Saturday, February 13, 2016

ShriNavanath Bhaktisar Adhyay 18 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठरावा ( १८ ) भाग१/२


ShriNavanath Bhaktisar Adhyay 18 
Gopichand started to go to Badrikedar for his 12 years tapas over there. He was passing through Poulpattanam where Tilkchand was a king and his daughter in law Champavati was Gopichand's sister. Tilakchand did not believe in Nathpanth and so he was unhappy with Gopichand as he had taken Diksha of Nathpanth. He told his family to serve food to Gopichand outside the house. Champavati became very sad for the worst treatment to his brother. She finished her life with a knife. Gopichand came to know about it. He became sad knowing that Champavati had to finish her life because of him. He told Tilkachand that his guru Jalindar would bring back Champavati alive again. However nobody believed him. Tilakchand proceeded with the further required rights. however he handed over one hand of Champavati to Gopichand. Jalindar came with Gopichand and he used Sanjivani Mantra to bring back Champavati alieve again. Tilakchand came to know the strength of Nathpanth. In the next 19 th Adhyay DhundiSut Malu from Narahai family will tell us about Goraksha who went to female kingdom to bring his Guru Machchhindra.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठरावा ( १८ ) भाग१/२
श्रीगणेशाय नमः ॥ 
जयजयाजी करुणाकरा । पंढरीअधीशा ।
रुक्मिणीवरा भक्तपालका चकोरचंद्रा । प्रेमपीयूषधारका ॥ १ ॥
हे दीनबंधो दीननाथा । पुढें चालवी भक्तिसारकथा ।
मागिले अध्यायीं वैराग्यता । गोपिचंदा लाधलीं ॥ २ ॥
असो पुढें आतां श्रोतीं । अवधान द्यावें ग्रंथार्थीं ।
गोपिचंद सोडूनि ग्रामाप्रती । वैराग्य आचरुं चालिला ॥ ३ ॥
मार्गी ग्रामोग्रामीं जात । आहारा पुरती भिक्षा मागत ।
पुढें मार्गीं गमन करीत । वाचे जप करीतसे ॥ ४ ॥
परी गौडबंगाल देश उत्तम । समाचार कळला ग्रामोग्राम ।
कीं गोपिचंद राजा नरोत्तम । योगीद्रंनीति आचरला ॥ ५ ॥
गांवोगांवींचे सकळ जनीं । ऐकतां विव्हळ होती मनीं ।
नेत्रीं अश्रुपात गाळूनी । अहा अहा म्हणताती ॥ ६ ॥
एकएकांसी बोलती वचन । राव नव्हे होती माया पूर्ण ।
कन्येसमान केलें पालन । सकळ प्रजेचें रायानें ॥ ७ ॥
आतां ऐसा राजा मागुती । होणार नाहीं पुढतपुढती । 
ऐसें म्हणोनि आरंबळती । लोक गांवींचे सकळिक ॥ ८ ॥
असो तो ज्या गांवीं जात । त्या गांवींचे लोक पुढें येत ।
म्हणती महाराजांनीं राहावें येथ । योग पूर्ण आचरावा ॥ ९ ॥
नाना पदार्थ पुढें आणिती । परी तो न घे कदा नृपती ।
भिक्षा मागूनि आहारापुरती । पुढें मार्गीं जातसे ॥ १० ॥
शेट सावकार मोठमोठे । बोळवीत येती तया वाटे ।
पुनः परता वागवट । बोलताती रायासी ॥ ११ ॥
हे महाराजा तुम्हांविण । प्रजा दिसत आहे दीन ।
जैसें शरीर प्राणाविण । निचेष्टित पडतसे ॥ १२ ॥
तैसी गति प्रजेसी झाली । जरी तुम्ही जातां आमुची माउली ।
तरी योग साधूनि पुनः पाउलीं । दर्शन द्यावें आम्हातें ॥ १३ ॥
अवश्य म्हणूनि नृपनाथ । बोळवीतसे समस्त ।
ऐसें रायासी गांवोंगांवीं होत । अति गुंती चालावया ॥ १४ ॥
असो ऐसें बहुत दिनीं । स्वराज्याची सीमा उल्लंघूनी ।
गौडबंगाल देश टाकूनी । कौलबंगालीं संचरला ॥ १५ ॥
त्याही कौलबंगालांत । गांवोगांवीं हा वृत्तांत ।
प्रविष्ट झाला लोकां समस्त । चकचकिताती अंतरी ॥ १६ ॥
म्हणती गोपीचंद रायासमान । होणार नाहीं राजनंदन ।
अहा गोपीचंद प्रज्ञावान । धर्मदाता सर्वदा ॥ १७ ॥
असो कौलबंगालींचा नृपती । पौलपट्टण ग्रामीं वस्ती ।
तेथें भगिनी चंपावती । गोपीचंदाची नांदतसे ॥ १८ ॥        
तिलकचंद श्र्वशुर नामीं । महाप्रतापी युद्धधर्मीं ।
जैसा गोपीचंद संपत्तीं उत्तमीं । तैशाचि नीतीं तो असे ॥ १९ ॥
गज वाजी (घोडे) अपरिमित । शिबिका नाना दिव्य रथ ।
धनभांडारें अपरिमित । राजसदनें भरलीं तीं ॥ २० ॥
किल्ले कोट दूर्ग विशाळ । कौलबंगाल देश सबळ ।
तया देशींचा तो नृपाळ । तिलकचंद मिरवला ॥ २१ ॥
एक लक्ष सहस्त्रशत लक्ष । सबळ पृतनेचा असे दक्ष ।
परी ती पृतना नव्हे प्रत्यक्ष । काळ शत्रूचा मिरवतसे ॥ २२ ॥
तया गृहीं ती चंपावती । सासुरवासिनी परम युवती ।
नणंदा जावा भावांप्रती । देवांपरी मानीतसे ॥ २३ ॥
परमप्रतापी गर्जत काळ । सासुसासरे असती सबळ ।
तेथेंही वृत्तांत समस्तां सकळ । गोपीचंदाचा समजला ॥ २४ ॥
समजला परी करिती टीका । म्हणती अ हारे नपुंसका ।
ऐसें राज्य सोडूनि लेंका । भीक मागणें वरियेलें ॥ २५ ॥
अहा मृत्यु आला जरी । तरी भिक्षाझोळी न वंचावी करीं ।
क्षत्रियधर्मदाय शरीरीं । भीक मागणें नसेचि ॥ २६ ॥
अहा जन्मांत येऊनि काय केलें । क्षात्रकुळा दूषण लाविलें ।
आमुचे मुखासी काळें लाविलें । पिशुन केलें जन्मांत ॥ २७ ॥
म्हणतील सोयरा तुमचा कैसा । नपुंसक झाला वेडापिसा ।
वैभव टाकूनि देशोदेशा । भीक मागे घरोघरीं ॥ २८ ॥
तो जन्मतांचि कां नाहीं मेला । क्षत्रियकुळांते डाग लाविला ।
आतां स्वमुखा दाविणें कशाला । श्र्लाघ्य दिसेना आमुतें ॥ २९ ॥
ऐसें आतां बहुतां रीतीं । लोक निंदितील आम्हांप्रती ।
अहा कैसी मैनावती । सुत दवडिला तिनें हा ॥ ३० ॥
अहा पुत्रा देऊनि देशवटा । आपण बैसली राजपटा ।
जालिंदर हातीं धरुनि गोमटा । भ्रष्टा केलें राज्यासी ॥ ३१ ॥
अहा सांडूनि रत्ववाटी । हातीं घेतली कैसी नरोटी ।
कनक टाकूनि सिंधुटी । भाळीं बांधी प्रीतीनें ॥ ३२ ॥
अहा जालिंदर कोणता निका । भिकार वाईट मिरवे लोका ।
हातीं धरिला समूळ रोडका । डोईबोडका शिखानट ॥ ३३ ॥
ऐसियाच्या लागूनि ध्यानीं । घरासी लाविला आपुल्या अग्नी ।
आतां काळें तोंड करुनी । जगामाजी मिरवतसे ॥ ३४ ॥
अहा माय नव्हे ती लांब म्हणावी । स्वसुत जिनें केला गोसावी ।
लठ्ठाश्रमाच्या लागून पायीं । विघ्न आणिलें राज्यांत ॥ ३५ ॥
आतां कोण तिचा बाप । उभा राहिला बलाढ्य भूप ।
राज्य हरुनि खटाटोप । देशोधडी लावील कीं ॥ ३६ ॥
ऐसी वल्गना बहुत रीतीं । एकमेक स्वमुखें करिती ।
तें ऐकूनि चंपावती । क्षीण चित्तीं होतसे ॥ ३७ ॥
मनींच्या मनीं आठवूनि गुण । बंधूसाठीं करी रुदन ।
नणंदा जावा विशाळ बाण । हृदयालागीं खोंचिती ॥ ३८ ॥
म्हणती भावानें उजेड केला । कीर्तिध्वज उभारिला ।
राज्य सांडूनि हात भिकेला । ओढवितो लोकांसीं ॥ ३९ ॥
मायबंधूनीं दिवटा लाविला । तिहीं लोकीं उजेड केला ।
आतां उजेड इचा उरला । हेही करील तैसेंचि ॥ ४० ॥
अहा माय ती हो रांड । जगीं ओढविलें भांड । 
आतां जगीं काळें तोंड । करुनियां मिरवते ॥ ४१ ॥
ऐसे दुःखाचे देती घाव । हृदयीं खोंचूनि करिती ठाव ।
बोलणें होतसे शस्त्रगौरव । दुःख विषमारापरी ॥ ४२ ॥
येरीकडे गोपीचंद । पाहतां पाहतां ग्रामवृदं ।
पौलपट्टणीं येऊनि शुद्ध । पाणवथीं (पाणवठ्याशी) बैसला ॥ ४३ ॥
हस्तें काढूनि शिंगीनाद । वाचे सांगत हरिगोविंद ।
परी स्वरुपामाजी प्रतापवृंद । झांकला तो जाईना ॥ ४४ ॥
कीं अर्कावरी अभ्र आलें । परी तेज तयाचें नाहीं बुडालें ।
कीं मृगमदातें गुंडाळिलें । सुवास वेष्टिल्या राहीना ॥ ४५ ॥
तेवीं तो नृपनाथ । पाणवश्यातें विराजत ।
तों परिचारिका अकस्मात । चंपावतीच्या पातल्या ॥ ४६ ॥
त्यांनीं येतांचि देखिला नयनीं । देखतांचि राव ओळखिला चिन्हीं ।
मग त्या तैश्याचि परतोनी । राजसदना पैं गेल्या ॥ ४७ ॥
रायासह सकळांसी । वृत्तांत सांगती त्या युवतींसी ।
कीं गोपीचंद पाणवथ्यासीं । येवोनियां बैसला ॥ ४८ ॥
ऐसा वृत्तांत रायें ऐकून । मग चित्तीं झाला क्षीण ।
म्हणे मुखासी काळें लावून । आमुचे गांवीं कां आला ॥ ४९ ॥
आला परी लोकांत । करील आमुची अपकीर्त ।
संचरोनि पट्टणांत । भीक मागेल गृहोगृहीं ॥ ५० ॥
लोक म्हणतील अमक्याचा अमुक । घरोघरीं मागतो भीक ।
काळें करुनि आमुचें मुख । जाईल मग पुढारां ॥ ५१ ॥
अहा राया ऐसें करणें होतें । तरी कासया आलासी येथें ।
स्वदेशीं चोरोनियां गुप्त । भीक मागावी सुखानें ॥ ५२ ॥
सकळ राजसदनींचीं माणसें । वेडाळपणीं बोलती त्यास ।
तिलकचंद येऊनि त्या समयास । गृहमनुष्यां सांगतसे ॥ ५३ ॥
म्हणे आतां गोपीचंद । भीक मागेल गांवांत प्रसिद्ध । 
परी जगांत आपुले नांव शुद्ध । अपकीर्ति मिरवेल ॥ ५४ ॥
तरी आतां पाचारुन । अश्र्वशाळेंत ठेवा आणून ।
तेथें तयातें घालूनि भोजन । बोळवावें येथून ॥ ५५ ॥ 
ऐसें सांगूनि नृपें सर्वालां । राव सभास्थानीं गेला ।
येरीकडे परिचारिकांला । पाठविलें बोलावूं ॥ ५६ ॥
परिचारिका जाऊनि तेथें । म्हणती महाराजा नृपनाथें ।
बोलाविलें आहे तुम्हांतें । चंपावतीचे भेटीसी ॥ ५७ ॥
राव म्हणे आम्ही गोसावी । आम्हां कैंची भगिनी ताई माई ।
घरघर बाप घरघर आई । भरली असे विश्र्वातें ॥ ५८ ॥
परी आतां असो चंपावती । बोलावीतसे आम्हांप्रती ।
तरी भेटोनि तिये युवती । पुढें मार्ग क्रमावा ॥ ५९ ॥
ऐसें म्हणोनि परिचारिकांसहित । चालता झाला नृपनाथ ।
परिचारिका पश्र्चिम द्वारांत । त्यासी घेवोनि जाताती ॥ ६० ॥
अश्र्वशाळेमाजी नेवोन । बैसविला राजनंदन । 
परिचारिका म्हणती येथें धाडून । देऊं चंपावतीतें ॥ ६१ ॥
तुम्ही बैसलां तैसेंचि बैसावें । भेटीसी येतील येथें सर्व । 
ऐसा परिचारिका दावूनि भाव । सदनामाजी संचरल्या ॥ ६२ ॥            
सकळांसी सांगितला वृत्तांत । कीं राव बैसविला अश्र्वशाळेंत ।
मग राजकांतेने त्वरित । अन्नपात्र भरियेलें ॥ ६३ ॥
तरुणपणाजोगे पात्र भरोन । परिचारिकेकरीं शीघ्र ओपून ।
धाडिती झाली नितंबीन । अश्र्वशाळेंत तत्त्वतां ॥ ६४ ॥
तंव ती परिचारिका घेवोनि अन्न । अश्र्वशाळे आली लगबग करोन ।
म्हणे महाराजा भोजन अन्न । पाठविलें तुम्हांसी ॥ ६५ ॥
तें पात्र पुढें ठेवोन । मग परिचारिका म्हणे करा भोजन । 
भोजन झालिया भेटीकारण । चंपावती येईल कीं ॥ ६६ ॥
राव विचार करी मानसीं । अहा आदर आहे संपत्तीसी ।
व्याही विहिणी खायासी । संपत्तीसी मिळताती ॥ ६७ ॥
तरी आतां असो कैसें । आपण घेतला आहे संन्यास ।
शत्रुमित्र सुखदुःखास । समानापरी लेखावें ॥ ६८ ॥
तरी मानापमान उभे राहाटी । हे प्रपंचाची मिरवे कोटी ।
तरी ऐसियासी आधीं कष्टी । आपण कशासी व्हावे हो ॥ ६९  ॥
मान अपमान दोन्ही समान । पाळिताती योगीजन ।
ऐसेपरी लक्षूनि मन । भोजनातें बैसला ॥ ७० ॥
मनांत म्हणे चैतन्यब्रह्म । तयाचें जीवन हें अन्नब्रह्मीं ।
स्वरुपब्रह्मींचें जीवनब्रह्म । नामब्रह्म मिरवीतसे ॥ ७१ ॥
तरी अन्नब्रह्म धिक्कारुन । मग कैंचें पाहावें सुखसंपन्न ।
ऐसा विचार करुन । भोजनातें बैसला ॥ ७२ ॥
येरीकडे अंतःपुरांत । स्त्रिया निघोनि गवाक्षद्वारांत ।
निजदृष्टीनें पाहती नृपनाथ । नेत्रीं दीक्षा पाहती ॥ ७३ ॥
मग एकेकी बोलती वचन । अहा हें काय निर्लज्जपण । 
सोयरियाघरीं अश्र्वशाळेंत बैसोन । भोजन करितो करंटा ॥ ७४ ॥
एक म्हणती चंपावतीसी । वेगें आणावी या ठायासी । 
ऐकोनि नणंदेनें त्वरेसी । धांव घेतली तिजपाशीं ॥ ७५ ॥
हस्तीं धरुनि चंपावतीसी । वेगें मेळीं आणिलें निगुतीसी ।
मग हस्त उचलोनि तियेसी । रायातें दावित्या जाहल्या ॥ ७६ ॥
तीस घेवोनि शेजारासी । पाहती गवाक्षद्वारासी ।
परी बोल बोलती कुअझारासी । कुश्र्चळवाणी करोनियां ॥ ७७ ॥
म्हणती सर्वस्वीं भ्रष्ट झाला । मान अपमान कैंचा त्याला ।
तस्करासम येवोनि बैसला । अश्र्वशाळेमाझारी ॥ ७८ ॥
अहा जळो जळो यांचे जिणें । केवढें वैभव सोडून । 
आतां हिंडतो दैन्यवाणा । श्र्वानासमान घरोघरीं ॥ ७९ ॥
म्हणवीत होता प्रजानाथ । काय मिळालें अधिक यांत ।
भणंगासमान दिसे आम्हांत । जैसा तस्कर धरियेला ॥ ८० ॥  
परी जैसें तैसें असो कैसें । कासया आला सोयरेगृहास ।
येवोनि बैसला अश्र्वशाळेस । भोजन करितो निर्लज्ज ॥ ८१ ॥
ऐसें नानापरी युवती । कीटकशब्दें वाखाणिती ।
ते ऐकोनि चंपावती । परम दुःखी झालीसे ॥ ८२ ॥
प्रथमच चंपावती गोरटी । बंधूते पाहतां निजदृष्टीं ।
परम झाली होती कष्टी । दुःख तयाचें पाहोनी ॥ ८३ ॥
त्यावरी नणंदा जावा पिशुने । दुःखलेशीं बोलती वचन ।
परी शब्द नसती ते बाण । हृदयामाजी खडतरती ॥ ८४ ॥
तेणेंकरुनि विव्हळ झाली । पश्र्चात्तापें परम तापली ।
मग स्त्रीमंडळ सोडूनि वहिली ( त्वरित) । सदना आली आपुल्या ॥ ८५ ॥
येतां झाली जीवित्वा उदार । वेगें शस्त्र घेतलें खंजीर ।
करीं कवळूनि क्षणें उदर । फोडिती झाली बळानें ॥ ८६ ॥       
खंजीर होतां उदरव्यक्त । जठर फोडोनि बाहेर येत ।
क्षणेंचि झाली प्राणरहित । सदनीं रक्त मिरवलें ॥ ८७ ॥
येरीकडे अश्र्वशाळेंत । परिचारिकेसी म्हणे नृपनाथ ।
भेटवीं मातें चंपावतीस । चल जाऊं दे आम्हांसी ॥ ८८ ॥
येरी म्हणती त्या शुभाननी । चंपावती सासुरवासिनी ।
त्यावरी अश्र्वशाळेलागुनी । कैसी येथें येईल ॥ ८९ ॥
परी आतां असो कैसें । तुम्ही वस्तीस असा या रात्रीस ।
आम्ही सांगूनि चंपावतीस । गुप्तवेषें आणूं कीं ॥ ९० ॥
ऐसें ऐकोनि रायें वचन । म्हणे राहीन आजिचा दिन ।
तरी आतांचि जाऊन । श्रुत करावें तियेसी ॥ ९१ ॥
अवश्य म्हणती शुभाननी । आतांचि सांगूं तियेलागुनी ।
रात्रीमाजी येऊं घेवोनी । भेटीलागीं महाराजा ॥ ९२ ॥
ऐसें बोलोनि त्या युवती । पाहत्या झाल्या चंपावती ।
तंव खंजीर खोंवोनि पोटीं । महीवरी पडलीसे ॥ ९३ ॥
तें पाहोनि शब्द कोल्हाळीं । धांवती झाली स्त्रिमंडळी ।
गतप्राण पाहतां बाळी । एकचि कोल्हाळ माजविला ॥ ९४ ॥
रुधिराचें तळें सांचले । जठर अवघे बाहेर पडलें ।
तें पाहोनि युवती वहिलें । शंखध्वनी करिताती ॥ ९५ ॥
सासु सासरे भाचे दीर । पति नणंदा जावा चाकर ।
म्हणती बंधूकरिता साचार । उदार झाली चंपावती ॥ ९६ ॥
मग बोलूं नये तेंचि बोलती । म्हणती अधम मंदमती ।
कोणीकडूनि या क्षिंती । दुष्ट नष्ट भ्रष्ट आला ॥ ९७ ॥
आपुल्या सदनीं अग्नि लाविला । शेवटीं लावावया येथें आला ।
तरी त्यातें बाहेर घाला । मुख पाहों नका हो ॥ ९८ ॥
एक म्हणती तयाकरितां । चंपावतीनें केली कर्तव्यता ।
तरी तिच्यासमान त्याची अवस्था । करोनि बोळवा तिजसंगें ॥ ९९ ॥
ऐसे नाना तर्ककुतर्क । करोनि मारिती हंबरडा हांक ।

एकचि कोल्हाळ करिती सकळिक । अहा अहा म्हणोनी ॥ १०० ॥

ShriNavanath Bhaktisar Adhyay 18 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अठरावा ( १८ )



Custom Search

No comments: