Sunday, October 11, 2015

Shri Navanath Bhaktisar Adhyay 5 Part 2/2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय ५ भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adyay 5 
I am trying to describe this adhyay 5 shortly. Machchhindra was on his way to visit Baramalhar temple. In a village in the forest he was resting in a temple at night. Where he came to know that some ghosts were moving around here and there. He thought that he should make use of these ghosts and their power in his endeavor to benefit the people. Hence he used the Sparshastra uttered mantra and thrown vibhuti on the ghosts. Because of the Sparshastra ghosts were fixed to the ground and could not move. The king of ghosts, Vetala came to know about this and came to fight with Machchhindra. Vetala and his captions were very powerful. However they were defeated by Machchhindra . He they asked Vetala and ghosts to be helpful to the people who will chant a mantra in their name or read this adhyay or have this book in their house. In the next adhyay Mchchhindra will meet Kalika Bhavani and there will also be a war which is described in there as written by Dhundi sut Maluji from Narahari family.


श्रीनवनाथभक्तिसार अध्याय पांचवा ( ५ ) भाग २/२

परी भोंवतें आहे वज्रास्त्र । तेंचि गिळूनि गेला मुखपात्र ।
हें मच्छिंद्र पाहता अति विचित्र । वासवास्त्र सोडीतसे ॥ ८१ ॥
वासवास्त्र होतां प्रगट । उभयतांची झाली झगट । 
जैसे जेठी लागूनि येत पाठ । लोंबी झोंबी खवळले ॥ ८२ ॥ 
एकमेकां महीं पाडिती । तेणें दणाणा उठे क्षितीं ।
अष्टसमुद्र हेलावती । खळबळती नक्षत्रें पै ॥ ८३ ॥
शेषमस्तकें हेलावती । कूर्म म्हणे त्या अति अद्भुती । 
वराह सांवरुनि नेटे दंती । महीलागी उचलीतसे ॥ ८४ ॥
येरीकडे सप्तजन । कवळूं पाहती मच्छिंद्राचे चरणीं ।
कीं चरणीं धरुनि महीकारण । मच्छिंद्रनाथ आकळावा ॥ ८५ ॥
परी तो नाथ अति चपळ । पुनः वज्रास्त्र सिद्ध केले सबळ ।
दाही दिशा रक्षपाळ । ऐसें वज्रास्त्र मिरविलें ॥ ८६ ॥
यावरी तो दानवास्त्र जल्पून । दानव केले सप्त निर्माण ।
मधु तिल कुंभकर्ण । मरु आणि मालीमल ॥ ८७ ॥
मुचकुंद त्रिपुर बळजेठी । ऐसी सप्तदानवहाटी ।
साती देवतें बळजेठी । लोंबी झोंबी पातले ॥ ८८ ॥
झोटिंगातें मधु झगटे । खेळताती कुंभक नेटें । 
बाबरातें कुंभकर्ण लोटे । झोटधरणी झगडती ॥ ८९ ॥
म्हंमदालागीं मरु भिडत । मालीमल मुंज्यातें आल्हाटीत ।
म्हैसासुर अति मुचकुंद उन्मत्त । त्यातें भिडतसे ॥ ९० ॥
धुळोवान वीर समर्थ । त्रिपुर झगटे तया निरत । 
ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य । सप्तजन आल्हाटिले ॥ ९१ ॥
ऐसे भिडतां अष्टजन । महीं उठला अति दणाण ।
एकमेकां महीकारण । आकळावया ते जल्पीती ॥ ९२ ॥
एक दिन एक रात्री । साती जया न विश्रांती । 
लाथा केवड हुमण्या देती । वर्मावर्मी जाणूनिया ॥ ९३ ॥
तेणेंकरुनि प्रहार भेदीत । भेदितां देह विकळ होत । 
मुष्टिप्रहारें मूर्छित होत । महीं तडती आदळोनि ॥ ९४ ॥
मग साती जणें दानवास्त्र । भिडतां केले त्या जर्जर । 
मग सप्त दानव अदृश्यवर । होते झाले एकसरें ॥ ९५ ॥
येरीकडे वासवशक्ती । भिडतां प्रेमें वेताळाप्रती । 
तों संधान पाहूनि हृदयस्थिती । वासवशक्ती भेदीतसे ॥ ९६ ॥
तेणें घायें अति सबळ । मूर्छित पडला वेताळ ।
महीं पडतां उतावेळ । अदृश्य झाली शक्ती ते ॥ ९७ ॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ । वाताकर्षणविद्या जल्पत । 
तों सांवरोनि वेताळ मूर्छित । पुनरपि आला त्वरेनें ॥ ९८ ॥
येतां येतां सातीजणीं । लगट करिती निकट येऊनि ।
तो सिद्धप्रयोग वाताकर्षणी । मच्छिंद्राचा झालासे ॥ ९९ ॥
सिद्धप्रयोग होतां नीती । संचारतो अष्टदेहांप्रती ।
तेणेंकरुनि वातगती । आकर्षण होतसे ॥ १०० ॥
जंव जंव आकर्षणवात होत । तंव हस्तपादांचे चलन राहत ।
परम क्लेश उचंबळत । मूर्छाशक्ती मिरवावया ॥ १०१ ॥
ऐसी होतांचि अष्टमावृत्ति । मग एकमेकांप्रती बोलती ।
आतां आसडूनि अहंवृत्ति । शरण वेगीं रिघावे ॥ १०२ ॥
नातरी जोगी आहे कठिण । भूतांसह आपुला घेईल प्राण ।
तरी यातें प्रसन्न करुन । जगामाजी नांदावें ॥ १०३ ॥     
उपरी जीवलिया संगोपन । आश्रय होईल हा एक ॥ १०३ ॥जैसें रामप्रसादेंकरुन । लंकाराणीव बिभीषण ।
की वालीचे कृतीनें । राज्यीं मिरवला सुग्रीव ॥ १०४ ॥
तन्न्यायें येथे करुन । वांचवावा आपुला प्राण ।
उपरी जीवलिया संगोपन । आश्रय होईल हा एक ॥ १०५ ॥
जैसा दरिद्रियाला परिस । कीं चिंतामणी चिंतित्यास ।
कीं पीयुष लाभे रोगियास । तैसे होईल आपणासी ॥ १०६ ॥
कीं प्रल्हादाचें नरसिंह दैवत । संकटी झालें साह्यवंत ।
तन्न्यायें आजही प्रीत । वाढवावी महाराजा ॥ १०७ ॥
ऐसें बोलूनि एकमेकां । निश्र्चय करुनि नेटका ।
म्हणती महाराजा तपोनायका । सीमा झाली प्रतापा ॥ १०८ ॥
तन्न्यायें सर्वज्ञमूर्ती । सोडवीं आम्हां क्लेशपद्धती । 
क्रोधानळें प्राणआहुती । योजू नको महाराजा ॥ १०९ ॥
तरी आतां अनन्य शरण । आहोंत आमुचा वाचवा प्राण ।
जैसें कचा शुक्रें दान । संजीवनीचें पैं केले ॥ ११० ॥
तूं प्रत्यक्ष अससी नारायण । हें नेणोनि रळी तुजकारण ।
केली परी उचित धन । प्राप्त झालें सध्याचि ॥ १११ ॥
जैसा जटायु आणि संपाती । प्रताप दावू गेले गभस्ती ।
परी भोगदशाप्राप्ती । सध्यांचि झाली लाभावरी ॥ ११२ ॥
तन्न्यायें येथें झालें । तरी कृपेचीं बसवीं पाउलें ।
चलनवलन अवघोचि राहिलें । बोलणें उरलें सांगावया ॥ ११३ ॥
आतां क्षणैक करिसी आळस । आम्ही जाऊं परठायास ।
तेणे लाभ तव हस्तास । काय मिरवेल तुजलागीं ॥ ११४ ॥
तरी आमुचा वांचवावा प्राण । मग नाम तुझे मिरवू जगाकारण ।
सांगशील तें कार्य करुन । भूतांसहित येऊं कीं ॥ ११५ ॥
कीं यमें पाळिले यमदूत । किंवा विष्णु पुढें विष्णुगण धांवत ।
तन्न्यायें आम्ही भूतांसहित । तुजपुढें मिरवूं कीं ॥ ११६ ॥
हें जरी म्हणशील खोटें । तरी पूर्वजां बुडवू नरककपाटें ।
आणि पंचपातकें महानेटें । निजमस्तकीं मिरवू कीं ॥ ११७ ॥
गोहत्यारी ब्रह्महत्यारी । स्त्रीहत्यारी बाळहत्यारी ।
मातृपितृगुरुहत्यारी । पंचपातकें मस्तकीं मिरवू कीं ॥ ११८ ॥
ऐशीं पातकें रौरव क्षितीं । भोग मिरवू संवत्सरअयूती ।
यातें साक्ष चित्रगुप्ती । लीनमुखपदा मिरवू कां ॥ ११९ ॥
ऐसे आमुचे बोल निश्र्चित । काया वाचा धरुनि निश्र्चित । 
तरी आतां होई कृपावंत । दयालहरी मिरवावी ॥ १२० ॥
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । साबरीविद्या मम कवित्व ।
त्यातें साह्य भूतांसहित । कार्यार्थी तुम्ही असावें ॥ १२१ ॥
जो जो मंत्र जया प्रकरणीं । तरी त्या अर्थी तुम्ही वर्तोनी ।
साह्य करावें मंत्रालागुनी । कोणीतरी घोकिलिया ॥ १२२ ॥
मग अष्टही म्हणती अवश्य । कार्य करुं निःसंशयास । 
मग साधनप्रयोग आपुला भक्ष । पृथक पृथक सांगितला ॥ १२३ ॥
अष्टकोटी भूतावळीसहित । भक्षसाधन सांगितलें समस्त ।
येणें पंथें कार्य जगांत । निश्र्चयें आम्ही मिरवू कीं ॥ १२४ ॥
पूजा पुरस्कर अभ्युत्थान । मंत्रासहित निर्वाण । 
मंत्र उजळला स्थापूनि ग्रहण । पर्वणीतें नेमिलें ॥ १२५ ॥
ऐसा निश्र्चय सांग होतां । मग बळें प्रेरकास्त्र प्रेरितां ।
समूळ नासूनि गेली वार्ता । आकर्षण अस्त्राची ॥ १२६ ॥
येरीकडे अष्टकोटी भुतावळ । जोगिणी इत्यादि सकळ ।
स्पर्शू  पाहती चरणकमळ । महीं व्यक्त होऊनिया ॥ १२७ ॥
तेव्हां जल्पूनि विमुक्तास्त्र । मुक्त केले पिशाच सर्वत्र ।
मग मच्छिंद्रपद नमूनि पवित्र । सन्मुख उभे राहती ॥ १२८ ॥
बद्धांजुळी उभय कर । उभे असती ते समोर । 
वाणी वदले जयजयकार । धन्य मच्छिंद्र म्हणोनी ॥ १२९ ॥
मग त्या मंडळींत मच्छिंद्र । कैसा शोभला मूर्तिमंत । 
जेवीं नक्षत्रांमाजी तेजोमंत । शशिनाथ मिरवला ॥ १३० ॥
कीं रश्मिपालमंडळांत । तेजें गहिंवरला प्रभे आदित्य ।
कीं सुरवरगणी शचीनाथ । स्वर्गामध्यें मिरवला ॥ १३१ ॥
कीं शिवगण समुदायीं । परम शोभत नगजावई ।
कीं विष्णुगुणांत शेषशायी । प्रभुत्वपणीं मिरवला ॥ १३२ ॥
कीं दानवांमाजी उशमनामूर्ती । कीं देवामाजी बृहस्पती ।
कीं पूतनेमाजी ऐरावती । देवांगणीं मिरवितसे ॥ १३३ ॥
तेवीं पिशाचमंडळांत । परम शोभला मच्छिंद्रनाथ ।
मग सकळांच्या मस्तकीं ठेवूनि हात । म्हणे क्षेमवंत असावे ॥ १३४ ॥
अष्टजण मुख्य नायक । ते बोलति बोलावून सकळिक ।
कीं मच्छिंद्र कार्य श्लोक । जनउपकारा वदला असे ॥ १३५ ॥
तरी त्याचा धाक कोणी । तया साह्य पिशाच असावें येऊनी ।
सांगितलें याचें कार्य द्या करुनि । मंत्रोच्चार होतांचि ॥ १३६ ॥
ऐसें ऐकोनियां भूतें । अवश्य म्हणती जोडोनि हात ।
यावरी बोले मच्छिंद्रनाथ । आणिक वर मज द्यावा ॥ १३७ ॥
तुमचें आमुचें समरांगण । झाले सबळ बळेंकरुन । 
त्या समरांगणाचें कथन । लोकीं ऐसें मिरविलें ॥ १३८ ॥
तरी तें आख्यान वाचितां । तया न करावी बाधा सर्वथा ।
आणि हें आख्यान संग्रहीं पाळितां । प्रिय मानावा तो पुरुष ॥ १३९ ॥
त्यासी जरी संकट येतां । निवारण करावें तुम्हीं सर्वथा ।
आणि आपुलेकडूनि सहसा व्यथा । जाणूनि त्या पुरुषा करुं नये ॥ १४० ॥
हें आख्यान राहे जया सदनीं । तेथें बसूं नये सहसा भूतांनीं ।
जैसे भाद्रपदशुद्ध चतुर्थीदिनीं । चंद्रालागीं न देखती ॥ १४१ ॥
कीं अविंध जेवीं का सूकर । कीं श्वान मानिती अशुद्ध विप्र ।
तेवीं तें मानूनि सर्वत्र । दूरदेशा असावें ॥ १४२ ॥
ऐसें आणूनि चित्तीं । तें सदन स्पर्शू नये भूतीं ।
अस्पर्श होतां व्यथा किंचित । होणार नाहीं भूतांची ॥ १४३ ॥
यावरी प्रशस्तपणें राहून । जरी त्या सदना आलें विघ्न ।
तयाचें करावें निवारण । सकळ भूतें मिळोनियां ॥ १४४ ॥
आणि तया घरचें मनुष्य व्यर्थ । जरी भेटलें जातां मार्गांत ।
तरी मार्ग सोडूनी निश्र्चित । दूर मार्गी बैसावें ॥ १४५ ॥
हें आख्यान जो पाळिता । त्यासी कदाकाळीं न करावी व्यथा । 
हेंचि द्यावें मज सर्वथा । कृपा करुनि सर्वानीं  ॥ १४६ ॥
ऐसी ऐकूनि मच्छिंद्रउक्ती । अवश्य करुं सकळ म्हणती ।
त्या सदनातें व्यथा निश्चितीं । आम्ही न करुं सहसाही ॥ १४७ ॥
ऐसे वदूनि वरदभूत । नमिता झाला मच्छिंद्रनाथ । 
सर्व नमूनि पुसून त्यातें । स्वस्थानें चालिले ॥ १४८ ॥
अष्टकोटी पिशाचांसहित । अष्ट विराजे मुख्य दैवत ।
तेही नमूनि मच्छिंद्राप्रत । स्वस्थानासी पै गेले ॥ १४९ ॥
येरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर । पाहता झाला बारामल्हार ।
तेथीचा विधी करुनि सर्व । कुमारी दैवतीं चालिला ॥ १५० ॥
तैसीच पावे कालिका भवानी । ते कथा पावेल मच्छिंद्रालागुनी ।
ते पुढिले अध्यायीं अवधान देऊनि । कथा श्रोते स्वीकारा ॥ १५१ ॥
अहो ह्या कथासारग्रंथास । परिकर पंचम अध्याय घोकिल्यास । 
पिशाचबाधा तयासी खास । होणार नाही सहसाही ॥ १५२ ॥
जरी पहिली बाधा असेल । तरी पठण करितां जाईल ।
प्रथम अध्याय जो घोकील । त्याचा अंगरोग जाईल कीं ॥ १५३ ॥
दुसरा अध्याय घोकिल्यापासून । विद्याभ्यास होईल पूर्ण ।
तिसरा अध्याय घोकितां प्रसन्न । होईल अंजनीसुत तयांतें ॥ १५४ ॥
चवथा अध्याय घोकिता फळ । कार्य निवटील परम सकळ ।
मान्यता देईल महीपाळ । मौन पडेल सर्वांतें ॥ १५५ ॥
असो ऐसे पंचम प्रसंग । मंत्रसंजीवनी अनुराग । 
धुंडीसुत मालूजी सांगे । वदे नरहरिकृपेकरुनियां ॥ १५६ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । पंचमाध्याय गोड हा ॥ १५७ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ 
श्रीनवनाथभक्तिसार पंचमोध्याय संपूर्ण ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 5 
श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय ५



Custom Search

No comments: