Deviche Navaratra
We celebrate Goddess Devi festival in the month of Aashwin for 10 days.It starts from Ashwin shukla Pratipada to Aashwin shukla Dashmi, which is also called as VijayaLaxmi or Dasara. All these ten days are filled with holy and divine Goddess Power. Many goddess devotees perform different devotional practices in all these ten days. Saptashi Patha, Shri Devi Mahatmya Patha and chanting of Devi stotras and Manatras are always found in their daily devotion. Every day Goddess's pooja is performed with beautiful flowers, Dhoop, deep, ashtagandha, panchamrutam and many other holy things. Many good and precious things, ornaments, Sarees,sweets etc. are offered to Goddess. Thus all these ten days are full of joy, happiness, devotion some customary practices, some family procedures are carried out and thus this festival is celebrated.
देवीचे नवरात्र
देवी महात्म्य ह्या रामबाबा वर्णेकरांनी लिहीलेल्या मराठी ग्रंथांतील बाराव्या अध्यायांत स्वतः देवीने सांगितलेल्या नवरात्रासंबंधी माहितीसह इतर प्रचलित माहिती भाविकांच्यासाठी येथे देण्याचा हा एक प्रयत्न.
सर्व स्त्री-पुरुषांनी हे व्रत करावे.
घटस्थापना
आश्र्विन शुक्ल प्रतिपदेला विधीयुक्त कलश स्थापन करावा. कलशाची पूजा करावी. नंतर पूजानुष्ठानास आरंभ करावा. देवांतीलच देवी अगर अन्नपूर्णेची तीला वेगळ्या आसनावर बसवून नवरात्रांत नऊ दिवस व विजयादशमीसही षोडशोपचारे पूजा करावी. देवी जवळ पीण्याचे पाणी एका भांड्यांत ठेवावे. शंख व घंटा ठेवावी. सर्व दहाही दिवस देवीस सुंदर फुलांची माळ वहावी. साधारणपणे अशी माळ एका छोट्या हुकाला अडकवून देवीच्या डोक्यावर सोडण्याची पद्धतआहे. आदल्या दिवशीची माळ हुकालाच उलटीकरुन अडकवून ठेवावी. नंतर दहा दिवसांच्या निर्माल्यासह या माळांचे विसर्जन करावे.
रोजची पूजा
नित्य षोड्शोपचारे देवीची पूजा करावी. पंचामृती स्नान देवीस नित्य घालावे. सुंदर वस्त्रे देवीस वहावीत. नाना प्रकारची सुंदर फुले, सुगंधी फुले, धूप दिप, हार, वेणी, अष्टगंध, कापूर, गुलाल, बुक्का, शेंदूर आदिसाहित्य पूजेंत वापरावे. सुगंधी उदबत्ती, तुपाचे निरांजन देवीस ओवाळावे. निरांजन, तूपाच्या वाती व तूपाची/तेलाची समई दहा दिवस अखंड देवीजवळ तेवत ठेवावी. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची आरती करावी. देवीस नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना द्यावा.
उपवास
नवरात्रांत तीन दिवस, पांच दिवस, सात दिवस किंवा नऊ दिवस एकभुक्त उपवास करावा. नवरात्रांत इतर दिवशी ज्यांना जमत नसेल त्यांनी निदान आश्र्विन शुद्ध अष्टमीस तरी उपवास करावा.
दहा दिवसांच्या पूजांचे महत्व
प्रतीपदेच्या पूजेचे वैशीष्ठ्य म्हणजे या दिवशी ब्रह्मदेव, विष्णु व शंकर यांनी अंबामातेची केलेली पूजा. याच दिवशी ब्रह्मदेवाने देवीस जागृत केले. युद्धामध्ये अष्टमीस रावणाचा नाश व रामाचा जय होईल असा देवीने वर दिला.
द्वितीयेची पूजा म्हणजे देवीची सर्वश्रेष्ठ अनुसुयेसहीत चौसष्ठ योगिनींची केलेली पूजा होय. देवीच्या कपाळी कस्तुरीचा मळवट व डोक्यावर शेंदूर वाहावा.
तृतीयेला नानाप्रकारच्या शृंगारांनी अष्टभुजा अंबेची पूजा करावी. देवीला नवे वस्त्र, साडीचोळी, केसांत सुंदर वेणी, गळ्यांत सुंदर हार, कंठी, पिवळा पीतांबर असा देवीचा थाट करावा.
चतुर्थदिनी अंबेचे रुप विश्र्वव्यापक मातेचे असते. आपल्या हृदयांत आईविषयी प्रेम, श्रद्धा ठेवून पूजन करणार्या भाविकांस पू्र्ण कृपेने अंबामाता प्रसन्न होऊन त्याचे सर्वप्रकारच्या संकटांतुन तारण करते.
आश्र्विन शुद्ध पंचमीस उपांगललिता व्रत करावे. अर्घ्यपाद्य पूजनाने भवानीची षोडशोपचारे पूजा करावी. रात्री जागरण करुन देवीच्या कथा वाचून, देवीची स्तोत्रे म्हणून देवीचे स्तवन करावे. या सर्व सोहळ्यांत देवीही सहभागी आहे अशी कल्पना करावी.
षष्ठीच्या दिवशी जोगवा मागावा. एका ताम्हणांत तांदूळ, सुपारी घालून पाच घरी जाऊन जोगवा मागावा. गोंधळही घालण्याची पद्धत आहे.
सप्तम दिवशींची पूजा म्हणजे सप्तश्रृंगींची पूजा असते. नाना प्रकारच्या फुलांनी डवरलेल्या सप्तशृंगगडावरील ही देवी भक्तांना संकटांतून मुक्त करते. या दिवशी देवीची पूजा जाईजुई शेवंती व नाना प्रकारच्या सुगंधी फुलांनी करावी. मूळनक्षत्रावर (आश्र्विन शुद्ध सप्तमीस) सरस्वती नावे पूजन. सप्तमीपासून चार दिवस सरस्वती पूजन करावें. लिहीणे, वाचणे किंवा कुठचीही कला अध्ययन करणे. यामुळे त्या त्या विद्यांची पारंगता येतेच शिवाय दुःखाचा नाश होतो.
अष्टमीच्या दिवशी देवीचे रुप मनमोहक अष्टभुजा नारायणीचे असते. अशीही जगन्माता भक्तांना आईच्या मायेने जवळ घेते. चैत्र शुद्ध अष्टमीला कोट्यावधी योगिनींसह देवी भवानी प्रगट झाली. म्हणून अष्टमीला उपवास करावा. नवरात्रांत इतर दिवशी ज्यांना जमत नसेल त्यांनी निदान आश्र्विन शुद्ध अष्टमीस तरी उपवास करावा.
नवव्या दिवशी चंडिकेचे नावे पूजन करावे.
अश्र्विन शुद्ध नवमीच्या दिवशी नऊ दिवसांचे पारणें करावे. देवीच्या नैवेद्यासाठी षड्रसानीयुक्त नाना पक्वाने करावी. देवीला त्यांचा नैवेद्य दाखवावा. सप्तशती जप, नवार्ण मंत्र जप, होम हवनें करावी. ब्राह्मण, सुवासीनी, कुमारीका, गुरु आदिनां भोजन-दक्षिणा देऊन तृप्त करावे. नवमीला पारणे. त्याच दिवशी अपराण्हकाली कूष्मांडफळाचे (कोहळा) बलिदान करावे. आणि कूमारीपूजनही त्याच दिवशी करावें. ब्राह्मणभोजन व कुमारीपूजन करावे. साधारणपणे कुमारी २ ते १० वर्षांपर्यंत निरोगी व व्यंगरहित असावी, कुरुप नसावी.
आणि दहाव्या दिवशी श्रवण नक्षत्री (विजयादशमीस) पूजन करावे. अंबामाता सिंहारुढ होऊन शस्त्रे घेऊन शुंभ-निशुंभ राक्षसांचा नाश करुन सीमोल्लंघन करते. दशमीला शस्त्रे, पुस्तके यांचे पूजन करावे. संध्याकाळी शमीचे पूजन करावे.श्रीरामाने याच दिवशी संध्याकाळी श्रवण नक्षत्रावर शमी पूजन करुन विजय नामाच्या कालामध्ये सर्व कामना पूर्ण करणार्या प्रयाणमुहूर्ती पुष्पक विमानांत बसून ईशान्य दिशेस अयोध्येस प्रयाण केले. विजय नावाचा मुहूर्त म्हणून हया दिवसास विजयादशमी म्हणतात. म्हणून विजयादशमीस सर्वांनी सीमोल्लंघन करावे. कठीण परिस्थितीवर विजय मिळावा म्हणून शमी पूजन करावे. नंतर देवीचे व निर्माल्याचे विसर्जन करावे. देवांमधून पूजेसाठी आसनावर बाजुस काढून ठेवलेल्या देवीस परत देवांमध्ये जागेवर ठेवावे.
१) उपांग ललिता व्रत
आश्र्वि शुद्ध पंचमीच्या देवशी हे व्रत आचरतात. ह्याला काम्यव्रत म्हणतात. स्त्री किंवा पुरुष यांपैकी कोणासही हेआचरता येते. काम्य म्हणजे मनांत काही इच्छा, कामना, वासना ठेवून व्रत आचरणे. ललिता ही या व्रताची देवता आहे. सोन्याच्या किंवा चांदिच्या
कुंकुवाच्या करंड्याचे झांकण हे ललिता देवीचे प्रतिक मानून त्याची पूजाअर्चा केली जाते.
या देवीच्या वर्णनाचा श्र्लोक खालिल प्रमाणे आहे.
नीलकौशेयवसनां हेमाभां कमलासनाम् ।
भक्तानां वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम् ॥
नीलकमळावर बसलेली, नीळे वस्त्र नेसलेली, सोनेरी वर्ण असलेली आणि भक्तानां नेहमी (त्याच्या मनांत असलेल्या इच्छा, कामना पूर्ण करुन) वरदान देणार्या ललिता देवीचे मी चिंतन करतो. देवीची पूजा नेहमी सारखी साधीच असते. ललितादेवीला दुर्वा वाहतात.
प्रसाद, नैवेद्य लाडू, घागरे बनवितात व तेच वाण ब्राह्मणाला देतात.
खालील ओव्यावरुन या व्रतामागील कथेचाही अंदाज येतो.
उपाग ललिता व्रता करि पुरुष स्त्री संगती ।
कथा सुरस वर्णिली बघ पुराणीं स्कंदादिकी ।
व्रताचरण शुक्ल आश्विनही पंचमीच्या दिनीं ।
करोनि जन ते सदा बनत लक्षुमीचे धनी ॥
साकी
गोपति ब्राह्मण लक्ष्मीसाठी घोर काननीं जाई ।
फिरतां फिरतां गोपाकडुनी शोध देवीचा घेई ।
उपांग नगरीं उपांग राजा उपांगललिता पूजी ।
गोपति ब्राह्मण तप आचरितां देवी झाली राजी ॥
दिंडी
देवी बोले मग तया ब्राह्मणाला । भेट सत्वरिं तूं उपांगा नृपाला ।
लाल करंड्याचें माग उपांगाला । घरीं नेवोनि पूजि मग तयाला ।
उपांगाला घेवोनि घरीं आला । मनोभावानें नित्य पूजी त्याला ।
नित्यपूजेनें देवी तृप्त झाली । विपुल संपत्ति तया घरीं झाली ॥
वसंततिलका
देवी कृपाच घडतां जरि हो कुणाला ।
भक्तास अर्पित उपांग सुखें तयाला ।
येणेंपरी पुरवि जी धनकाजिं सिद्धी ।
वंदी उपांगाललिते तुजलाच आधीं ॥
ललितागौरी
बिभिषणाला मदत करण्यासाठी आणि लंकेवर स्वारी करुन
आलेल्या शतमुख रावणाशी युद्ध करण्यास राम आला पण त्याला
शतमुख रावणाला युद्धांत मारण्याचा विश्र्वास नव्हता म्हणून नारदांच्या सांगण्यावरुन रामाने सीतेचे ललितादेवी म्हणून पूजन केले अशी ही एक कथा आहे. त्या योगे ललितागौरी प्रसन्न होऊन तीने हातांत शस्त्रे घेऊन सीतेकरवि शतमुख रावणवध वध केला. सीतेने हा वध आश्र्विन शुद्ध पंचमीलाच केला.
म्हणून ललितागौरीचेही व्रत या दिवशी आचरले जाते. ललितादेवी पीठ देवता पण आहे.
२) महालक्ष्मीपूजन
आश्र्विन शुद्ध सप्तमी किंवा अष्टमी दिवशी हा विधी होतो. हा तीन रात्री चालणारा उत्सव असतो. सरस्वती आवाहनम्, सरस्वती पूजनम् व सरस्वती विसर्जनम्. कोकणस्थ ब्राह्मणांत घागरी फुकंण्याचा कार्यक्रम होतो. ही महालक्ष्मी म्हणजे अष्टादशभुजा महिषासुर मर्दिनीचेच ध्यान, स्वरुप असते. देवीच्या पूजनासाठी तांदळाच्या उकडीची किंवा लोण्याचीही मूर्ती बनवितात. काहीकाही ठिकाणी ती चिकणमातीचीही बनवितात. सायंकाळी देवीची पूजा झाल्यावर अगांत देवीचा संचार झालेली स्त्री-पुरुष घागरी फुंकतात. देवीच्या समोर धूप जळत ठेवलेली शेगडी असते त्या शेगडीवर वरचेवर त्या घागरी धूपवाव्या लागतात. अंगात आलेल्या व्यक्तिला इतर लोक काहीं प्रश्र्ण विचारतात. संचार झालेल्या व्यक्तिला आई म्हणूनच मान देतात.
देवीच्या नवरात्रांतील उपासना
१) काहीकाही भक्त देवीची ठरावीक स्तोत्रे रोज म्हणतात. या स्तोत्रांमधिल कांही स्तोत्रे व त्यांच्या लिंक खालिलप्रमाणे आहेत.
1) ArgalaStotra
2) Pradhanikam Rahasyam
3) Vaikrutikam Rahasyam
4) Moorti Rahasyam
5) Shri Shrisuktam
6) RatriSuktam
7) Shri Kunjika Stotra
8) Shri Durga Kavacha
9) Devyaparadhakshamapan Stotra
२) काही भाविक भक्त रोज ठराविक संख्येचा नवार्ण मंत्राचा जप करतात. रोज एक माळ (एकशे आठ) तरी करावा. एकहजार आठ रोज झाला तर फारच चांगले.
नवार्ण मंत्र:
" ॐ ऐं र्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे "
यांतील ॐ = विश्र्वव्यापक
ऐं = महाकालिचे रुप.
र्हीं = महालक्ष्मीचे रुप
आणि क्लीं = महासरस्वतीचे रुप.
विच्चे = नमस्कार असो.
अर्थात संपूर्ण विश्र्वाला व्यापणार्या सर्व गुणसंपन्न असलेल्या महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीरुपी चामुण्डेला माझा नमस्कार असो.
३) देवीच्या संस्कृत सप्तशतीचाही पाठ काही भाविक भक्त करतअसतात.
Shri Durga SaptaShati (Sanskrit)
४) काही भक्त श्रीदेवीमाहात्म्य या मराठी सप्तशतीचा पाठ करतात. ह्याला काही नियम मर्यादा नसल्याने बहुतेक भक्तांना आपल्या वेळेनुसार सोईनुसार व प्रकृतीमानानुसार या नवरात्र काळांत पाठ करणे सोपे जाते.
ShriDeviMahatmya
5) देवीच्या आरत्या
1) Shri Durga Devichi Aarti
2) NavaratriChi Aarati
याशिवाय बरीचसी महत्वाची देवीस्तोत्रे माझ्या ब्लॉगवर आहेत. त्यांच्या playlists च्या links खालीलप्रमाणे आहेत.
१) Goddess Laxmi
2) Goddess Durga/Devi
3) Goddess Sarswati
सर्व देवी भक्तांना नवरात्रीच्या उत्सवांत देवीच्या शक्तीने भारलेल्या या दहा दिवसांत देवीला उपासनेद्वारे प्रसन्न करुन घेऊन सर्व प्रकारचे सुख, धनधान्य, शांती, समाधान, ऐश्र्वर्य लाभावे व त्यांची भरभराट व्हावी व त्यांच्या आयुष्यांतील सर्व अडचणी दुःखे व त्रास यांचे निराकरण देवीच्या आशिर्वादाने होवो अशी देवी चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
Deviche Navaratra
देवीचे नवरात्र
Custom Search
No comments:
Post a Comment