Thursday, February 25, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 22 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बावीसावा (२२) भाग २/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 22 
Kilotala went to Sinhaldwip with Uparicharvasu. She was Padmini of Sinhaldwip who had been on the earth because of the curse from Uparicharvasu. Uparicharvasu assured her that after 12 years he would bring Machchhindra to her. Then she would meet Meennath and Goraksha also. Goraksha with Machchhindra and Meennath went for tirthyatra leaving female kingdom. Goraksha on the way showed the place to Machchhindra where he met with Kanifa. He told everything he knew about Jalindar to Machchhindra. Then in the Helapattanam they met Mainavati mother of Gopichand. Goraksha and Machchhindra were testing each other whether they had with them having the principles of the Nath-Panth or not. Now in the next 23rd Adhyay Dhanudisut Malu from Narahari Family will tell us what happens next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बावीसावा (२२) भाग  २/२ 
धन्य धन्य मही ऐक । निवटूनि पूर्वजपातक दोंदिक (श्रेष्ठ) । 
सनाथपणाची घेऊनि भाक । स्वर्गवासा मिरविशी ॥ १०१ ॥        
तरी तारक लोकां बेचाळिसां । कुळा झालीस भावाब्धिरसा ।
कीं भगीरथकूप पितृउद्देशा । मिरवलासे त्रिभुवनीं ॥ १०२ ॥
कीं विनतेचें दास्यपण । गरुडें साठविलें पीयूष देऊन ।
तेवीं तूं कुळांत सकळांकारण । तारक झालीस सर्वकाळीं ॥ १०३ ॥
ऐसें नाथ बोलतां युक्तीं । चरणीं माथा ठेवी सती ।
म्हणे महाराजा कृपामूर्ती । सदैव केलें तुम्हींच ॥ १०४ ॥
तुमच्या दृष्टीचा सहज झळकू । कृपापात्र वरिला मशकू ।
मम प्रज्ञे मोहशठकू । मिरवला हे महाराजा ॥ १०५ ॥
अहा तुमचे पडिपाडें (तुलनेस) । न येती कल्पतरु झाडें ।
परि वासनेसमान कोडें । बरें वाईट मिरवतसे ॥ १०६ ॥
तैसी तुमची नव्हे स्थिती । साधक कल्याण मिरवी मती ।
कीं परीस देतां समानगती । बरें वाईट मिरवतसे ॥ १०७ ॥
परीस लोहाचें करी कनक । परी स्वदीक्षेची न तुटे भीक ।
तेवीं तुम्ही नोहेत साधक । आपुलेसमान करितां कीं ॥ १०८ ॥
ऐशी उद्धारपूर्ण कोटी । तुम्ही मिरवितां महीपाठीं ।
उदार तरी समता होटीं । मेघ अपूर वाटतसे ॥ १०९ ॥
मेघ उदार म्हणती लोक । परी तो अपूर ओसरे उदक ।
तस्मात् तुमचें औदार्य दोंदिक । समतापदासी मिरवेना ॥ ११० ॥    
तरी तुमची वर्णितां स्तुती । अपूर्ण असे माझी मती ।
ऐसें म्हणोनि मैनावती । चरणीं माथा ठेवीतसे ॥ १११ ॥
मग आसन वसन भूषणासहित । अन्नपानादि अन्य पदार्थ ।
सिद्ध करुनि मनोरथ । तुष्ट करीत नाथासी ॥ ११२ ॥
तीन रात्री वस्ती करुन । सर्वां आशीर्वाद देऊन ।
मग निघता झाला मच्छिंद्रनंदन । गोरक्षानाथादिकरुनियां ॥ ११३ ॥
सकळ कटकासहित । बोळवों निघाला चंद्रमुक्त ।
मैनावती आणि ग्रामस्थ । एक कोस बोळविती ॥ ११४ ॥
सकळीं चरणावरीं ठेवून माथा । परतते झाले बोळवोनि नाथा ।
मग आपुले सदनीं येऊनीं तत्त्वतां । धन्य नाथ म्हणतात ॥ ११५ ॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ । त्रिवर्गादि गमन करीत । 
ग्रामोग्राम मुक्काम साधीत । जगन्नाथीं पातलें ॥ ११६ ॥
तेथें करुनि उदधिस्नान (समुद्रस्नान) । जगन्नाथाचें घेऊनि दर्शन ।
तीन रात्रीं तेथें राहून । तीर्थविधी सारिला तो ॥ ११७ ॥
तेथूनि निघोनि पुनः मार्गी । गमन करीत मग योगी ।
तों सौराष्ट्रग्राम मुक्काम प्रसंगीं । जाऊनि तेथें राहिले ॥ ११८ ॥   
रात्र क्रमोनि जैसी तैसी । दुसरे दिनीं मित्रोदयासी । 
गोरक्ष सांवरोनि भिक्षाझोळीसी । भिक्षालागीं प्रवर्तला ॥ ११९ ॥
भिक्षा मागोनि सदनोसदनीं । परम श्रमोनि आला सदनीं ।
तों येरीकडे शिबिरस्थानीं । शयनीं असे मीननाथ ॥ १२० ॥
तो मच्छिंद्रनाथानें उठवोन । बैसविला शौचाकारण ।
तों तें संधींत भिक्षा मागोन । गोरक्षनाथ पातला ॥ १२१ ॥ 
ग्रामांत हिंडतां सदनोसदनीं । श्रमें विटलासे मनीं ।
तो येतांचि स्थानीं श्रमोनी । मच्छिंद्रनाथ बोलतसे ॥ १२२ ॥
म्हणे गोरक्ष मीननाथ । शौचासी बैसविला आहे गल्लींत ।
तरी तूं त्यातें प्रक्षाळूनि त्वरित । घेऊनि येईं पाडसा ॥ १२३ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । भिक्षाझोळी ठेवूनि तेथ । 
लक्षूनि पातला मीननाथ । गल्लीमाजी जाऊनियां ॥ १२४ ॥
तो मीननाथ परम अज्ञान । हस्तपाद भरले विष्ठेनें ।
अंगव्यक्त गोरक्ष विष्ठा पाहोन । परम चित्तीं विटलासे ॥ १२५ ॥
मनांत म्हणे मच्छिंद्रासी । कीं परम असे विवसी ।
विषयउपद्रव संन्याशासी । व्यर्थ कासया पाहिजे ॥ १२६ ॥
कीं कबरीभाराविण बोडकी । कुंकूं खटाटोप हुडकी ।
तेवीं मच्छिंद्रमनीं उपद्रव शेखीं । काय आज सुचला हो ॥ १२७ ॥ 
जन्मांधासी अवनीं । तोचि संभार रक्षी कानीं ।
निगडी (बंधनांत अडकलेल्या) मनुष्या षड्रसान्नीं । खटाटोप कासया ॥ १२८ ॥
कीं परम भ्याड सोडी सदन । शस्त्रसंभारापरी संगोपन ।
ज्याचें काय आसन वसन । त्या वस्त्रभूषण कासया ॥ १२९ ॥
कीं रानींचें रानसावज उन्मत्त । द्रव्य देऊनि त्या करावें शांत ।
तेवीं निःस्पृहताविषय अत्यंत । गोड कांहींच वाटेना ॥ १३० ॥
ऐसें बोलुनि गौरनंदन । मीननाथातें करी कवळून ।
दृष्ट करी मच्छिंद्राकारणें । उचलोनियां तेधवां ॥ १३१ ॥
विष्ठेव्यक्त मीननाथ । पाहोनि मच्छिंद्र बोलत ।
म्हणे गोरक्षा सरितेआंत । धुवोनि आणीं बाळका ॥ १३२ ॥    
अवश्य म्हणोनि गोरक्षनाथ । तैसाचि उठोनि सरिते जात ।
संचार करितां सरितेंत । तो उत्तम दगड देखिला ॥ १३३ ॥
देखिलें परी एकांतस्थान । मनांत म्हणे न्यावें धुवोन ।
परी अंतर्बाह्य मळी निवटवून । नाथालागीं दाखवूं ॥ १३४ ॥
ऐसें विचारुनि चित्तांत । पदीं धरिला मीननाथ ।
खडकावरी आपटोनि त्वरित । गतप्राण पैं केला ॥ १३५ ॥
सरिते उदक असे अपार । त्यांत प्रवेशतें झालें रुधिर ।
तें सर्व अपार जळचर । भक्ष्य म्हणोनि धांवले ॥ १३६ ॥
मच्छ मगरी कबंधदेही (मोठ्या शरीराचे) । मग तळपती त्या प्रवाहीं ।
तैं अपार जळचरें पाहूनि डोहीं । मनांत म्हणतसे गोरक्ष ॥ १३७ ॥
म्हणे जीवें गेला मीननाथ । तरी याचे घालो सदावर्त ।
एक जीवावरी तृप्त होत । आहेत जीव सकळ हे ॥ १३८ ॥  
ऐसा विचार करुनि मनीं । त्वचा घेतली काढूनी ।
रति रति मांस तुकडे करोनी । जळचरांते ओपीतसे ॥ १३९ ॥   
उरल्या अस्थी त्या जळांत । टाकूनि तेथूनि उठला नाथ ।
परी त्या जळा नसे अंत । अस्थी तळीं व्यक्त जाहल्याती ॥ १४० ॥
ऐसें करितां गौरनंदन । मांस तें सकळ गेलें आटून ।
मांस सरल्या आंतडें पूर्ण । जळचतरांतें भक्षविलें ॥ १४१ ॥
एक त्वचेरहित भाग । कांहीं न ठेवी वरतें अव्यंग ।
खडकीं पवित्र करुनि चांग । त्वचा घेऊनि चालला ॥ १४२ ॥
चालला परी तो सदनीं । तों शिबिरीं नसे मच्छिंद्रमुनी ।
शांभवीअर्था बाजारभुवनीं । संचरलासे महाराजा ॥ १४३ ॥
तों येतांचि येथें *गोरक्षनाथ* । मग तान्हा पसरी प्रावर्णी त्वचेंत । 
मित्ररश्मि पाहोनि वात । सुकावया घातलें ॥ १४४ ॥
तों येरीकडे मच्छिंद्रनंदन । शांभवी आलासे घेऊन ।
कंदा कुत्का सिद्ध करुन । आसनावरी बैसला ॥ १४५ ॥
बैसला परी गोरक्षातें । म्हणे बा रे कोठें मीननाथ । 
येरी म्हणे धुवोनि त्यातें । स्वच्छ आणिलें महाराजा ॥ १४६ ॥
मच्छिंद्र म्हणे आणिलें परी । कोठें ठेविला न दिसे नेत्रीं ।
येरी म्हणे तान्हा प्रावरीं । सुकूं घातला महाराजा ॥ १४७ ॥
म्हणे मच्छिंद्र काय बोलसी । घातला सुकूं ऐसें म्हणसी ।
येरी म्हणे कीं असत्य तुम्हांसी । भाषण माझें वाटतसे ॥ १४८ ॥
तरी बाहेर शीघ्र येवोन । स्वचक्षूनें पहावा विलोकून ।
ऐसें बोलतां मच्छिंद्रनंदन । तेचि क्षणीं बाहेर येतसे ॥ १४९ ॥
म्हणे कोठें रे मीननाथ । परी पाहतां म्हणे तान्हा प्रावर्णातें ।
न्याहाळोनि पाहतां त्वचेतें । मग धरणीं आंग सांडीतसे ॥ १५० ॥
म्हणे अहा रे काय केलें । बाळ माझें कैसें मारविलें ।
अंग धरणीवरी टाकिलें । वरी लोळे गडबडां ॥ १५१ ॥
अहा अहा म्हणूनी । मृत्तिका उचलोनि घाली वदनीं ।
आणि वक्षःस्थळा पिटूनी । शोक करी आक्रोशें ॥ १५२ ॥
परम मोहें आरंबळत । उठउठोनि त्वचा कवळीत ।
हृदयीं लावूनि आठवीत । बाळकाच्या गुणांतें ॥ १५३ ॥
अहा तुझा मी असें जनक । परम शत्रु होतों एक ।
जननीचें तोडूनि बाळक । तुज आणिलें कैसें म्यां ॥ १५४ ॥ 
म्हणे अहा रे मीननाथा । मज सांडूनि कैसा गेलासी आतां ।
एकटा परदेशीं सोडूनि तत्त्वतां । मार्ग मिळाला तुज केवीं ॥ १५५ ॥
आतां तूतें कीलोतळा । कोठूनि पाहील मुखकमळा ।
तुझा कापिला गळा । कैसा येथें आणूनी ॥ १५६ ॥
 बाळका स्त्रियांचे राज्यांत । भुभुःकारें पावशील मृत्य । 
म्हणोनि बा रे तुजसी येथें । रक्षणातें आणिलें ॥ १५७ ॥
आणिलें परी तुज निश्र्चितीं । कृतांत झाला गोरक्ष जती ।
ऐसें म्हणोनि धरणीप्रती । अंग टाकी धडाडून ॥ १५८ ॥
पुनः उठे मच्छिंद्रनंदन । त्वचा हृदयीं धरी कवळून । 
म्हणे बाळा तुजसमान । पुत्र कैंचा मज आतां ॥ १५९ ॥
अहा बाळाचें चांगुलपण । मज भासतसे जैसा मदन ।
अहा बाळाचे उत्तम गुण । कोणा अर्थीं वर्णूं मी ॥ १६० ॥
बाळा लोटली वर्षें तीन । परी काय सांगूं मंजुळ बोलणें ।
अहा ताता ऐसें म्हणोन हांक मारीत होतासी तूं ॥ १६१ ॥
बा रे तनू असतां कोंवळी । परी शयनींहूनि उठसी उषःकाळीं ।
माथा ठेवूनि मम पदकमळीं । अहो तात ऐसें म्हणसी ॥ १६२ ॥
बा तूं वसत होतासी मम शेजारी । मर्यादा रक्षीत होतासी अंतरीं ।
अरे कठिण वागुत्तरीं । शब्द वाहिला नाहीं म्यां ॥ १६३ ॥
बा रे भोजन करितां ताटीं । चतुरपणाची परम हातवटी ।
आपुल्या पुढें ठेवूनि दृष्टी । ग्रास घेसी बाळका ॥ १६४ ॥
अहा रे अहा मीननाथ बाळा । परमज्ञानी वाचा रसाळा ।
लिप्त कदा नव्हेसी मळा । शुद्ध मुखकमळा मिरविशी ॥ १६५ ॥
अहा बा रे चक्षुघ्राण । कधीं न पाहिलें तुझे मळिण ।
आजि तुझे अंग विष्ठावेष्टन । कैसें अमंगळ जावया ॥ १६६ ॥
बा रे कधीं मजवांचून । न राहसी एकांतपण ।
आजिचे दिनीं शयनीं मज सोडून । कैसा परत गेलासी ॥ १६७ ॥
बा रे माय तुझी कीलोतळा । तिचा कधीं न पाहसी लळा ।
आसनीं शयनीं मजपासूनि बाळा । पैल झाला नाहींस तूं ॥ १६८ ॥
तरी ऐसें असूनि तुझे मनीं । आजि मज गेलासी सोडूनी ।
अहा एकदां येऊनि अवनीं । मुख दावीं मज बाळा ॥ १६९ ॥
ऐसें म्हणोनि मच्छिंद्रनाथ । हंबरडा गायीसमान फोडीत ।
अहा माझा मीननाथ । कोणी दाखवा म्हणतसे ॥ १७० ॥
भूमीं लोळे अश्रु नयनीं । नेत्रीं ढाळितां न समाये पाणी ।
वक्षःस्थळादि पिटूनि अवनीं । दाखवा म्हणे मीननाथ ॥ १७१ ॥
ऐसें म्हणोनि आक्रंदत । तें पाहूनि गोरक्षनाथ ।
मनांत म्हणे अद्यापि भ्रांत । गेली नाहीं श्रीगुरुची ॥ १७२ ॥
मग पुढें गोरक्षनाथ होऊन । म्हणे महाराजा कां घेतां अज्ञानपण ।
कोण तुम्ही कोणाचा नंदन । करितां रुदन त्यासाठीं ॥ १७३ ॥
अहो पुरतें पाहतां कोण मेला । अशाश्र्वताचा भार हरला ।
शाश्र्वत अचळ आहे बोला । कदा काळीं न मरे तो ॥ १७४ ॥
अहो तुमचा मीननाथ । नामधारी असे त्यांत ।
तो कदा न मरे योजिल्या घात । आहे शाश्र्वत महाराजा ॥ १७५ ॥
तो कदा न मरे शस्त्रघातांनीं । त्यातें न जाळी कदा वन्ही ।
अनिळ न शोषी ना बुडवी पाणी । शाश्र्वत चिन्हीं नांदतसे ॥ १७६ ॥
ऐसें बोलतां गोरक्षक । परी कदा न सोडी शोक ।
अहा अहा मीननाथ । ऐसें म्हणोनि आक्रंदे ॥ १७७ ॥
ऐसिये आग्रहाचा अर्थ । तें पाहूनियां गोरक्षनाथ ।
मग संजीवनीमंत्राप्रत । स्मरण करितां पै झाला ॥ १७८ ॥
करी कवळूनि भस्मचिमुटी । संजीवनीमंत्र जपे ओठीं ।
त्वचेप्रती सोडिता झाला मुष्टी । मीननाथ ऊठला ॥ १७९ ॥
उठतांचि मीननाथ । मच्छिंद्राचे गळा पडत ।
मच्छिंद्र पाहूनि हृदयांत । परम मोहें धरीतसे ॥ १८० ॥
चुंबन घेऊनि म्हणे बाळा । कोठें गेला होतासी खेळा ।
मज टाकूनि विनयस्थळा । गमन केलें होतें कीं ॥ १८१ ॥
ऐसें म्हणोनि जैसें तैसें । तोही अस्त पावला दिवस ।
दुसरे दिनीं मीननाथास । घेऊनि ते चालिले ॥ १८२ ॥
मार्गी चालतां त्रिवर्ग जाण । गोरक्ष करितां झाला बोलणें ।
हे महाराजा मच्छिंद्रनंदन । चित्त द्यावें मम बोला ॥ १८३ ॥
तुमचा प्रताप पाहतां अवनीं । निर्जीव जीववाल वाटे मनीं ।
ऐसें असुनि सुतालागुनी । रुदन केलें हे काय ॥ १८४ ॥
तरी हें रुदन करावया कारण । काय होतें बोला वचन ।
ऐसें मीननाथ सहस्त्रावधीनें । संजीवनीनें निर्माल ॥ १८५ ॥
तरी हें आश्र्चर्य वाटे मनीं । स्वामी पडले शोकरुदनीं ।
कीं चिंताहारक चिंतामणी । तो चिंतेमाजी पडियेला ॥ १८६ ॥
ऐसें ऐकोनि मच्छिंद्रनाथ । म्हणे तुवां मारिलें किमर्थ ।
येरु म्हणे मोहभावार्थ । तो पहावया तुमचा ॥ १८७ ॥
तुम्ही वैराग्यशील म्हणवितां । तरी माया लंघूनि व्हावें परता ।
आशा मनशा तृष्णा ममता । लिप्त नसावी शरीरातें ॥ १८८ ॥
ऐशा परीक्षाभावनेसीं । म्यां मारिलें मीननाथासी । 
परी प्राज्ञिक तुम्ही सर्वज्ञराशी । रुदन कासया केलें जी ॥ १८९ ॥
येरी म्हणे वत्सा ऐक । तूं शिष्य माझा अससी एक । 
तरी म्यांही परीक्षेचें कौतुक । तुझे बाळा पाहिलें असे ॥१९० ॥
बा रे आशा तृष्णा मनशा कामना । काम क्रोध मद मत्सर वासना ।
हे मोहमांदुसी मायासदना । नांदणुकी करितात ॥ १९१ ॥
तरी तुझे ठायीं मायालेश । आहे कीं नाहीं महापुरुष ।
हें पहावया रुदनास । आरंभिलें म्या पाडसा ॥ १९२ ॥
आम्ही अलक्षरुपी पाहणें । आणि विज्ञानज्ञानानें विवरणें ।
याचि कौतुकें जाणपणें । पाहिलें म्यां पाडसा ॥ १९३ ॥
बा रे शाश्र्वत अशाश्र्वत । तुज कळलें कीं नाहीं होतों या भ्रांतींत ।
तयाची परीक्षा रुदननिमित्त । तुझी घेतली पाडसा ॥ १९४ ॥
आतां बा रे तुझें वयसपण । समूळ आजि झाले हरण ।
पयतोयाचेनि कारण । हसपुरुष मिरविसी ॥ १९५ ॥
ऐसें बोलतां गुरुनाथ । गोरक्ष चरणीं माथा ठेवीत ।
म्हणे महाराजा तुम्ही सनाथ । या देहासी पैं केले ॥ १९६ ॥
ऐसें बोलोनि वागुत्तर । पुन्हा गमती मार्गापर ।
मुक्काममुक्कामीं ज्ञानविचार । गुरुशिष्य करिताती ॥ १९७ ॥
असो यापरी करितां गमन । पुढें कथा येईल वर्तून । 
नरहरिवंशी धुंडीनंदन । श्रोतियांतें सांगेल ॥ १९८ ॥
तरी पुढिले अध्यायीं कथाशी । पुण्यपर्वत पापनाशी ।
श्रोते स्वीकारुनि मानसीं । अवधानिया बैसावें ॥ १९९ ॥
तरी नरहरिवंशी धुंडीसुत । तुमचा आहे शरणागत ।
मालू नाम ठेविलें सत्य । तो कथा सांगेल तुम्हांसीं ॥ २०० ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । समस्त गोरक्षकाव्य किमयागार । 
सदा परिसोत भाविक चतुर । द्वाविंशतितमाध्याय गोड हा ॥ २०१ ।
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार द्वाविंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 

Shri Navanath BhaktiSar Adhyay 22 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय बावीसावा (२२)


Custom Search

No comments: