Saturday, December 7, 2013

Gurucharitra Adhyay 33 गुरुचरित्र अध्याय ३३


Gurucharitra Adhyay 33 
Gurucharitra Adhyay 33 is in Marathi. Name of this Adhyay is Rudraksha MahimaNirupanam. 
गुरुचरित्र अध्याय ३३ 
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । 
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिये चरणां । 
विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरोनियां ॥ १ ॥ 
म्हणे स्वामी सिद्धमुनि । पूर्वकथानुसंधानीं । 
पतीसहित सुवासिनी । आली गुरुसमागमें ॥ २ ॥ 
श्रीगुरु आले मठासी । पुढें कथा वर्तली कैसी । 
विस्तारोनि आम्हांसी । निरोपावी दातारा ॥ ३ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक बाळा । दुसरे दिवसीं प्रातःकाळा । 
दंपति दोघें गुरुजवळा । येऊनि बैसती वंदूनि ॥ ४ ॥ 
विनविताति कर जोडोनि । आम्हां शोक घडले दिनीं । 
एक यतीनें येऊनि । नाना धर्म निरोपिले ॥ ५ ॥ 
रुद्राक्ष चारी आम्हांसी । देतां बोलिला परियेसीं । 
कानीं बांधोनि प्रेतासी । दहन करीं म्हणितलें ॥ ६ ॥ 
आणिक एक बोलिलें । रुद्रसूक्त असे भलें । 
अभिषेक करिती विप्रकुळें । तें तीर्थ आणावें ॥ ७ ॥ 
आणोनि तीर्थ प्रेतावरी । प्रोक्षा तुम्ही भावेकरीं । 
अंतकाळ-समयीं दर्शन करीं । श्रीगुरुनृसिंहसरस्वतीस्वामीचें ॥ ८ ॥ 
ऐसें सांगोनि आम्हांसी । आपण गेला परियेसीं । 
रुद्राक्ष राहिले मजपाशीं । पतिश्रवणीं स्वामिया ॥ ९ ॥ 
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु सांगती हांसोन । 
रुद्राक्ष दिल्हे आम्हींच जाण । तुझी भक्ति देखोनियां ॥ १० ॥ 
रुद्राक्षांची महिमा । सांगता असे अनुपम्या । 
सांगेन विस्तारुन तुम्हां । एकचित्ते परियेसा ॥ ११ ॥ 
भक्ति अथवा अभक्तिसीं । रुद्राक्षधारणनरासी । 
पापें न लागती परियेंसी । उत्तम अथवा नीचातें ॥ १२ ॥ रुद्राक्षधारणपुण्य । मिति नाहीं अगण्य । 
आणिक द्यावया नाहीं साम्य । श्रुतिसंमत परियेसा ॥ १३ ॥ सहस्त्रसंख्या जो नर । रुद्राक्षमाळा करी हार । 
स्वरुपें होय तोचि रुद्र । समस्त देव वंदिती ॥ १४ ॥ 
सहस्त्र जरी न साधती । दोंही बाहूंसी षोडश असती । 
शिखेसी बांधा एक ख्याति । चतुविंशति दोंही करी ॥ १५ ॥ 
कंठाभरण बत्तिसाचें । मस्तकीं बांधा चत्वारिंशाचें । 
श्रवणद्वयीं द्वादशाचे । धारण करावें परियेसा ॥ १६ ॥ 
अष्टोत्तरशत एक । कंठी माळा करा निक । 
रुद्रपुत्रसमान ऐक । येणें विधी धारण केलिया ॥ १७ ॥ 
मोतीं पोंवळीं स्फटिकेसी । रौप्य-वैडूर्य सुवर्णेसीं । 
मिळोनि रुद्राक्षमाळेसी । धारण करावें परियेसा ॥ १८ ॥ 
त्याचें फळ असे अपार । माळा रुद्राक्ष असे थोर । 
जैसे मिळती समयानुसार । रुद्राक्ष धारण करावे ॥ १९ ॥ 
ज्याचे गळां रुद्राक्ष असती । त्यासी पापें नातळती । 
त्यासी होय सद्गति । रुद्रलोकीं अखंडित ॥ २० ॥ 
रुद्राक्षमाळा धरोनि । जप करिती अनुष्ठानीं । 
अनंत फळ असे जाणी । ऐका श्रोते एकचित्तें ॥ २१ ॥ 
रुद्राक्षाविणें जो नर । वृथा जन्म जाणा थोर । 
ज्याचे कपाळीं नसे त्रिपुंड्र । जन्म वायां परियेसा ॥ २२ ॥ 
रुद्राक्ष बांधोनि मस्तकेंसी । अथवा दोन्ही श्रवणांसी । 
स्नान करितां नरासी । गंगास्नानफळ असे ॥ २३ ॥ 
रुद्राक्ष ठेवोनि पूजेसी । अभिषेकावें रुद्रसूक्तेसीं । 
लिंगपूजा समानेसीं । फळ असे निर्धारें ॥ २४ ॥ 
एकमुख पंचमुख । एकादश असती मुख । 
चतुर्दशादि कौतुक । मुखें असती परियेसा ॥ २५ ॥ 
हे उत्तम मिळती जरी । अथवा असती नानापरी । 
धारण करावें प्रीतिकरीं । लाधे चतुर्विध पुरुषार्थ ॥ २६ ॥ 
याचें पूर्वील आख्यान । विशेष असे गति गहन । 
ऐकतां पापें पळोन । जाती त्वरित परियेसा ॥ २७ ॥ 
राजा काश्मीरदेशीं । ' भद्रसेन ' नाम परियेसीं । 
त्याचा पुत्र ' सुधर्मा ' ऐसी । प्रख्यात होता अवधारा ॥ २८ ॥ 
तया राजमंत्रीसुता । नाम ' तारक ' असे ख्यात । 
दोघे कुमार ज्ञानवंत । परमसख्यत्वें असती देखा ॥ २९ ॥ 
उभयतां एक वयेसीं । सुकुमार अति सुंदरेसीं । 
एके स्थानीं विद्याभ्यासी । वर्तती देखा संतोषें ॥ ३० ॥ 
क्रीडास्थानीं सहभोजनीं । असती दोघे संतोषोनि । 
ऐसे कुमर महाज्ञानी । शिवाचारी परियेसा ॥ ३१ ॥ 
सर्वदेही अळंकार । रुद्राक्षमाळा शृंगार । 
भस्मधारण त्रिपुंड- । तिलक असे परियेसा ॥ ३२ ॥ 
रत्नाभरण सुवर्ण देखा । लोहासमान पाहती निका । 
रुद्राक्षमाळांवांचूनि आणिका । न घेती देखा अलंकार ॥ ३३ ॥ 
मातापिता बंधुजन । आणोनि देती रत्नाभरण । 
टाकोनि देती कोपून । लोह पाषाण म्हणती त्यासी ॥ ३४ ॥ 
वर्ततां ऐसें एके दिवसीं । तया राजमंदिरासी । 
आला पराशर ऋषि । साक्षात ब्रह्म तो देखा ॥ ३५ ॥ 
ऋषि आला देखोनि । राजा सन्मुख जाऊनि । 
साष्टांगीं नमोनि । घेऊनि आला मंदिरांत ॥ ३६ ॥ 
बैसवोनि सिंहासनीं । अर्घ्य पाद्य देवोनि । 
पूजा केली उपचारोनि । महानंदें तये वेळीं ॥ ३७ ॥ 
कर जोडोनि मुनीश्र्वरासी । विनवी राजा भक्तीसीं । 
पिसें लागलें पुत्रांसी । काय करावें म्हणतसे ॥ ३८ ॥ 
रत्नाभरण अलंकार । न घेती भूषणें परिकर । 
रुद्राक्षमाळा कंठीं हार । सर्वाभरण तेंचि करिती ॥ ३९ ॥ 
शिकविल्या नायकती । कैसे ज्ञान यांचे मतीं । 
स्वामी यांते निरोप देती । तरीच ऐकती कुमारक ॥ ४० ॥ भूतभविष्यवर्तमानीं । त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी । 
याचा अभिप्राय विस्तारोनि । निरोपावें दातारा ॥ ४१ ॥ 
ऐकोनि रायाचें वचन । पराशर ऋषि जाण । 
निरोपीतसे हांसोन । म्हणे विचित्र असे ऐका ॥ ४२ ॥ 
तुझ्या आणि मंत्रिसुताचा । वृतांत्त असे विस्मयाचा । 
सांगेन ऐक एकचित्तें साचा । म्हणे ऋषि तये वेळीं ॥ ४३ ॥ 
पूर्वीं नंदीग्राम नगरीं । होती एक वेश्या नारी । 
अति लावण्य सुंदरी । जैसें तेज चंद्रकांति ॥ ४४ ॥ 
जैसा चंद्र पौर्णिमेसी । तैसे छत्र असे तिसी । 
सुखासन सुवर्णेसीं । शोभायमान असे देखा ॥ ४५ ॥ 
हिरण्यमय तिचें भुवन । पादुका-सुवर्ण विराजमान । 
नानापरींचे आभरण । असे विचित्र परियेसा ॥ ४६ ॥ 
पर्यंक रत्नखचित देखा । वस्त्राभरणे अनेका । 
गोमहिषी दास्यादिका । बहुत असती परियेसा ॥ ४७ ॥ 
सर्वाभरणें तिसी असतीं । जैसी दिसे मन्मथरति । 
नवयौवन सोमकांति । अति लावण्य सुंदरी ॥ ४८ ॥ 
गंध कुंकुम कस्तुरी । पुष्पें असतीं नानापरी । 
अखिल भोग तिच्या घरीं । विख्यात असे तया ग्रामीं ॥ ४९ ॥ धनधान्यादि संपत्ति । कोटिसंख्या नाहीं मिति । 
ऐशापरी तें नांदती । वारवनिता तया नगरीं ॥ ५० ॥ 
ऐसें असोनि वारवनिता । म्हणे आपण पतिव्रता । 
धर्म करी असंख्याता । अन्नवस्त्रें ब्राह्मणांसी ॥ ५१ ॥ 
नाट्यमंडप तिचे घरी । रत्नखचित नानापरी । 
उभारिला अतिकुसरीं । सदा नृत्य करी तेथें ॥ ५२ ॥ 
सखियावर्गसहित नित्य । नृत्य करी ती मनोरथ । 
कुक्कुट मर्कट विनोदार्थ । बांधिले असती मंडपी ॥ ५३ ॥ 
तया मर्कटकुक्कुटांसी । रुद्राक्षमाळाभूषणेसीं । 
कुक्कुटाच्या शिखेसी । रुद्राक्ष एक बांधिला असे ॥ ५४ ॥ 
तया मर्कटकुक्कुटांसी । शिकवी ती नृत्य विनोदेसीं । 
वर्ततां ऐसें एके दिवसीं । अभिनव झालें परियेसा ॥ ५५ ॥ 
' शिवव्रती ' म्हणिजे एक । वैश्य आला महाधनिक । 
रुद्राक्षमाळा-भस्मांक । प्रवेशला तिच्या घरीं ॥ ५६ ॥ 
त्याचे सव्य करीं देखा । रत्नखचित लिंग निका । 
तेज फांके तरुणार्का । विराजमान दिसतसे ॥ ५७ ॥ 
तया वैश्यासी देखोनि । नेलें वेश्यें वंदूनि । 
नाट्यमंडपी बैसवोनि । उपचार केले नानाविध ॥ ५८ ॥ 
तया वैश्याचे करीं । जें कां लिंग होतें भूरी । 
रत्नखचित सूर्यापरी । दिसतसे तेज त्याचें ॥ ५९ ॥ 
देखोनि लिंग रत्नखचित । विस्मय करी वारवनिता । 
आपुले सखीसी असे म्हणत । ऐसी वस्तु पाहिजे ॥ ६० ॥ 
पुसा तया वैश्यासी । देईल जरी मोलासी । 
अथवा देईल रतीसी । होईन कुलस्त्री दिवस तीन ॥ ६१ ॥ 
ऐकोनि तियेचे वचन । पुसती वैश्यासी सखी जाण । 
जरी कां द्याल लिंगरत्न । देईल रति दिवस तीनी ॥ ६२ ॥ 
अथवा द्याल मोलासी । लक्षसंख्यादि द्रव्यासी । 
जें कां वसे तुमचे मानसीं । निरोपावें शिवव्रती ॥ ६३ ॥ 
ऐकोनि सखियांचे वचन । म्हणे वैश्य हांसोन । 
देईन लिंग मोहन । रतिकांक्षा करुनियां ॥ ६४ ॥ 
तुमची मुख्य वारवनिता । होईल जरी माझी कांता । 
दिवस तीन पतिव्रता । होऊनि असणें मनोभावें ॥ ६५ ॥ 
म्हणोनि मुख्य वनितेसी । पुसतसे वैश्य स्वमुखेसीं । 
नामें व्यभिचारी तूं होसी । काय सत्य तुमचे बोल ॥ ६६ ॥ 
तुम्हां कैंचे धर्मकर्म । बहु पुरुषांचा संगम । 
पतिव्रता कैसें नाम । असे तुज सांग मज ॥ ६७ ॥ 
ख्याति तुमचा कुळाचार । सदा करणें व्यभिचार । 
 नव्हें तुमचे मन स्थिर । एक पुरुषासवें नित्य ॥ ६८ ॥ 
ऐकोनि वैश्यवचन । बोले वारवनिता आपण । 
दिनत्रय सत्य जाण । होईन तुमची कुलस्त्री ॥ ६९ ॥ 
द्यावें मातें लिंगरत्न । रतिप्रसंगें तुमचे मन । 
संतोषवीन अतिगहन । तनुमनधनेसीं जाणा ॥ ७० ॥ 
वैश्य म्हणे तियेसी । प्रमाण द्यावें आम्हांसी । 
दिनत्रय दिवानिशीं । व्हावें पत्नी धर्मकर्में ॥ ७१ ॥ 
तये वेळी वारवनिता । लिंगावरी ठेवी हस्ता । 
चंद्रसूर्य साक्षी करितां । झाली पत्नी तयाची ॥ ७२ ॥ 
इतुकिया अवसरीं । लिंग दिधलें तिचे करीं । 
संतोषली ते नारी । करी कंकण बांधिलें ॥ ७३ ॥ 
लिंग देवोनि वेश्येसी । बोले वैश्य परियेसीं । 
माझ्या प्राण समानेसीं । लिंग असे जाण तुवां ॥ ७४ ॥ 
याकारणें लिंगासी । जतन करावें परियेसीं । 
हानि होतां लिंगासी । प्राण आपुला त्यजीन ॥ ७५ ॥ 
ऐकोनि वैश्याचें वचन । अंगीकारिलें ते अंगनें । 
म्हणे लिंग करीन जतन । प्राणसमान म्हणोनियां ॥ ७६ ॥ 
ऐसीं दोघे संतोषत । बैसली असतीं मंडपांत । 
दिवस झाला अस्तंगत । म्हणती जाऊं मंदिरांत ॥ ७७ ॥ 
संभोगसमयीं लिंगासी । ठेवों नये जवळिकेसी । 
म्हणे वैश्य तियेसी । तये वेळीं परियेसा ॥ ७८ ॥ 
ऐकोनि वैश्यवचन । मंडपीं ठेविलें लिंगरत्न । 
मध्यस्तंभीं बांधोन । गेली अतर्गृहासी ॥ ७९ ॥ 
क्रीडा करीत दोघेंजण । होतीं ऐका एक क्षण । 
उठिला अग्नि अद्भुत जाण । तया नाट्यमंडपांत ॥ ८० ॥ 
अग्नि लागोनि मंडप । भस्म जाहला जैसा धूप । 
वैश्य करीतसे प्रलाप । देखोनियां तये वेळीं ॥ ८१ ॥ 
म्हणे हा हा काय झालें । माझें प्राणलिंग गेलें । 
विझविताति अतिप्रबळें । नगरलोक मिळोनि ॥ ८२ ॥ 
विझवूनि पाहती लिंगासी । झालें दग्ध परियेसीं । 
अग्नींत मर्कट-कुक्कुटांसी । दहन जहालें अवधारा ॥ ८३ ॥ 
वैश्य देखोनि तये वेळीं । दुःख करी अतिप्रबळी । 
प्राणलिंग जळोनि गेलें । आतां प्राण त्यजीन म्हणे ॥ ८४ ॥ 
म्हणोनि निघाला बाहेरी । आयती केली अवसरीं । 
काष्टें मिळवोनि अपारी । अग्नि केला परियेसा ॥ ८५ ॥ 
लिंगदहन जाहलें म्हणत । अग्निप्रवेश केला त्वरित । 
नगरलोक विस्मय करीत । वेश्या दुःख करीतसे ॥ ८६ ॥ 
म्हणे हा हा काय झाले । पुरुषहत्या दोष मज घडले । 
लिंग मंडपीं ठेविलें । दग्ध जाहलें परियेसा ॥ ८७ ॥ 
वैश्य माझा प्राणेश्र्वरु । तया हानी जहाली निर्धारु । 
पतिव्रताधर्म करुं । म्हणे प्राण त्यजीन ॥ ८८ ॥ 
बोलावोनि विप्रांसी । नमस्कारी तये वेळेसी । 
सहगमन करावयासी । दानधर्म करीतसे ॥ ८९ ॥ 
वस्त्र-भूषणें भांडारा । सर्व दिधलें विप्रवरां । 
आयती केली परिकरा । काष्ठें-चंदन वन्ही देखा ॥ ९० ॥ 
आपले बंधुसहोदरासी । नमोनि पुसे तये वेळेसी । 
निरोप द्यावा आपणासी । पतीसमागमें जातसें ॥ ९१ ॥ 
ऐकोनि तियेचें वचन । दुःख करिती बंधुजन । 
म्हणती तुझी बुद्धि हीन । काय धर्म करित्येसी ॥ ९२ ॥ 
आम्हीं घेतले जन्म कोण । तदनुसार वर्तन । 
करितां नाहीं दूषण । तूं हे काय करित्येसी ॥ ९३ ॥ 
वेश्येचे मंदिरासी । येती पुरुष रतीसी । 
मिती नाहीं तयांसी । केवीं जाहला तुझा पुरुष ॥ ९४ ॥ 
कैंचा वैश्य कैंचे लिंग । वायां जाळिसी आपुलें अंग । 
वारवनिता-धर्म चांग । नित्य पुरुष नूतनचि ॥ ९५ ॥ 
ऐसे वैश्य किती येती । त्यांची कैशी होसी सती । 
हांसती नगरलोक ख्याति । काय तुझी बुद्धि सांगे ॥ ९६ ॥ 
येणेंपरी समस्त जन । वारिती तिचे बंधुजन । 
कांहीं केलिया नायके जाण । विनवीतसे परियेसा ॥ ९७ ॥ 
वेश्या म्हणे तया वेळीं । आपुला पति वैश्य अढळी । 
प्रमाण केलें तयाजवळी । चंद्र-सूर्य साक्षी असे ॥ ९८ ॥ 
साक्षी केली हो म्यां क्षिति । दिवस तीन अहोरात्रीं । 
धर्मकर्में त्याची सती । जाहल्यें आपण परियेसा ॥ ९९ ॥ 
माझा पति जाहला मृत । आपण जीवंत नाहीं सत्य । 
पतिव्रता-धर्म ख्यात । वेदशास्त्री परियेसा ॥ १०० ॥ 
पतीसवें जे नारी । सहगमन जाय प्रीतीकरीं । 
एकेक पाउला भूमीवरी । अश्र्वमेधयज्ञ फळ असे ॥ १०१ ॥ 
आपुले मातापिता-पक्ष । एकवीस कुळें विख्यात । 
पतीचे मातापितापक्ष । एकवीस कुळें परियेसा ॥ १०२ ॥ 
इतुके जरी नरकी असती । त्यांसी घेऊनि समवेती । 
जाई त्वरित स्वर्गाप्रति । वेदशास्त्रें म्हणती ऐसें ॥ १०३ ॥ 
ऐसें पुण्य जोडिती । काय वांचूनि राहणें क्षितीं । 
दुःखसागर संसार ख्याति । मरणें सत्य कधीं तरी ॥ १०४ ॥ 
म्हणोनि विनवी समस्तांसी । निघाली बाहेर संतोषी । 
आली अग्निकुंडापाशी । नमन केलें अग्निकुंडा ॥ १०५ ॥ 
स्मरोनियां सर्वेश्र्वर । केला सूर्यासी नमस्कार । 
प्रदक्षिणे उल्हास थोर । करिती झाली तये वेळीं ॥ १०६ ॥ 
नमूनि समस्त द्विजांसी । उभी ठेली अग्निपाशीं । 
उडी घालितां वेगेसीं । अभिनव जहालें तये वेळीं ॥ १०७ ॥ 
सदाशिव पंचवजक्त्र । दशभुजा नागसूत्र । 
हातीं असे पानपात्र । त्रिशूळ डमरु करीं असे ॥ १०८ ॥ 
भस्मांकित जटाधारी । बैसलासे नंदीवरी । 
धरितां झाला वरचेवरी । वेश्येसी तये वेळीं ॥ १०९ ॥ 
तया अग्निकुंडांत । न दिसे अग्नि असे शांत । 
भक्तवत्सल जगन्नाथ । प्रसन्न जाहला तये वेळी ॥ ११० ॥ 
हातीं धरुनि वेश्येसी । कडे काढिलें व्योमकेशीं । 
प्रसन्न होऊनि परियेसीं । वर माग म्हणतसे ॥ १११ ॥ 
ईश्र्वर म्हणे तियेसी । आलों तुझे परीक्षेसी । 
धर्मधैर्य पहावयासी । येणें घडलें परियेसा ॥ ११२ ॥ 
जाहलों वैश्य आपणचि । लिंगरत्न स्वयंभूचि । 
अग्नि केली मायेची । नाट्यमंडप जाळिला ॥ ११३ ॥ 
तुझें मन पहावयासी । जहालों अग्निप्रवेशीं । 
तूंचि पतिव्रता होसी । सत्य केलें व्रत आपुलें ॥ ११४ ॥ 
तुष्टलों तुझे भक्तीसी । देईन वर जे मागसी । 
आयुरारोग्यश्रियेसीं । जें इच्छिसी माग आतां ॥ ११५ ॥ 
म्हणे वेश्या तये वेळीं । नलगे वर चंद्रमौळी । 
स्वर्ग-भूमि-रसातळीं । न घें भोग ऐश्र्वर्य ॥ ११६ ॥ 
तुझे चरणकमळीं भृंग । होवोनि असेन महाभाग । 
माझे इष्ट बंधुवर्ग । सकळ तुझे संनिधेंसी ॥ ११७ ॥ 
दासदासी माझे असती । सकळ न्यावें स्वर्गाप्रति । 
तुझे संनिध पशुपति । रांहू स्वामी सर्वेश्र्वरा ॥ ११८ ॥ 
आम्हां न व्हावी पुनरावृत्ति । न लगे संसार यातायाती । 
विमोचावें स्वामी त्वरिती । म्हणोनि चरणीं लागली ॥ ११९ ॥ 
ऐकोनि तियेचें वचन । प्रसन्न झाला गौरीरमण । 
समस्तां विमानीं बैसवोन । घेऊनि गेला स्वर्गासी ॥ १२० ॥ 
तिचे नाट्यमंडपांत । जो कां जाहला मर्कटघात । 
तया कुक्कुटासमवेत । दग्ध जहाले परियेसा ॥ १२१ ॥ 
म्हणे पराशर ऋषि । सांगेन राया परियेसीं । 
मर्कटत्व त्यजूनियां हर्षी । तुझे उदरीं जन्मला ॥ १२२ ॥ 
तुझे मंत्रियाचे कुशीं कुक्कुट जन्मला परियेसीं । 
रुद्राक्षधारणफळें ऐसीं । राजकुमर होऊनि आले ॥ १२३ ॥ पूर्वसंस्काराकरितां । रुद्राक्षधारण असे करीत । 
दोघे पुत्र ज्ञानवंत । केवळ भक्त ईश्र्वराचे ॥ १२४ ॥ 
पूर्वजन्मीं अज्ञान असतां । रुद्राक्षधारण नित्य करितां । 
इतुकें पुण्य घडलें म्हणतां । जहाले तुझे कुमारक ॥ १२५ ॥ 
आतां तरी ज्ञानवृत्तीं । रुद्राक्ष धारण करिताती । 
त्यांच्या पुण्या नाहीं मिति । म्हणोनि सांगे पराशर ॥ १२६ ॥ 
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । येणेंपरी रायासी । 
सांगता झाला महा हर्षी । पराशर विस्तारें ॥ १२७ ॥ 
ऐकोनि ऋषीचें वचन । राजा विनवी कर जोडून । 
प्रश्र्न केला अतिगहन । सांगेन ऐका एकचित्तें ॥ १२८ ॥ 
म्हणोनि सिद्ध विस्तारेसीं । सांगे नामधारकासी । 
अपूर्व जाहलें परियेसीं । पुढील कथा ऐक पां ॥ १२९ ॥ 
गंगाधराचा नंदनु । सांगे गुरुचरित्रकामधेनु । 
ऐकतां श्रोते सावधानु । लाधे चारी पुरुषार्थ ॥ १३० ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
रुद्राक्षमहिमानिरुपणं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 33 
गुरुचरित्र अध्याय ३३


Custom Search

No comments: