Wednesday, February 17, 2016

ShriNavanath BhaktiSar Adhyay 19 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणीसावा (१९) भाग २/२


ShriNavanath BhaktiSar Adhyay 19
 kanifa told Goraksha that his guru Machchhindra was in Female kingdom. Goraksha started towards it for bringing Machchhindra from there. He met Kalinga who was a dancer and going to Female kingdom. Goraksha proved his mastery on playing different musical instruments. Then he entered female kingdom alongw with Kalinga who was very much impressed by Goraksha's mastery over different musical instruments. Goraksha used Vajrastra, Sparashastra, Mohanastra and Nagastra so that Maruti would not trouble him. Maruti came at night and because of these Astras became helpless and about to die. He they prayed God ShriRam who came at his rescue and made him free. Then both went to Goraksha for telling him not to take Machchhindra out of female kingdom with him. Goraksha told them that he is there to take Machchhindra with him any how and any cost. Anything other than that they can ask him to do, he would do it. In the Next 20 th Adhyay Dhundisut Malu from Narahari family will tell us what happen next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणीसावा (१९) भाग २/२
तरी आतां धांव वेगीं । तव दूत या संकटप्रसंगीं ।
मुक्त होऊं दे महीलागीं । शरणागततारक तूं म्हणवितोसी ॥ १०१ ॥
ऐसी स्तुति वागुत्तर । करीत अति वायुकुमार ।
ते वाग्बाण श्रवणद्वार । पाहते झाले रामाचें ॥ १०२ ॥
जाणूनि परम संकटमात । धांवोनि आला श्रीरघुनाथ ।
मारुतीचें संकट पाहूनि अत्यंत । परम चित्तीं कळवळला ॥ १०३ ॥
कीं एकांत पाडसावांचूनि हरिणी । हिंडे सैरावैरां रानीं ।
तन्न्यायें  मोक्षदानी । हृदयामाजी कळवळला ॥ १०४ ॥
जैसी वत्सालागीं गाय । काननी हंबरडा फोडी मोहें । 
त्याचिप्रमाणें रघुराय । हृदयामाजी कळवळला ॥ १०५ ॥ 
जळवेगळां पडतां मीन । अति तळमळोनि सोडी प्राण ।
तन्न्यायें रघुनंदन । हृदयामाजी कळवळला ॥ १०६ ॥
किंवा बाळ मातेचे चुकार होतां । आरंबळती तीं उभयतां ।
तन्न्यायें भक्त निःशक्त होतां । हृदयामाजी कळवळला ॥ १०७ ॥ 
मग मनोवेगातें मागें सारुन । प्रत्यक्ष आला लगबगें धांवून ।
तों विकळ होऊनि भक्तजन । अहा अहा म्हणतसे ॥ १०८ ॥
मग तापनिवारण चाप करीं । शर संजुनि बाप कैवारी ।
पाकशासनास्त्र अवधारी । वज्रास्त्र निवटाया ॥ १०९ ॥
प्रेरितांचि पाकशासनास्त्र । प्रकट झाला सहस्त्रनेत्र ।
वज्रास्त्र कवळूनि पवित्र । जाता झाला अमरपुरीं ॥ ११० ॥
यावरी विभक्तास्त्र जल्पून । स्पर्शास्त्र केलें निवारण ।
यावरी फणी सहस्त्रनयन । हस्तपदीं गुंडाळला ॥ १११ ॥
तयासाठीं क्षीराब्धिवासी । लक्ष्मीनारायण वेगेंसीं ।
तें प्रत्यक्षस्वरुपें उरगेंसीं । पाहता वैनतेय झालासे ॥ ११२ ॥
नमूनि म्हणे अहा अनंता । तूं प्रिय अससी माझे चित्ता । 
याचि नीतीं वायुसुता । संबोखीत आहेसी ॥ ११३ ॥
तरी आतां मम सखया । मुक्त करीं अंजनीहृदया ।
ऐसें ऐकोनि आराधिया । मोहाब्धि उचंबळला ॥ ११४ ॥
मग स्वदेहपुच्छ काढूनि । मुक्त केलें हस्तचरण ।
काढूनि घेतलें अस्त्रमोहन । प्रत्यक्ष विष्णु होऊनियां ॥ ११५  ॥
असो नागास्त्री उरगपती (शेषनाग) । प्रेमें नमूनि अब्धिजापती ।
जाता झाला स्वस्थानाप्रती । मही धारण करावया ॥ ११६ ॥
येरीकडे अंजनीनंदन । सावध होऊनि बैसला जाण ।
हृदयीं आठवूनि रामगुण । स्वस्थ झाला तेधवां ॥ ११७ ॥
दृष्टीं करितां चहुंकडे । तो रामस्वामी देखिला पुढें ।
आनंदोनि मग प्रेमें उडे । चरणकमल नमावया ॥ ११८ ॥
वंदूनि श्रीरामाचे चरण । म्हणे महाराजा वांचविला प्राण ।
वेधलें अस्त्र अति दुर्गम । देखिलें नाहीं कधीं हो ॥ ११९ ॥
अस्त्र नव्हे परम काळ । महाप्रळयींचें उतालें सबळ ।
आणि माझा अंतकाळ । ओढवला होतां महाराजा ॥ १२० ॥
परी तूं माझी माय सघन । लगबगीनें आलीस धांवून ।
म्हणूनि वांचला माझा प्राण । प्रळयास्त्रामाझारीं ॥ १२१ ॥
तरी तुझिया उपकारा । उत्तीर्णता न होय मज पामरा ।
ऐसें वदोनि वागुत्तरा । चरणांवरी लोळतसे ॥ १२२ ॥
अति कनवाळू सीतापती । सप्रेम हृदयीं धरिला मारुती ।
म्हणे तुजसाठीं बा या क्षिती । तीन वेळां आलों मी ॥ १२३ ॥
तेव्हां चतुर्थ अस्त्रबंधन । मुक्त झालें तुजकारण । 
परी असो तव शत्रु कोण । वेगें वद मम वत्सा ॥ १२४ ॥
येरु म्हणे महाराजा । अकल्पित लाभ संकटचोजा ।
शत्रु येथें कवण माझा । प्राप्त झाला असे कीं ॥ १२५ ॥
तरी आतां प्रस्तुतकाळीं । क्षत्रिय नसे कोणी बळी ।
परी नाथपंथी अस्त्रफळीं । मिरवीतसे महाराजा ॥ १२६ ॥
तरी महाराजा नवांतील एक । आला असे प्रतापदायक ।
तयाचा प्रताप जो अर्क । असे अजिंक्य सर्वांसी ॥ १२७ ॥
ऐसें ऐकूनि मारुतीवचन । म्हणे राम नाथपंथी भक्त जाण ।
तयांसी रळी हे वायुनंदन । करुं नये सहसाही ॥ १२८॥
ते भक्त माझे आवडीचे असती । तयांसीं रळी न करीं मारुती ।
आपण आपुल्या विक्षेपवृत्ती । वाढवूं नये सर्वज्ञा ॥ १२९ ॥
ऐसी नीति रघुवीर । अंजनीसुता बोलोनि उत्तर ।
हृदयांत पाहे जनकजावर । नाथ कोणता नवांतुनी ॥ १३० ॥
तों सहज दृष्टीं अंतरीं करितां । चित्त गुंतले गोरखसुता ।
मग मारुतीसी म्हणे वो प्रतापवंता । गोरक्षनाथ असे हा ॥ १३१ ॥
असो जो हरिनारायण । तयाचा अवतार गोरक्ष जाण ।
याउपरी बोले मारुती वचन । चला जाऊं दर्शना तयाच्या ॥ १३२ ॥
या सीमेपासूनि एक योजन । तेणें रचुनि हें संधान । 
प्रतापी आहे गौरनंदन । स्त्रीराज्यांत जाते झाले ॥ १३३ ॥
तया नाथाची घेतां भेटी । एक अर्थ आहे आमुचे पोटीं ।
तो साधूनि घेऊनि त्यांत शेवटीं । तरी कृपाजेठी चलावें ॥ १३४ ॥
राम म्हणे वो अर्थ कोण । तो मातें करी निवेदन ।
मग सकळ कथा अंजनीनंदन । मच्छिंद्राची वदलासे ॥ १३५ ॥
मैनाकिनीचें तपोवचन । मच्छिंद्र पाठविला म्हणून । 
तरी गोरक्षक आतां जाऊन । घेऊन येईल मच्छिंद्रा ॥ १३६ ॥
तरी त्यासी अमृतवाणी । बोलूनि गोंवावा दृढवचनीं ।
मग तो गोरक्ष मच्छिंद्र लागूनि । नेणार नाहीं कदाही ॥ १३७ ॥
ऐसा विचार सुचवी रामातें । बोलता झाला सीतानाथ ।
म्हणे बा तुझा पुरवावया अर्थ । चाल गोरक्षा भेटाचया ॥ १३८ ॥
युक्तीप्रयुक्ती बोलूनि वचन । परमादरें तोषवून ।
इतुका अर्थ घेऊं मागून । तुजसाठीं कपींद्रा ॥ १३९ ॥
ऐसें वदूनि रघुनाथ । मग चालते झाले उभयतां ।
मध्यरात्रीचा समय होतां । चिनापट्टण ग्राम पोंचलें ॥ १४० ॥
तंव त्या ग्रामीं सुख शयनीं । पहुडले होते सुखपणीं ।
स्वस्वरुपीं अन्तःकरणीं । हेलावतसे ब्रह्मांड  ॥ १४१ ॥
येरीकडे रघुनाथ । आणि द्वितीय अंजनीसुत ।
ग्रामानिकट येतां त्वरित । स्वरुपातें पालटिती ॥ १४२ ॥
शुद्ध करुनि याचकपण । भावे आले उत्तम ब्राह्मण ।
नमन करितां गौरनंदन । तया ठायीं पातले ॥ १४३ ॥
तंव तो साधक गोरक्षनाथ । बैसला होतां निवांत ।
वाचे अंशघन सद्गुरुनाथ । प्रेमछंदे डुल्लतसे ॥ १४४ ॥
जैसा जळामाजी मीन । तळपत आहे स्वछंदेंकरुन ।
तन्न्यायें गोरक्षनंदन । श्रीगुरुभजनीं डोलतसे ॥ १४५ ॥
तों येरीकडे उभयतां । प्रत्यक्ष जाऊनि तेथ ।
आदेश म्हणून वंदिला नाथ । निकट जाऊनि बैसले ॥ १४६ ॥
बोलती बैसतांचि वचन । आम्हीं षड्शास्त्री ब्राह्मण ।
तुम्हीं नाथ परिपूर्ण । महीवरी असतां कीं ॥ १४७ ॥
योगियांमाजी शिरोमणी । जितेन्द्रिय सदा दमनी ।
विरक्तांत पूर्णपणीं । मिरविसी महाराज ॥ १४८ ॥
धैर्याब्धीचें बुद्धिजळ । मिरविसी विवेकपात्रीं सबळ ।
परघात तो वडवानळ । शांतोदरीं सांठवीसी ॥ १४९ ॥
मित्रशत्रुद्वितीयतटीं । सदैव कृपांसरितेचा पूर लोटी ।
क्षेमालिंगन अर्थी भेटी । वर्तविली महाराजा ॥ १५० ॥
तरी सच्चिदानंद तेजाकारु । कीं वहनादि चराचरु ।
एक पहाणें जंगमादरु । दाटविसी महाराजा ॥ १५१ ॥
तूं ऐसा औदार्यदाता । अपूर्ण मिरविसी धनवंता ।
तरी महाराजा आमुच्या अर्था । साधिला तो पुरवीं कां ॥ १५२ ॥
गोरक्ष म्हणे विप्रोत्तमा । कोण कामना वेधली तुम्हां ।
तरी सरिता कार्यउगमा । प्रसिद्धपणीं मिरवावें ॥ १५३ ॥
येरु म्हणती जी योगशीला । वरदपात्री ओपूं बोला ।
मग आमुची सरिता विपुला । आनंद जळीं दाटेल ॥ १५४ ॥
तरी भाष देऊनि आतां । तोषवी कां आमुचे चित्ता  ।
भाष्यदिधल्यावरी अर्था । दर्शवूं तूतें महाराजा ॥ १५५ ॥
ऐसी ऐकोनि तयांची वाणी । तो गोरक्ष विचार करी मनीं ।
कीं इतुका गौप्यार्थ मेदिनी । कोण आहे मजपाशी ॥ १५६॥
शिंगी सारंगी कुबडी फावडी । मुद्रा शैली कंथा घोंगडी ।
पात्र भोपळा संपदा एवढी । आम्हांपाशी विराजे ॥ १५७ ॥
याविरहित आणिक दुसरा । अर्थ न राहिला आमुच्या आश्रया ।
परी यानें कल्पिलें काय अंतरा । हे तो कांहीं कळेना ॥ १५८ ॥
यापरी आणी विचार चित्तीं । कीं अवसर लोटला मध्यरात्रीं ।
त्यांतही स्त्रीदेशाप्रती । पुरुष आले हें कैसें ॥ १५९ ॥
तरी हे मानव सहसा नसती । स्वर्ग सुखाचे पात्र असती ।
शुक्र कीं वरुण गभस्ती । वाचस्पति पातलेति ॥ १६० ॥
कीं मंगळ किंवा विरिची सुंदर । कीं गण गंधर्व साचार ।
कीं यक्ष रक्ष अश्र्विनीकुमर । कीं तपोलोकादि पातले ॥ १६१ ॥
नातरी व्हावया आगमन । मानवा नसेही साधन। ।
तरी हे देवचि निश्र्चयवचन । मानवी कृत्य नसेचि ॥ १६२ ॥
ऐसें भावूनि दृढ चित्तांत । आणि विचारी हृदयांत ।
कवण कामना आहे यतिं । शोध करुं तयाचा ॥ १६३ ॥
म्हणूनि अंतरदृष्टीं अंतःकरणीं । करुनि विचार शोधी मुनी ।
परी कांहीं एक अर्थ तों तरणी । आश्रयातें लागेना ॥ १६४ ॥
मग म्हणे असो कैसें । आपण चालिलो ज्या कार्यास । 
तितुकें भिन्न करुनि यास । मागेल तेंचि आदरुं ॥ १६५ ॥
ऐसा विचार करुनि मनीं । बोलतां झाला प्रसिद्धपणीं ।
म्हणे महाराजा भूदेवतरणी । तुम्हीं सहसा नोहेती ॥ १६६ ॥
काय प्राप्ती द्विजवरा । चालूनि येईल येथवरा । 
काळकृतांत सीमेवरा । चतुर्थअस्त्र विराजती ॥ १६७ ॥
प्रतापार्क वायुकुमर । ते रश्मीतसें भुभुःकार । 
यावरी प्रेरिला वैश्र्वानर । चतुर्थास्त्र प्रतापी ॥ १६८ ॥
ऐशिया संकटीं भूदेवराया । कोण रेवाण (लहान देवता) येईल उपाया ।
शिवहालातें प्राशिलिया । वाचेल ऐसें वाटेना ॥ १६९ ॥
कीं दहन आकाशीं कवळितां । येथें पतंग मिरवी आपुली वीर्यता । 
कीं मशक मेरुते वाहुनि तोली वरता । जात थिल्लरी बुडवावया ॥ १७० ॥
तेवीं येथें यावयाकारण । कदा न पावे मनुष्या गमन ।
तरी महाराजा प्रज्ञावान । कोण तुम्हीं तें सांगा ॥ १७१ ॥
ऐसें बोलूनि माथा चरणीं । ठेविता झाला सलीलपणीं ।
मग एकमेकांतें विलोकुनी । हास्यवदन करिताती ॥ १७२ ॥
याउपरी बोले रघुनंदन । आतां यातें ठेवणें भिन्न ।
हें योग्य मातें न ये दिसून । स्वपंकजा दावावया ॥ १७३ ॥
ऐसें वदतां रघुपती । मान तुकावी प्राज्ञमूर्ती ।
मगप्रकट करुनि स्वरुपप्राप्ती । नाथ हृदयीं कवळिला ॥ १७४ ॥
म्हणे वत्सा ऐक वचन । कामें वेधला वायुनंदन ।
कीं मच्छिंद्रयतीलागून । नेऊं नये स्वदेशीं ॥ १७५ ॥
मैनाकिनी नृपदारा । परम आचरली तपाचारा ।
वचनीं गोंवूनि वायुकुमारा । नाथ मच्छिंद्रातें मागितलें ॥ १७६ ॥
तरी यशाची उभवूनि कोटि । प्रेरिला आहे मच्छिंद्रजेठी ।
तरी हा अर्थ मारुतीचे पोटीं । पूर्णपणीं मिरवला ॥ १७७ ॥
याविरहित मागणें तुजसी । कांहीं नाहीं तपोराशी ।
तरी तूं जाऊनि तया भेटीसी । श्रीनाथासी नेऊं नको ॥ १७८ ॥
ऐसें ऐकूनि लाघवी वचन । बोलता झाला गौरनंदन ।
हे महाराजा प्रज्ञावान । सत्य वचन बोलतसां ॥ १७९ ॥
परी पहा जी प्रज्ञावानराशी । आम्ही म्हणवितों योगाभ्यासी ।
तरी हे अनुचित कर्म आम्हांसी । प्रपंच विसरुं साजिरा ॥ १८० ॥
तरी इतुके काम करुनि भिन्न । मागाल तरी देईन प्राण ।
परी या देशीं मच्छिंद्र जाण । ठेवणार नाहीं सहसाही ॥ १८१ ॥
भूवरी आकाश अवघें पडो । मेरुमांदार उलथोनि पडो ।
कीं अवघीं मही रसातळीं बुडो । परी मी न ठेवी गुरुवर्या ॥ १८२ ॥
यावरी बोले रघुनंदन । इतुकें आमुचें करीं मान्य ।
गोरक्ष म्हणे पितरांकरण । घडूनि आल्या घडेना ॥ १८३ ॥
तरी शांतिमांदार रघुनंदन । हस्तकीं धरिला वायुनंदन ।
म्हणे बा सकळ प्रतापगुणसंपन्न । करशील कंदन (युद्ध) निश्र्चयें ॥ १८४ ॥
ऐसें बोलता गौरनंदन । मारुतीसी क्रोध आला दारुण ।
रामासी म्हणे करीन कंदन । शब्दभ्रष्ट आतांचि ॥ १८५ ॥
परी इतुका अनर्थ कासयासाठीं । लघुकार्यातें आटा आटी ।
तुज या वचनाची वागवटी । फिटूनि गेला महाराजा ॥ १८६ ॥
आतां प्रारब्धयोग कैसा । घडूनि येई तयाच्या लेशा ।
परी त्या आपुल्या भाषा । सत्य करुनि शेवटविले ॥ १८७ ॥
ऐशा युक्तीप्रयुक्तीकरुन । शांत केला वायुनंदन ।
मग गोरक्षा हृदयीं धरुन । रघुनंदन चालिला ॥ १८८ ॥
गोरक्षें चरणीं घालूनि मिठी । म्हणे महाराजा अस्त्रें चावटीं ।
तूंतें केली असे पोटीं । क्षेमाब्धींत सांठविला ॥ १८९ ॥
ऐसें विनवूनि वाणी रसाळ । बोळविला प्रतापशीळ ।
असो दशरथबाळ । स्वस्थानासी पातला ॥ १९० ॥
याउपरी पुढिले अध्यायीं कथन । श्रृंगमुरडा पाहील वायुनंदन ।
मैनाकिनी राज्यभाषण । गुप्तसूचना करील तो ॥ १९१ ॥
ती कथा परम सुधारस सुंदर । श्रोत्यांसी सांगेल धुंडीकुमर ।
नरहरिवंशीं संतकिंकर । मालूवरी विराजला ॥ १९२ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । एकोनविंशाध्याय गोड हा ॥ १९३ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥  

॥ श्रीनवनाथभक्तिसार एकोनविंशाध्याय संपूर्ण ॥  
ShriNavanath BhaktiSar Adhyay 19 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणीसावा (१९)


Custom Search

No comments: