Friday, February 5, 2016

ShriNavanath BhaktiSar Adhyay 15 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंधरावा ( १५ ) भाग २/२


ShriNavanath BhaktiSar Adhyay 15 
Kanifa and Goraksha completed their 12 years tapas and they performed the necessary Pooja and proceeded for tirthayatra. They also wanted to see their Guru. However they were unaware about each other. Goraksha was very unhappy as he could not found out his guru. However at Helapattam he met with Kanifa's Guru Jalindar. Kanifa while on tirthyatra was spreading Nathapanth. Thus his disciples were increasing and the figure went to seven hundred. On his way he reached near to the boundary of Female kingdom, where entry was hard and anybody who had entered had never came back alive. Hence some of his disciples were frighten. Finally Kanifa proved his strength with they by using Sparshastra on them. Then he also fought with Maruti. Maruti was thinking that Kanifa would bring back Machchhindra who was in Female kingdom. However Kanifa told him that he was not there to take Machchhindra with him. Machchhindra welcomed Kanifa in Female kingdom and honored him with many gifts. In the next 16th Adhyay Dhundisut Malu from Narahari family will tell us what happens next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंधरावा ( १५ ) भाग २/२
हे जाऊनि बोलती त्यांतें । कैसें सोडूनि गुरुतें ।
जीवित्वलोभ धरुनियां मनातें । मार्ग केला पुढारां ॥ १०१ ॥
परी ईश्र्वराची अगाध करणी । सकळ पडला महीं खिळूनी ।     
ऐसिया रीतीं कोण तरुनी । गेला आहे सांगा पां ॥ १०२ ॥
मग हस्तें सकळ पाषाण । पृष्ठीं ठेविती बळेंकरुन ।
स्पर्श होतांचि जाती चिकटून । आंग हालवितां पडेना । १०३ ॥
मग परम आक्रंदती । चुकलों चुकलों ऐसें म्हणती ।
आतां क्षमा करुनि चित्तीं । सोडवावें आम्हांतें ॥ १०४ ॥
येरु म्हणती खुशाल असा । जीवित्वाचा धरुनि भरंवसा ।
स्वामी पाहूनि आलिया देशा । सोडवूनि नेऊं तुम्हांसी ॥ १०५ ॥
गुरु करितां हा कशाला । संकट पडतां काढितां पळा ।
परी ज्याची क्रिया त्याची त्याला । फलद्रूप होतसे ॥ १०६ ॥
आतां स्वस्थ असा चित्तीं । आम्ही जातो स्त्रीदेशाप्रती ।
दैवें वांचूनि आलिया अंतीं । सोडवूनि नेऊं तुम्हांतें ॥ १०७ ॥
ऐसें सकळा करुनि भाषण । सकळां पृष्ठीं देऊनि पाषाण ।
परतते झाले गुरुआज्ञेकरुन । परी ते पाहूनि आरंबळती ॥ १०८ ॥
म्हणती गुरुमायेहूनि माय । होऊनियां सदयहृदय ।
आम्हांसही सवें न्यावें । स्त्रीराज्यामाझारीं ॥ १०९ ॥
आमुची सकळ गेली भ्रांती । आणि गुरुची समजली प्रतापशक्ती ।
आतां सकळ नासूनि दुर्मती । विश्र्वासातें टेंकलों ॥ ११० ॥
ऐसी करितां विनवणी । ती ऐकिली सातजणीं ।
मग म्हणती श्रीगुरुतें सांगुनी । सुटका करुं तुमची ॥ १११ ॥
ऐसें बोलूनि सकळांकारण । पुनः आले परतून ।
म्हणती महाराजा दैन्यवाण । शिष्यकटक मिरवले ॥ ११२ ॥
त्यांची नासिली सकळ भ्रांती । पृष्ठीं पाषाण घेऊनि आरंबळती ।
तरी आतां कृपा ओसंडोनि चित्तीं । मुक्त करा सर्वांतें ॥ ११३ ॥
आतां येथूनि गेलिया प्राण । सोडणार नाहीं आपुले चरण ।
सर्वही स्थिरमती धरुन । चरणावरी लोटतील ॥ ११४ ॥
नाना युक्तींकरुन । करितील श्रीगुरुचें समाधान ।
हें सच्छिष्यांचे ऐकूनि वचन । नाथ चित्तीं तोषला ॥ ११५ ॥ 
मग विभक्तास्त्रमंत्र होटीं । जल्पूनि योजिली भस्मचिमुटी ।
ओपूनि शिष्या करसंपुटी । म्हणे चर्चूनि यावे तयातें ॥ ११६ ॥
मग एक शिष्य जाऊनि तेथें । भाळीं चर्चूनि भस्मचिमुटातें ।
चर्चिता झाले सकळ मुक्त । साता उणे सातशें ॥ ११७ ॥
ऐसे मुक्त झालें सकळ जनीं । येऊनि लागले गुरुचे चरणीं ।
नाथ तयालागीं पाहुनी । अहा अहा म्हणतसे ॥ ११८ ॥
असो ऐसें बोलूनि वचन । तेथूनि टाळितां मगमुक्कम ।
स्त्रीदेशाचे सीमेवरी जाऊन । वस्तीलागीं विराजती ॥ ११९ ॥
तेथें दिन लोटल्या झाली रात्री । तो चमत्कार वर्तला ते क्षितीं ।
भुभुःकार द्यावया मारुती । सेतुहूनि चालिला ॥ १२० ॥
तों मार्गी येतां अस्त्र सबळ । वेष्टित झालें पदकमळ ।
परी तो वज्रशरीरी तुंबळ । अस्त्रालागीं मानीना ॥ १२१ ॥
येरु चित्तामाजी विचार करीत । हें स्पर्शास्त्र आहे निश्र्चित ।
तरी येथें कोणी प्रतापवंत । आला आहे निश्र्चयें ॥ १२२ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । येता झाला सीमेप्रती । 
तों कटक पाहूनि नाथपंथी । मनांत विचार करीतसे ॥ १२३ ॥
कीं म्या यत्न करुनि बहुत । तेथें पाठविला मच्छिंद्रनाथ ।
परी कटक गेलिया तेथ । बोधितील तयासी ॥ १२४ ॥
मग बोधें होऊनियां स्वार । स्वदेशीं येईल मच्छिंद्र ।
मग मैनाकिनीमुखचंद्र । दुःखसागरीं उतरेल ॥ १२५ ॥
तरी येथेंचि यातें निर्बळ करुन । मागें लावावें परतून ।
मग अति भीमरुप धरुन । भुभुःकार करीतसे ॥ १२६ ॥
गाजवी पुच्छाचा फडत्कार । भयंकररुपी अति तीव्र ।
तें पाहुनिया कटकभार समग्र । स्वामीआड दडताती ॥ १२७ ॥   
म्हणती महाराजा प्रळयकाळ । प्रथम उदेला महाबळ ।
आता भक्षील कटक सकळ । उपाय कांहीं योजावा ॥ १२८ ॥  
येरु म्हणे नाहीं भय । उगेचि पहा धरुनि धैर्य ।
यानें तुमचे करावें काय । अचळपणीं असा रे ॥ १२९ ॥
मग करीं घेऊनि भस्मचिमुटी । वज्रास्त्र परम बोले होटीं ।
तो प्रयोग सिद्ध होता दाटीं । भस्मचिमुटी फेंकिली ॥ १३० ॥
मग तें वज्रास्त्र परम कठिण । माथां मिरविलें भूषण गगन ।
येरीकडे वायुनंदन । निजदृष्टी पहातसें ॥ १३१ ॥
मग मोठमोठे उचलून पर्वत । फेंकिता झाला गगनपंथ ।
ते गिरी आदळतां वज्रास्त्र । चूर्ण होती क्षणार्धें ॥ १३२ ॥
तें पाहूनि अंजनीसुत । प्रेरिता झाला मुष्टीघात ।
तेणे वज्र झाले भंगित । निचेष्टित महीं पडलें ॥ १३३ ॥
ऐसें होतां प्रकरण । दृष्टी पाहे कर्णनंदन ।
मग काळिकास्त्र जल्पून । भस्मचिमुटी सोडीतसे ॥ १३४ ॥
यावरी सवेंचि अग्न्यस्त्र । सोडिता झाला प्रयोगमंत्र ।
त्यावरी सवेंचि वासवास्त्र । वरी वाय्वस्त्र प्रेरिलें ॥ १३५ ॥
मग तो वाय्वस्त्रप्रयोग होतां । द्विमूर्धनी दाटला सविता ।
मग महापर्वत असती स्थूलता । भस्म होती तयानें ॥ १३६ ॥
तों अंजनीसुतासकट । तो अति तीव्र करीत नेट ।
याउपरी काय उद्भट । विक्रालरुपी प्रगटला ॥ १३७ ॥
कीं कृतांत जैसा मुख पसरुन । ग्रासू पाहे सकळ जन ।
त्यातें साह्य परिपूर्ण । वासवशक्ती मिरवली ॥ १३८ ॥
जैसा यमामागे दम । प्रगट होय हरुं प्राण ।
ऐसें उभयास्त्र तरुण । कडकडां करीतसे ॥ १३९ ॥
जैसे खग मेघडंबरीं । चनका मारिती चपळेपरी ।
उदेली भक्ती तदनुपरी । प्रणयतरणी मिरवल्या ॥ १४० ॥
त्यात अग्न्यस्त्राचा ताप थोर । त्यावरी साह्यातें वातास्त्र ।
मग मारुतिदेह होऊनि जर्जर । रक्षणार्थ कांहीं दिसेना ॥ १४१ ॥
वासव आणि काळिकास्त्र । मागे पुढें होऊनि पवित्र ।
प्रहर भेदाया पाहती स्वतंत्र । परी वायुपुत्र चपळ तो ॥ १४२ ॥
देई अस्त्रातें दोन हात । ओढिता झाला चपळवंत ।
तरी तेंही अस्त्र चपळ बहुत । हस्तयुक्त होऊं न देत ॥ १४३ ॥
यावरी अग्न्यस्त्राकारण । पुच्छीं योजी वायुनंदन ।
यापरी वातास्त्र कारण । स्तुति विनवोनि आराधिलें ॥ १४४ ॥
म्हणे महाराजा प्रळयवंत । प्रविष्ट करा अग्न्यास्त्रांत ।
तरी तुझा आहे सुत । लोकांमाजी मिरवतसे ॥ १४५ ॥
परी गृहींचा पाहूनि अनर्थ । कोणता पाहुनि तुष्टला तात ।
ऐसेया प्रकरणीं हृदयांत । निवारिजे महाराजा ॥ १४६ ॥
ऐसें उत्तर ऐकोनि सावधान । मग बोलवी वायुनंदन ।
तें वातास्त्र झालें क्षीण । महाप्रतापें आच्छादी ॥ १४७ ॥
तें पाहुनी कानिफनाथ । मोहनास्त्र प्रेरुनियां त्वरित ।
तें गुप्तास्त्र हृदयांत । जाऊनि आंत संचरलें ॥ १४८ ॥
संचरलें तरी वज्रशरीर । लाग न धरी मोहनास्त्र । 
परी कांहींसा भ्रांत वायुकुमर । निजदेहीं दाटला ॥ १४९ ॥
तरी तैसाचि भ्रांतीमाझारी । अग्न्यस्त्र पुच्छें धरी । 
महाबळें समुद्रतीरी । भिरकावुनि दिधलें ॥ १५० ॥
परी अग्न्यस्त्रें महासबळ । काढूं लागलें समुद्र जळ ।
जळाचरा ओढवला प्रलयकाळ । तेणें समुद्र गजबजिला ॥ १५१ ॥
मग तो येवोनि मूर्तिमंत । निजदृष्टीनें जंव पाहात ।
तों कानिफा आणि वायुसुत । युद्धालागीं मिरवले ॥ १५२ ॥
परी तयासी ओढवला प्रळयकाळ । अग्न्यस्त्रातें करी शीतळ ।
मग जलद आणोनी सकळ । अग्न्यस्त्रीं स्थापिले ॥ १५३ ॥
तेणे अग्न्यस्त्र झाले शांत । येरीकडे वायुसुत ।
मोहनप्रकरणीं प्रविष्टचित्त । परी पुच्छीं पर्वत उचलिला ॥ १५४ ॥
पर्वत उचलावयाचे संधीं । फाकली होती तिकडे बुद्धी ।
आणि स्थावरमोह अस्त्रें शुद्धि । भ्रम पडला होताचि ॥ १५५ ॥
त्या संधींत दोहींकडून । पाठींपोटी अस्त्रें दोन ।
एकदांचि भेदिली प्रहार करुन । सबळबळें करुनियां ॥ १५६ ॥
जैसी मेषाची मूर्धनी । झुंजता एक होय मेळणीं ।
तैसी पृष्ठीं हृदय लक्षुनी । भेदतीं झालीं तीं अस्त्रें ॥ १५७ ॥ 
कालिका आणि वासवशक्ती । भेदितांचि मूर्छित झाली व्यक्ती ।
तेणें उलंढूनि महीवरती । वायुसुत पडियेला ॥ १५८ ॥
तें पाहूनि अनिळराज । हृदयीं उजळलें मोहबीज ।
मग प्रत्यक्ष होवोनि तेजःपुंज । तयापासीं पातला ॥ १५९ ॥
परी तो अंजनीचा बाळ । वज्रशरीरी ब्रह्मांडबळ ।णे
पुच्छ सांवरोनि उतावेळ । युद्धा मिसळूं पहातसे ॥ १६० ॥
मग श्रीवातें धरुनि हात । म्हणे ऐक मद्वचन सत्य ।
हे सबळपाणी आहेत नाथ । रळीं यांतें करुं नको ॥ १६१ ॥
पूर्वी पाहे मच्छिंद्रनाथ । तव शिरीं दिधला होता पर्वत ।
वाताआकर्षणविद्या बहुत । जाज्वल्यें मिरवे यापासीं ॥ १६२ ॥
तरी आतां सख्य करुन । कार्य काय तें घे साधून ।
गूळ दिल्या पावे मरण । विष त्यातें नकोचि ॥ १६३ ॥
यापरी बोले अपांपती । म्हणे हेंचि मानवतें माझे चित्तीं ।
सख्यासारखी दुसरी युक्ती । योग्यायोग्य दिसेना ॥ १६४ ॥
मग उदधीं आणि द्वितीय वातें । सवें घेऊनि मारुतीतें ।
कानिफातें घेऊनि त्वरितें । परम प्रेतीनें भेटले ॥ १६५ ॥
कानिफा तीन्ही देवांसी । नमन करितसे अतिप्रीतीसीं ।
नमूनि पुढें वायुसुतासी । युद्ध कां सोडिलें म्हणतसे ॥ १६६ ॥ 
हे ऐकूनि बोले अनिळ । कीं युद्ध कासया करितां तुंबळ ।
कवण अर्थी तयाचें फळ । आम्हांलागीं दाखवा ॥ १६७ ॥
नाथ म्हणे तया मारुतीसी । युद्ध करीत होतों कासयासी ।
मारुती म्हणे कामनेसी । तरी ऐका माझिया ॥ १६८ ॥
म्यां बहुत यत्नेंकरुन । गौरवोनि मच्छिंद्रनंदन ।
परम आदरें स्त्रीराज्याकारण । पाठविला आहे कीं ॥ १६९ ॥
तरी हे तयाचे असती जाती । तेथें गेलिया तयाप्रती । 
भेटल्या तयाची समूळ वृत्ती । बोधस्थिती आणितील ॥ १७० ॥
मग तो सांडूनि तेथींचे स्थान । स्वदेशांत करील गमन ।
ऐसी चित्तीं कल्पना आणून । युद्धालागीं मिसळलों ॥ १७१ ॥
तरी आतां असो कैसें । हा गेलिया स्त्रीराज्यास । 
कांहीं योग मच्छिंद्रास । बोलूं नये दुरुक्ती ॥ १७२ ॥
ऐसे प्रकरणीं भाष्य देऊन । आवश्य करावें यांनीं गमन ।
मग माझें कांहीं एक छलन । होणार नाहीं नाथासी ॥ १७३ ॥
ऐसें बोलतां वायुसुत । अपांपति म्हणे बरवें यांत ।
अहा म्हणूनि वदे मरुतसुत । यांत काय वेंचतसे ॥ १७४ ॥
मग हांसोनि बोलिलें कानिफनाथें । अहा शंका आलिया तुम्हांतें ।
तरी प्रयोजन काय आमुतें । मच्छिंद्रातें बोलाया ॥ १७५ ॥
तरी सहसा आम्ही मच्छिंद्रासी । बोलणार नाहीं दुर्बलेंसी ।
आणि संबोधूनि त्यासी । तेथील तेथें स्थापूं कीं ॥ १७६ ॥
ऐसें वदूनि करतळभाष । देऊनि तुष्ट केलें त्यास ।
मग आपण आपुल्या स्वस्थानास । त्रिवर्गही चालिले ॥ १७७ ॥
सकळ गेले स्वस्थानासी । तो उदय झाल्या लोटली निशीं ।
मग शिष्यकटकेंसी । तेथूनियां निघाले ॥ १७८ ॥
स्त्रीराज्यांत प्रवेशून । नाना तीर्थक्षेत्रस्थान । 
पहात पहात गजनंदन । शृगंमुरडीं पातला ॥ १७९ ॥
तों तें गांवींचे नृपासनीं । तिलोत्तमा मैनाकिनी ।
मच्छिंद्रासह बैसोनि सभास्थानीं । सेवेलागीं विनटली ॥ १८० ॥
तों कानिफनाथ फेरी । आला करीत राजद्वारीं ।
सवें शिष्य कटक भारी । तों द्वाररक्षक शोधालागीं धांवले ॥ १८१ ॥
शोधितां शिष्य नयनीं । तो कानिफा कळला कानीं ।
मग जाऊनियां राजांगणीं । वृत्तांत सुचविला ॥ १८२ ॥
म्हणती महाराजा ग्रामद्वारीं । कानिफा सहनाथपरिवारीं । 
सातशें शिष्य समुद्रलहरी । तव भेटी आलासे ॥ १८३ ॥
हें ऐकूनि मच्छिंद्रनाथ । म्हणे पाहिला तया कोण पंथ ।
येरी म्हणती म्हणवती नाथ । कानफाटी कर्णी ॥ १८४ ॥ 
ऐसें ऐकूनि मच्छिंद्रनाथ । परम दचकलें तयाचें चित्त ।
म्हणे आला कीं गोरक्षनाथ । पालटोनि नामातें ॥ १८५ ॥
तरी आतां कैचे येथें । राहूं देईना या सुखातें ।
अहा तिलोत्तमा सौंदर्यें माते । लाधली होती प्रीतीनें ॥ १८६ ॥
परी तयामाजी विक्षेप झाला । कीं सैंधवे दुग्धघट नासला ।
तन्न्यायें न्याय झाला । प्रारब्धवशें आमुचा ॥ १८७ ॥           
आतां असो कैसे तरी । यासी न्यावें ग्रामाभितरीं ।
म्हणोनि सिद्ध करोनि स्वारी । अश्वशिबिकेसह निघाला ॥ १८८ ॥
त्वरें येऊनि ग्रामद्वारीं । परस्पर भेटी झाल्यावरी ।
कानिफा पाहोनि हृदयाभीतरी । समाधान मिरवलें ॥ १८९ ॥
मग आदेशा होऊनि नमन । रुजामे भरजरी कनकवर्ण ।
महीं पसरुनि योगद्रुम । तयावरी बैसविला ॥ १९० ॥
मग कोण कोनाची समूळ कथा । तदनु पुसतां गुरुचे पंथा ।
त्यांनींहि सांगितली समूळ वार्ता । जालिंदर जन्मापासूनी ॥ १९१ ॥
मग मच्छिंद्र म्हणे जालिंदरनाथ । देता अनुग्रह उत्तम यात ।
तरी तूं कानिफा नाम सुत । गुरुबंधु तो माझा ॥ १९२ ॥
मग शब्दोशब्दीं अधिकोत्तर । वाढत चालली प्रेमलहर ।
मग वाहूनि गजस्कंधावर । ग्रामामाजी आणिलें ॥ १९३ ॥
मग नानायुक्ती रचोनि चित्तीं । स्वयें करीं मच्छिंद्रजती ।
एक मास अति प्रीतीं । कानिफा राहविला त्या स्थानीं ॥ १९४ ॥
राहिला परी तो नाथ कैसा । तरी समूळ कथासुधारसा ।
पुढिलें अध्यायीं श्रवणीं वसा । श्रवण होईल सकळिकां ॥ १९५ ॥
तरी हा भक्तिकथासार । तुम्हां वैष्णवांचे निजमाहेर । 
प्रपंच सांडूनि रहावें स्थिर । या धवलगिरीं येऊनि ॥ १९६ ॥
धुंडीसुत नरहरिवंशीं । कवि मालू नाम जयासी । 
तो बैसला ग्रंथमाहेरासी । सुखसंपन्न भोगावया ॥ १९७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।    
सदा परिसोत भाविक चतुर । पंचदशाध्याय गोड हा ॥ १९८ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार पंचदशाध्याय संपूर्ण ॥
ShriNavanath BhaktiSar Adhyay 15 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पंधरावा ( १५ ) 

Custom Search

No comments: