Gurucharitra Adhyay 30
Gurucharitra Adhyay 30 is in Marathi. Name of this Adhyay is PretanganaShoko.
गुरुचरित्र अध्याय ३०
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिये चरणां ।
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरोनियां ॥ १ ॥
जय जया सिद्धमुनि । तूंचि तारक भवार्णी ।
अज्ञानतिमिर नासोनि । ज्योतिःस्वरुप तूंचि होसी ॥ २ ॥
अविद्यामायासागरीं । बुडालों होतों महापुरीं ।
तुझी कृपा जाहली तरी । तारिलें मातें स्वामिया ॥ ३ ॥
तुवां दाविला निजपंथ । जेणें जोडे परमार्थ ।
विश्र्वपालक गुरुनाथ । तूंचि होसी स्वामिया ॥ ४ ॥
गुरुचरित्र सुधारस । तुवां पाजिला आम्हांस ।
तृप्त न होय गा मानस । तृषा आणिक होतसे ॥ ५ ॥
तुवां केलिया उपकारासी । उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी ।
निजस्वरुप आम्हांसी । दाविलें तुम्ही सिद्धमुनि ॥ ६ ॥
मागें कथा निरोपिलीसी । अभिनव जाहलें सृष्टीसी ।
पतिताकरवीं ख्यातीसी । वेद चारी म्हणविले ॥ ७ ॥
त्रिविक्रम महामुनेश्र्वरासी । बोधिलें ज्ञान प्रकाशीं ।
पुढें कथा वर्तली कैशी । विस्तारावें दातारा ॥ ८ ॥
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला सिद्ध आपण ।
प्रेमभावें आलिंगोन । आश्र्वासीतसे तये वेळीं ॥ ९ ॥
धन्य धन्य शिष्यमौळी । तुज लाधलें अभीष्ट सकळी ।
गुरुची कृपा तात्काळी । जाहली आतां परियेसा ॥ १० ॥
धन्य धन्य तुझी वाणी । वेध लागला श्रीगुरुचरणीं ।
तूंचि तरलासा भवार्णी । सकळाभीष्टें साधतील ॥ ११ ॥
तुवां पुसिला वृत्तांत । संतोष झाला आजि बहुत ।
श्रीगुरुमहिमा असे ख्यात । अगम्य असे सांगता ॥ १२ ॥
एकेक महिमा सांगतां । विस्तार होईल बहु कथा ।
संकेतमार्गे तुज आतां । निरोपीतसे परियेसीं ॥ १३ ॥
पुढें असतां वर्तमानीं । तया गाणगग्रामभुवनीं ।
महिमा होतसे नित्यनूतनी । प्रख्यातरुप होऊनियां ॥ १४ ॥
त्रयमूर्तीचा अवतार । झाला नृसिंहसरस्वती नर ।
महिमा त्याची अपरांपर । सांगतां अगम्य परियेसा ॥ १५ ॥
महिमा तया त्रयमूर्तीची । सांगतां शक्ति आम्हां कैची ।
काया धरुनि मानवाची । चरित्र केलें भूमीवरी ॥ १६ ॥
तया स्थानीं असतां गुरु । ख्याति झाली अपरांपरु ।
प्रकाशत्व चारी राष्ट्र । समस्त येती दर्शना ॥ १७ ॥
येती भक्त यात्रेसी । एकोभावें भक्तीसी ।
श्रीगुरुदर्शनमात्रेसीं । सकळाभीष्ट पावती ॥ १८ ॥
दैन्य पुरुष होती श्रियायुक्त । वांझेसी पुत्र होय त्वरित ।
कुष्ठें असेल जो पीडित । सुवर्ण होय देह त्याचा ॥ १९ ॥
अक्षहीना अक्ष येती । बधिर कर्णी ऐकती ।
आपस्मारादि रोग जाती । श्रीगुरुचरणदर्शनमात्रें ॥ २० ॥
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय नवल कायसी ।
श्रीगुरुकृपा होय ज्यासी । सकळाभीष्ट पाविजे ॥ २१ ॥
ऐसें असतां वर्तमानीं । उत्तर दिशे माहुरस्थानीं ।
होता विप्र महाधनी । नाम तया ' गोपीनाथ ' ॥ २२ ॥
तया पुत्र होऊनि मरती । करी दुःख अनेक रीतीं ।
दत्तात्रेया आराधिती । स्त्रीपुरुष दोघेजण ॥ २३ ॥
पुढें जाहला आणिक सुत । तया नाम ठेविती ' दत्त ' ।
असती आपण धनवंत । अति प्रीतीं वाढविलें ॥ २४ ॥
एकचि पुत्र तया घरीं । अति प्रीति तयावरी ।
झाला पांच संवत्सरी । व्रतबंध केला तयासी ॥ २५ ॥
वर्षे बारा होतां तयासी । विवाह करिती प्रीतीसी ।
सुरुप पाहुनी नवरीसी । सासूसासर्यांसी महाप्रेम ॥ २६ ॥
मदनाचे रतीसरसी । रुप दिसे नोवरीसी ।
अति प्रीति सासूश्र्वशुरासी । महाप्रेमें प्रतिपाळिती ॥ २७ ॥
दंपती एकचि वयेसीं । अति प्रिय महा हर्षी ।
वर्धता झाली षोडशी । वर्शे तया पुत्रासी ॥ २८ ॥
दोघें सुंदर सुलक्षण । एकापरीस एक प्राण ।
न विसंबिती क्षण क्षण । अतिप्रिय परियेसा ॥ २९ ॥
ऐसी प्रेमें असतां देखा । व्याधि आली त्या पुरुषा ।
अनेक औषधें देतां ऐका । आरोग्य नोहे तयासी ॥ ३० ॥
नवचे अन्न तयासी । सदा राहे उपवासी ।
त्याची भार्या प्रीतीसी । आपण न घे सदा अन्न ॥ ३१ ॥
पुरुषावरी आपुला प्राण । करी नित्य उपोषण ।
पतीस देतां औषधें जाण । प्राशन करी परियेसा ॥ ३२ ॥
येणेंपरी तीन वर्षी । झाली व्याधि-क्षयासी ।
पतिव्रता स्त्री कैसी । पुरुषासवें कष्टतसे ॥ ३३ ॥
पुरुषदेह क्षीण झाला । आपण तयासरसी अबला ।
तीर्थ घेऊनि चरणकमळा । काळ क्रमी तयाजवळी ॥ ३४ ॥
दुर्गंधि झाले देह त्याचें । जवळी न येती वैद्य साचे ।
पतिव्रता सुमन तिचें । न विसंबेचि क्षणभरी ॥ ३५ ॥
जितुकें अन्न पतीसी । तितुकेचि ग्रास आपणासी ।
जैसें औषध देती त्यासी । आपण घेतसे परियेसा ॥ ३६ ॥
मातापिता दायाद गोती । समस्त तिसी वारिती ।
पतिव्रता ज्ञानवंती । न ऐके बोल कवणाचे ॥ ३७ ॥
दिव्यवस्त्रादि आभरणें । त्यजिलीं समस्त भूषणें ।
पुरुषावरी आपुला प्राण । काय सुख म्हणतसे ॥ ३८ ॥
उभयतांचीं मातापितां । महाधनिक श्रीमंता ।
पुत्रकन्येसी पाहतां । दुखः करिती परियेसा ॥ ३९ ॥
अनेक जपानुष्ठान । मंत्रविद्या महा हवन ।
अपरिमित ब्राह्मणभोजन । करविताति अवधारा ॥ ४० ॥
अनेक परींचे वैद्य येती । दिव्य रस-औषधें देती ।
शमन नव्हे कवणें रीतीं । महाव्याधीनें व्यापिलें ॥ ४१ ॥
पुसती आपल्या ज्योतिष्यासि । पूजा करिती कुळदेवतांसी ।
कांहीं केलिया पुत्रासी । आरोग्य नोहें सर्वथा ॥ ४२ ॥
वैद्य म्हणती तये वेळीं । नव्हें बरवें त्यासी अढळी ।
राखील जरी चंद्रमौळी । मनुष्ययत्न नव्हे आतां ॥ ४३ ॥
ऐसें ऐकोनि मातापिता । दुःखें दाटलीं करिती चिंता ।
जय जया जगन्नाथा । दत्तात्रेया गुरुमूर्ति ॥ ४४ ॥
आराधोनियां तुम्हांसी । पुत्र लाधलों संतोषी ।
पापरुप आपणासी । निधान केवीं राहों पाहे ॥ ४५ ॥
एकचि पुत्र आमचे वंशी । त्यातें जरी न राखिसीं ।
प्राण देऊं तयासरसी । दत्तात्रेया स्वामिया ॥ ४६ ॥
ऐसें नानापरी देखा । दुःख करिती जननीजनका ।
वारीतसे पुत्र ऐका । मातापिता आलिंगोनि ॥ ४७ ॥
म्हणे आपुले भोग सरले । जितुके ऋण तुम्हां दिधलें ।
अधिक कैचे देऊं भले । ऋणानुबंध न चुकेचि ॥ ४८ ॥
ऐसें ऐकोनि मातापिता । दोघें जाहली मूर्च्छागता ।
पुत्रावरी लोळतां । महादुःखें दाटोनियां ॥ ४९ ॥
म्हणती ताता पुत्रराया । आमुची आशा झाली वायां ।
पोषिसी आम्हां म्हणोनियां । निश्र्चय केला होता आपण ॥ ५० ॥
उबगोनियां आम्हांसी । सोडूनि केवीं जाऊं पाहसी ।
वृद्धाप्यपणीं आपणांसी । धर्म घडे केवीं तुज ॥ ५१ ॥
ऐकोनि मातापिता वचन । विनवीतसे आक्रंदोन ।
करणीं ईश्र्वराधीन । मनुष्ययत्न काय चाले ॥ ५२ ॥
मातापित्यांचे ऋण । पुत्रें करावें उत्तीर्ण ।
तरीच पुत्रत्व पावणें । नाहीं तरी दगडापरी ॥ ५३ ॥
मातेनें केले मज पोषण । एके घडीचे स्तनपान ।
उत्तीर्ण नव्हे भवार्ण । जन्मांतरी येऊनियां ॥ ५४ ॥
आपण जन्मलों तुमचे उदरीं । कष्ट दाविले अतिभारी ।
सौख्य न देखां कवणेपरी । ऐसा आपण पापी देखा ॥ ५५ ॥
आतां तुम्हीं दुःख न करणें । परमार्थी दृष्टी देणें ।
जैसें कांहीं असेल होणें । ब्रह्मादिकां न सुटेचि ॥ ५६ ॥
येणेंपरी जननीजनकां । संभाषीतसे पुत्र निका ।
तेणेपरी स्त्रियेसी देखा । सांगतसे परियेसा ॥ ५७ ॥
म्हणे ऐक प्राणेश्र्वरी । झाले आमुचे दिवस सरी ।
मजनिमित्तें कष्टलीस भारी । वृथा गेले कष्ट तुझे ॥ ५८ ॥
पूर्वजन्मींचे वैरपण । तुजसी होता माझा शीण ।
म्हणोनि तूंते दिधलें जाण । जन्मांतरीचे कष्ट देखा ॥ ५९ ॥
तूं जरी रहासी आमुचे घरीं । तुज पोशितील परिकरी ।
तुज वाटेल कष्ट भारी । जाईं आपुले माहेरा ॥ ६० ॥
ऐसें तुझें सुंदरपण । न लाधे आपण दैवहीन ।
न राहे तुझें अहेवपण । माझें अंग स्पर्शतां ॥ ६१ ॥
ऐकोनि पतीचें वचन । मूर्च्छा आली तत्क्षण ।
माथा लावूनियां चरणा । दुःख करी तये वेळीं ॥ ६२ ॥
म्हणे स्वामी प्राणेश्र्वरा । तुम्ही मज न अव्हेरा ।
तुम्हांसरी दातारा । आणिक नाहीं गति आपणा ॥ ६३ ॥
जेथें असे तुमचा देह । सवेंचि असे आपण पाहे ।
मनीं न करा संदेह । समागमी तुमची आपण ॥ ६४ ॥
ऐसे दोघांचिया वचनी । ऐकोनियां जनकजननी ।
देह टाकोनियां धरणीं । दुःख करिती तयेवेळीं ॥ ६५ ॥
उठवूनियां श्र्वशुरासी । संबोखीतसे सासूसी ।
न करा चिंता, हा भरंवसीं । पति आपुला वांचेल ॥ ६६ ॥
विनवीतसे तये वेळीं । आम्हां राखेल चंद्रमौळी ।
पाठवा एखाद्या स्थळीं । पति आपुला वांचेल ॥ ६७ ॥
सांगती लोक महिमा ख्याति । नृसिंहसरस्वती श्रीगुरुमूर्ति ।
गाणगापुरी वास करिती । तया स्वामी पहावें ॥ ६८ ॥
त्याचे दर्शनमात्रेसीं । आरोग्य होईल पतीसी ।
आम्हां पाठवा त्वरितेसीं । म्हणोनि चरणा लागली ॥ ६९ ॥
मानवली गोष्ट समस्तामसी । मातापिताश्र्वशुरांसी ।
निरोप घेऊनि सकळिकांसी । निघती झाली तये वेळीं ॥ ७० ॥
तया रोगिया करोनि डोली । घेवोनि निघाली ते बाळी ।
विनवीतसे तये वेळीं । आपले सासूश्र्वशुरांसी ॥ ७१ ॥
स्थिर करुनि अंतःकरण । सुखें रहावें दोघेंजण ।
पति असे माझा प्राण । राखील माझें कुळदैवत ॥ ७२ ॥
म्हणोनि सासूश्र्वशुरांसी । नमन करी प्रीतीसीं ।
आशीर्वाद देती हर्षी । अहेवपण स्थिर होय ॥ ७३ ॥
तुझे दैवें तरी आतां । आमुचा पुत्र वांचो वो माता ।
म्हणोनि निघाले बोळवीत । आशीर्वाद देताति ॥ ७४ ॥
येणेंपरी पतीसहित । निघती झाली पतिव्रता ।
क्वचित्काळ मार्ग क्रमितां । आली गाणगापुरासी ॥ ७५ ॥
मार्ग क्रमितां रोगियासी । अधिक जाहला त्रिदोषी ।
उतरतां ग्रामदेशीं । अतिसंकट जाहले पैं ॥ ७६ ॥
विचारितां श्रीगुरुसी । गेले होते संगमासी ।
जावें म्हणोनि दर्शनासी । निघती झाली तये वेळीं ॥ ७७ ॥
पतिव्रता तये वेळ । आली आपुले पतिजवळ ।
पहातां झाला अंतःकाळ । प्राण गेला तत्क्षणी ॥ ७८ ॥
आकांत करी ते नारी । लोळतसे धरणीवरी ।
भोंसकूनि घ्यावया घेतां सुरी । वारिती तियेसी ग्राम लोक ॥ ७९ ॥
आफळी शिर भूमीसी । हाणी उरीं पाषाणेसी ।
केश मोकळे आक्रोशी । प्रलापीतसे परियेसा ॥ ८० ॥
हा हा देवा काय केले । कां मज गाईसी गांजिलें ।
आशा करुनि आल्यें । राखिसी प्राण म्हणोनि ॥ ८१ ॥
पूजेसी जातां देउळांत । पुढें देऊळचि करी अतिघात ।
ऐसें ऐकों कानीं मात । दृष्टांत झाला आपणासी ॥ ८२ ॥
उष्णकाळीं तापोनि नरु । ठाकोनि जाय एखादा तरु ।
वृक्षचि पडे आघात थोरु । तयापरी झालें मज ॥ ८३ ॥
तृषेकरुनि पीडित । जाय मनुष्य गंगेंतं ।
संधी सुसरी करी घात । तयापरी मज झालें ॥ ८४ ॥
व्याघ्रभयें पळे धेनु । जाय आधार म्हणोनु ।
तेथेंचि वधिती यवनु । तयापरी झाले मज ॥ ८५ ॥
ऐसी पापी दैवहीन । आपुले पतीचा घेतला प्राण ।
मातापितरांसी त्यजून । घेवोनि आल्यें विदेशीं ॥ ८६ ॥
येणेंपरी दुःख करीत । पाहूं आले जन समस्त ।
संभाषिताति दुःख शमता । अनेकपरीकरुनियां ॥ ८७ ॥
वारिताति नारी सुवासिनी । कां वो दुःख करिसी कामिनी ।
विचार करी अंतःकरणीं । होणार न चुके सकळिकांसी ॥ ८८ ॥
ऐसें म्हणतां नगरनारी । तिसी दुःख झालें भारी ।
आठवीतसे परोपरी । आपुलें जन्मकर्म सकळ ॥ ८९ ॥
ऐका तुम्ही मायबहिणी । आतां कैसी वांचूं प्राणीं ।
पतीसी आल्यें घेऊनि । याची आशा करोनियां ॥ ९० ॥
आतां कवणा शरण जावें । राखेल कोण मज जीवें ।
प्राणेश्र्वरा त्यजूनि जीवें । केवीं वांचूं म्हणतसे ॥ ९१ ॥
बाळपणीं गौरीसी । पूजा केली शंकरासी ।
विवाह होतां परियेसीं । पूजा केली मंगळागौरी ॥ ९२ ॥
अहेवपणाचे आशेनीं । पूजा केली म्यां भवानी ।
सांगती मातें सुवासिनी । आनेकपरी व्रतादिकें ॥ ९३ ॥
जें जें सांगती मातें व्रत । केली पूजा अखंडित ।
समस्त जाहलें आतां व्यर्थ । रुसली गौरी आपणावरी ॥ ९४ ॥
आतां माझिये हळदीसी । चोर पडले गळेसरसी ।
सर्वस्व दिधलें वन्हीसी । कंकण-कंचुकी परियेसा ॥ ९५ ॥
कोठे गेलें माझें पुण्य । वृथा पूजिला गौरीरमण ।
कैसे केलें मज निर्वाण । ऐका मायबहिणी हो ॥ ९६ ॥
केवीं राहूं आतां आपण । पति होता माझा प्राण ।
लोकांसरिसा नोहे जाण । प्राणेश्र्वर परियेसा ॥ ९७ ॥
ऐसें नानापरी देखा । करी पतिव्रता दुःखा ।
पतीच्या पाहूनियां मुखा । आणिक दुःख अधिक करी ॥ ९८ ॥
आलिंगोनि प्रेतासि । रोदन करी बहुवसी ।
आठवी आपुले पूर्व दिवसी । पूर्वस्नेह तये वेळीं ॥ ९९ ॥
म्हणे पुरुषा प्राणेश्र्वरा । कैसें माझे त्याजिलें करा ।
उबग आला तुम्हां थोरा । म्हणोनि मातें उपेक्षिलें ॥ १०० ॥
कैसी आपण दैवहीन । तटाकीं खापर लागतां भिन्न ।
होतासि तूं निधान । आयुष्य तुझें उणें जहालें ॥ १०१ ॥
तुमचे मातापितयांसी । सांडूनि आणिलें परदेशीं ।
जेणेंपरी श्रावणासी । वधिलें राये दशरथें ॥ १०२ ॥
तैसी तुमचीं जनकजननी । तुम्हां आणिलें त्यजूनि ।
तुमची वार्ता ऐकोनि । प्राण त्यजितील दोघेजण ॥ १०३ ॥
तीन हत्या भरवंसी । घडल्या मज पापिणीसी ।
वैरिणी होय मी तुम्हांसी । पतिघातकी आपण सत्य ॥ १०४ ॥
ऐशी पापिणी चांडाळी । निंदा करिती लोक सकळीं ।
प्राण घेतला मींचि बळी । प्राणेश्र्वरा दातारा ॥ १०५ ॥
स्त्री नव्हे मी तुमची वैरी । जैसी तिखट शस्त्र सुरी ।
वेधिली तुमचे शरीरीं । घेतला प्राण आपणचि ॥ १०६ ॥
मातापिता बंधु सकळीं । जरी असती तुम्हांजवळी ।
मुख पाहाती अंतःकाळीं । त्यांसि विघ्न आपण केलें ॥ १०७ ॥
माझ्या वृद्ध सासूसासर्यांस । होती तुमची आस ।
पुरला नाहीं त्यांचा सोस । त्यातें सांडोनि केवीं जाता ॥ १०८ ॥
एकचि उदरीं तुम्ही त्यांसी । उबगलेति पोसावयासी ।
आम्हां कोठे ठेवूनि जासी । प्राणेश्र्वरा दातारा ॥ १०९ ॥
आतां आपण कोठे जावें । कवण मातें पोसील जीवें ।
न सांगतां आम्हांसी बरवें । निघोनि गेलासी प्राणेश्र्वरा ॥ ११० ॥
तूं माझा प्राणेश्र्वरु । तुझें ममत्व केवीं विसरुं ।
लोकांसमान नव्हसी नरु । प्रतिपाळिलें प्रीतिभावें ॥ १११ ॥
कधीं नेणे पृथकशयन । वामहस्त उसेवीण ।
फुटतसे अंतःकरण । केवीं वांचों प्राणेश्र्वरा ॥ ११२ ॥
किती आठवूं तुझे गुण । पति नव्हसी माझा प्राण ।
सोडोनि जातोसि निर्वाण । कवणेपरी वांचूं मी ॥ ११३ ॥
आतां कवण वार्या जाणें । कवण घेतील मज पोसणें ।
' बालविधवा ' म्हणोनि जन । निंदापवाद ठेविती ॥ ११४ ॥
एकही बुद्धि मज न सांगतां । त्यजिला आत्मा प्राणनाथा ।
कोठें जावें आपण आतां । केशवपन करुनि ॥ ११५ ॥
तुझे प्रेमें होतें भरल्यें । मातापितयांतें विसरल्यें ।
त्यांचे घरा नाहीं गेल्यें । बोलावणी नित्य येती ॥ ११६ ॥
केवीं जाऊं त्यांच्या घरा । उपेक्षितील प्राणेश्र्वरा ।
दैन्यवृत्तीं दातारा । चित्तवृत्ति केवीं धरुं ॥ ११७ ॥
जंववरी होतासी तूं छत्र । सर्वां ठायीं मी पवित्र ।
मानिती सकळ इष्टमित्र । आतां निंदा करतील ॥ ११८ ॥
सासूश्र्वशुरापाशीं जाणे । मज देखतां त्याहीं मरणें ।
गृह जहालें अरण्य । तुम्हांविणें प्राणेश्र्वरा ॥ ११९ ॥
घेवोनि आल्यें आरोग्यासी । येथें ठेवूनि तूंम्हांसी ।
केवीं जाऊं घरासी । राक्षसी मी पापीण ॥ १२० ॥
ऐसें नानापरी ते नारी । दुःख करी अपरांपरी ।
इतुकें होतां अवसरीं । आला तेथे सिद्ध एक ॥ १२१ ॥
भस्मांकित जटाधारी । रुद्राक्षमाळाभूषण-अळंकारी ।
त्रिशूळ धरिला असे करीं । येऊनि जवळी उभा ठेला ॥ १२२ ॥
संभाषीतसे तया वेळीं । कां वो प्रलापिसी स्थूळीं ।
जैसें लिहिलें कपाळीं । तयापरी होतसें ॥ १२३ ॥
पूर्वजन्मीचें तपफळ । भोगणें आपण हें अढळ ।
वायां रडसी निर्फळ । शोक आतां करुं नको ॥ १२४ ॥
दिवस आठ जरी तूं रडसी । न ये प्राण प्रेतासी ।
जैसें लिहिलें ललाटेसी । तयापरी घडेल जाण ॥ १२५ ॥
मूढपणें दुःख करिसी । समस्तां मरण तूं जाणसी ।
कवण वांचला असे धरित्रीसी । सांग आम्हांसी म्हणतसे ॥ १२६ ॥
आपुला म्हणसी प्राणेश्र्वरु । कोठें उपजला तो नरु ।
तुझा जन्म झाला येरु । कवण तुझी मातापिता ॥ १२७ ॥
पूर येतां गंगेंत । नानापरीचीं काष्टें वाहत ।
येऊनि एके ठायीं मिळत । फांकती आणिक चहूंकडे ॥ १२८ ॥
पाहें पां एका वृक्षावरी । येती पक्षी अपरांपरी ।
क्रमोनि प्रहर चारी । जाती मागुती चहूंकडे ॥ १२९ ॥
तैसा हा संसार जाण नारी । कवण वाचला असे स्थिरी ।
मायामोहें कलत्रपुत्रीं । पति म्हणसी आपुला ॥ १३० ॥
गंगेमध्यें जैसा फेन । तेणेपरी देह जाण ।
स्थिर नोहे, याचि कारण । शोक वृथा करुं नको ॥ १३१ ॥
पंचमहाभूतात्मक देह । तत्संबंधीं गुण पाहें ।
आपुलें कर्म कैसें आहे । तैसा गुण उद्भवे ॥ १३२ ॥
गुणानुबंधें कर्में घडती । कर्मासारखी दुःख प्राप्ति ।
मायामोहाचिया रीतीं । मायाभयसंबंधें ॥ १३३ ॥
मायासंबंधें मायागुण । उपजे सत्व-रज-तमोगुण ।
येणेंचि तीन्ही देह जाण । त्रिगुणात्मक देह हा ॥ १३४ ॥
हा संसार वर्तमान । समस्त कर्माचे अधीन ।
सुखदुःख आपुले गुण । भोगिजे आपुलें आर्जव ॥ १३५ ॥
कल्पकोटी दिवसवरी । देवांस आयुष्य आहे जरी ।
त्यांसी काळ न चुके सरी । मनुष्याचा कवण पाड ॥ १३६ ॥
काळ समस्तांसी कारण । कर्माधीन देह-गुण ।
स्थिर कल्पितां साधारण । पंचभूत देहासी ॥ १३७ ॥
काळ-कर्म-गुणाधीन । पंचभूतात्मक देह जाण ।
उपजतां संतोष नको मना । मेलिया दुःख न करावें ॥ १३८ ॥
जघीं गर्भ होता नरु । जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्याते थोरु ।
त्याचे जैसे गुणकर्म-विवरु । तैसें मरण जन्म परियेसा ॥ १३९ ॥
कोणा मृत्यु पूर्ववयसी । कवणा मृत्यु वृद्धाप्येंसी ।
जैसे आर्जव असे ज्यासी । तयापरी घडे जाणा ॥ १४० ॥
पूर्वजन्मार्जवासरसीं । भोगणें होय सुखदुःख अंशी ।
कलत्र-पुत्र-पति हर्षी । पापपुण्यांशे जाणा ॥ १४१ ॥
आयुष्य सुखदुःख जाणा । समस्त पापवश्य-पुण्य ।
ललाटीं लिहिलें असे ब्रह्मानें । अढळ जाण विद्वजना ॥ १४२ ॥
एखादे समयीं कर्मासी । लंघिजेल पुण्यवशीं ।
देवदानवमनुष्यांसी । काळ न चुके भरंवसे ॥ १४३ ॥
संसार म्हणजे स्वप्नापरी । इंद्रजाल-गारुडीसरी ।
मिथ्या जाण तयापरी । दुःख आपण करुं नये ॥ १४४ ॥
शतसहस्त्रकोटि जन्मीं । तूं कवणाची कोण होतीस गृहिणी ।
वायां दुःख करिसी झणी । मूर्खपणेंकरुनियां ॥ १४५ ॥
पंचभूतात्मक शरीर । त्वचा मांस शिरा रुधिर ।
मेद मज्जा अस्थि नर । विष्ठा-मूत्र-श्र्लेष्मसंबंधीं ॥ १४६ ॥
ऐशा शरीरअघोरांत । पाहतां काय असे स्वार्थ ।
मल मूत्र भरलें रक्त । तयाकारणें शोक कां करिसी ॥ १४७ ॥
विचार पाहें पुढें आपुला । कोणेपरी मार्ग असे भला ।
संसारसागर पाहिजे तरला । तैसा मार्ग पाहें बाळे ॥ १४८ ॥
येणेंपरी तियेसी । बोधिता झाला तापसी ।
ज्ञान झालें तियेसी । सांडी शोक तयावेळी ॥ १४९ ॥
कर जोडोनि तये वेळीं । माथा ठेवोनि चरणकमळी ।
विनवीतसे करुणाबहाळी । उद्धरीं स्वामी म्हणोनियां ॥ १५० ॥
कवण मार्ग आपणासी । जैसा स्वामी निरोप देसी ।
जनकजननी तूं आम्हांसी । तारी तारी म्हणतसे ॥ १५१ ॥
कवणेपरी तरेन आपण । हा संसार भवार्ण ।
तुझा निरोप करीन । म्हणोनि चरणा लागली ॥ १५२ ॥
ऐकोनि तियेचे वचन । सांगे योगी प्रसन्नवदन ।
बोलतसे विस्तारुन । आचरण स्त्रियांचे ॥ १५३ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्र विस्तार ।
ऐकतां समस्त पाप दूर । सकळाभीष्टें साधती ॥ १५४ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे
प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
1 गुरुचरित्र सप्ताह पारायण दिवस पहिला.
2 गुरुचरित्र सप्ताह पारायण दिवस दुसरा.
3 गुरुचरित्र सप्ताह पारायण दिवस तीसरा.
4 गुरुचरित्र सप्ताह पारायण दिवस चौथा
6 गुरुचरित्र सप्ताह पारायण दिवस सहावा
7 गुरुचरित्र सप्ताह पारायण दिवस सातवा
Gurucharitra Adhyay 30
गुरुचरित्र अध्याय ३०
Custom Search
No comments:
Post a Comment