Sunday, December 15, 2013

Gurucharitra Adhyay 38 गुरुचरित्र अध्याय ३८


Gurucharitra Adhyay 38 
Gurucharitra Adhyay 38 is in Marathi. Samaradhana is a way by which devotees pay their respect to their Guru. It includes offering food to Guru and Brahmins. One of such devotee came to Gangapur for Samaradhana. He was very poor and don’t have enough things to offer food to many people. However he was very much eager for doing Samaradhana. Guru helped him and fulfilled his will. Name of this Adhyay is AnnaPurtik-Diwaj-Chatusahasra-Bhojanam. 
श्रीगुरुचरित्र अध्याय ३८ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ 
नामधारक विनवी सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी । 
विस्तारावें कृपेसी । म्हणोनि चरणीं लागला ॥ १ ॥ 
 आर्त झालो मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा । 
चरित्र सांगें श्रीगुरुचें । माझें मन निववीं वेगीं ॥ २ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारकासी । तूं जें जें मज पुससी । 
संतोष होतो आम्हांसी । गुरुचरित्र आठवितां ॥ ३ ॥ 
तुजकरितां आम्हासी । लाभ जोडे परियेसीं । 
आठवली कथा सुरसी । विचित्र एक झालें असे ॥ ४ ॥ 
मागें कथन सांगितले । जें भक्तिं द्रव्य आणिलें । 
स्वामी अंगीकार नाहीं केलें । समाराधना करावी म्हणोनि ॥ ५ ॥ 
नित्य समाराधना देख । करीत होते भक्त अनेक । 
कधीं नाहीं आराणूक । नाहीं ऐसा दिवस नाहीं ॥ ६ ॥ 
ऐसें होतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं । 
असें काश्यप-गोत्रेंसीं । नाम तया ' भास्कर ' ॥ ७ ॥ 
अति सुक्षीण ब्राह्मण । आला आपण दर्शना म्हणोन । 
साष्टांगीं नमस्कारुन । भक्तिपूर्वक विनविलें ॥ ८ ॥ 
तें दिवसीं भक्तजन । करीत होते आराधन । 
उठवितात तया ब्राह्मणा । भोजन करीं म्हणोनियां ॥ ९ ॥ 
संकल्प करोनि तो ब्राह्मण । श्रीगुरुसी भिक्षा करवीन आपण । 
सवें सोपस्कार घेऊन । आला होता परियेसा ॥ १० ॥ 
त्रिवर्गाच्या पुरतें देखा । सवें असे तंडुलें-कणिक । 
वरकड पदार्थ त्या पूर्तिका । सोपस्कार असे त्यापाशीं ॥ ११ ॥ 
सर्व असे वस्रीं बांधिलें । नेऊनि मठांत ठेविले । 
भक्तें आणिक त्यासी बोलाविलें । गेला तो ब्राह्मण भोजनासी ॥ १२ ॥ 
भोजन करितां झाली निशी । आपण आला मठासी । 
गांठोडी ठेवी आपुले उशीं । मग निद्रा करी देखा ॥ १३ ॥ 
नित्य घडे ऐसेंचि त्यासी । भक्त लोक येती आराधनेसी । 
आराणूक नव्हे त्यासी । नित्य जेवी समाराधनीं ॥ १४ ॥ 
समस्त त्यास हांसती । पहा हो समाराधनेसी आयती । 
घेऊन आला असे भक्तीं । आपण जेवी नित्य समाराधनी ॥ १५ ॥ 
एकासी नव्हे पुरें अन्न । श्रीगुरुशिष्य बहु जन । 
केवीं करील हा ब्राह्मण । समाराधना करीन म्हणतो ॥ १६ ॥ 
लाज नये त्यासी कैसी । समाराधना म्हणायासी । 
दे कां स्वयंपाक आम्हांसी । तूं करीं आजि माधुकरी ॥ १७ ॥ 
ऐसें नाना प्रकारें त्यासी । विनोद करिती ब्राह्मण परियेसीं । 
ऐशा प्रकारें तीन मासीं । क्रमिले त्या ब्राह्मणें तेथेचि ॥ १८ ॥ 
नित्य होतसे आराधन । त्यांचे घरीं जेवी आपण । 
गांठोडी उशाखाली ठेवून । निद्रा करी प्रतिदिवसीं ॥ १९ ॥ 
मास तीन क्रमिल्यावरी । समस्त मिळोनि द्विजवरीम । 
 परिहास करिती अपारी । श्रीगुरुमूर्ती ऐकलें ॥ २० ॥ 
बोलाविती त्या ब्राह्मणासी । आजि भिक्षा करावी आम्हांसी । 
स्वयंपाक करी वेगेंसी । म्हणती श्रीगुरु कृपासिंधु ॥ २१ ॥ 
ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । संतोष अपार द्विजा झाला । 
चरणांवरी माथा ठेविला । हर्षे गेला आइतीसी ॥ २२ ॥ 
आणिलें द्वय शेर घृत । शाका दोनी त्यापुरत । 
स्नान करुनि शुचिर्भुत । स्वयंपाक केला तये वेळीं ॥ २३ ॥ 
समस्त ब्राह्मण तये वेळीं । मिळोन आले श्रीगुरुजवळी । 
म्हणती आजि आमुची पाळी । यावनाळ-अन्न घरीं ॥ २४ ॥ 
नित्य होतें समाराधन । आम्ही जेवतों मिष्टान्न । 
कैंचा हा आला ब्राह्मण । आजि राहिली समाराधना ॥ २५ ॥ 
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । नका जाऊं घरांसी । 
शीघ्र जावें आंघोळीसी । येथेंचि जेवा तुम्ही आजि ॥ २६ ॥ 
ब्राह्मण मनीं विचारिती । मठी असे सामग्री आयती । 
स्वयंपाक आतां करविती । आम्हांसी निरोपिती याचिगुणें ॥ २७ ॥ 
समस्त गेले स्नानासी । श्रीगुरु बोलाविती ब्राह्मणासी । 
 शीघ्र करीं गा होईल निशी । ब्राह्मण अपार सांगितले ॥ २८ ॥ 
स्वयंपाक झाला तत्क्षण । सांगतसे श्रीगुरुसी ब्राह्मण । 
निरोप देती जा धांवोन । ब्राह्मण समस्त पाचारीं ॥ २९ ॥ 
ब्राह्मण गेला गंगेसी । बोलावीतसे ब्राह्मणांसी । 
स्वामीनें बोलाविलें तुम्हांसी । शीघ्र यावें म्हणोनियां ॥ ३० ॥ 
ब्राह्मण म्हणती तयासी । स्वयंपाक व्हावया होईल निशी । 
तुवां शीघ्र श्रीगुरुसी । भिक्षा करावी जाय वेगीं ॥ ३१ ॥ 
ऐसें ऐकोनि तो ब्राह्मण । गेला श्रीगुरुजवळी आपण । 
ब्राह्मण न येती ऐसें म्हणे । आपण जेवूं अपरात्रीं ॥ ३२ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । नेम असे आजि आम्हांसी । 
सहपंक्तीनें ब्राह्मणांसी । जेवूं आम्ही निर्धारीं ॥ ३३ ॥ 
ब्राह्मणांसहित आम्हांसी । जेवूं वाढीं गा तूं परियेसीं । 
जरी अंगीकार न करिसी । न जेवूं तुझे घरीं आम्ही ॥ ३४ ॥ 
ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी । जो निरोप द्याल आपणासी । 
तोचि निरोप माझे शिरसीं । ब्राह्मणांसहित जेवूं वाढीन ॥ ३५ ॥ 
ब्राह्मण मनीं विचारी । श्रीगुरु असती पुरुषावतारी । 
न कळे बोले कवणेंपरी । आपुलें वाक्य सत्य करील ॥ ३६ ॥ 
मग काय करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून । 
मज न येती ब्राह्मण । विनोद करिती माझ्या बोला ॥ ३७ ॥ 
श्रीगुरु आणिक शिष्यासी । निरोपिती जा वेगेंसी । 
 बोलावूनि आणी ब्राह्मणांसी । भोजन करा म्हणोनि ॥ ३८ ॥ 
शिष्य गेला धांवत । समस्त ब्राह्मणांतें बोलावीत । 
स्नानें करोनि आले त्वरित । श्रीगुरु-मठाजवळिक ॥ ३९ ॥ 
श्रीगुरु निरोपिती तयांसी । पत्रावळी करा वेगेंसीं । 
जेवा आजि सहकुटुंबेसीं । ब्राह्मण करितो आराधना ॥ ४० ॥ 
चारी सहस्र पत्रावळी । कराव्या तुम्ही तात्काळी । 
उभा होता ब्राह्मण जवळी । त्यासी स्वामी निरोपिती ॥ ४१ ॥ 
या समस्त ब्राह्मणांसी । विनंति करावी तुवां ऐसी । 
तुम्हीं यावें सहकुटुंबेसीं । आपण करितों आराधना ॥ ४२ ॥ 
श्रीगुरुचा निरोप घेऊन । विनवीतसे तो ब्राह्मण । 
 द्विज म्हणती त्यासी हांसोन । काय जेवा म्हणतोस आम्हां ॥ ४३ ॥ 
आम्हां इतुके ब्राह्मणांसी । एकेक शित न ये वांट्यासी । 
आमंत्रण सांगावया न लाजसी । नमस्कारितोसी घडीघडी ॥ ४४ ॥ 
वृद्ध ब्राह्मण ऐसें म्हणती । निंदा न करा श्रीगुरु ऐकती । 
जैसे श्रीगुरु निरोपिती । तैसें बोलतो ब्राह्मण ॥ ४५ ॥ 
हो का बरवें बरवें म्हणती । सकळ पत्रावळी करिती । 
ब्राह्मण श्रीगुरुपूजा त्वरिती । करिता झाला उपचारें ॥ ४६ ॥ 
त्रिकरणपूर्वक करी भक्ति । बरवी केली मंगळारती । 
तेणें श्रीगुरु संतोषती । ठाय घाला म्हणती वेगें ॥ ४७ ॥ 
स्वयंपाक आणूनि आपणाजवळी । ठेवीं म्हणती तये वेळीं । 
आणोनियां तात्काळीं । श्रीगुरुजवळी ठेविला ॥ ४८ ॥ 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आमुचें वस्त्र घेऊनि अन्नासी । 
झांकोनी ठेवीं आम्हांपाशीं । म्हणोनि वस्त्र देती तये वेळी ॥ ४९ ॥ 
झांकिलें वस्त्र अन्नावरी । कमंडलुउदक घेऊनि करीं । 
श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळीं ॥ ५० ॥ 
बोलावूनि म्हणती ब्राह्मणासी । उघडों नको अन्नासी । 
काढूनि नेऊनि समस्तांसी । वाढीं वेगीं म्हणोनियां ॥ ५१ ॥ 
 तूप घालूनि घटांत । ओतूनि घे आणिकांत । 
वाढीं वेगीं ऐसें म्हणत । निरोप देती श्रीगुरु ॥ ५२ ॥ 
ठाय घातले समस्तांसी । वाढीतसे ब्राह्मण परियेंसीं । 
लोक पहाती तटस्थेसीं । महदाश्र्चर्य म्हणताति ॥ ५३ ॥ 
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । वाढोंलागा या द्विजासी । 
आणिक उठिले बहुतेसी । वाढू लागले तये वेळीं ॥ ५४ ॥ 
भरोनि नेती जितुकें अन्न । पुनः मागुती परिपूर्ण । 
घृत भरलें असे पूर्ण । घट ओतूनि नेताति ॥ ५५ ॥ 
वाढिलें समस्त पंक्तीसी । सहपंक्ती श्रीगुरुसी । 
जेविताति अतिहर्षी । द्विजवर पुसतसे ॥ ५६ ॥ 
जों जों मागाल तो पदार्थ । वाढूं वेगें ऐसें म्हणत । 
भागलेति क्षुधाक्रांत । क्षमा करणें म्हणतसे ॥ ५७ ॥ 
घृत असे आपुले करी । वाढीतसे महापुरीं । 
विप्र म्हणती पुरे करी । आकंठवरी जेविलों ॥ ५८ ॥ 
भक्ष्य परमान्न पत्रशाका । ब्राह्मण वाढिताति अनेका । 
शर्करा दधि लवणादिका । अनेकापरी जेविले ॥ ५९ ॥ 
तृप्त जाहलें ब्राह्मण देखा । हस्तप्रक्षालन करिती मुखा । 
उच्छिष्टें काढिती तात्काळिका । आश्र्चर्य म्हणती तये वेळी ॥ ६० ॥ 
तांबूलादि देती समस्तांसी । श्रीगुरु बोलावूनि तयांसी । 
बोलावा म्हणती आपुले कलत्रपुत्रांसी । समस्त येऊनि जेवितील ॥ ६१ ॥ 
आलें विप्रकुळ समस्त । जेवून गेले पंचामृत । 
श्रीगुरु मागुती निरोपित । शूद्रादि ग्रामलोक बोलावा ॥ ६२ ॥ 
त्यांचे स्रियापुत्रांसहित । बोलावी शीघ्र ऐसें म्हणत । 
पाचारितां आले समस्त । जेवूनि गेले तये वेळीं ॥ ६३ ॥ 
 श्रीगुरु पुसती ब्राह्मणांसी । आतां कोण राहिले ग्रामवासी । 
ते सांगती स्वामियासी । अंत्यज आहेति उरले ॥ ६४ ॥ 
बोलावा तया समस्तांसी । अन्न द्यावें वाढून त्यांसी । 
जितुकें मागती तृप्तीसी । तितुकें द्यावें अन्न वेगी ॥ ६५ ॥ 
तेही तृप्त झाले देखा । प्रणिमात्र नाहीं भुका । 
सांगताति श्रीगुरुनायक । डांगोरा पिटा ग्रामांत ॥ ६६ ॥ 
कोणी असती क्षुधाक्रांत । त्यांसी बोलवावें त्वरित । 
ऐसें श्रीगुरु निरोपित । हिंडले ग्रामीं तये वेळीं ॥ ६७ ॥ 
प्राणीमात्र नाहीं उपवासी । सर्व जेवले परियेसीं । 
मग निरोपित त्या द्विजासी । भोजन तुवां करावें ॥ ६८ ॥ 
श्रीगुरुनिरोपें भोजन केलें । मागुती जाऊनि अन्न पाहिलें । 
आपण जितुकें होतें केलें । तितुकें उरलें असे अन्न ॥ ६९ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । घेऊनि जावें अन्न त्वरितेसीं । 
घालावें जळांत जळचरांसी । तृप्त होती तेही जीव ॥ ७० ॥ 
ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्र चारी झाली मिति । 
भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्र्चर्य ॥ ७१ ॥ 
इतुकें झालियावरी । श्रीगुरु त्या द्विजातें पाचारी । 
वर देती दरिद्र दुरी । पुत्रपौत्र होती तुज ॥ ७२ ॥ 
समस्त जाहले तटस्थ । देखिलें अति कौतुक म्हणत । 
अन्न केलें होते किंचित । चारी सहस्र केवीं जेविले ॥ ७३ ॥ 
 एक म्हणती श्रीगुरुकरणीं । स्मरली असेल अन्नपूर्णी । 
अवतारपुरुष असे धणी । श्रीनृशंहसरस्वती ॥ ७४ ॥ 
एक म्हणती अपूर्व देखिलें । पूर्वी कथानक होतें ऐकिलें । 
पांडवाघरी दुर्वास गेले । ऋषेश्र्वरांसमवेत ॥ ७५ ॥ 
सत्वभंग होईल म्हणोन । श्रीकृष्ण आला ठाकून । 
तेणें केलें अन्न पूर्ण । दुसरें आजि देखिलें ॥ ७६ ॥ 
नर दिसतो दंडधारी । सत्य त्रैमूर्ति-अवतारी । 
न कळे महिमा असे अपारी । म्हणती हाचि परब्रह्म ॥ ७७ ॥ 
यातें नर जे म्हणती । ते जाती अधोगतीं । 
वर्णावया नाहीं मति । म्हणती हाचि परब्रह्म ॥ ७८ ॥ 
नव्हे हा जरी ईश्र्वर । केवीं केले अन्नपूर । 
होतें तीन अडीच शेर । चारी सहस्र जेविले केवीं ॥ ७९ ॥ 
अणिक एक नवल झालें । आम्हीं समस्तीं देखिलें । 
प्रेतातें जीव आणिलें । शुष्क काष्ठासी पल्लव ॥ ८० ॥ 
आणिक ऐका याची महिमा । कोणासी देऊं आतां साम्या । 
कुमसीं होता त्रिविक्रमा । त्यासी दाखविलें विश्र्वरुप ॥ ८१ ॥ 
ग्रामांत होती वांझ महिषी । क्षीर काढविलें आपुले भिक्षेसी । 
वेद म्हणविले पतितामुखेंसी । अभिमंत्रितां श्रीगुरुमूर्ती ॥ ८२ ॥ 
आणिक जाहलें एक नवल । कुष्टी आला विप्र केवळ । 
दर्शनमात्रें झाला निर्मळ । आम्हीं देखिलें दृष्टीनें ॥ ८३ ॥ 
विणकरी होता एक भक्त । तयासी दाखविला श्रीपर्वत । 
काशीक्षेत्र क्षण न लागत । एका भक्तासी दाखविलें ॥ ८४ ॥ 
आणिक अपार चरित्रता । अमित असे हो सांगतां । 
क्षितीवरी समस्त दैवतें । तयांचें नव्हे सामर्थ्य ॥ ८५ ॥ 
समस्त देवांतें आराधितां । आलस्यें होय मनकाम्यता । 
दर्शनमात्रें श्रीगुरुनाथा । सकळाभीष्टें होताति ॥ ८६ ॥ 
ऐसें म्हणती विप्रलोक । अपूर्व जाहलें कवतुक । 
ख्याती ऐकती समस्त देख । श्रीगुरुचें चरित्र ॥ ८७ ॥ 
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं । 
याचि निमित्य बहुवसीं । शिष्य जाहले श्रीगुरुचे ॥ ८८ ॥ 
नाना राष्ट्रींचे भक्त येती । श्रीगुरुची सेवा करिती । 
अंतःकरणीं एकचित्तीं । भजणारांसी प्रसन्न ॥ ८९ ॥ 
गंगाधराचा नंदन । सरस्वती विनवी नमून । 
ऐका तुम्ही समस्त जन । भजा भजा हो श्रीगुरुसी ॥ ९० ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
अन्नपूर्तिकद्विजचतुःसहस्रभोजनं नाम 
अष्टात्रिंशत्तमोऽध्यायः ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
 Gurucharitra Adhyay 38 
गुरुचरित्र अध्याय ३८


Custom Search

No comments: