Tuesday, February 2, 2016

Shree Navanatha Bhaktisar Adhyay 14 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ ) भाग २/२


Shree Navanatha Bhaktisar Adhyay 14 
Mainavati received the Brahmdyana from her guru Jalindar. Now she thought that her son Gopichand should also receive the true knowledge from her guru. So she advised him that the main purpose of our life is to receive true knowledge. Gopichand's father was also a brave king, handsome however when time came his body went to ash within no time. Lord of Death is waiting. Hence Gopichand should obtain the knowledge from guru Jalindar. Gopichand told her that he knows that Mainavati is telling all this to him for his benefit. However he has not found a guru who would be of that much knowledge. Further this is not the right time to leave the kingdom and his family members. However he is not declining what Mainavati had told him. He will do it at appropriate time. Loomavanti was very favorite wife of King Gopichand. She was listening what Mainavati was telling Gopichand. She thought that Gopichand will leave the kingdom. She was selfish as such she wanted that Gopichand should not leave the kingdom. She told Gopichand that Mainavati and Jalindar had made a plot so that Gopichand would go out of Kingdom and then Jalindar would along with Mainavati would leave there as they wish and become head of the kingdom. This was a lie and Gopichand believed it and thrown Jalindar into a deep pit. However Jalindar knew what was going to happen in future hence he kept quiet and done nothing. What happen next will be told to us by Malu who is son of Dhudi from Narahari Family in the Next Adhyay 15.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ ) भाग २/२
ऐसें ऐकोनि मातेचें वचन । बोलता झाला त्रिलोचननंदन ।
म्हणे माते तयासी शरण । जालिया योग्यता फिरावें ॥ १०१ ॥
सकळ टाकूनि सुखसंपत्ति । राजवैभव दारासुती ।
आप्तवर्गादि सोयरेजाती । टाकूनि योग कैसा करावा कीं ॥ १०२ ॥
द्वादशवरुषें मातें । भोगूं दे सकळ वैभवातें ।
मग शरण रिघूनि त्यातें । योगालागीं कशीन कीं ॥ १०३ ॥
कशीन तरी परी कैसा । मिरवीन ब्रह्मांडांत ठसा ।
कीं उत्तानपादराजसुतापरी । शिक्का जगामाजी मिरवीन ॥ १०४ ॥
माता म्हणे बाळा परियेसीं । पळ घडी भरंवसा नाहीं देहासी ।
तेथे संवत्सर म्हणतां द्वादशी । देखिले कोणी बाळका ॥ १०५ ॥
चित्त वित्त आणि जीवित्व आपुलें । अचळ नोहे अशाश्वत ठेलें ।
क्षणैक काय होईल न कळे । क्षणभंगुर वर्ततसे ॥ १०६ ॥
बा रे उदकावरील बुडबुडा । कोण पाहील अशाश्वत चाडा ।
वंध्यापुत्रें घेतला वाडा । मृगजळा केवीं तृषार्त ॥ १०७ ॥
तेवीं वारे सहजस्थितीं । बोलतां न ये अशाश्वती ।
स्वप्नप्रवाहीं इंद्रपदासी । भोगीत खरे न मानावें ॥ १०८ ॥
तन्न्याय अभासपर । सकळ मिरवतसे चराचर ।
त्यांतूनि कोणीएक रणशूर । शाश्वतपदा मिरवितसे ॥ १०९ ॥
शुक दत्तात्रेय कपिलमुनी । व्यास वसिष्ठाची मांडणी ।
प्रल्हादादिक भागवतधर्मी । ऐसे कोणी निवडिले ॥ ११० ॥
नाहींतरी होताती थोडीं । सकळ बांधिली प्रपंचवेडीं ।
परी यमरायाच्या रक्षकवाडी । एकसरां कोंडिलीं ॥ १११ ॥
म्हणूनि बा रे सांगते तुज । शाश्वत नोहे काळ समस्त ।
कोणे घडी घडेल केउत । अक्कलकळा कळेना ॥ ११२ ॥
ऐसा बोध माता करितां । लुमावंती तयाची कांता ।
गुप्तवेषें श्रवण करितां । हाय हाय म्हणतसे ॥ ११३ ॥
म्हणे माता नोहे पापिणी । पुत्रासी योजिती पुत्रकाचणी ।
ऐसी राज्यविभवमांडणी । जोग देऊं म्हणतसे ॥ ११४ ॥
तरी राज्यासी आली विवशी । उपाय काय करावा यासी । 
रामासारिखा पुत्र वनवासीं । कैकैयीनें धाडिला ॥ ११५ ॥
स्वभ्रताराचा घेतला प्राण । चतुर्थपुत्रा लाविलें रानोरान ।
तन्न्याय आम्हांकारणें । देव क्षोभला वाटतसे ॥ ११६ ॥  
दुष्ट स्वप्न दृष्टीं येतां । तर्की मानिती विनाश चित्ता ।
म्हणतां प्रवेशली दुःखव्यथा । तरी देव क्षोभतात ॥ ११७ ॥
दासदासी आपुले हाती । आज्ञेमाजी सकळ वर्तती । 
ते अवज्ञा करोनि उत्तर देती । तरी देव क्षोभला जाणावें ॥ ११८ ॥
सहज ठेविलें धनमांदुस । पुढें काढूं जातां कार्यास ।
तें न सांपडे ठेविल्यास । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ ११९ ॥
सभेस्थानीं सत्यार्थगोष्टी । करितां अनृत वाटे चावटी ।
लोक बैसती चेष्टेपाठी । तरी देवक्षोभ जाणिजें ॥ १२० ॥
आपुलें धन लोकांवरी सांचे । तें मागूं जातां स्वयें वाचे ।
ते म्हणती काय घेतले तुझ्या बापाचें । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२१ ॥    
आपुली विद्या तीव्रशस्त्र । शत्रुकाननीं विनाशपात्र । 
ती कार्यार्थ न मिरवे स्वतंत्र । तरी देवक्षोभ जाणावा ॥ १२२ ॥
नसतां वांकुडें पाऊल कांहीं । नागविला जाय राजप्रवाहीं ।
नसत्या कळीं बैसल्या ठायीं । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२३ ॥ 
आपुला शत्रु प्रतापापुढें । मिरवी जैसा अति बापुडें ।
त्या शरण रिघतां आपुल्या चाडें । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२४ ॥
लोकां उपकार केला विशेष । तेचि लोक मानिती आपुला त्रास ।
पाहूं नका म्हणती मुखास । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२५ ॥
नसता अधिमधीं उतरा । नसतीच विघ्ने येती घरा ।
तेंचि करणे परिहारा । देवक्षोभ जाणिजे ॥ १२६ ॥
गृहींचे मनुष्य मुष्टींत सकळ । असूनि वाढे गृहांत कळ ।
आपुलें न चाले कांहींच बळ । तरी देवक्षोभ जाणिजे ॥ १२७ ॥
तरी हेचि नीति उपदेश । माता करीत आहे पुत्रास ।
तरी बरवें नोहे हा विनाश । जगामाजी मिरवेल ॥ १२८ ॥
तरी ह्या द्वंद्वसुखाची कहाणी । पेटेल महावडवानळ वन्ही ।
राजवैभव हें अब्धिपाणी । भस्म करील निश्र्चयें ॥ १२९ ॥
ऐसा विचार करुनि मानसीं । लुमावंती प्रवेशे स्वसदनासी ।
येरीकडे मैनावतीसी । उत्तर देत नरेंद्र ॥ १३० ॥
म्हणे माय वो तव कामनीं । ऐसेंचि आहे वेधक मनीं ।
तंव त्या स्वामीची करणी । निजदृष्टीं पाहीन वो ॥ १३१ ॥
माझें मजलागीं हित । तें द्यावया असेल सामर्थ्य ।
शोध शोधितां भक्तिपंथ । सहज दृष्टीं पडेल वो ॥ १३२ ॥
मग मी सोडूनि सकळांस । तनधनमन ओपीन त्यास ।
तूं येथून वाईट चित्तास । सहसा न मानीं जननीये ॥ १३३ ॥
ऐसें वदोनि समाधानीं । नृप गेला स्नानालागोनी ।
येरी कडे अंतःपुरसदनीं । काय करी लुमावंती ॥ १३४ ॥
परम आवडत्या स्रिया पांचसात । तयांच्या आज्ञेंत नृपनाथ ।
पट्टराणिया प्रीतीवंत । सदा सर्वदा वर्तती ॥ १३५ ॥
तयांसी पाठवूनि परिचारिका । बोलाविल्या सद्विवेका ।
त्यांत लुमावंती मुख्य नायिका । पट्टराणी रायाची ॥ १३६ ॥
वेगें मांडुनि कनकासन । बैसविल्या प्रीतींकरुन । 
तांबुलादि पुढें ठेवून । वृत्तांत सांगे रायाचा ॥ १३७ ॥
बाई वो बाई विपरीत करणी । मैनावती राजजननी ।
विक्षेप पेटला तियेचे मनीं । काय सांगूं तुम्हांतें ॥ १३८ ॥
कोण गावांत आला हेला । जालिंदर ऐसें म्हणती त्याला ।
त्याचा अनुग्रह देऊनियां रायाला । जोग देऊं म्हणतसे ॥ १३९ ॥
ऐसें वर भोगवी माता सुत । निश्र्चय करुनि केला घटपटीत ।
रायासी बोधितां श्रवणीं मात । सकळ झाली वो बाई ॥ १४० ॥
मग राजवैभव सकळ नासलें । स्तंभ भंगल्या सदन पडिलें ।
मुळींचि अर्कालागीं गिळिलें । मग अंधकार सर्वस्वीं ॥ १४१ ॥
मग आपण अष्टविंशती सती । असूनि काय करावी माती ।
परचक्र येऊनि सकळ संपत्ति । विनाशातें पावे हो ॥ १४२ ॥
परी येउते अर्थाअर्थी । कैसी करावी ती युक्ती ।
सांगावी आधीं योजूनि सकळ सबळ मतीं । केलिया कारण मोडावे ॥ १४३ ॥
अगे वन्ही म्हणूं नये लहान । तो क्षणें जाळील सकळ सदन ।
तरी त्यातें करुनि सिंचन । विझवूनियां टाकावा ॥ १४४ ॥
उशा घातला विखार । मग सुखनिद्रा केवीं येणार ।
विष भेदूनि गेल्या जठर । जीवित्व काय वांचेल ॥ १४५ ॥
तरी प्रथमचि सारासार । करुनि मोडावा सकळ प्रकार ।
ऐसी बुद्धि रचूनि सार । सुखसंपत्ति भोगा कीं ॥ १४६ ॥
ऐसी ऐकूनि तियेची उक्ती । मग तर्कवितर्क करिती त्या युवती ।
नानाबुद्धि विलाप दाविती । परी निश्र्चय न घडे कोणाचा ॥ १४७ ॥
यापरी विशाळबुद्धी युवती । विचार काढी लुमावंती ।
की येअर्थी दिसे एक मजप्रती । सुढाळपणीं नेटका ॥ १४८ ॥
आपुल्या गावांत जालिंदर । जोगी आहे वैराग्यपर ।
तरी तयाचा अपाय करुनि थोर । निर्दाळावा सर्वस्वीं ॥ १४९ ॥
निर्दाळावा तरी कैसे रीतीं । तयाच्या भक्तीसी मैनावती ।
आहे तरी राजयाप्रती । निवेदावें कुडे भावें ॥ १५० ॥
तरी तो तुमचा वसवसा । ग्रीवे मिरवितसे भयार्थ फांसा ।
म्हणूनि युक्ति रचिली मानसा । गाढपणीं ऐकावी कीं ॥ १५१ ॥
निवेदावें तरी कैसें । काम न आवरे मैनावतीस ।
म्हणूनि चित्तीं उदास । जालिंदर भोगितसे ॥ १५२ ॥
जालिंदराचा अनुग्रह देऊन । जोगी करावा राजियाकारण ।
मग करुनि पाठवावा तीर्थाटन । अथवा तपाचे कारणीं ॥ १५३ ॥
मग तो गेलिया दूर देशीं । गृहीं आणूनि जालिंदरासी ।
बैसवोनि राज्यासनासी । सकळ सुख भोगावें ॥ १५४ ॥
ऐसें सांगूनि सकळ रायातें । उदय करावा कोपानळातें ।
मग सहजविधि जालिंदरनाथ । भस्म होईल त्यामाजी ॥ १५५ ॥
जैसे विषय अति गोड । गोडचि म्हणूनि करावा पुड ।
मग तें मिरवे शत्रुचाड । द्वंद्वसुख वाटावया ॥ १५६ ॥
ऐसा विचार करुनी गोमटा । जात्या झाल्या त्या वरवंटा ।
येरी सांगे राजपटा । गोपीचंद मिरवला ॥ १५७ ॥
राजकारणीं अपार वार्ता । रागरंग कुशळता । 
मानरंजनीं नृपनाथा । दिवस लोटूनि पैं गेला ॥ १५८ ॥
मग निशाउदय तममांडणी । तेही प्रहर गेली यामिनी ।
मग पाकशाळेंत भोजन करुनी । अंतःपुरीं संचरला ॥ १५९ ॥
संचरला परी लुमावंती । तिच्याचि गेला सदनाप्रती ।
तिने पाहुनी राजाधिपती । कनकासनी बैसविला ॥ १६० ॥
उचलोनि परमभक्तीं मांदार । बैसला आहे मंचकावर ।
गौरवूनि षोडशोपचार । प्रेमडोहीं बुडविला ॥ १६१ ॥
मग तो राव होऊनि निर्भर । रतिसुखाचा करुनि आदर ।
यावरी गजगामिनी जोडूनि कर । बोलती झाली रायातें ॥ १६२ ॥
हे महाराज प्रतापतरणीं । एक वार्ता ऐकली कानीं ।
परी वदतां भय कीं मनीं । संचरत आहे महाराजा ॥ १६३ ॥
जरी न बोलावें ठेवूनी गुप्त । तरी महाअनर्थाचा पर्वत दिसत ।
वदूं तंव तरी भयांत । चित्त गुंडाळा घेतसे ॥ १६४ ॥
ऐसा उभय पाहतां अर्थ । भ्रांतीमाजीं पडलें चित्त ।
तरी सुख सुखशब्दाचा सरुनि वात । वार्ता अवघड महाराजा ॥ १६५ ॥
ऐसें ऐकूनि राव बोलत । म्हणे सकळ सोडूनि भयातें ।
निर्विकार कवण अर्थ । असेल तैसें कळविजे ॥ १६६ ॥
येरी म्हणे द्याल भाष्य । तरी चित्त सोडील भयदरीस । 
मग खरें खोटें बरें रत्नास । तुम्हांलागीं अर्पिन तें ॥ १६७ ॥ 
ऐसें वचन नृप ऐकतां । मग करतळभाष्य झाला देता ।
म्हणे मम दर्पभयाची व्यथा । सोडूनि वार्ता बोल कीं ॥ १६८ ॥
येरी म्हणे जी एक कुडें । मातेनें रचिलें तुम्हांपुढें ।
जालिंदर योगी विषयपांडें । वश्य केला आहे की ॥ १६९ ॥
परी तुमचा भयाचा संदर्प । अंगीं विरला विषयकंदर्प ।
तेणेंकरुनि बुद्धी कुरुप । तिनें वरिली आहे जी ॥ १७० ॥
तुम्हांसी अनुग्रह देऊनि त्याचा । वेष द्यावा योगीयाचा ।
मग तीर्थाटनीं योग तुमचा । बोळवावें तुम्हांतें ॥ १७१ ॥
तुम्ही गेलिया तपाकारण । दूरदेशीं विदेशाकारण । 
मग जालिंदराप्रती आणून । राज्यासनीं ओपावा ॥ १७२ ॥
ऐसें प्रकरणीं सहजस्थिती । श्रुत मात झालें आम्हांप्रती ।
परी आमुचे सौभाग्यनीतीं । भाग्यार्क दिव्य जाहले ॥ १७३ ॥
आमचें कुंकुम होतें अचळ । म्हणोनि दृष्टीं आले ऐसे फळ ।
यापरी तुम्हा नृपाळ । वाईट बरें विलोका ॥ १७४ ॥
ऐसी ऐकोनि तियेची वार्ता । उचंबळला क्रोधानळाच्या माथां ।
मग अनर्थानळाच्या शाखा दावितां । भयंकररुपी जाहलासे ॥ १७५ ॥
मग तो क्रोध न वदवे वाणी । प्रत्यक्ष आला वडवानळ अग्नी ।
नाथ जालिंदर समुद्रपाणी । प्राशावया क्षोभला ॥ १७६ ॥
मग तो उठोनि तैसेचि गतीं । बाहेर जाय तो नृपती ।
मंत्री बोलावूनि सेवकांहातीं । जालिंदरा पाहों चला ॥ १७७ ॥
शीघ्र आणोनि कामाठ्यांसी । गर्ती योजिली कूपासरसी ।
नाथ जालिंदर ते उद्देशीं । तयामाजी लोटिला ॥ १७८ ॥
अश्र्वलीद न गणती । तेथें सर्वत्र पडली होती ।
ती लोटूनि गर्तेवरती । नाथजती बुजविला ॥ १७९ ॥
ऐसें गुप्त करोनि प्रकरण । राव सेवी आपुलें स्थान ।
परी सेवकां ठेविलें सांगोन । मात बोलूं नका ही ॥ १८० ॥
जरी होतां मुखलंपट । मम श्रोत्रीं आलिया नीट ।
त्याचें करीन सपाट । यमलोकीं मिरवीन कीं ॥ १८१ ॥
ऐसी ऐकूनि भयंकर वार्ता । दर्पसिंह तो योजूनि माथां ।
रागेला परी सेवकचित्ता । धुसधुसी मिरवीतसे ॥ १८२ ॥
इतुके प्रकरणीं मध्ययामिनी । झाली म्हणूनि नेणती जनीं ।
अर्कोदयीं पाहिला स्वामी । म्हणती उठोनि गेला असे ॥ १८३ ॥
एक म्हणती त्याचें येथें काय । स्वइच्छे बसावें वाटेल तेथ ।
हा ग्राम नव्हे आणिक राय । ग्रामवस्तीं विराजला ॥ १८४ ॥
ऐशी बहुतांची बहुत वाणी । प्रविष्ट झाली जगालागोनी ।
कीं जालिंदर गेला येथूनी । महीं भ्रमण करावया ॥ १८५ ॥
ऐसी वार्ता नगरलोकीं । उठली ऐकूनि परिचारिकी ।
त्या जाऊनि सद्विवेकी । मैनावतीसी सांगती ॥ १८६ ॥
कीं महाराज आपला गुरु । वस्तुफळाचा कल्पतरु ।
उठोनि गेला कोठें दुरु । महीं भ्रमण करावया ॥ १८७ ॥
ऐसें ऐकोनि मैनावती । असंतोषली परम चित्तीं ।
म्हणे मम सुताचे दैवाप्रती । लाभ नाहीं आतुडला ॥ १८८ ॥
ऐसें म्हणोनि संकोचित । नेत्रीं प्रेमाश्रु ढाळीत । 
येरीकडे जालिंदरनाथ कैसे स्थितीं राहिला ॥ १८९ ॥
तरी अवश्य भविष्य जाणणार । आणि मैनावतीचा लोभ अपार ।
आणि शत्रुमित्र पाहणार । एकरुपीं समत्वें ॥ १९० ॥
नातरी परम प्रतापी वासरमणी । क्षणें टाकील ब्रह्मांड जाळोनि ।
तो भद्र ज्याची विपर्यासकरणी । तुष्ट कैसा राहिला ॥ १९१ ॥
जो द्वंद्वातीत मूर्तिमंत । दंभरहित स्वरुपीं मिरवत ।
ममता निःसंग विरहित । कार्याकार्य जाणोनी ॥ १९२ ॥
असो गर्तेमाजी यतिनाथ । वज्रासनातें घालोनि खालतें ।
आकाशास्त्र प्रेरुनि भोंवतें । स्वस्थचित्तीं बैसला ।॥ १९३ ॥
आकाशास्त्र असतां भोंवतें । लीद मिरवे सभोंवतें ।
यापरी आकाशास्त्र माथां । वज्रास्त्र स्थापिलें ॥ १९४ ॥
तेणेंकरोनि अधरस्थळीं । लीद मिरविली आहे शिरीं ।
येरीकडे अंतःपुरीं । जनवार्ता समजली ॥ १९५ ॥
नाथ जालिंदर गेला निघोन । मग सकळ स्रियांचे झालें समाधान ।
बरें झालें म्हणती निधान । येऊनि पहुडल्या सेजेसी ॥ १९६ ॥
यापरी पुढें सुरस । धुंडीसुत सांगेल श्रोतुयांस ।
तरी सर्व श्रोतीं टाकूनि आळस । अवधान द्यावें पुढारां ॥ १९७ ॥
मालू धुंडी नरहरि वंशीं । कथा वदेल नवरसी ।
परी वारंवार श्रोत्यांसीं । कृपा अवधान मागतसे ॥ १९८ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार । 
सदा परिसोत भाविक चतुर । चतुर्दशाध्याय गोड हा ॥ १९९ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ श्रीनवनाथभक्तिसार चतुर्दशाध्याय संपूर्ण ॥ 
Shree Navanatha Bhaktisar Adhyay 14 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौदावा ( १४ )


Custom Search

No comments: