Saturday, February 27, 2016

Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३) भाग २/२


Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 
Machchhindra wanted to test his disciple Goraksha. Machchhindra had brought a gold brick from female kingdom with him. He while passing through a dense forest made a drama that he was very frighten that thieves may trouble them. He handed over his zoli to Goraksha. Goraksha found a gold brick in it and knew the reason why Machchhindra was talking about thieves. He took out the gold brick and threw into the deep dense grass. He asked Machchhindra why he was carrying a gold brick. Machchhindra told him that he was planning a bhandara that is offering food to Rushies, Munies and others. Goraksha with his Mantra vidya turned the mountain into gold. He fulfilled the wish of his guru of offering food to Rushies, Munies, Gods and many others. Thus he proved that he had neither feeling of selfishness nor any attachment towards worldly objects. In the next Adhyay 24 Dhundusut Malu will tell us a new story.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३) भाग २/२
नाना बैरागी संन्यासी । जपी तपी संतयोगियांसी ।
येथें आणोनि समाजेंसीं । अन्नदानें ऊत्साह करावा ॥ १०१ ॥
सुरवरगंधर्वगणसहित । देवदानवकिन्नरांसहित । 
मेळवोनि अपरिमित । आनंदउत्साह करावा ॥ १०२ ॥
ऐसें सांगतांचि चित्रसेनातें । मग चित्रसेन पाचारी गंधर्वांतें ।
एकशत गंधर्व महीवरते । प्रकट झाले येवोनि ॥ १०३ ॥
मग त्या गंधर्वांसी चित्रसेनें । सांगूनि सर्व वर्तमान । 
दाही दिशा प्रेरणा करुन । प्रज्ञावंत आणिले कीं ॥ १०४ ॥
जपी तपी योगशीळ । गुप्त प्रकट आणिले सकळ ।
नवनाथादि ऋषिमंडळ । येऊनियां पोहोचले ॥ १०५ ॥
शुक दत्तात्रेय याज्ञवल्की । वसिष्ठ वामदेव कपिल शेखी ।
व्यास पाराशर नारद ऋषी । वाल्मीक पाचारिले गंधर्वीं ॥ १०६ ॥
आठ्यायशीं सहस्त्र ऋषिभार । स्वर्गीहूनि उतरले देवकिन्नर ।
गणगंधर्वादि वसुलोक अपार । तपोलोक पातले ॥ १०७ ॥
त्यांतचि अष्टवसूंसहित । उपरिचर आला विमानव्यक्त ।
तेणे येतांचि मच्छिंद्रास वृत्तांत । कीलोतळेचा सांगितला ॥ १०८ ॥
कीं सोडून स्त्रीदेश अवनी । सिंहलद्वीपा गेली मैनाकिनी ।
परी तुमच्या वियोगेंकरुनी । क्षीणशरीर झालीसे ॥ १०९ ॥
तरी असो कैसें तें । भेटेल तुम्हां ईश्र्वरसत्ते । 
परी योगक्षेम स्वशरीरातें । आहांत कीं त्रिवर्ग ॥ ११० ॥
मच्छिंद्र म्हणे अहो जी ताता । तव कृपेची दृष्टी असतां ।
सदा मिरवूं सर्व क्षेमता । पदोपदीं अर्थातें ॥ १११ ॥
ऐसें वदतां उभय जाण । तों देवांसह उतरला पाकशासन ।
ब्रह्मा विष्णु रुद्रादि पूर्ण । महीलागीं उतरले ॥ ११२ ॥
श्रीनाथासी भेटोनि सकळ । मग ठाईं ठाईं सर्व मंडळ ।
विराजूनि वार्ता सकळ । ठाईं ठाईं करिताती ॥ ११३ ॥                                 
येरीकडे गोरक्षनाथें । पाचारुनि मच्छिंद्रातें ।
म्हणे समुदाय अपरिमित । मिळाला कीं महाराजा ॥ ११४ ॥        
तरी तुमची कनकवीट । आणोनि देतों सुभट ।
तितुक्यांत अर्थ सारोनि सुभट । बोलवावें समस्तातें ॥ ११५ ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । काय करुं ही कनकवीट ।
तुजएवढा शिष्यवर्गांत । असतां चिंता नसे मज ॥ ११६ ॥
ऐसें बोलतां मच्छिंद्रनाथ । गदगदा हांसे गोरक्षसुत ।
म्हणे महाराजा प्रतापवंत । सकळ तुम्ही प्रकटलां ॥ ११७ ॥
ऐसें बोलोनि वागुत्तरीं । माथा ठेवी चरणांवरी । 
म्हणे महाराजा स्वशरीरीं । स्वस्थ आपण असावें ॥ ११८ ॥
अष्टसिद्धी अणिमा गरिमा । प्राप्ति प्राकाम्य आणि महिमा ।
वशित्व ईशित्व आठवी प्रतिमा । सिद्धींलागीं पाचारा ॥ ११९ ॥
पाचारिल्या अष्टजणी । येवोनि लागल्या गोरक्षचरणीं ।
म्हणती आज्ञा करा स्वामी । कामनेसह अर्थांतें ॥ १२० ॥
येरु म्हणे वो प्रियभामिनी । तृप्त करावें मंडळीलागुनी ।
षड्रसान्नरुचीकरोनी । संतुष्ट सर्व करावे ॥१२१ ॥     
मग तेथ अवश्य म्हणोनि सिद्धी । वेंचित्या झाल्या आपुल्या बुद्धी ।
अन्न निर्मिलें पर्वतमांदी । षड्रसादि पक्कान्नें ॥ १२२ ॥
ऐशा सिद्धी योजिल्या कामा । याचिपरी सडासंमार्जन आरामा ।
सप्तही संख्या नेमूनि उत्तमा । मही पवित्र करीतसे ॥ १२३ ॥
तरी त्या सप्तही सटव्या कोण । ऐका तयांचीं नामाभिधानें ।
आणि तयांतें काय कामानें । निरोपिलें विधीनें ॥ १२४ ॥
तरी त्या उत्पत्तिस्थानीं जन्मकाळा । जावोनि लक्षावें यांनीं बाळा ।
विधिअक्षरें लिहिलीं भाळा । वाचूनि सटव्या पाहती ॥ १२५ ॥     
जरी सप्त सटव्या मानवासी । शोभा न मिरवे असुरप्रदेशीं ।
रानसटवी वनचरांसी । विलोकूनि जातसे ॥ १२६ ॥
वृषभ अश्र्व गांवाचे पशु । घोडसटवी आहे त्यांस ।
वासतसटवी खेचरांस । पक्षीकुळा मिरवतसे ॥ १२७ ॥
अंबुधासटवी जलचरांत । सबुधासटवी उदधी जात ।
ऐसिया कामीं सटव्या सात । कमलोद्भवें लाविल्या ॥ १२८ ॥
त्या सातही परिचारिका । सडासंमार्जन करिती निका ।
यापरी वाढणें आनंददोदिका । जळदेवता आराधिल्या ॥ १२९ ॥
कुमारी धनदा नंदा विमळा । लक्ष्मी विख्याता प्रबळ ज्ञानमंगळा ।
नववी समर्थ देवता बाळा । ह्या नवही वाढिती सकळांते ॥ १३० ॥
गंधर्वें करावें पाचारणें । समाचार घ्यावा अष्टवसुनें ।
चौकी द्यावी भैरवानें । अष्टदिशा अष्टांनी ॥ १३१ ॥
उपरिचरवसूनें करपल्लवीं । सकळांसी दक्षिणा द्यावी ।
मच्छिंद्र करीत आघवी । प्रदक्षिणा भावार्थें ॥ १३२ ॥
चित्रसेन गंधर्वपती । तांबूल देतसे सर्वांप्रती ।
आणि तीर्थ जे भागीरथी । तोय वाढी सर्वांतें ॥ १३३ ॥
यापरी अष्टोत्तरशत तीर्थ । पाणी वाहती समर्थ ।
आणि उचलणें उच्छिष्टपात्रांते । ऐशी कामें करिताती ॥ १३४ ॥
महानुभाव जो उमापती । अति आदरें स्वपंक्ती ।
अप्सरा किन्नर गायन करिती । नारदादि येवोनियां ॥ १३५ ॥
ऐसे नेम नेमूनि कामा । दिधलें ऐसें कार्यउगमा ।
आनंदोत्साह होतां सुकर्मा । सर्वानंद हेलावे ॥ १३६ ॥
ऐसी होतां आनंदस्थिती । परी गहनी आठवला गोरक्षचित्तीं ।
मग येवोनियां मच्छिंद्राप्रती । बोलता झाला प्राज्ञिक ॥ १३७ ॥
हे महाराजा गुरुनाथा । प्राणिमात्र आले समर्था ।
परी कर्दमपुतळा गहिनीनाथा । येथें आणावा वाटतें ॥ १३८ ॥
ऐसें मोहक ऐकोनि वचन । म्हणे गंधर्वा पाठवोन ।
कोंतिगेसहित मधुब्राह्मण । बाळासह आणावा ॥ १३९ ॥
मग चित्रसेना सांगोनि वृत्तांत । पत्र लिहिलें मधुविप्रातें ।
सुलोचन गंधर्वाचे ओपूनि हस्तें । कनकगिरीशी पाठविला ॥ १४० ॥
गंधर्व जावोनि कनकगिरीसी । भेटोनि कोंतिगे मधुविप्रासी ।
मग आनंदोत्सव वृत्तांतासी । निवेदिलें सकळ तेथ ॥ १४१ ॥
मग पत्र देवोनि त्याहातीं । वाचूनि पाहे विप्रमूर्ती ।
पाचारण ही मजकुरशक्ती । ध्यानालागीं संचरली ॥ १४२ ॥
मग बाळासह सपरिवार । येता झाला मधुविप्र ।
मुक्कामोमुक्काम महीवर । साधूनियां पोंचला ॥ १४३ ॥
सप्तवर्षीं गहिनीनाथा । आणुनि लोटला पदावरुता ।
मच्छिंद्र अंकी घेवोनि त्यातें । प्रेमें चुंबन घेतसे ॥ १४४ ॥
अति स्नेहानें करोनि लालन । म्हणे अवतारी करभंजन ।
गैबी जन्मला गहिनीनाम । सकळांलागीं दिठावी ॥ १४५ ॥
ऐसिये स्नेहाचापरम अवसर । पाहोनि बोलता झाला शंकर ।
कीं आम्हांलागी पुढें अवतार । घेणें आहे मच्छिंद्रा ॥ १४६ ॥
तरी त्या अवतरणीं नेमस्ती । मही मिरवे नामांप्रती ।
तरी त्या अनुग्रहाचे स्थितीं । गहिनीनाथ चदविला ॥ १४७ ॥
तरी यातें विद्या अभ्यासून । सकळ अधिकारी करावा पूर्ण ।
मी अनुग्रह याचा घेईन । पुढिले ते अवतारीं ॥ १४८ ॥
ऐसें सांगतां शिव त्यास । मग बोलावूनि गोरक्षास ।
प्रत्यक्ष अनुग्रह गहिनीनाथास । गोरक्षापासोनि देवविला ॥ १४९ ॥
सर्व देवांचे साक्षीसहित । मौळी ठेविला वरदहस्त ।
ब्रह्मपरायण गहिनीनाथ । जाहला सत्य परियेसा ॥ १५० ॥
अनुग्रहउत्साह मंडळीस । एक मास उभवला आनंद द्रुम ।
मग कुबेरा पाचारुनि नेम । सांगता झाला गोरक्ष ॥ १५१ ॥
म्हणे हा कनकगिरी जा घेवोन । आम्हां देई अपार भूषण ।
सकळ मंडळी गौरवोन । पाठविणें स्वस्थाना ॥ १५२ ॥
मग तो कुबेर बोले वचन । येथेंचि असो द्यावें धन ।
मी लागेल तैसें इच्छेसमान । भूषणांते आणितों ॥ १५३ ॥
मग अपार दिंडें वस्त्रें आणोन । महत्त्वासारखें दिधलें वांटोन ।
द्रव्यादि देवोनि याचकजन । तोषविले सकळ ॥ १५४ ॥
सकळ तोषले पावोनि मान । पावती आपुलें स्वस्थान ।
परी मच्छिंद्र तेथें राहोन । अभ्यासिती गहिनीतें ॥ १५५ ॥
उपरी गंधर्व मच्छिंद्रपिता । तो आपुले स्वस्थाना जातां ।
त्यासवें देऊनि मीननाथा । सिंहलद्वीपीं पाठविले ॥ १५६ ॥
उपरिचरवसुनें मीननाथ । केला कीलोतळेच्या हस्तगत ।
मच्छिंद्राचा सकळ वृत्तांत । निवेदिला तियेसी ॥ १५७ ॥
कीलोतळेनें ऐकोनि वृत्तांत । नेत्रीं आणिले अश्रुपात ।
म्हणे आतां मातें मच्छिंद्रनाथ । कैसा भेटेल कळेना ॥ १५८ ॥
उपरिचर बोले वो शुभाननी । चिंता न करीं कांहीं मनीं ।
एक वेळा मच्छिंद्रमुनी । निजदृष्टीं पाहसील ॥ १५९ ॥
ऐसें म्हणोनि उपरिचर गेला । येरीकडे कीलोतळा ।
हृदयीं कवळोनि मीननाथबाळा । प्रेमें चुंबन घेतसे ॥ १६० ॥
म्हणे बाळा माझिये खंती । होतसे कीं तुजप्रती ।
सोडूनि आलासी नाथ निगुती । श्रीमच्छिंद्र पितयातें ॥ १६१ ॥
ऐसें बोलूनि मीननाथातें । वारंवार चुंबन घेत । 
येरीकडे गर्भाद्रीतें गहिनी विद्या अभ्यासी ॥ १६२ ॥
तये वेळेसी कोण कोण तेथें । राहिले होते ऐका नाथ ।
विचार करोनि उमाकांत । गर्भाद्रीतें राहिले ॥ १६३ ॥
अदृश्य अस्त्र नगीं प्रेरुन । स्वस्थाना गेला कुबेर निघोन ।
तेणें नग तो कनकवर्ण । झांकोळून पैं गेला ॥ १६४ ॥  
परी गर्भाद्रिपर्वतांत । वस्ती राहिला उमाकांत ।
तो अद्यापि आहे स्वस्थानांत । म्हातारदेव म्हणती त्या ॥ १६५ ॥
तयाचिया पश्र्चिम दिशेसी । कानिफा राहिला शिष्यकटकेंसीं ।
वस्ती करोनि नाम या ग्रामासी । मढी ऐसें ठेविलें ॥ १६६ ॥
तयाचे दक्षिण पर्वतीं । राहता झाला मच्छिंद्रजती ।
त्याहूनि पूर्वेस महीपर्वतीं । जालिंदर राहिला ॥ १६७ ॥
आणि त्या पर्वतापैलदेशीं । नागनाथ राहिला वडवानळेंशीं ।
आणि रेवणसिद्ध तया महीसी । विटेग्रामीं राहिला ॥ १६८ ॥
वामतीर्थ गर्भाद्रिपर्वतीं । राहता झाला गोरक्षजती ।
सेवेसी शिष्य ठेवोनि सप्ती । विद्या सांगे गहिनीतें ॥ १६९ ॥
एक वर्षपर्यंत । अभ्यासिला गहिनीनाथ । 
सकळ विद्येचें स्वसामर्थ्य । तया देहीं सांठविलें ॥ १७० ॥  
परी कोतीगांवीं मधुब्राह्मण । गेले होते गहिनीस ठेवोन ।
ते जालिंदरासमीप दिशेकारण । वस्तीलागीं विराजले ॥ १७१ ॥
विराजिले परी गहिनीनाथ । अभ्यासिते झाले पात्रभरित ।
मग गोरक्षें बोळवोनि त्यातें । विप्रापाशीं पाठविला ॥ १७२ ॥
यावरी त्या वस्तीस । वसते झाले बहुत दिवस । 
शके दहाशें वर्षास । समाधी त्यांनीं घेतल्या ॥ १७३ ॥
घेतल्या परी यवनधर्म । कबरव्यक्त झाले आश्रम ।
पुढें औरंगजेब तें पाहून । पुसता झाला लोकांसी ॥ १७४ ॥
ह्या कोणाच्या असती कबरी । ते म्हणती तव पूर्वजांच्या साचारीं ।
मठींत कान्होबापर्वतीं मच्छेंद्र । आवडतें स्थान त्यांचे तें ॥ १७५ ॥
त्याहूनि पूर्वेसी जालिंदर । विराजली त्याची कबर ।
त्याहूनि खालता वल्ली थोर । गहिनीनाथ नांदतसे ॥ १७६ ॥
मग तेणें ऐकोनि ऐसी मात । पालटिलें त्या नांवातें ।
जानपीर जालिंदरातें । ठेविलें असे राजानें ॥ १७७ ॥
गहिनीनाथासी गैबी पीर । नाम ठेविलें तेवीं साचार ।
महजदी बांधोनि पुजारे । ठाईं ठाई स्थापिले ॥ १७८ ॥
मच्छिंद्र आणि कानिफाचें । नामाभिधान बदलूनि साचें ।
मायाबा कान्होबा बोलोनि साचें । यवन पुजारी स्थापिले ॥ १७९ ॥
कल्याण कलबुर्गी बाबाचैतन्य । राजबागशर नाम ठेविलें त्यानें ।
म्हणाल केलें यवनकारण । ऐसें विपरीत त्या रायें ॥ १८० ॥
परी समाधी पाहिल्या कबरीऐशा । म्हणोनि त्यातें पडला भास ।
कीं हे पीर असतील यवनकुळींचे । म्हणोनि प्रविष्ट करावें ॥ १८१ ॥
म्हणोनि ऐसें कृत्य घडलें । यापरी ऐकोनि श्रोता बोले ।
कीं कबरयुक्त नाथ केले भले । काय म्हणोनि झालेती ॥ १८२ ॥
तरी ते अंतरसाक्ष नाथ । यवन राजे होतील महीतें ।
ते छळतील हिंदुदेवांतें । म्हणोनि कबरी बांधल्या ॥ १८३ ॥
परी हें असो आतां कथन । मध्यें कथा असती दैदीप्यमान ।
नाथांनी योजूनि आपुलालें स्थान । ठाई ठाईं राहिले ॥ १८४ ॥
गोरक्ष सटव्या ठेवोनि रक्षण । निघता झाला तीर्थाकारण ।
त्या सटव्या तेथें अद्यापि राहून । रक्षिताती स्थानासी ॥ १८५ ॥
यापरी पुढें गोरक्षनाथ । भेटेल जाऊनि भर्तरीतें । 
ती कथा पुढें रसाळभरित । श्रोतिये श्रवणीं स्वीकारा ॥ १८६ ॥
नरहरिंवंशीं धुंडीकुमर । कवि मालू असे संतकिंकर । 
कथा सांगेल भक्तिसार । भर्तरीचें आख्यान ॥ १८७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार ॥ संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । त्रयोविंशाध्याय गोड हा ॥ १८८ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार त्रयोविंशाध्याय संपूर्ण ॥

Shri Navanath BhaktiSar Adhyay 23 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तेवीसावा (२३)

Custom Search
Post a Comment