Saturday, February 20, 2016

ShriNavanath BhaktiSar Adhyay 20 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय वीसावा ( २० ) भाग १/२


ShriNavanath BhaktiSar Adhyay 20 
Goraksha entered into the female kingdom along with the dancer Kalinga. Mainavati from Sinhaldwip was cursed by Uparicharvasu and had to come down to earth in the female kingdom. But she was Kilotala that is she was head of the kingdom. She worshiped God Maruti and with his blessings she had brought Machchhindra in the female kingdom. She and Machchhindra were mother and father of Minanath. Maruti had warned her that Goraksha a disciple of Machchhindra had been there for taking Machchhindra with him. Kalinga and Poorvanda along with other members came into the palace to show their art. They pleased all by their mastery over dance, singing, playing many instruments. Suddenly “chalo Machchhindar Gorakh aaya” sound was appeared and Kilotala came to know that it is by a lady who was playing Mrudungam. She knew it must be Goraksha. She took her into her room and asked male dress for Goraksha and ornaments and asked him to ware it. Then she told her that you are my elder son and brother of Minanath. Now she had no worry as he and Minanath would run this kingdom and look after her and Machchhindra in their old age. Machchhindra told Goraksha that he was always remembering and missing him. What happens next will be told to us by dhundiSut Malu from Narahari family in the next 21st Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय वीसावा ( २० ) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥ 
जयजयाजी पंढरीराया । भोक्तया षड्गुणऐश्र्वर्या ।
ऐसी सोसूनि अपार माया । सकळ कळा तुझेनि ॥ १ ॥
पट-घट तंतु आकाशन्याय । सर्व तंवचि ब्रह्म होय ।
ऐसें असूनि निराळा राहे । अव्यक्त व्यक्ती पावुनी ॥ २ ॥
कीं अपार घटीं अपार तरणी । व्यापूनि ऐक्य दिसे गगनीं ।
त्याचि न्यायें मोक्षदानी । व्याप्त असे सर्वांतें ॥ ३ ॥
तरी पू्र्णब्रह्म नाथवेष । करुणानिधी पंढरीचा अधीश ।
माय कनवाळू जगन्निवास । भक्तवत्सल नटलासे ॥ ४ ॥
तरी हे दीनबंधो भक्तव्यापका । पुंडलीक वरदायका ।
आतां पुढें रसना दोंदिका । भक्तिसार वदवीं कां ॥ ५ ॥
मागिले अध्यायीं रामदर्शन । आणि द्वितीय अंजनीनंदन ।
गोरक्षालागीं भेटून । अदृश्यपणीं मिरवले ॥ ६ ॥
असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ । येरीकडे अंजनीसुत ।
श्रृंगमुरडा जाऊनि त्वरित । सानवेषें नटलासे ॥ ७ ॥
गुप्तवेषें राजसदन । पाहता झाला अंजनीनंदन ।
एकांतसदनीं मैनाकिनी पद्मिण । मंचकावरी पहुडली ॥ ८ ॥
सुखनिद्रा शयनी असून । परिचारिका गेल्या उठोन ।
ऐसी एकान्त संधी पाहून । धवळारीं तैं संचारला ॥ ९ ॥
चपळपणीं तो मंचकाजवळी । जाऊन बैसला प्रतापबळी ।
कीलोतळा पद्मिनी कमळी । करपात्रीं धरियेली ॥ १० ॥
व्यक्त होत करकमळ । सावध झाली कीलोतळा वेल्हाळ ।
तों दृष्टीं देखिला अंजनीबाळ । चरणांवरी लोटली ॥ ११ ॥
कीलोतळा आणि मैनाकिनी । तृतीय नाम जिये पद्मिनी ।
यापरी बोलती कल्पनीं । कवणें अर्थी हीं नामें ॥ १२ ॥
तृतीय अभिधाना ती दुहिता । झाली कवणा अर्था ।
मग त्या कल्पनीं वाक्सरिता । व्यक्ती घेणें मिरवली ॥ १३ ॥
ऐसा पाहुनि श्रोतियां आदर । बोलता झाला कवि सादर ।
तृतीय भिन्न भिन्न प्रकार । कैशा रीतीं एका त्या ॥ १४ ॥
तरी पर्वतांमाजी मंदरगिरी । जंबुद्वीप त्याची प्रथम पायरी ।
यापरी सिंहलद्वीपाची दुसरी । मेरुमंदार आहे कीं ॥ १५ ॥
यापरी सिंहलद्वीपभुवनीं । स्त्रिया जितुक्या असती पद्मिनी ।
त्यांत ही मुख्य मैनाकिनी । स्वरुपवंती मिरवतसे ॥ १६ ॥
तों एकें दिवशीं अभ्यंग करुनी । उभी राहिली धवळारी जाऊनि ।
ते सहज दृष्टीं दिशागमनीं । आकाशातें पाहातसे ॥ १७ ॥
हस्तीं झगडतीं कबरीभार । तो वर दृष्टी जाऊनी गोचर ।
उपरिचरवसु विमानावर । आरुढ होऊनि जातसे ॥ १८ ॥
विमानारुढ झाला होता । तों वसन एकांगें झालें तत्त्वतां ।
आवेशें बाहेर लिंग दर्शता । असावध बैसलासे ॥ १९ ॥
विमानावरी गवाक्षद्वार । त्यांतूनि दिसे अवयव समग्र ।
तों मैनाकिनी पाहूनि नेत्रें । हांसे खदखदां ते काळीं ॥ २० ॥
तें ऐकूनि वसुनाथ । विक्षेपोनी बोलता झाला तीतें । 
म्हणे पापिणी परपुरुषांते । पाहूनियां हांसलीस ॥ २१ ॥
तरी ऐसी जारिणी वरती । धरुनि राहसी स्वगृहाप्रती ।
माझेविषयीं कामशक्ती । उद्भवली म्हणूनि हांसलीस ॥ २२ ॥
तरी मी नोहे तैसा भ्रष्ट । सकळ वसूंमाजी श्रेष्ठ ।
इंद्रियदमनीं एकनिष्ठ । पूर्णतपा साधीतसें ॥ २३ ॥
तरी मम अभिलाष धरुनी । गदगदां हांससी पापिणी ।
तरी पुरुषविनोदें स्वस्थानीं । जाऊनियां पडशील ॥ २४ ॥
स्त्रीदेशांत स्त्रीकटकीं । वस्ती होईल तुझी शेखीं ।
मग कैंचा पुरुष ते लोकीं । दृष्टिगोचर होईल ॥ २५ ॥
ऐसें बोलतां वसु अंतरिक्ष । परम लाजली पद्मिनी सुलक्ष ।
परी पदच्युत शब्द ऐकतां प्रत्यक्ष । स्तुतिसंवादा व्यापिली ॥ २६ ॥
म्हणे महाराजा वसुनाथा । अपराध झाला विषम आतां ।
अपराधाचें विवरण करितां । बोलतां न ये आम्हांसी ॥ २७ ॥
परी हा असो प्रारब्धयोग । कदा न सुटे आचरला भोग ।
तरी उश्शाप देऊनि आतां चांग । स्वपदातें स्थापावें ॥ २८ ॥
तुम्ही वसु सर्वप्रकारें । भरलां आहां शांतिभांडारें ।
परम कनवाळू इंद्रियें साचारें । योगदमनीं मिरवला ॥ २९ ॥
तरी उश्शाप देऊनि मातें । करीं महाराजा पदाश्रित ।
मग अंतरिक्ष पाहूनि ढळाळित । उश्शापातें वदलासे ॥ ३० ॥
म्हणे पद्मिनी ऐक वचन । स्त्रीराज्यांत कीलोतळा स्वामीण ।
तेथें आयुष्य सरल्या पूर्ण । तैं पदीं वससील तूं माये ॥ ३१ ॥
परी मज भावें निवेदिलें चित्त । तरी महीं मिरवेल माझा सुत ।
तो तुज स्वीकारुनि होईल रत । मच्छिंद्रनाथ म्हणोनियां ॥ ३२ ॥
तो रत झालिया अंगसंगीं । पुत्र लाभसील रेतप्रसंगीं ।
मीननाथ हें नाम जगीं । प्रसिद्ध मिरवेल महीतें ॥ ३३ ॥
तो पुत्र झालिया तूतें शेवटीं । विभक्त होईल मच्छिंद्रजेठी ।
मग तूं स्वपदा येऊनि गोरटी । भोग भोगीं स्वर्गींचा ॥ ३४ ॥
याउपरी बोलली मैनाकिनी । पुरुष नाहीं कां तयां भुवनीं ।
सकळ स्त्रिया दिसती अवनीं । काय म्हणोनी महाराजा ॥ ३५ ॥
तरी पुरुषांवांचूनि संतती । कोठूनि होतसे नसूनि पती ।
येरुं म्हणे येऊनि मारुती ॥ भुभुःकार देतसे ॥ ३६ ॥
उर्ध्वरेता वायुनंदन । वीर्य व्यापीतसे भुभुःकारेंकरुन ।
मग उत्पत्ति उदयजन्म । तेथें होतसे शुभानने ॥ ३७ ॥
बाळतनु जो पुरुषधारी । मृत्यु पावे तो भुभुःकारीं ।
तितुक्यांविण अचळ नारी । महीवरी विराजती ॥ ३८ ॥           
ऐसी वदतां अंतरिक्ष मात । मग बोले पद्मिनी त्यासी त्वरित ।
हे महाराजा मच्छिंद्रनाथ । येईल कैसा त्या ठाया ॥ ३९ ॥
प्रत्यक्ष पुरुष पावती मरण । ऐसी चर्चा तेथें असून ।
कैसा येईल तव नंदन । मम भोगार्थ महाराजा ॥ ४० ॥
अंतरिक्ष म्हणे वो शुभाननी । तूं कीलोतळेचें उपरी जाऊनी ।
बैसोनि उपरी तपमांडणीं । आराधावा मारुती ॥ ४१ ॥
प्रसन्न झालिया वायुनंदन । मग मुक्ती करील त्या भयापासून ।
परी तुज सांगतों ती खूण । चित्तामाजी रक्षावी ॥ ४२ ॥
प्रसन्न होईल जेव्हां मारुती । मागणें करिजे अंगसंगती ।
मग तो संकटीं पडूनि क्षिती । मच्छिंद्रातें आणील ॥ ४३ ॥
तरी हा रचूनि दृढतर उपाय । मिरवत आहे मारुती भय ।
तरी तयाचे हस्तें साधावें कार्य । मच्छिंद्रातें आणोनी ॥ ४४ ॥
याउपरी बोले पद्मिनी युवती । रामचरणीं श्रीमारुती । 
कैसें सांग मातें द्यावी रती । ऐसे म्हणेल महाराजा ॥ ४५ ॥
परी ऐसिये बोलप्रकरणीं । मारुतीच मिरवला विषयध्वनी ।
मग तव सुत मच्छिंद्र कोठूनि । तेथें येईल महाराजा ॥ ४६ ॥
ऐसें अंतरिक्ष ऐकतां वचन । म्हणे विषयोपद्रवरहित वायुनंदन ।
ब्रह्मचर्य व्रतातें लोटून । रतिसुखा कैसा मिरवेल ॥ ४७ ॥
तरी हा संशय सोडूनि गोरटी । अर्थ धरिजे इतुका पोटीं ।
मच्छिंद्रा लाहसील येणें कोटीं । हनुमंतेंकरुनियां ॥ ४८ ॥
ऐसें सांगूनियां अंतरिक्ष । स्वस्थाना गेला वसु दक्ष ।
येरीकडे मैनाकिनी प्रत्यक्ष । स्त्रीराज्यांत प्रवर्तली ॥ ४९ ॥
श्रृंगमुरडा राजपट्टणीं । भ्रमण करितां ती पद्मिणी ।
तों चर्मिकेचे सदनीं । सहजस्थितीं पातली ॥ ५० ॥
सहजस्थितीं जाऊनि ओसरीं । बैसती झाली शुभगात्री ।
तों ती चर्मिका पाहूनि नेत्रीं । बोलती झाली तियेतें ॥ ५१ ॥
म्हणे माय वो शुभाननी । कोठें अससी लावण्यखाणी ।
येरी म्हणे वो मायबहिणी । सिंहलद्वीपीं मी असतें ॥ ५२ ॥
परी अंतरिक्षवसूचे शापेंकरुन । पाहतें झालें माय हें भुवन ।
आतां माझे संगोपन । कोणी करील कळेना ॥ ५३ ॥
ऐसी ऐकूनि पद्मिनी वाणी । बोलती झाली तों चर्मिणी ।
म्हणे माय वो माझे स्थानीं । राहुनि सुख भोगीं कां ॥ ५४ ॥
स्वहस्तें करुनि पाक । हरीत जा माये तृषाभूक ।
मी आपुल्या गृहींची एक । तारंबळ होतसे ॥ ५५ ॥
तरी माय वो उपेक्षा सोडून । सेवीं माय वो माझें सदन ।
कन्येसमान तुज पाळीन । सर्व सुख देऊनियां ॥ ५६ ॥
ऐसी ऐकूनी तियेची वार्ता । परम तोषली हृदयीं दुहिता ।
मग तेथेंचि राहूनि वल्लवी हस्ता । क्रियेलागीं आराधी ॥ ५७ ॥
स्वहस्तें करुनि पाकनिष्पत्ती । हरीत चर्मिकेचे क्षुधेप्रती ।
शेवटीं भोजनक्रियेसंगतीं । आपण सेवी नित्यशा ॥ ५८ ॥
यासही लोटतां बहुत दिन । कीलोतळा राज्यस्वामीण ।
आयुष्य सरलें जरा व्यापून । मग मंत्र्यालागीं बोलतसे ॥ ५९ ॥
म्हणे आयुष्य सरलें निकट । तरी कोणासी वो द्यावा राज्यपट ।
मंत्री म्हणे माळिका चोखट । गजशुंडीं विराजवावी ॥ ६० ॥
सकळ स्त्रिया पाचारुन । गज प्रेरावा माळ देऊन ।
त्यासी भेटेल दैववान । माळग्रहणीं ग्रीवेंत ॥ ६१ ॥
ऐसें बोलत मंत्री तये वेळा । परम तोषली कीलोतळा ।
सुदिन पाहूनि कार्यमंगळा । अर्पिली माळा गजशुंडी ॥ ६२ ॥
समग्र स्त्रियांची सभा करुन । मग तो प्रेरिला माळ देऊन ।
ते प्रांती मैनाकिनी पाहून । माळ ग्रीवेंत ओपिली ॥ ६३ ॥
याउपरांतिक भोगितां राणीव । आचरली पूर्वोक्त तपपर्व । 
वश केला मनोभावें । रामदूत तियेनें ॥ ६४ ॥
वश झाला अंजनीनंदन । हें पूर्वींच लिहिलें कथन ।
वायुसुतें मच्छिंद्राकारण । पूर्वी प्रकरण निवेदिलें ॥ ६५ ॥
तरी असो ऐसें कथन । सिंहलद्वीपीं मैनाकिनी नाम । 
माता पितरांच्या आवडींकरुन । नाम ऐसें विराजलें ॥ ६६ ॥
यापरी सिंहलद्वीपींची दारा । म्हणोनि सर्वांच्या वागुत्तरा ।
पद्मिनी नाम सर्वोपचार । वोभावती कटकांत ॥ ६७ ॥
कीलोतळेचें पावली आसन । म्हणोनि कीलोतळा ऐसें नाम ।
असो गुप्तरुपें वायुनंदनें । सावध केली कीलोतळा ॥ ६८ ॥
सावध करोनि तीतें । म्हणे कीलोतळे ऐकें मात । 
तुवां मज ठेवूनि वचनांत । मच्छिंद्रनाथ आणविला ॥ ६९ ॥
तरी तव वचनापासून । सुटलों आहें अर्थ करुन ।
परी तव सुखासी पातलें विघ्न । मच्छिंद्रशिष्य येतो कीं ॥ ७० ॥            
तो मच्छिंद्राहूनि प्रतापवंत । नामीं मिरवला गोरक्षनाथ। ।
तो अजिंक्य असे तयाचें सामर्थ्य । वर्णवेना वाचेसी ॥ ७१ ॥
म्यां तुझ्यासाठीं यत्न केला । श्रीराम मध्यस्थ घातला ।
परी अवमानूनि उभयतांला । मच्छिंद्रा नेऊं म्हणतसे ॥ ७२ ॥
तरी तो आतां येईल येथें । त्यासी सज्ज करुनि प्रीतीतें ।
गोंवूनि घ्यावा कोणे हितार्थें । सुखसंपत्ती दावूनियां ॥ ७३ ॥
परी तो नोहे मच्छिंद्रासमान । विषयीं विरक्त तपोधन ।
कैसा राहिला नवलविधान । सर्वोपरी विरक्त तो ॥ ७४ ॥
परी वाचागौरव द्रव्यगौरव । आसनगौरव वसनगौरव ।
भोजनादि नानावैभवें । गौरवोनि गोंवावा ॥ ७५ ॥
जैसा जतन करी पावक । संग्रहीं जे गौरवी राख ।
कीं चिंधीवेष्टणें रक्षणें माणिक । होत आहे शुभाननी ॥ ७६ ॥
तैसा बहुविध गौरव करुन । तुष्ट करावें तयाचें मन ।
ऐसें सांगूनि वायुनंदन । गमन करिता पैं झाला ॥ ७७ ॥
परी ती चपळ मैनाकिनी । मारुती बैसविला कनकासनी ।
षोडशोपचारें पूजा करोनि । बोळविला महाराजा ॥ ७८ ॥
स्वस्थाना गेला वायुसुत । येरीकडी गोरक्षनाथ । 
वेश्याकटकीं मार्गी येत । मुक्काममुक्कामासी साधूनियां ॥ ७९ ॥
जैसे पक्षी करिती गमन । या तरुहूनि त्या तरुवरी जाऊन ।
तेवीं गोरक्ष मुक्काम करुन । श्रृंगमुरडीं पातला ॥ ८० ॥
गांवांनिकट पेठेंत । धर्मशाळा होती त्यांत । 
वेश्याकटकीं राहूनि तेथ । शिबिरापरी योजिलें ॥ ८१ ॥
मग ती वेश्या मुख्य नायिका । कलिंगा नामें मुख्य दोंदिका ।
साजसरंजाम घेऊनि निका । राजसदनीं चालिली ॥ ८२ ॥
सवें वेश्या सात पांच । घेऊनि रुपवंत गुणवंत साच ।
ऐसे कटकीं करोनि संच । राजांगणीं मिरवली ॥ ८३ ॥
राजद्वारीं उभी राहून । पाठविलें वर्तमान ।
द्वाररक्षकें आंत जाऊन । वेश्याकटकीं सांगितलें ॥ ८४ ॥
हे महाराजा राजद्वारीं । कलावती कलाकुसरी । 
रुपवती गुणगंभीरी । भेटीलागीं पातली ॥ ८५ ॥
तरी आज्ञेप्रमाणें वदूं तीतें । ऐसी ऐकतां कीलोतळा मात ।
म्हणे घेऊनि या सभास्थानांत । अवघे समारंभेंसीं ॥ ८६ ॥
ऐसें ऐकतां द्वारीं दूतीं । सवेंचि पातली द्वारावती ।
घेऊनि कलिंगा कलावती । सभास्थानीं पातली ॥ ८७ ॥
तों कनकतगटीं रत्नकोंदणीं । मच्छिंद्र मिरवला कनकासनीं ।
निकट बैसली मैनाकिनी । निजभारें शोभली ॥ ८८ ॥
जैसा नभीं उडुगण(अग्नि)ज्योती- । मध्यें मिरवला रोहिणीपती ।
त्याचि न्यायें मच्छिंद्राभोंवतीं । सकळ स्त्रिया विराजल्या ॥ ८९ ॥
कीं तेजःपुंज हाटकासनीं । हिरा मिरवला शुद्ध कोंदणीं ।
नवरत्न हिरे वेष्टित हिरकणी । तैसा शोभला मच्छिंद्र ॥ ९० ॥
कीं शैल्या (स्त्रिया) नव्हेत त्या रश्मिज्वाला । मध्यें मच्छिंद्र अर्कगोळा ।
कनकासनीं ते सदनीं सकळा । राजसभेंत मिरवत ॥ ९१ ॥
असो ऐसी सभा सघन । कलिंगा दृष्टीनें पाहोन ।
मग बोलती झाली सभे वचन । मैनाकिनीरायातें ॥ ९२ ॥  
हे महाराजा शैल्यापती । ऐकूनि नामाभिधानकीर्ती ।
सोडूनि आपुल्या देशाप्रती । येथें आलें महाराजा ॥ ९३ ॥
तरी कीर्तिध्वजा फडकत अवनीं । तैसी अवलोकनीं आली करणी ।
मही कलावंत राजभुवनीं । विराजतसे महाराजा ॥ ९४ ॥
बृहद्रथ राजा हस्तिनापुरीं । कीर्तिध्वज धर्माचारी ।
याचि नीतिं बंगालधरित्रीं । गोपीचंद विराजला ॥ ९५ ॥
याचि नीतीं कीर्तिध्वज । शैल्यादेशीं कीलोतळानाम राज । 
ऐसी वरुनि सत्कीर्तिभाज । येथें आलें महाराजा ॥ ९६ ॥
ऐसी बोलतां कलिंगा युवती । परम तोषला कीलोतळाभूपपती ।
मग समुच्चयें विचार करोनि अन्नभुक्ती । देऊनि बोले कीलोतळा ॥ ९७ ॥
तंव ती कलिंगा येऊनि शिबिरीं । माध्यान्हसमया सारोनि  उपरी । 
साजसरंजाम सजूनी परी । सावध रात्रीं बैसली ॥ ९८ ॥
तों येरीकडे मैनाकिनी । येऊनि बैसली सभास्थानीं ।
सभामंडप श्रृंगारोनी । दीपमाळ रचियेल्या ॥ ९९ ॥
लावूनि स्फटिकांची कूपिका । मेणबत्ती लावोनि दीपका ।

अगरबत्तीगंध लोकां । घ्राणोघ्राणीं मिरवतसे ॥ १०० ॥

ShriNavanath BhaktiSar Adhyay 20 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय वीसावा ( २० )


Custom Search

No comments: