमध्यें प्रकृतीची अभिव्यक्ती आणि प्रकृतीच्या विकासामधें पुरुषाची अभिव्यक्ती असा हा परस्पर संबंध आहे. या न्यायानेंच प्रकृतिपुरुष असें लोक म्हणतात.   
पिंडावरुन ब्रह्मांड पाहावें । प्रचीतीनें प्रचीतीस घ्यावें ।
उमजेना तरी उमजावें । विवराविवरों ॥ ४१ ॥
४१) आपण पिंडरचनेवरुन ब्रह्मांडरचना समजून घ्यावी. पिंडाच्या बाबतींतील प्रचीतीवरुन ब्रह्मांडाच्या बाबतींत प्रचीति घ्यावी. हें ध्यानांत येत नसेल तर वारंवार विचारणा करुन समजून घ्यावें.  
द्वैतइछा होते मुळीं । तरी ते आली भूमंडळीं ।
भूमंडळीं आणी मुळीं । रुजु पाहावें ॥ ४२ ॥   
४२) द्वैतइच्छा अगदी मूळांत झाली, तेथून ती दृश्यांत पृथ्वीवर आली. येथील द्वैतइच्छा आणि अगदी मूळ द्वैतइच्छा या दोन्हींचा मेळ घालावा.   
येथें मोठा जाला साक्षेप । फिटला श्रोत्यांचा आक्षेप ।
जे प्रकृतीपुरुषाचें रुप । निवडोन गेलें ॥ ४३ ॥
४३) प्रकृति व पुरुष यांचें स्वरुप नीटपणें व स्पष्टपणें कळलें आणि श्रोत्यांच्या शंकांचे समाधान झालें. हें एक मोठेंच काम झालें. असें म्हणण्यास हरकत नाहीं. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे महद्भूतनिरुपणनाम समास सातवा ॥ 
Samas Satava MahatBhoot Nirupan
समास सातवा महदभूत निरुपण 



Custom Search

No comments: