Wednesday, February 10, 2016

Shri NavanathBhaktiSar Adhyay 17 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सतरावा ( १७ ) भाग २/२


Shri NavanathBhaktiSar Adhyay 17 
Kanifa asked Gopichand to prepare 5 statues of him made up of Gold, Silver, Copper, Brass and Iron. Then on a very good day he along with Gopichand went to the place where Gopichand had buried Jalindar. Kanifa told Gopichand that Gopichand had to dig and took out Jalindar from that. However immediately after starting digging Jalidar would ask who was digging. Then Gopichand should tell his name and immediately come out behind his statue of Gold. He put some vibhuti on the head of Gopichand. Then Gopichand started the digging. Jalinder from inside asked who was digging. Gopichand told his name and hurried behind the gold statue. Because of the anger of Jalindar Gold statue burned into ashes. the same thing happened with remaining statues every time. Then Kanifa told Gopichand that now he can dig till Jalinder from inside ask him to stop. Jalindar came out. Kanifa, Mainavati and Gopichand bowed to him. Jalindar as per wish of King Gopichand imparted the brhmadnyan and Gopichand took diksha of Natha panth. What happened next will be told to us by DhundiSut Malu from Narahari family in the 18th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सतरावा ( १७ ) भाग २/२
म्हणती राया तुजविण । आतां कोण करील संगोपन ।
आतां आमुचे सकळ प्राण । परत्र देशांत जातील हो ॥ १०१ ॥
ऐसें म्हणूनि आरंबळती । अट्टाहासें हृदय पिटीती ।
मृत्तिका घेऊनि मुखीं घालिती । केश तोडिती तटतटां ॥ १०२ ॥
म्हणती अहा राया तीनवेळ । शय्येहूनि उठूनि पाजिसी जळ ।
ऐसा कनवाळू असूनि निर्मळ । सोडूनि कैसा जासी रे ॥ १०३ ॥
अहा राया शयनीं निजतां । उदर चापसी आपुल्या हाता ।
रिक्त लागतां उठोनि तत्त्वतां । भोजन घालीत होतासी ॥ १०४ ॥ 
ऐसा कनवाळू तूं मनीं । आतां कैसा जासी सोडूनी ।
ऐसें म्हणोनि शरीर धरणीं । धडाडूनि टाकिलें ॥ १०५ ॥
म्हणे रायाचें स्वरुप । पाहतांचि पुरतसे कंदर्प ( मदन ) ।
तरी त्या स्वरुपाचा झाला लोप । कोठें पाहूं महाराजा ॥ १०६ ॥
एक म्हणे नोहे भर्ता । प्रत्यक्ष होती आमुची माता ।
कैसी सांडूनि जात आतां । निढळवाणी पाडसा ॥ १०७ ॥
एक म्हणे माझी हरिणी । कैसी पाडसा जात सोडूनि ।
एक म्हणे माझी कूर्मिणी । कृपादृष्टी आवगतली ( टाकून दिली ) ॥ १०८ ॥
एक म्हणे गज मीनांचे बळ । कैसें आटलें अब्धीचें जळ ।
दुःखार्काची झळाळ । साहवेना वो माये ॥ १०९ ॥
एक म्हणे माउली माझी । स्नेहाचा पान्हा पाजी ।
वियोगकाननीं चुकर आजी । कैसी झाली दैवानें ॥ ११० ॥
एक म्हणे आमुची पक्षिणी । अंडजासमान पाळिलें धरणी ।
आतां चंचुस्नेहेंकरोनी । कोण ओपील ग्रासातें ॥ १११ ॥
एक म्हणे मज चातकाकारण । भरतां नोहे गे अंबुदस्थान ।
परम स्नेहाचें पाजितां जीवन । आजि ओस कैसा झाला गे ॥ ११२ ॥
ऐसें म्हणोनि आरंबळती । एकमेकींचे गळां पडती ।
रडती पडती पुन्हा उठती । आरंबळती आक्रोशें ॥ ११३ ॥
ऐसा आकांत अंतःपुरांत । येरीकडे जालिंदरनाथ । 
राया गोपीचंदा सांगत । तपालागीं जाईं कां ॥ ११४ ॥
परी राया ऐक मात । सुरत्नपणाचा पाहों हेत ।
तुझ्या स्त्रिया अठरा शत । भिक्षा मागें तयांपासीं ॥ ११५ ॥
अलक्ष आदेश निरंजन । ऐसा सवाल मुखें वदोन ।
अंतःपुरांत संचार करोन । भिक्षा मागें बाळका तूं ॥ ११६ ॥
शिंगीनाद वाजवूनि हातीं । भिक्षा दे माई वदोनि उक्ती ।
ऐशापरी भेटोनि युवती । तपालागीं जाईं कां ॥ ११७ ॥
मग अवश्य म्हणोनि नृपनाथ । संचार करी अंतःपुरांत ।
अलक्ष निरंजन मुखें वदत । माई भिक्षा दे म्हणतसे ॥ ११८ ॥
तें पाहूनि त्या युवती । महाशोकाब्धींत उडी घालिती ।
एकचि कोल्हाळ झाला क्षितीं । नाद ब्रह्मांडीं आदळतसे ॥ ११९ ॥
एक हातें तोडिती केशांतें । एक मृत्तिका घालिती मुखांत ।
एक म्हणे दाही दिशा ओस दिसत । दाही विभाग झाल्यानें ॥ १२० ॥
एक धुळींत लोळती । एक उठूनि पुन्हां पडती ।
एक हृदय पिटोनि हस्ती । आदळिती मस्तकें ॥ १२१ ॥
एक पाहोनि रायाचें स्वरुप । म्हणती अहाहा कैसा भूप ।
सवितारुपी झाला दीप । खद्योतपणीं दिसतसे ॥ १२२ ॥
अहाहा राव वैभवार्णव । कैसा दिसतो दीनभाव । 
कीं मेरुमांदार सोडूनि सर्व । मशक दृष्टीं ठसावला ॥ १२३ ॥  
अहा राय हस्तेंकरुन । अपार याचकां वांटी धन ।
आतां कक्षेंत झोळी घालून । मागें कण घरोघरीं ॥ १२४ ॥
ऐसें म्हणोनि आरंबळती । धरणीवरी अंग टाकिती ।
पुन्हां उठोनि अवलोकिती । म्हणती अहा काय झालें ॥ १२५ ॥
असो नृप तो अंतःपुरांगणीं । आदेश निरंजन वदे वाणी ।
मुख्य नायिका लुमावंती राणी । रायापासीं पातली ॥ १२६ ॥
मुखचंद्र गळे बोलूनी । नयनीं अश्रु अपार जीवनीं ।
रायालागीं पाळा घालूनी । वेष्टूनियां बोलती त्या ॥ १२७ ॥
तिचे मागें चंपिका कारंती । उठोनि येतात मागें समस्ती ।
राजस्त्रिया अट्टाहास करिती । धांव घेती मागें लगबगां ॥ १२८ ॥
म्हणती राया असो कैसें । घडूनि आलें ईश्र्वरसत्तेसें ।
परी येथेंचि राहूनि पूर्ण योगास । संपादिंजे महाराजा ॥ १२९ ॥
आम्हां दरिद्रियांचें स्वरुपमांदुस । लोपवूं नका सहसा महीस ।
आम्ही तुम्हांविण दिसतों ओस । प्राणाविण शरीर जैसें ॥ १३० ॥
हे राया आम्ही स्त्रिया कोटी । परम अंध महीपाठीं ।
तरी आमुची सबळ काठी । टेंका हरुं नका जी ॥ १३१ ॥
तरी येथेंचि योग आचरावा । आम्ही न छळूं विषयभावा ।
परी तव स्वरुपाचि ठेवा । पाहूनि तो शांत करुं कीं ॥ १३२ ॥
जैसें जीर्ण कडतर । परी म्हणावा वैभवी थोर छत्र ।
तेवीं तव आश्रयीं सर्व पवित्र । वैभवमंडण आम्हांसी ॥ १३३ ॥
तरी मानेल तेथें पर्णकुटिका । बांधूनि देऊं जडितहाटका ।
आम्ही बारा सोळा शत बायका । सेवा करुं आदरानें ॥ १३४ ॥
सुवर्णें शिंगी देऊं मढवूनी । आणि रत्नबिकी शैल्या परिधानून ।
कनकचिरी कंथा घालून । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १३५ ॥
मुक्तरत्नें हिरे माणिक । संगीत करुनि हाटकीं देख ।
त्यातें भूषणमुद्रा अलौकिक । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १३६ ॥
कनकचीर तेजविपुल । शेले शाली शाला दुशाल ।
स्वीकारा सांडूनि मृगछाल । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १३७ ॥  
लोड तिवासे मंचक सुगम । गादी तोषक अति गुल्म ।
तरी भस्म सन्निधीकरुन । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १३८ ॥   
भिक्षातुकडे सूक्ष्म कठिण । त्यजूनि सेवीं 
षड्रसान्न । घृत दुग्ध दहि पक्वान्न । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १३९ ॥ 
एकट सेवीं त्यजीं कानन । दासदासी सेवकजन ।
सेवा करितां षोडशोपचारानें । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४० ॥ 
चुवा चंदन अर्गजासुवास । मार्जन करुं तव देहास ।
धिक्कारुनि तृणासनास । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४१ ॥
हत्ती घोडे शिबिका सदन । टाकूनि कराल तीर्थाटनी ।
परी चालला तें दुःख त्यजून । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४२ ॥
महाल चोटक संगीत रंगीत । तें सांडूनि विपिनीं पडाल दुःखित । 
तरी तें त्यजूनि रहा येथ । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४३ ॥ 
छत्र चामरें प्रजा अंकित । त्यजूनि फिराल अरण्यांत ।
एकटपणीं त्यजूनि रहा येथ । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४४ ॥
मृगाक्षी खंजीरपद्मनयनी । पदचुरिती कोमलपाणीं ।
तरी तृणांकुरशयन त्यजूनि । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४५ ॥ 
चंद्राननी गजगामिनी । बोलती संवाद रसाळ वाणी ।
तरी यांचा त्याग करोनी । हें सुखसंपन्न भोगावें ॥ १४६ ॥
ऐशा स्त्रिया संवादती । परी कोप चढला रायाच्या चित्तीं ।
दूर हो लंडी म्हणोनि उक्ति । धिक्कारीत तयांतें ॥ १४७ ॥
परी त्या मोहें वेष्टूनि बोलत । राया एकटें पडावें अरण्यांत ।
तुम्हांसवें बातचीत । कोण करील महाराजा ॥ १४८ ॥
येरी म्हणे अरण्यपोटीं । सिंगी सारंगी करील गोष्टी ।
स्त्रिया म्हणती आसनदृष्टी । वसन कैंचें हो तेथे ॥ १४९ ॥
राव म्हणे मही आसन । अंबरासारखे असे ओढवण ।
स्त्रिया म्हणती शयनीं कोण । निजेल तुमच्या सांगातीं ॥ १५० ॥
येरी म्हणे कुबडी फावडी । शयन करितील दोन्ही थडी ।
स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी । कोण निघारीं सांगावें ॥ १५१ ॥
येरी म्हणे अचल धुनी । पेटवा घेईल पंचाग्नी ।
ते सबळ शीतनिवारणीं । होतील योग साधावया ॥ १५२ ॥
स्त्रिया म्हणती अलौकिक । तेथें कोठें परिचारक लोक ।
राज्यासनीं पदार्थ कवतुक । देत होते आणूनियां ॥ १५३ ॥
येरी म्हणे व्याघ्रांबर । आसन विराजूं वज्रापर ।
मग धांव घेती नारीनर । कौतुकपदार्थ मिरवावया ॥ १५४ ॥
स्त्रिया म्हणती मोहव्यक्त । कोणतीं असती मायावंत ।
माय बाप भगिनी सुत । अरण्यांत कैंचीं हो ॥ १५५ ॥
येरी म्हणे विश्र्वरुप । घरघर आई घरघर बाप ।
इष्टमित्र भगिनी गोतरुप । शिष्य साधक मिरवती ॥ १५६ ॥
स्त्रिया म्हणती षड्रसादि अन्नें । विपीनीं मिळतील कोठून ।
येरी म्हणे जीं फळें सुगम । षड्रसादि असती तीं ॥ १५७ ॥
स्त्रिया म्हणती वेंचाया साधन । विपीनीं मिळेल जी कोठून ।
येरी म्हणे ब्रह्मरुपानें । घेऊं देऊं वेव्हारासी ॥ १५८ ॥
स्त्रिया म्हणती फाटल्या कौपीन । पुनः मिळेल ती कोठून ।
येरी म्हणे इंद्रियदमन । विषयीं कांसोटी घालूं कीं ॥ १५९ ॥
स्त्रिया म्हणती फाटल्या कंथां । ते कोठूनि मिळेल जी समर्था ।
येरी म्हणे योग आचरतां । दिव्य कंथा होईल ॥ १६० ॥
स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी । फुटूनि गेलिया प्रसंगीं ।
मग गोष्टी करावयाची तरंगी । कोण आहे तुम्हांपाशीं ॥ १६१ ॥
येरी म्हणे सगुण निर्गुण । सिंगी सारंगीं असती दोन ।
आगमनिगमाचे तंतू ओंवून । सुखसंवाद करीन मी ॥ १६२ ॥
स्त्रिया म्हणती कुबडी फावडी । जीर्ण झालिया लागती देशोधडी ।
मग सुखशयनीं निद्रापहुडी । कोण संगीन करील जी ॥ १६३ ॥
येरी म्हणे खेचरी भूचरी उभय । आदेय विदेह प्रकाश स्वरुपमय ।
वाम दक्षिण देऊनि तन्मय । डोळां लावीन निरंजनीं ॥ १६४ ॥
स्त्रिया म्हणती शैल्य तुटून । गेल्या पुन्हां आणाल कोठून ।
येरी म्हणे मोक्षयुक्तिसमान । शैल्यभूषण मिरवीन गे ॥ १६५ ॥  
स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका । हरपोनि गेल्या नरपाळका ।
मग काय करिशील वनीं देखा । नाथपंथी मिरवावया ॥ १६६ ॥
येरी म्हणे वो खेचरी भूचरी । लुप्तमुद्रा कर्णद्वारीं ।
अलक्ष चाचरी अगोचरी । लेवविल्या गुरुनाथें ॥ १६७ ॥   
( चाचरी व अगोचरी दोन्ही योगमुद्रांची नांवे आहेत. )
ऐसें बोलतां उत्तरोत्तर । म्हणे माई भिक्षा देई सत्वर ।
तंव त्या धांवती धरावया कर । कंठी मिठी गालावया ॥ १६८ ॥
ऐसें चांचल्यगुणयुक्त । दृष्टीं पाहूनियां नृपनाथ ।
कुबडी फावडी उगारीत । दूर होईं लंडी म्हणतसे ॥ १६९ ॥
तें गुप्त पाहोनि मैनावती । सिद्धार्थ अन्न घेऊनि हातीं ।
शीघ्र येऊनि पुत्राप्रती । म्हणे भिक्षा घे नाथा ॥ १७० ॥
मग भिक्षा घेऊनि झोळीं । मातेपदीं अर्पी मौळी ।
मग तेथूनि निघूनि तये वेळीं । नाथापाशीं पातला ॥ १७१ ॥
मग जो झाला स्त्रियांत वेव्हार । तो सकळ सांगितला वागुत्तर ।
मैनावती येऊनि तत्पर । तीही वदे वृत्तांतासी ॥ १७२ ॥
असो उभयतांचा वृत्तांत ऐकून । मान तुकावी अग्निनंदन ।
मग तीन रात्री रायासी ठेवून । बहुत अर्थीं उपदेशिला ॥ १७३ ॥
मग लुमावंतीचा उदरव्यक्त । गोपीचंदाचा होता सुत ।
मुक्तचंद नाम त्याचें । राज्यासनीं वाहिला ॥ १७४ ॥
स्वयें जालिंदरें कौतुक । राज्यपटीं केला अभिषेक ।
मंत्री प्रजा सेवक लोक । तयाहातीं ओपिले ॥ १७५ ॥
राया गोपीचंदा सांगे वचन । बा रे पाहें बद्रिकाश्रम ।
बद्रिकेदारालागीं नमून । तपालागीं तूं बैसें कां ॥ १७६ ॥
लोहकंटकीं चरणांगुष्ठ । देऊनि तपाचे दावीं कष्ट ।
द्वादश वरुषें नेम स्पष्ट । एकाग्रीं रक्षावा ॥ १७७ ॥
ऐसें सांगून तयातें । मग प्रजा लोकादि समस्तें । 
निघाले रायासी बोळवावयातें । कानिफासुद्धां जालिंदर ॥ १७८ ॥
परी प्रजेचे लोक शोक करिती । राया गोपीचंदाचे गुण आठविती ।
नेत्रीं ढाळूनि अश्रुपातीं । रुदन करिती अट्टहासें ॥ १७९ ॥
म्हणती अहा सांगों कायी । नृप नव्हे होती आमुची आई ।
पक्षाखालीं सकळ मही । संबोधीतसे महाराजा ॥ १८० ॥
ऐसे वर्णूनि तयाचे गुण । आक्रंदती प्रजाजन ।
परी आतां पुरे करा विघ्न । शोकमांदार खोंचला ॥ १८१ ॥
तृणपाषाणादि तरु । पक्षी पशु जाती अपारु ।
राया नृपाकरितां समग्रु । शोकाकुलित मिरवले ॥ १८२ ॥
मग एक कोस बोळवून । समस्त आणिले अग्निनंदने ।
जेथील तेथें संबोखून । आश्र्वासीत सकळांसी ॥ १८३ ॥
परी राया जात ठायीं ठायीं । धांवूनि पाहातां उंच मही ।
म्हणती सोडूनि गेलीस आई । कधीं भेटसी माघारां ॥ १८४ ॥
घडी घडी दृष्टी उर्ध्व करुन । पाहती रायाचे वदन । 
कोणी मागें जाती धांवून । पाहूनि वदन येताती ॥ १८५ ॥
ऐसा राजा जातां दोन कोश । मग सकळ मिरवले एक निराश ।
मन मागें उलटूनि संभारास । ग्रामामाजी संचरले ॥ १८६ ॥
राजसदनीं येऊनि समस्त । सकळ बैसले दीनवंत । 
जैसें शरीर प्राणरहित । एकसरां मिरवलें ॥ १८७ ॥
मग श्रीजालिंदर राजसदनीं । मुक्तचंदा विराजूनि राज्यासनीं ।
मंत्रियातें पाचारुनी । वस्त्रें भूषणें आणविलीं ॥ १८८ ॥
मग जैसें जयाचे महत्व पाहून । तयालागीं भूषणें देऊन ।
प्रेमें गौरवूनि प्रजाजन । बोळविले स्वस्थाना ॥ १८९ ॥
याउपरी अंतःपुरीं जाऊन । सर्व स्त्रियांचें केलें समाधान ।
मैनावतीचे करीं ओपून । समाधानीं मिरवलें ॥ १९० ॥
मुक्तचंद ओपूनि तियेचे करीं । म्हणें हा गोपीचंदचि मानीं ।
हा शिलार्थ तयाचे परीं । मनोरथ पुरवील तुमचे ॥ १९१ ॥
ऐसें करोनि समाधान । राज्यासनीं पुन्हां येऊन । 
मुक्तचंदाचे हस्तेंकरुन । याचकां धन वांटिलें ॥ १९२ ॥
जालिंदर कानिफा कटकांसहित । षण्मास राहिले पट्टणांत ।
अर्थाअर्थी सकळ अर्थ । निजदृष्टीं पाहती ॥१९३ ॥
श्रीजालिंदरचा प्रताप सघन । कोण करुं पाहती विघ्न ।
येरीकडे गोपीचंदरत्न । भगिनीग्रामा चालिला ॥ १९४ ॥
तेथे कथा होईल अपूर्व । ते पुढील अध्यायीं ऐका सर्व ।
अवधानपात्रीं घन भाव । कथा स्वीकारा श्रोते हो ॥ १९५ ॥
नरहरिवंशी धुंडीसुत । मालु संतांचा शरणागत । 
तयाचे रसनेसी धरुनि हेत । अवधानपात्रीं मिरवावें ॥ १९६ ॥
स्वति श्रीभक्तिसार । समंत गोरक्षकाव्य किमयागार । 
सदा परिसोत भाविक चतुर । सप्तदशाध्याय गोड हा ॥ १९७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार सप्तदशाध्याय संपूर्ण ॥  
Shri NavanathBhaktiSar Adhyay 17 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय सतरावा ( १७ )


Custom Search

No comments: