Saturday, February 20, 2016

ShriNavanath BhaktiSar Adhyay 20 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय वीसावा ( २० ) भाग २/२


ShriNavanath BhaktiSar Adhyay 20 
Goraksha entered into the female kingdom along with the dancer Kalinga. Mainavati from Sinhaldwip was cursed by Uparicharvasu and had to come down to earth in the female kingdom. But she was Kilotala that is she was head of the kingdom. She worshiped God Maruti and with his blessings she had brought Machchhindra in the female kingdom. She and Machchhindra were mother and father of Minanath. Maruti had warned her that Goraksha a disciple of Machchhindra had been there for taking Machchhindra with him. Kalinga and Poorvanda along with other members came into the palace to show their art. They pleased all by their mastery over dance, singing, playing many instruments. Suddenly “chalo Machchhindar Gorakh aaya” sound was appeared and Kilotala came to know that it is by a lady who was playing Mrudungam. She knew it must be Goraksha. She took her into her room and asked male dress for Goraksha and ornaments and asked him to ware it. Then she told her that you are my elder son and brother of Minanath. Now she had no worry as he and Minanath would run this kingdom and look after her and Machchhindra in their old age. Machchhindra told Goraksha that he was always remembering and missing him. What happens next will be told to us by dhundiSut Malu from Narahari family in the next 21st Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय वीसावा ( २० ) भाग २/२
तबकीं भरोनि गंगेरी पानें । विडे रचिले त्रयोदशगुणी । 
त्यांत फुलें अत्तरदाणी । लोकांमाजी मिरवतसे ॥ १०१ ॥
ऐसिये सभे कटकासन । मूळ पाठविलें कलिंगेलागून ।
तंव ती आपुला सरंजाम घेऊन । दिव्यतेजें मिरवली ॥ १०२ ॥
येरी कलिंगा राजसदना जात । सवें चालिला गोरक्षनाथ ।
परी कलिंगे पाचारोनि एकान्त । गुज सांगे तियेसी ॥ १०३ ॥
म्हणे वो ऐकें गुणगंभीरी । तूं नाट्या करिसील सभेभीतरी ।
तरी मृदंगवाद्य माझें करीं । सभास्थानीं ओपीं कां ॥ १०४ ॥
शैल्यासभे कटकस्थानीं । रिझवितां माझें वाजवणीं ।
मग द्रव्यलाभ घे ओढोनि । मानेल तैसें माग तेथें ॥ १०५ ॥
ऐसें ऐकतां कलिंगा वदत । हे वरिष्ठ महाराजा गुणसमर्थ ।
सभेस्थानीं स्त्रिया समस्त । पुरुष नसे त्या ठायीं ॥ १०६ ॥
तरी तुम्हांलागीं तेथें नेतां । वितर्क वाढेल संशय चित्ता ।
स्त्रीदेशांत पुरुष व्यक्त । कोठेंचि नाहीं म्हणोनि ॥१०७ ॥
ऐसें ऐकूनि तपोद्रुम । म्हणे ऐकें वो सुमध्यमे । 
अंगनावेषें येतों नटून । रंग तुझा लुटावया ॥ १०८ ॥ 
माझी इच्छा होईल पूर्ण । तूतेंही मिळेल अपार धन ।
मग ती कलिंगा आवडीन । अवश्य नाथा म्हणतसे ॥ १०९ ॥  
मग लेवूनि कंचुकीसार । परिधानिलें उत्तर चीर ।
जटावियुक्त करोनि भार । भांग मुक्तांनीं भरियेला ॥ ११० ॥
भाळीं चर्चूनि कुंकुमकोर । सोगया अंजनीं मिरवले नेत्र ।
कबरीवरुनि (केसांवरुन) चीरपदर । नाभिस्थानीं खोविला ॥ १११ ॥
काढोनि कर्णमुद्रिकाभूषण । ताटंकें केली परिधान ।
तेही कोंदणीं जडावरत्नें । नक्षत्रांसम झळकती ॥ ११२ ॥
कीं एकाग्र करुनि रोहिणीपती । करुं पातले श्रवणीं वस्ती ।
मुक्तघोष नासिकाप्रती । सरजी नथ शोभतसे ॥ ११३ ॥
पाचकंकणजडित भूषण । ग्रीवेमाजी अपार हेम ।
नाना नगीं हाटकगुण । मुक्तलडा शोभल्या ॥ ११४ ॥
असो आतां किती वर्णन । अंगनावेषें गोरक्षनंदन । 
परम शोभला -चपळेसम । वेश्यांगणीं तळपतसे ॥ ११५ ॥
आधींच पूर्ण हेमकांती अवतारी । त्यावरी नटला हेमश्रृंगारीं ।
मग वर्णदशास्वरुपापरी । रंभा दासी शोभली ॥ ११६ ॥
ऐसिया आव्हानूनि पैंजणी ती । मृदंग कवळूनि प्रतिहाती ।
नटनृत्यस्वरुपीं राजपंक्तीं । जाणूनियां मिरवली ॥ ११७ ॥
परी त्या शैल्या शुभाननी । पाहती पुरवंडा सुलोचनी ।
एकमेकां बोलती वाणी । मदनबाळी हेही असे ॥ ११८ ॥
सकळ नाट्यकलावती । विकळस्वरुप नीच दिसती ।
म्हणती धन्य विधात्याप्रती । रचिली मूर्ति अनुपम्य ॥ ११९ ॥
समस्त वंदू जरी उर्वशी । तरी हिच्यापुढें वाटती दासी ।
चपळातेजें सहजेंसीं । तळपत आहे बाळी हे ॥ १२० ॥
साज सोडोनि प्रत्योदक । नाद दर्शवी अलौकिक ।
पाहतेपणीं पडूनि टक । विस्मयातें पडती त्या ॥ १२१ ॥
वाद्यनादानें व्यक्तींत । मेळवी ताल अति अद्भुत ।
परी सकळ शैल्यांचें चक्षु तेथ । एका ठायीं मीनले ॥ १२२ ॥
कलिंगा मुख्य नायकिणी । परी पुरवंडा दैन्यवाणी ।
जेवीं उदया येतां तरणी । सकळ तेजा लोपती ॥ १२३ ॥
असो नाट्यदारा कलिंगेसहित । उभ्या राहिल्या करुं नृत्य ।
तैं कटी कवळूनि मृदंगातें । कुशळ वाजवी पुरवंडा ॥ १२४ ॥
संगीत स्वरित गायन । शैल्या सकळ तुकाविती मान ।
अहा अहा बोलूनि वचन । धन्य म्हणती कलिंगा ॥ १२५ ॥
सकळ शैल्या सभांगणीं । त्यांत मच्छिंद्रनाथ कनकासनीं ।
पदमाळिके चिंतामणी । हिरा चमक दावीतसे ॥ १२६ ॥
पुढारां पाहूनि गुरुनाथ । मनींच्या मनीं नमन करीत ।
परम हेलावे आनंदे चित्त । म्हणे कृतार्थ झालों मी ॥ १२७ ॥
आतां श्रीगुरुचे पाहिले चरण । सकळ झालों तापहीन ।
मग स्फुरण ये कुशळपणीं । वाद्यकळा मिरवितसे ॥ १२८ ॥
तैं नृत्य गीत संगीत होतां । पाहूनि लाजे विधिदुहिता ।
लाजत अप्सरा गंधर्व माथा । ठेवूनि पाहती चरणांतें ॥ १२९ ॥
तानमान रंगप्रकार । तल्लीन झाले सकळ भार ।
सान तुकावूनि नाथ मच्छिंद्र । अहा अहा म्हणतसे ॥ १३० ॥
मग परिधानावया उंची वस्त्र । काढूनि हस्तें देत मच्छिद्रनाथ । 
तों पुढारां पाहूनि हर्ष बळवंत  । लाघवकळे वर्तवी ॥ १३१ ॥
मृदंगवाद्य वाजवितां । अद्भुतपणा कुशळता ।
तया नादातें अक्षरव्यक्ता । भांती भांती काढीतसे ॥ १३२ ॥
त्या अक्षरांमाजी अक्षर । मच्छिंद्रनामें चमत्कार । 
दावूनि पुढें तोचि व्यवहार । रंगासमान नाचवी ॥ १३३ ॥  
मृदंग अक्षरी तैसी चर्चा । दावितसे गुरुवर्या ।
" चलो मच्छिंदर गोरक्ष आया " । पुन्हां अक्षरें आच्छादी ॥ १३४ ॥
परी अक्षरें मच्छिंद्रातें । श्रवण होतां पाहे भंवतें ।
चित्तीं चाकटूनि म्हणे येथें । कोठूनि आला गोरक्ष ॥ १३५ ॥
येरीकडे सहज चालीं । गोरक्ष वाजवी गायनपाउलीं ।
रंजीत देखतां गुरुमाऊली । तींचि अक्षरें पूर्वव्यक्त ॥ १३६ ॥
आणितां अक्षरें पूर्वव्यक्त । होतांचि मच्छिंद्र दचकत ।
भवतें पाहूनि गोरक्षनाथ । कोठे आहे म्हणतसे ॥ १३७ ॥
शैल्या आणि कलावासिनी । तयासी व्यक्त न पाहतां नयनीं ।
कोठूनि पडतसे अक्षरध्वनीं । श्रवणीं साजणीं आमुचे ॥ १३८ ॥
पिशाचवाणी भंवती पाहातसे ॥ घडीघडी चित्त दचकतसे ।
थडाथडोनी हृदय उडतसे । आला गोरक्ष म्हणोनी ॥ १३९ ॥
मग न आवडे सभा कनकासन । मुख वाळलें झालें म्लान ।
मग कोणी ऐकेना गायन । चित्तीं फार व्यापिले ॥ १४० ॥
" चलो मच्छिंदर गोरख आया " । जंव जंव अक्षरें हीं ऐकूनियां । 
तंव तंव दचकूनि गेली काया । काळिमा तेव्हां येतसे ॥ १४१ ॥
तंव पाहूनि किलोतळा । हृदयीं पेटूनि चिंतानळा ।
काळिंबी काया म्हणूनि सकळा । रोमांच उठती शरीरीं ॥ १४२ ॥
तंव पाहूनि किलोतळा । म्हणे महाराजा तपपाळा ।
सुरस रंगीं मुखकमळा । काळिंबी कां वरियेली ॥ १४३ ॥
येरी म्हणे वो मैनाकिनी । मातें दिसते विपरीत करणी ।
मच्छिंद्रशिष्य गोरक्ष अवनीं । भय आहे तयाचें ॥ १४४ ॥
तो परम पवित्र भक्तचूडामणि । विषया नातळे इंद्रियदमनीं ।
महाप्रतापें तपोखाणी । बैरागी तो असे हो ॥ १४५ ॥ 
अगे तो येतां तंव पट्टणीं । नेईल माते स्वदेशअवनीं ।
मग तव यतीची सुखयामिनी । गोरक्षअंकीं नासेल ॥ १४६ ॥
ऐसें ऐकतां कीलोतळा । मारुतिसूचनेचा खूणगरळा ।
हृदयीं व्यापूनि जाळूं लागला । मुख कोमाविती पैं झाली ॥ १४७ ॥
मग तो रंग नाट्यकृती । विरस होऊनि नावडे चित्तीं ।
हृदयालयीं ते चिंताभगवती । नांदती झाली प्रत्यक्ष ॥ १४८ ॥
नाट्यरंगाचा आनंदवेष । बळी आव्हानिला एकचि भाष ।
मग रंगदेवता पडूनि ओस । उठवी आपुल्या ठाण्यातें ॥ १४९ ॥
जैसी पयसैंधवां पडे गांठी । मग विरस होऊनि नासल्या गोष्टी ।
मिरवला हा तन्न्याय पोटीं । भय उभयतां आतळे ॥ १५० ॥
परी ती चतुर मैनाकिनी । गायनस्वर आव्हान कानीं ।
तों मृदंगवाद्यीं उठोनि ध्वनी । " चलो गुप्त गोरक्ष आया "॥ १५१ ॥
ऐसा नाद अक्षरस्थित । कीलोतळा श्रवण करीत ।
मग बोलावूनि कलावंत । उत्तरातें आराधी ॥ १५२ ॥
म्हणे तव सारंगी संगीती । वाजत आहे उत्तमा गतीं ।
परी आमुच्या साजसंग्रहाप्रती । आजी पाहूं वाजवोनी ॥ १५३ ॥
ऐसें ऐकतां कलिंगा पद्मिनी । म्हणे आणा पाहूं वाजवोनी ।
मग ती कीलोतळा आज्ञापोनी । साज आणूनि ठेवीतसे ॥ १५४ ॥
तोही साज पुढें घेऊनी । वाजविती कुशलपणीं ।
परी सुस्वर गाण्यांत अक्षर पूर्ण । तेंचि काढी पुन्हां पुन्हां ॥ १५५ ॥
तेंही ऐकूनि मैनाकिनी । मग सेविका आपुली कलावंतिनी ।
कलिंगाचा साज देऊनि । उभी केली पाठीमागें ॥ १५६ ॥
तीतें सांगे रहस्ययुक्ती । पुढारां वाद्यें अक्षरें काढिती ।
त्याची नीतीं अक्षरस्थिती । तूंही बोलवीं मृदंगा ॥ १५७ ॥
परी ती वाजवितां कलावंतिणी । तैसीं अक्षरें न येती कानीं ।
मग पुरवंडेचा हात धरोनी । एकांतासी पैं गेली ॥ १५८ ॥
सलीलपणीं चरणीं माथा । ठेवूनि पुसे तीस वार्ता ।
माये तूं कोण सांग आतां । सकळ संशय सोडोनी ॥ १५९ ॥
जरी ही गोष्ट ठेविसी चोरुन । तरी तुज तुझ्या गुरुची आण ।
मातें वदें कीं प्रांजलपण । कोणकोणाची तूं अससी ॥ १६० ॥
ऐसी भूषिणी बोलतां वचन । मनांत विचारी गोरक्षनंदन ।
प्रकट होण्याचा समय पूर्ण । हाचि सुलक्षण दिसतसे ॥ १६१ ॥
मग बोलता झाला प्रांजळ वचन । माये मी सर्वथा नसे कामिण ।
श्रीमच्छिंद्राचा प्रियनंदन । गोरक्षनामें मिरवतसें ॥ १६२ ॥
तरी स्त्रीवेषनटी नारी । नटोनि निघों तव राजद्वारीं ।
ऐसें ऐकतां ती सुंदरी । पुन्हां चरणीं लोटली ॥ १६३ ॥
मग पुरुषपरिधान आणोनि त्वरित । श्रीगोरक्षनाथा नेसवीत ।
म्हणे तूं माझा सुत । भेटलासी दैवानें ॥ १६४ ॥ 
पूर्वी नाथानें नामाभिधान । तव रुपीं केलें निवेदन ।
निवेदन होतांचि तनमनप्राण । तव भेटी उदेले ॥ १६५ ॥
सांगू उदेले परी काय । जैसें सेवितां कां जगन्याय ।
कीं गृहीं वत्स काननीं गाय । परी प्राण वत्सा ठेवीतसे ॥ १६६ ॥
कीं जळावेगळी मासोळी । होतां रिघूं पाहे पुन्हां जळीं ।
तन्न्यायें मोहकाजळी लागली । तुजसाठीं मज बा रे ॥ १६७ ॥
मग हाटकश्रृंगार करुनि व्यक्त । जडितकोंदणीं लेववीत ।
रत्नमुद्रिका रणबिंदीसहित । मुक्ततुरा लाविला ॥ १६८ ॥
भरजरीचे कनकवर्णी । परिधानिला चीरभूषणीं ।
मस्तकीं मंदिल नवरत्नी । शिरपेंच वरी जडियेला ॥ १६९ ॥
हस्ताग्रीं बाहुवट । हेमकोंदणीं लखलखाट ।
सर्व भूषणीं तेजवट । श्रृगांरिला नाथ तो ॥ १७० ॥
मग हस्त धरुनि कीलोतळा । येती झाली सभामंडळा ।
येतांचि मच्छिंद्रें देखिली डोळां । पुरुषव्यक्त कामिनी ॥ १७१ ॥  
मनांत म्हणे मच्छिंद्रनाथ । पुरुष कैंचा आला येथ ।
निकट येतां कीलोतळेतें । हस्तें खुणावी कोण तो ॥ १७२ ॥
येरीकडे हस्तखुणे संकेतीं । पाहूनि म्हणे गोरक्षजती ।
तुमचा उद्देश धरुनि चित्तीं । भेटीलागीं पातला ॥ १७३ ॥
परी आज उदेला दैवआदित्य । भेटला माझा प्राणसुत ।
सकळ राज्याचा धैर्यवंत । बाळ गोरक्ष माझा हा ॥ १७४ ॥
आतां सकळ कांचणी । फिटूनि गेली अंतःकरणीं ।
सकळ वैभव राजमांडणी । संगोपील बाळ हा ॥ १७५ ॥
आणि पाठिंबा बळिवंत । सहोदर वडील गोरक्षनाथ ।
धाकुटा मीन तुमचा सुत । संगोपील तयासी ॥ १७६ ॥
म्हणूनि समूळ माझी कांचणी । फिटूनि गेली दूर अवनीं ।
वृद्धापकाळीं चक्रपाणी । कृपें वेष्टिला आपणासी ॥ १७७ ॥
ऐसें बोलतां मैनाकिनी । गोरक्ष हास्य करीं मनीं ।
चित्तीं म्हणे बळेंचि तरणी । अंधारचीरीं भूषीतसे ॥ १७८ ॥
आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव । आम्हां कासयासी वैभव ।
विधवेलागीं कुंकुमटेव । खटाटोप कासया ॥ १७९ ॥
कीं परिसालागीं कनकशृंगार । कीं तक्रीं तुष्टती देव अमर ।
तैसे आम्ही विरक्त थोर । राजवैभव कासया ॥ १८० ॥
कीं ग्रामगौतमीची कांस । दुग्ध काढूनि अंजुळीस ।
तें पयोब्धीस पाजूनि सुरस । तुष्ट चित्तीं मिरवला ॥ १८१ ॥
कीं सकळ महीचा नृपनाथ । अंजुळी धान्याचा गरजवंत ।
की मित्र तेजाचि भिक्षा मागत । काजव्यातें जाऊनि ॥ १८२ ॥
तयाचि न्यायें आम्हांसी वैभव । कायसें पद थोर राणीव ।
येरी जल्पतसे आपुला भाव । निःसंगा संग जाऊनी ॥ १८३ ॥
परी असो कार्यापुरती । ऐकूनि घ्यावी येउती मात ।
श्रीगुरुमर्जी आली करतलांत । मारुं लाथ वैभवासी ॥ १८४ ॥
ऐसें गोरक्ष कल्पूनि मनीं । येरीकडे मच्छिंद्रमुनी ।
कीलोतळेचे शब्द ऐकुनीं । आसनाहुनि ऊठिला ॥ १८५ ॥
अतिप्रेमा दाटूनि पोटीं । गोरक्षगळां घातली मिठी ।
करीं कमळूनि हृदयपोटीं । प्रेमें सद्गद आलिंगिला ॥ १८६ ॥
मग कलिंगेतें पाचारुन । अमूप द्रव्य दिधलें वसन ।
गौरवूनि तियेचें मन । स्वस्थानातें बोळविलें ॥ १८७ ॥
येरीकडे मंडपांत । शैल्यासहित मच्छिंद्रनाथ ।
निकट बैसवूनि गोरक्षातें । योगक्षेम पुसतसे ॥ १८८ ॥
बद्रिकाश्रमीं तपोराहाटी । तितुकें सांगे गोरक्षजेठी ।
कंटकाग्रीं पादांगुष्ठीं । द्वादश वर्षे संपादिली ॥ १८९ ॥
उपरी तप झालिया पूर्ण । माव करी उमारमण ।
सकळ देवां बोलावून । आतिथ्यही मिरवलें ॥ १९० ॥
ऐसी झालिया तपराहाटी । परी तव वियोग साहिना पोटीं ।
क्षणक्षणां होऊनि कष्टी । शोक करुं रिघतसे ॥ १९१ ॥
जया पदाचें होतां स्मरण । अंती जठर जाय वेष्टून ।
म्लानवदनीं ओस कानन । दाही दिशां दिसतसे ॥ १९२ ॥
मग उदकावांचूनि जैसा मीन । तडफडूनि देऊं पहात प्राण ।
तेवीं माझें अन्तःकरण । दुःखडोहीं हेलावे ॥ १९३ ॥
परी प्रारब्धयोग दारुण । येथें भेटले तुमचे चरण ।
आतां गेलिया प्राण । एकाकी कदा न वसें मी ॥ १९४ ॥
ऐसें ऐकतां वचनयुक्तीं । पुन्हां धरीतसे हृदयाप्रती ।
म्हणे वत्सा तुज मागुती । एकांगें कदा न करी मी ॥ १९५ ॥
मुळींहुनि बाळपण । तुवां न जाणिलें मजविण ।
सकळ करुनि लालन । स्थावरपणीं मिरविलें ॥ १९६ ॥
जळावेगळी जळमासोळी । विभक्त न होय कवणे काळीं ।
तेवीं मम चित्तदरींत तपमौळी । विभक्त झाला नाहींस ॥ १९७ ॥
परी न व्हावें तें घडूनि आलें । श्रीमारुतीनें मज गोंविलें ।
गौरविलें परी सदा फोलें । वैभव वाटे तुजविण बा ॥ १९८ ॥
बा भोजन करितां षड्रसान्नीं । तुझें स्मरण होतसे मनीं ।
बा तो ग्रास ठेवितां आननी । विशासमान वाटतसे ॥ १९९ ॥
मग अश्रूनें पूर्ण भरती नयन । तुजजवळी लागे माझा प्राण ।
मग मूर्तिमंत तूं जठरीं येऊन । उभा राहसी माझिया ॥ २०० ॥
मग ताप उपजे मनांत । अहा बाळकासी टाकोनि वनांत ।
आलों मी फिरत फिरत । हेंचि चिंतन निशिदिनीं ॥ २०१ ॥
बा तुजविण करितां तीर्थभ्रमण । परी ओस दिशा बोभावे (खिन्न) मन ।
मनांत जल्पें वत्स टाकून । कैसा आलों मी पापी ॥ २०२ ॥
ऐसें बोलता मात । मग बोलता झाला गोरक्षनाथ ।
हे महाराजा माझी ऐकें मात । तूतें सुत बहु असती ॥ २०३ ॥
जया देशीं कराल गमन । तेथेंचि सुत कराल निर्माण ।
मग तुमच्या मोहाचें आचरण । वांटले जाय महाराजा ॥ २०४ ॥
परी एकचि तूं माझी आई । मन माझें एकेंचि ठायीं ।
मग जैसी होय गती पाहीं । जळाविण मीनांतें ॥ २०५ ॥
कीं अर्का कुमुदिनी असती अपार । तो मोह करील कोणावर ।
परी कुमुदा तो एकचि मित्र । सुखापारी आणाया ॥ २०६ ॥
कीं चंद्रा चकोर असती बहुत । परी चकोरा एकचि रोहिणीनाथ ।
त्याचि न्यायें जननी मातें । अससी एकचि मातें तूं ॥ २०७ ॥
जळांत असती बहुत जळचर । परी जळचरा असतें एकचि नीर ।
तन्न्यायें मज माहेर । एकचि मच्छिंद्र आराधिला ॥ २०८ ॥
श्र्लाघ्य पुरुषा अन्य युवती । परी युवतीसी एकचि पती ।
तन्न्यायें कृपामूर्ती । माझें जीवन तूं अससी ॥ २०९ ॥
धनासी अपार असती चातक । चातकासी धन तो एक ।
तेवीं तूं मातें जननीजनक । एकचि अससी महाराजा ॥ २१० ॥  
ऐसें म्हणूनि गोरक्षनाथ । नेत्रीं आणी अश्रुपात ।
तें पाहूनि अंतरिक्षसुत (मच्छिंद्रनाथ) । प्रेमें हृदयीं कळवळला ॥ २११ ॥
म्हणे तान्हुल्या सत्य वचन । तुज कोणी नसे मजविण ।
ऐसें म्हणूनि मुखचुंबन । कुरवाळून धरीतसे ॥ २१२ ॥
मग सभास्थान विसर्जून । पाकशाळेंत उभयतां जाऊन ।
श्रीगोरक्षा ताटीं घेऊन । भोजनातें सारिलें ॥ २१३ ॥
भोजन झालिया एकासनीं । निद्रा करिती उभय जणीं ।
दिनोदयीं स्नानें करोनी । एकासनीं बैसती ॥ २१४ ॥
एका अंकीं मीननाथ । एका अंकी गोरक्षसुत ।
कनकासनीं राजसभेंत । घेऊनि नाथ बैसती ॥ २१५ ॥
जैसा वक्रतुंड षडानन । घेऊनि बैसे उमारमण ।
कीं माय यशोदेजवळी राम कृष्ण । उभय अंकी मिरवती ॥ २१६ ॥
असो आतां हें कथन । पुढें सुखें झाले संपन्न ।
तें पुढिले अध्यायीं निरुपण । होईल श्रोतीं श्रवण कीजे ॥ २१७ ॥
ते मच्छिंद्र उभय अंकीं । घेऊनि सुतसुताची फेडिल बाकी ।
शैल्यांनीं वेष्टुनि सुखासनीं हाटकीं । नित्य मिरवे मच्छिंद्र तो ॥ २१८ ॥
नरहरिवंशीं धुंडीसुत । नरहरि मालू नाम ज्याते ।
तो श्रीगुरुकृपें रसाळ कथेतें । निवेदिल श्रोतियां ॥ २१९ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । विंशतितमाध्याय गोड हा ॥
२२० ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार विंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 
ShriNavanath BhaktiSar Adhyay 20 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय वीसावा ( २० )


Custom Search

No comments: