Thursday, May 3, 2018

Samas Tisara Pruthvi Stavan Nirupan समास तिसरा पृथ्वीस्तवन निरुपण


Dashak Solava Samas Tisara Pruthvi Stavan Nirupan 
Samas Tisara Pruthvi Stavan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pruthvi. Pruthvi stuti i.e. praise of Pruthvi is done in this samas. Every animal and every living is dependent on Pruthvi i.e. earth.
समास तिसरा पृथ्वीस्तवन निरुपण
श्रीराम ॥
धन्य धन्य हे वसुमती । इचा महिमा सांगों किती ।
प्राणीमात्र तितुके राहाती । तिच्या आधारें ॥ १ ॥
१) ही पृथ्वी खरोखरीच धन्य होय. हिचा महिमा सांगावा तेवढा थोडाच आहे. अगदी सगळे प्राणी तिच्या आधारानें राहतात.   
अंतरीक्ष राहाती जीव । तोहि पृथ्वीचा स्वभाव ।
देहे जड नस्तां जीव । कैसे तगती ॥ २ ॥ 
२) आकाशांत राहणार्‍या जीवांनासुद्धा पृथ्वीचाच आधार असतो. कारण देह पृथ्वी तत्वाचा बनलेल असतो. आणि देजावाचून जीव जगूं शकत नाहीं.
जाळिती पोळिती कुदाळिती । नांगरिती उकरिती खाणती ।
मळ मूत्र तिजवरी करिती । आणी वमन ॥ ३ ॥
३) लोक पृथ्वीला जाळतात, पोळतात कुदळीनें खणतात, नांगरतात, उकरतात खणून काढतात. तिच्यावर मलमूत्र टाकतात व ओकतात. 
नासकें कुजकें जर्जर । पृथ्वीविण कैची थार ।
देह्यांतकाळीं शरीर । तिजवरी पडे ॥ ४ ॥
४) नासके, कुजके, अति जीर्ण झालेल्या पदार्थांना पृथ्वीचाच आधार असतो. अंतकाळीं प्राण्याचा देह पृथ्वीवरच पडतो. 
बरें वाईट सकळ कांहीं । पृथ्वीविण थार नाहीं ।
नाना धातु द्रव्य तें हि । भूमीचे पोटीं ॥ ५ ॥
५) सगळें बरें-वाईट जें आहे त्याला पृथ्वीचाच आधार असतो. अनेक धातु व द्रव्यें पृथ्वीच्याच पोटांत सापडतात. 
येकास येक संव्हारिती । प्राणी भूमीवरी असती ।
भूमी सांडून जाती । कोणीकडे ॥ ६ ॥
६) एकमेकांनी एकमेकांचा संहार केला तरी ते दोघेही पृथ्वीवेच असतात. पृथ्वी सोडून दुसरीकडे कोणीं जाऊंच शकत नाहीं.
गड कोट पुरें पट्टणें । नाना देश कळती अटणें ।
देव दानव मानव राहाणें । पृथ्वीवरी ॥ ७ ॥
७) गड, कोट, गांवें, आणि शहरें, आणी नाना प्रकारचे देश, पृथ्वीवरच आहेत. प्रवास केला म्हणजे ते कळतात. देव, दानव आणि मानव यांचे राहणें पृथ्वीवरच असतें. 
नाना रत्नें हिरे परीस । नाना धातु द्रव्यांश ।
गुप्त प्रगट कराव्यास । पृथ्वीविण नाहीं ॥ ८ ॥
८) नाना प्रकारची रत्नें, हिरे, परिस अनेक प्रकारचे धातु आणि द्रव्यें पृथ्वीमध्यें गुप्त असतात. त्यांना प्रगट करण्यास पृथ्वीखेरीजमार्ग नाहीं. 
मेरुमांदार हिमाचळ । नाना अष्टकुळाचळ ।
नाना पक्षी मछ व्याळ । भूमंडळीं ॥ ९ ॥
९) मेरु, मांदार, हिमालय तसेंच आठ कुलाचल पर्वत, नाना प्रकारचे पक्षी, मासे, आणि सर्प यांचा आधारही पृथ्वीच आहे. 
नाना समुद्रापैलीकडे । भोंवतें आवर्णोदका कडें ।
असंभाव्य तुटले कडे । भूमंडळाचे ॥ १० ॥
१०) अनेक समुद्रांपलीकडे पृथ्वीच्या सभोवती असलेल्या आवर्णोदकाकडे पृथ्वीचे मोठमोठे तुटलेले कडे आहेत.  
त्यामधें गुप्त विवरें । लाहानथोरें अपारें ।
तेथें निबिड अंधकारें । वस्ती कीजे ॥ ११ ॥
११) त्यामध्यें लहानमोठी अशी खूप गुप्त विवरें आहेत. त्या विवरांच्यामध्यें अगदी गाढ अंधार भरलेला आहे.  
आवर्णोदक तें अपार । त्याचा कोण जाणे पार ।
उदंड दाटले जळचर । असंभाव्य मोठे ॥ १२ ॥
१२) आवरणोदक इतकें अपार आहे कीं त्याचा अंतच लागत नाहीं. त्यामध्यें प्रचंड शरीराचे जलचर पुष्कळच आहेत.   
त्या जीवनास आधार पवन । निबिड दाट आणी घन ।
फुटों शकेना जीवनसा  । कोणेकडे ॥ १३ ॥
१३) त्या आवरणोदकाला वार्‍याचा आधार आहे. हा वायु गहन दाट आणि घट्ट आहे. म्हणून तें पाणी कोणत्याहि बाजूनें वाहून जात नाही. 
त्या प्रभंजनासी आधार । कठीणपणें अहंकार ।
ऐसा त्या भूगोळाचा पार । कोण जाणे ॥ १४ ॥
१४) त्या वायूला आधार आहे घट्ट व कठीण अहंकाराचा. हा अहंकार जड द्रव्याचा म्हणजे पृथ्वीचा बनलेला आहे. असा त्या भूगोलाचा विस्तार कोणीच जाणत नाहीं. 
नाना पदार्थांच्या खाणी । धातुरत्नांच्या दाटणी ।
कल्पतरु चिंतामणी । अमृतकुंडें ॥ १५ ॥
१५) पृथ्वीवर अनेक पदार्थांच्या खाणीं आहेत. त्यांत खूप धातु व रत्नें आहेत. शिवात कल्पतरु, चिंतामणि आणि अमृतकुंडे पृथ्वीवरच आहेत.  
नाना दीपें नाना खंडें । वसती उद्वसें उदंडे ।
तेथें नाना जीवनाचीं बंडें । वेगळालीं ॥ १६ ॥
१६) अनेक बेटें आहेत. अनेक खंडे आहेत. त्यावर अगदी ओसाड प्रदेश आहे तसाच अनेक प्रकारच्या जीवप्राण्यांनी भरलेला प्रदेश आहे.  
मेरुभोवते कडे कापले । असंभाव्य कडोसें पडिलें ।
निबिड तरु लागले । नाना जिनसी ॥ १७ ॥
१७) मेरुभोवती कापलेले कडे आहेत. त्यांतून पुष्कळ कवडसे पडतात. नाना पदार्थांचे भरपूर वृक्ष उगवलेले आहेत.  
त्यासन्निध लोकालोक । जेथें सूर्याचे फिरे चाक ।
चंद्रादि द्रोणाद्रि मैनाक । माहां गिरी ॥ १८ ॥
१८) त्याच्याजवळ लोकालोक पर्वत आहे. तेथें सूर्याचे चक्र फिरत असते. चंद्रपर्वत, द्रोणपर्वत, मैनाक असे मोठे पर्वत आहेत. 
नाना देशीं पाषाणभेद । नाना जिनसी मृतिकाभेद ।
नाना विभूति छंद बंद । नाना खाणी ॥ १९ ॥
१९) निरनिराळ्या देशांत निरनिराळें दगड आहेत. निरनिराळ्या प्रकारची माती आहे. नाना प्रकारच्या विभूति आहेत. छंद आहेत. बंद खाणी आहेत.
बहुरत्न हे वसुंदरा । ऐसा पदार्थ कैचा दुसरा ।
अफाट पडिलें सैरावैंरा । जिकडे तिकडे ॥ २० ॥
२०) त्यामुळेंच पृथ्वीला " बहुरत्न वसुंधरा " म्हणतात. पृथ्वीसारखा दुसरा पदार्थ नाहीं. पृथ्वी जिकडे तिकडे अफाट पसरलेली आहे.  
अवघी पृथ्वी फिरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
दुजी तुळणा न साहे । धरणीविषीं ॥ २१ ॥
२१) सगळ्या पृथ्वीवर प्रवास करुन ती पाहणारा कोणीच माणूस नाहीं. पृथ्वीशी तुलना करतां येईल असा दुसरा पदार्थ नाहीं.
नाना वल्ली नाना पिकें । देसोदेसीं  अनेकें ।
पाहों जातां सारिख्या सारिखें । येक हि नाहीं ॥ २२ ॥
२२)  निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या वनस्पति व पिकें असतात. पाहावयास गेलें तर त्यापैकी एकासारखें एक नसतें.
स्वर्ग मृत्यु आणी पाताळें । अपूर्व रचिलीं तीन ताळें ।
पाताललोकीं माहां व्याळें । वस्ती कीजे ॥ २३ ॥
२३) स्वर्ग, मृत्यु व पाताळ अशी तीन ताळें त्यानें रचिली आहेत. पाताळांत प्रचंड सर्पांची वस्ती आहे.  
नाना वल्ली बीजांची खाणी । ते हे विशाळ धरणी ।
अभिनव कर्त्याची करणी । होऊन गेली ॥ २४ ॥
२४) ही अति विशाळ पृथ्वी म्हणजे नाना प्रकारच्या वनस्पतिंच्या बीजांची खाणच आहे. अंतरात्म्याची ही मोठी विलक्षण करणी होऊन गेली.
गड कोठ नाना नगरें । पुरें पट्टणें मनोहरें ।
सकळां ठाईं जगदेश्र्वरें । वस्ती कीजे ॥ २५ ॥
२५) गड, कोट, अनेक गांवें आणि लहान मोठी सुंदर शहरें, या सर्वांमध्यें जगदीश्र्वराची वस्ती असते.
माहां बळी होऊन गेले । पृथ्वीवरी चौताळले ।
सामर्थ्यें निराळे राहिले । हें तों घडेना ॥ २६ ॥
२६) पूर्वी अतिशय बलवान पुरुष होऊन गेले. या पृथ्वीवरच मोठा पराक्रम गाजविला. व स्वसामर्थ्यानें पृथ्वीहून निराळे राहिले असें कांहीं झालें नाहीं.
असंभाव्य हे जगती । जीव कितीयेक जाती ।
नाना अवतारपंगती । भूमंडळावरी ॥ २७ ॥
२७) ही पृथ्वी पुनः अशी होण्याचा संभव नाहीं. या पृथ्वीवर असंख्य जीव होऊन जातात. अनेक अवतारसुद्धा या भूमंडळावर झालें. 
सध्यां रोकडे प्रमाण । कांहीं करावा नलगे अनुमान ।
नाना प्रकारीचें जीवन । पृथ्वीचेनि आधारें ॥ २८ ॥
२८) आजसुद्धा असा पुरावा आहे कीं, पृथ्वीच्या आधारानेंच नाना प्रकारचे जीव जीवन जगतात. त्यासाठीं कांहीं कल्पना करण्याचे कारण नाहीं. 
कित्येक भूमी माझी म्हणती । सेवटीं आपणचि नरोन जाती ।
कित्येक काळ होतां जगती । जैसी तैसी ॥ २९ ॥
२९) कांहीं लोक जमीन माझी असें म्हणतात. शेवटीं आपणच मरुन जातात. पण कितीही काळ गेला तरी पृथ्वी जशींच्या तशींच राहातें.  
ऐसा पृथ्वीचा महिमा । दुसरी काये द्यावी उपमा ।
ब्रह्मादिकापासुनी आम्हां । आश्रयोचि आहे ॥ ३० ॥
३०) पृथ्वीचा महिमा हा असा आहे. तिला दुसरी उपमा देतां येत नाहीं. ब्रह्मादिकांपासून थेट आमच्यापर्यंत सर्वांना पृथ्वीचाच आधार आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पृथ्वीस्तवननिरुपणनाम समास तिसरा ॥ 
Samas Tisara Pruthvi Stavan Nirupan
समास तिसरा पृथ्वीस्तवन निरुपण


Custom Search

No comments: